Friday, March 4, 2011

मिष्टान्न आणि मालवणी जेवण.

वसंता शनिवारीच माझ्या घरी येऊन माझ्याकडून खात्री करून गेला की,उद्या रविवारी दुपारी आपण दादरच्या कानविंदेच्या दुर्गाश्रमात जाऊन मालवणी जेवणाचा कार्यक्रम करायचा.मी पण अलीकडे दुर्गाश्रमात गेलो नव्हतो. कानविंद्याची आणि माझी जूनी ओळख.अगदी कोकणात शाळेत शिकत असताना पासूनची आमची मैत्री होती.व्हायचं काय की,मी दुर्गाश्रमात जेवल्यावर माझ्याकडून कानविंदे पैसे घेत नसायचा.मला ते जरा अवघड व्हायचं.म्हणून मी दुर्गाश्रामात जायचं टाळायचो.त्यामुळे परिणाम असा व्हायचा की मला मालवणी जेवण चुकायचं.कधीतरी मालवणी जेवणाची तलफ आली तर मी गिरगावातल्या खोताच्या वाडीतल्या खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला जायचो.

दुर्गाश्रमात काशीनाथ म्हणून एक वयस्कर वाढपी होता.तो पण आमच्या गावचा.मी जेवायला गेल्यावर तो माझी चांगलीच खिदमत ठेवायचा.मला गाववाला म्हणूनच संबोधायचा.मला जरा करपलेला तळलेला मास्याचा तुकडा आवडायचा.पापलेटच्या आमटीतला मास्याच्या शेपटीकडचा तुकडा आवडायचा.बांगड्याच्या तिखल्यातल्या तुकड्याचं पण असंच असायचं.गरम गरम वाफ येणार्‍या भातावर मास्यांची आमटी कालवून जेवायला मला आवडायचं. सोलकडी बरोबर शेवटचा भात जेवताना मात्र मला थंड झालेला भात आवडायचा.अशा बारीक-सारीक गोष्टी कडे तो माझी खिदमत करताना लक्ष द्यायचा.आणि वर,
“काशीनाथा रे! तेंका काय होयां होयां तां बघ रे!”
असं ओरडून गल्ल्यावर बसून ड्रॉवर मधल्या पितळेच्या कपात असलेल्या चिल्लरीचा आवाज करीत कानविंदे त्याला सांगायचा.इतकी बडदास करून झाल्यावर जेवण मोफत जेवायला मला कसंसंच व्हायचं.एक दोनदा मी कानविंद्याला समजावून पण सांगीतलं.
“अहो,कानविंदे हा तुमचा धंदा आहे.धंद्यात मित्र वगैरे कोणी नसतं.”
“तां तुम्ही माका सांगू नका.धंदो काय तो माका ठावक आसा. तुमच्या जेवणाचे पैसे घेओन मी काय बंगलो बांधतलंय नाय”
असं टिपीकल मालवणी शब्दात आणि हेळ्यात बोलून मलाच गप्प करायचा.

वसंताबरोबर जाण्यात माझा हाही एक उद्देश होता.पैसे मी देओ नाही तर वसंता देओ कानविंदे वसंताकडून पैसे स्वीकार करायचा.
ह्यावेळच्या जेवणात काशीनाथने आमची विशेष बडदास्त ठेवली होती.त्याला माहित होतं की मला मास्यांत सर्वात बांगडे जास्त आवडतात.
“आज सगळा बांगड्याचा जेवण आसां”
काशीनाथ मला पहाताच म्हणाला.
“बांगड्याचा तिखलां,बांगड्याची शाक,बांगड्याची आमटी आणि तळलेलो बांगड्याचो तुकडो.आणि सोलाची कडी.”
काशीनाथने आपलं मनातलं मेनुकार्ड वाचून दाखवलं.
खरंतर वसंता अट्टल गोड खाणारा.
“आमका सगळां होयां”
असं वसंताने नबोलता हाताच्या भाषेत काशीनाथला सांगीतलं.

मी आणि वसंता पोटभर जेवलो.बाहेर भय्याकडून दोन मसालापानं तोंडात कोंबून टॅक्सीत जाऊन बसलो.
“जुहू चलो”
असं वसंता ड्राईव्हरला म्हणाला.जुहूला जाण्यात वसंताच्या मनात काय होतं ते मला जुहूला बास्किन-रॉबीन्सच्या जवळ टॅक्सी थांबवल्यावर लक्षात आलं.
“अरे आपण आत्ताच मास्यांचं जेवण जेवलो आता आइस्क्रीम?”
असा मी त्याला प्रश्न केल्यावर,टॅक्सीचे पैसे देता देता मला म्हणाला,
“नंतर सगळं सांगतो.”

चॉकलेट आइस्क्रीमच्या मोठ्या डीश ऑर्डर करून झाल्यावर मला म्हणाला,
“कुठेही मला जेवण झाल्यानंतर दिल्यागेलेल्या शेवटच्या गोड डीशबद्दल-dessert बद्दल- विशेष वाटतं.दुर्गाश्रामात आइस्क्रीमची अपेक्षा करणं वेडेपणाचं होईल.पण मग मी इथे जुहूला येण्याचा विचार केला.”
नंतर मला म्हणाला,
“माझ्या समोर ठेवलेल्या एक पौंड रंगीबेरंगी चॉकलेटचीप आइसक्रीमचा अर्धा भाग मी फस्त केल्यावरही माझी अनावर होणारी, गोड खाण्याची, तीव्र इच्छा अपूरी राहून उरलेल्या आइस्क्रीमचा फडसा पाडायला प्रचंड उत्सुक असते.माझे गोड खाऊ दात कानात खुखूसायला लागले आणि जीभ लोभस होऊन चळवळ करीत गोड बोलायला लागली की,मग घरात नसलं तर मला बाहेर जाऊन काहीतरी गोड खायाला जाण्याविना गत्यंतरच नसतं.”

“ही तुझी लहानपणापासूनची सवय मला माहित आहे.”
मी वसंताला म्हणालो.

“हो! ही माझी लहानपणापासूनची सवय असल्याने ते ऐकून तुमच्या मनात माझ्या स्थुल प्रकृतीची छाप येऊन जाणं स्वाभाविक आहे.पण मी तसा स्थुल नव्हतो आणि नाही. ह्याचं श्रेय मी माझ्या शरीराच्या चयापचयाला देतो.त्या तसल्या नको असलेल्या आणि येण्याचा संभव असलेल्या, दिवसाचा विचार करायलापण मी धजत नाही की ज्या दिवशी गोड डीश माझ्या खाण्याच्या यादीतून अन्यायपूर्ण मज्जावीत केली जाईल.”

“ती पाळी तुला येण्याचा संभव बराच कमी आहे.त्याचं कारण तू नियमीत व्यायाम घेत असतोस.अर्थात जसं वय होत जातं तसं खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं.किती खातोस त्यापेक्षा काय खातोस हे महत्वाचं ठरत असतं.आणि गोड खाणं बर्‍याच वेळेला काबूत ठेवावं लागतं असं म्हणतात.”
मी वसंताला म्हणालो.

“तू तर गोड खातोस ते षौक म्हणून खातोस.तुझ्याकडून मला ऐकायचं आहे तुझं गोडपूराण.”
त्याचे विचार ऐकण्यासाठी मी वसंताला ट्रिगर दिली.

लगेचच मला म्हणाला,
“मला वाटतं गोड पक्वान्न हे ह्या पृथ्वीतलावरचं एक महत्वाचं अन्न आहे.मला तर,नेहमीच गोड पक्वान्नाच्या थाळीला पाहून आलेला हृदय-धक्का कुठल्याही गोष्टीपेक्षा अमुल्य वाटतो. माझ्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडून,मस्तपैकी थंडगार रस-मलाई ते चॉकलेटी रंगाचे साखरेचा रस शोषून गबदूल झालेले गुलाब-जाम, जे लहानश्या गोल चमच्यात काढून घेताना चमच्याला लागलेला पाघळून खाली भांड्यात पडणारा साखरेचा रस पाहून माझ्या जीभेच्या चवीच्या कोंबाना-बड्सना- इतकं भंडावून सोडतो की जे लोक माझं हे वर्णन ऐकून माझ्या गोडखाऊ वेडाशी सहभागी होत नसतील त्यांना समजावून सांगणं जरा जिकीरीचं आहे असं मला वाटतं.

माझ्या समोर आणून ठेवलेली गोड पक्वान्नाची थाळी आणि त्यातलं गोड पक्वान्न,ज्यांच्या दृष्टीने ते भरपूर वाढलं आहे असं वाटतं, त्यांना,मला अधाशासारखा एका मिनीटात त्याचा फडशा पाडताना पाहून, बरेच वेळा माझ्या गोड मिष्टांन्न खाण्याच्या परिमाणाचा त्यांचा अंदाज साफ चुकलेला असतो असं मला वाटतं.आकाश-मंडळातलं काळं भुयार-ब्लॅक होल-जसं भिंगरणार्‍या असंख्य तार्‍यांना गिळंकृत करून आसमंतात शून्यता आणतं अगदी तसंच माझं पोट रिक्त रहातं. हे माझं अपूर्व लक्षण माझ्या मनावर एव्हडा भार आणतं की,माझ्यावर, आणखी हवं,हवं असं वाटून घायचा तर्क करावा अशी जबरी होते.
माझे मिष्ट दात कधीच समाधान नसतात.अगदी स्पष्ट सांगायचं तर,मला वाटत नाही की मी कधीही मिष्टान्न खाऊन तृप्त झालो आहे अशा निर्णयाला येईन.

मला वाटतं एखादी व्यक्ति सर्व प्रकारच्या व्यापक आमोद-प्रमोदाचा षौक करते,जसं केशर घालून पिवळं जर्द झालेलं फ्रिझमधलं श्रीखंड,बेदाणा, चारोळ्या,पिस्ते घालून घोटून,घोटून केलेली थंडगार बासूंदी,बदाम.पिस्ते असलेलं कसाटा आइस्क्रीम,असल्या गोष्टी पाहून त्या व्यक्तिला वेळेचं आणि ह्या भौतिक जगात आपण रहात असून जीवनाशी निगडीत असलेल्या सर्व समस्यांशी संबंध ठेवून आहोत ह्याचं भान रहात नसावं.”

मला वसंताचं हे गोडपूराण ऐकून एक मुद्दा सुचला.
मी म्हणालो,
“तुझं हे गोडपूराण ऐकून माझ्या मनात असा विचार आला की एखाद्या अशाच गोड पक्वान्नाचा अधाशासारखा स्वाद घेत असताना एखाद्या व्यक्तिला जीवनातल्या समस्यांना सामोरं गेल्यामुळे,जर का खरोखरंच दुःखी आणि उदास वाटत असेल तर त्याला गंभीर स्वरूपाच्या मदतीची जरूरी आहे असं मला वाटतं. ग्लोबल वॉरमिंग,भांडवलशाहीतली आर्थिक मंदी असल्या प्रश्नापासून विरंगुळा मिळायला हा षौक उपयोगी आहे असं मला वाटतं.”

माझं हे ऐकून वसंता बराच खूश झालेला दिसला.मला म्हणाला,
“भरपूर साजूक तूप घालून आणि थोडं दूध घालून,वेलची घातलेला मधूनच मनुका दाढेखाली येतील असा चपचपीत तूपाचा गोड शिरा, दुधात पाव कुसकरून थोडी वेलची आणि साखर घालून वर तांबसर रंग येईपर्यंत अवनमधे चारशे डीग्री तपमानाला ठेवून बेककरून केलेलं खरपूस पावाचं पुडींग,गरम गरम पिवळ्या धमक जिलेब्या आणि रूट-बिअर सिरप वर टाकून केलेलं थंडगार बटर-स्कॉच आइस्क्रीम हे माझे चार फूड-ग्रूप आहेत.दुसरं काही नसलं तरी ह्या अन्नावर मी तग धरून जीवंत रहिन.प्रत्येक रात्री जेवण झाल्यावर गंभीर निर्णय घेताना ह्यातल्या कुठल्या अन्नाचा मी षौक करावा ह्याचा मला विचार करावा लागत असतो.”

बराच वेळ झाला होता.बोलण्याच्या नादात वसंता आणखी एखादी आइस्क्रीमची डिश ऑर्डर करील ह्याची मला भीती वाटत होती आणि तसं होऊ नये म्हणून समारोप करताना मी त्याला म्हणालो,

“वसंता, रोज रात्री तुला असे षौक करून तन्मय व्ह्यायला आवडतं हे उघडच आहे. गोड पक्वान्न हा नुसताच तुझा षौक नाही.संपूर्ण मानवतेला तेव्हड्या काही गोड नसणार्‍या समस्यांपासून क्षणभराची उसंत असण्याची जरूरी असताना हा षौक कामाला येईल असं मला वाटतं.म्हणूनच एखाद्या गोडपक्वान्नाची लज्जत घेतली तर बरं असं तुला वाटत असावं.सतत गोडपक्वान्न खाऊन दिवसातल्या सर्व समस्या सुटतील अशातला प्रकार नाही पण ते गोडपक्वान्न निदान मधुर परमानंद तरी देईल हे खचित असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही.”

घरी परत जाताना मी विचार करू लागलो की एव्हडा गोडखाऊ वसंता, कानविंद्यांच्या दुर्गाश्रमात तिखट,आंबट मास्यांचं जेवण चापून जेवत होता याचा अर्थ हा चवदार मालवणी जेवणाचा असर तर नसावा?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com