Tuesday, March 1, 2011

एक झोका अन प्रणयाचा एक मोका.


“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.

शारदेचं लग्न एका डॉक्टर बरोबर झालं.ती त्याच्या बरोबर सौदीअरेबियात गेली.तिला भारत सोडून जायला बरं वाटत होतं.त्याची काही कारणं असली तरी शरदपासून दूर जाणार आहे ह्यात तिला आनंद होत होता.
दिनेश डॉक्टर म्हणून सौदीअरेबियातल्या एका मोठ्या हॉस्पिटलात नोकरी करण्यासाठी गेला होता.भरगच्च पगाराची नोकरी होती.सुरवातीला शारदा तिकडे रहायला खूश होती.पण जस जसे दिवस जायला लागले तस तसे तिला घरी एकटेपण जाणवायला लागलं.दिनेश दिवसभर कामावर असल्याने त्याचा वेळ जात होता.

शारदा, नंतर एकटीच खरेदी करायला बाहेर पडायची.पण बाहेर प्रचंड उष्मा आणि बायकांना बुरखा घातल्या शिवाय बाहेर फिरता येत नव्हतं हे तिला फारच जाचायला लागलं.भारतात परत जाऊन आपण एखादं लहानसं हॉस्पिटल काढावं असा प्रस्ताव तिने दिनेश समोर ठेवला.दिनेशला ते मान्य झालं.दिनेश आणि शारदा तशी घरची बरीच श्रीमंत होती.त्यामुळे त्यांना ते सहजच जमून आलं.

कोकणात असताना शारदाचं आणि शरदचं चांगलंच जमलं होतं.आम्ही म्हणायचो की ती शरदशीच लग्न करून संसार करणार.
“लग्न वरती ठरत असतात.आपल्या हातात काही नाही.”
असं दिनेशशी लग्न झाल्यावर एकदा शारदा मला म्हणाल्याचं आठवतं.शरदच्या संबंधाने ती म्हणत होती ते मला कळायला वेळ लागला नाही.शरदचं मात्र लग्न झालंच नाही.शारदेला हे माहित होतं.तिच्या लग्नालाही तो आला होता. नंतर कधीतरी तिला तो घरी भेटून जायचा.

असंच एकदा मी शारदेकडे तिला भेटायला गेलो होतो. तेव्हा शरद गेल्याची वाईट बातमी मला तिने सांगीतली होती. तिच्या घराच्या बाहेरच्या खोलीत एक झोपाळा होता. त्यावर आम्ही दोघं बसलो होतो.जुन्या आठवणी काढून ती माझ्याशी गप्पा मारत बसली होती.
“खूप दिवसानी मी झोपाळ्यावर बसलो आहे.लहानपणी झुल्यावर बसून खूप उंच उंच झोके घेतले ते आठवायला लागलं आहे.”
असं मी तिला म्हणताच मला म्हणाली,
“झोपाळ्यावर झोके घेतल्याचं कुणाला आठवत नसावं?.तुम्ही लहान असताना एखाद्या झोक्यावर कदाचीत तुमच्या बाबांनी किंवा आईने तुम्हाला झोके दिले असतील,मोठ्या बहिणीने किंवा तुमच्या भावाने तुम्हाला झोपाळ्यावर बसवून उंच झोके दिले असतील किंवा कदाचीत स्वतः तुमच्या तुम्ही झोके घेतले असतील.सुरवातीला एकट्याने झोके घेताना तुम्ही थोडे घाबरूनही गेला असाल किंवा नसालही.
“फार उंच झोके घेऊं नकोस”
उंच झोके घेताना पडायला होईल आणि लागेल म्हणून तुमच्या आईने तुम्हाला सांगीतलेही असेल.”
शारदेला पण तिच्या लहानपणची आठवण येऊन मला ती झुल्याबद्दल सांगत होती.

“कसंही झालं तरी झोके घेत असताना परतीच्या झोक्याने तुमच्या तोंडावरून जाणार्‍या वार्‍याने होणारा आनंद,तसंच, असं होत असताना विस्कळीत होऊन उडणारे तुमच्या डोक्यावरचे केस भुरभूरताना होणारा आनंद विरळाच म्हणायला हवा.झोका उंच उंच आकाशात जाण्यासाठी झोपाळ्याला दिला गेलेला बळाचा वापर कसा होत होता हेही त्यावेळी तुमच्या नक्कीच लक्षात येत असावं.”
मला पण झुला किती आवडायचा ते माझ्या कल्पनेतून मी शारदेला सांगत होतो.
आणि पुढे तिला म्हणालो,
“खेळाची मैदानं,पार्कस,झाडाच्या मोठ्या फांद्या,वडाच्या पारंब्या ह्या झोका घेण्याच्या अशाच काहीश्या जागा असल्याने तुमच्या बाळपणापासून तुम्ही त्याचा आनंद घेत वाढत असता.तुम्ही त्यातून वाढत असता म्हणजेच तुम्ही त्यातून बाहेरही पडत असता.तुम्ही बाहेर पडत असता कारण तुम्ही मोठे होत असता आणि तसं तुमच्या मनातही म्हणत असता.”

“पण हे म्हणणं काही खरं नाही.”
मला मधेच अडवीत शारदा मला म्हणाली.आणि पुढे सांगू लागली,
“झोके घेणं म्हणजेच जीवनातली अगदी साध्यातली साधी मजा करणं.झोके घेण्याच्या आनंदातून परागंदा व्हायला काहीच कारण असूं नये.
माझ्यासाठी मात्र माझ्या कुमारी-वयातल्या साठून राहिलेल्या स्मृती, झोपाळ्याशी निगडित आहेत.माझ्या मनात असलेला माझा प्रियकर-शरद- ज्याच्याशी मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रणय केला त्या झोपाळ्याला संबोधून आमचा प्रणय होत होता.शरदच्या घराच्या मागच्या पोरसात असलेल्या झोपाळ्या जवळ आम्ही कित्येक वेळा भेटत असूं.कधी कधी आमच्याबरोबर आमच्या आणखी मित्र-मैत्रीणी असायच्या.काहीवेळा आम्ही फक्त दोघंच असायचो.”

नकळत झोपाळ्याचा विषय काढला गेल्याने, शरद गेल्याचं मनात आणून,लहानपणीच्या आठवणी येऊन शारदा बोलत आहे हे मी तेव्हाच ताडलं.
“आम्ही जसे मोठे होत गेलो तसे जीवन आणि प्रेम ह्यावर आमचं दोघाचं खोलवर बोलणं ह्या ठिकाणी व्ह्यायचं.
कधी कधी शाळेतल्या अगदी अर्थशून्य गोष्टीवर आमची चर्चा व्हायची.”
मला शारदा सांगत होती.
“जास्तीत जास्त उंच झोका घेण्यापासूनच्या स्पर्धेपासून,झुल्यानेच आम्हाला हवं तसं हिंदोळत ठेवावं अश्या दोलायमान मनस्थितीपर्यंत आम्ही असायचो.
त्यावेळी झुला,माझ्या बालिश आनंदापलीकडे, माझ्या अंतराचा एक भाग झाला होता.

माझ्या प्रणयाच्या सुरवातीचा,मध्य आणि अखेरच्या अवस्थेचं प्रतीक म्हणजे हा झुलाच होय.आमचा प्रणय त्या झुल्यासारखाच होता असं तुम्ही म्हणाल, असा मी तर्क केला, तरी ते तुमचं म्हणणं मला ऐकायला आवडेल.”

“मला पण तुझ्याकडून आणखी ऐकायला आवडेल.”
असं मी म्हणताच शारदा म्हणाली,
“जसं झुल्याला ढकलतात तसं सुरवातीला आमच्या प्रणयाचं झालं.प्रणयातला खरा आनंद मिळायला ढकलण्यासाठी काहीसं बळ लागलं.पण एकदा त्याची सुरवात झाल्यावर नंतर रुकावट आली नाही.शब्दशः आणि रुपकात्मकतेने नंतर आमच्या उंच भरार्‍या होत होत्या.आम्हाला दोघांना मिळून मजा येत होती आणि आम्ही तरूण-प्रीतीच्या प्रचलतेचे शोध घेत होतो.अखेरीस थोडसं मंदगतीत येऊन नंतर एकाएकी झुल्यावरून उड्याच घ्याव्या लागल्या. शाळेची पुन्हा सुरवात होणार असल्याने हे सगळं थांबवावं लागणार आहे हे आम्हाला माहित झालं होतं.आम्ही गती थोडी मंद करू शकलो
होतो.पण जमिनीवर पाय घासल्याशिवाय ते शक्य नव्हतं.पण नंतर अर्धवट मंदगती झाली असतानाच उडी घेतली. आम्हाला माहित होण्याअगोदरच सर्व संपत आलं होतं, शिवाय त्याला काही इलाज नाही हे ही आम्हाला माहित होतं.
आमची उन्हाळी-सुट्टी संपली होती.पण आमची प्रीत मात्र हिंदोळ्यावर योग्य वेळ साधून बसून होती.”

शारदेचं लग्न होऊन इतकी वर्ष होऊन गेली तरी शरदबद्दलच्या भावना आणि त्याच्या आठवणी शारदेच्या मनात जागृत होत्या.पण आता तो कायमचाच गेल्याने त्या जास्तच उफाळून वर येणं अगदी स्वाभाविक होतं.

“माझ्या मनातलं शेवटचं सांगते”
असं म्हणत मला शारदा म्हणाली,
“त्यानंतर जरी मी आणि तो झुला,दिव्व्या मधून तरून गेलो होतो तरी कुणीही मला त्याचा आनंद उपभोगायला यापूढेही वंचित करू शकणार नाही हे मला माहित होतं.शक्य आहे की,तुम्हाला वाटत असेल त्यापेक्षा मला त्याचं प्रतिनिधित्व जास्त भावतं.
माझ्यासाठी तो झुला माझ्या बालपणाच्या स्मृतिंचं प्रतिनिधित्व करतोच शिवाय माझ्या युवावस्थेत ते थोडं जास्तच करतो.”

मला खरोखरच शारदेची कीव आली मी तिला म्हणालो,
“भूतकाळात गेल्यावर,तू त्या स्मृतिंची निवड केल्यास हा हिंदोळा त्या आठवणींकडे तुला केव्हाही घेऊन जाणारच.मला वाटतं की तुझ्या झुल्यासाठी आणि त्यावर झोके घेण्यासाठी तू कधीही तुला वयस्कर झालीस असं मुळीच वाटून घेऊ नकोस.”

एव्हड्यात खाली गाडीचा हॉर्न वाजल्याचं आम्ही दोघांनी ऐकलं.
“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com