Saturday, March 19, 2011

(कटकटीला) जाऊ देणे


संजयचं वय पस्तीसएक असेल.एका मल्टी-नॅशनल कंपनीत एका जबाबदारीच्या जागेवर तो काम करीत असतो.
मला त्या दिवशी म्हणाला,
“हे मल्टी-नॅशनल कंपनी प्रकरण माझा एकदा जीव घेणार आहे.पगार भरपूर देतात पण घाण्याच्या बैलासारखं काम करून घेतात.दिवस नाही,रात्र नाही,घर नाही दार नाही,सेल फोन कानावर आणि लॅपटॉप मांडीवर घेऊन बसावं लागतं.कधी कधी लॅपटॉपवर घरी काम करीत असताना माझा दोन वर्षाचा मुलगा माझ्या मांडीवर बसायला मागतो पण मला त्याची समजूत घालावी लागते.बिचारा नाराज होऊन गेल्यावर माझ्या काळजात कळ येते.”

मला संजयची खूपच कीव आली.
मी म्हणालो,
“तुझं म्हणणं मला एकदम पटतं.अशावेळे कुठेतरी दूर जाऊन काही दिवस रहावं असं वाटत असतं.”

“पण कुठे म्हणून जाणार?.जावं तिथे ही गर्दी.तेच वातावारण,त्याच कामाच्या चर्चा.”
अगदी वैतागून संजय मला म्हणाला.

“मला वाटतं जीवनात कटकटी जास्त वाढायला लागल्या की कुणालाही वाटत असतं की अशा ठिकाणी जाऊन बसावं की सर्व कटकटी जाऊ द्याव्यात.
अशावेळी आयुष्यात थोडी मंदगती आली तरी येऊ द्यावी.”
मी संजयला सहानुभूती देत म्हणालो.
“अगदी,हुबेहूब तुझ्या कामासारखं माझं काम नव्हतं.कदाचीत त्यावेळी मल्टी-नॅशनल नव्हत्या.पण माझं काम संशोधनाचं होतं.अमुकच झालं पाहिजे असा कुणाचा माझ्यावर ताण नव्हता.पण स्वतःचा स्वतःवर कामाचा ताण होता.”

“मग अशावेळी तुम्ही काय करायचा?”
संजयने लागलीच मला प्रश्न केला.
मी म्हणालो,
“अशावेळी निवांत जाऊन रहाण्याची माझी जागा म्हणजे माझ्या आजोबांच्या कोकणातल्या शेतीवरच्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ बांधलेला मांगर.”
“सांगा,सांगा निदान तुमचं ऐकून माझा कामाचा ताण कमी होईल.”
उतावीळ होऊन संजय मला म्हणाला.

मी म्हणालो,
“ऐकतर,ह्या मांगराच्या जवळच एक छोटसं तळं होतं.तळ्याच्या सभोवती मोठमोठी जंगली झाडं होती.लांबच लांब पारंब्या लोम्बत असलेलं एक वडाचं झाड होतं.माझ्या आजोबांनी लावलेली नवीन आंब्यांची कलमं आणि माडाचे कवाथे होते.उंचच उंच पोफळीची आणि माडाची झाडं होती.वारा आला की ह्या झाडांची पानं हलायची.जास्त करून पिंपळाच्या पानांचा सळसळाट जाणवायचा.तळ्याच्या जवळ आजोबांनी एक सिमेंटचा बाक बसायला म्हणून ठेवला होता.त्या बाकावर बसून तळ्यातल्या पाण्याकडे बघत असताना सर्व कसं शांत वाटायचं.मोटार-गाड्यांचा आवाज नाही,टीव्हीचे मोठे आवाज
नाहीत,फोनच्या घंटीचा खणखणाट नाही.

निरनीराळ्या पक्षांचे आवाज,मधूनच कोकिळेची कुहू,कुहू,लांबून येणारा मधूनच घुबडाचा आवाज,हेलिकॉप्टर सारखे दिसणारे लहान लहान भिरमुटे आजुबाजूला उडताना दिसायचे, कधीतरी एखादा रंगीत सरडा सुक्या पाचोळ्यातून झरकन पळत जाऊन जवळच्या झाडाच्या बुंद्यावर चढून बसायचा आणि तळ्यातल्या पाण्यात जरा निरखून पाहिल्यावर एखादा मासा हवेसाठी पाण्यावर उंच उडी घेऊन नंतर त्याने पाण्यात डुबकी मारल्यावर त्याच्याकडून केला जाणारा आवाज हे सर्व पाहून,ऐकून आणि अनुभवून मला त्या वातावरणात चिंब भिजल्या सारखं वाटायचं.

कधीकधी इतकं शांत वातावरण असायचं की तळ्यातल्या पाण्यात डोकावून पाहिल्यावर माझं प्रतिबिंब दिसायचं.सभोवतालच्या झाडांचं प्रतिबिंब दिसायचं.मात्र मधेच एखादं वार्‍यावर तरंगत येणारं सुकलेलं पान पाण्यात पडून शांततेचा भंग करायचं.शांत पाण्यात इवल्याश्या पानाने तरंग उत्पन्न होऊन हे असं व्ह्यायचं हे उघडच आहे.”

“मग अशा जागी तुम्ही सुट्टी घेऊन जात असाल”
अगदी कुतूहलाने संजयने प्रश्न केला.

“अलबत, पंधरा दिवसाची चक्क व्हेकेशन घेऊन मी जायचो.”
असं सांगून पुढे संजयला म्हणालो,
“मला तरी त्यावेळी त्याजागी माझं आयुष्य क्षणभर स्तब्ध झाल्यासारखं भासायचं.त्या शेतावर मला कसलीच कटकट वाटत नसायची.
माझं जीवन क्षणभर स्तब्ध झाल्याचं भासून मला बरं वाटायचं.त्या शेतावर मला कुणाचाही उपद्रव होण्याचा संभव नव्हता. मेंदू शांत असायचा.
माझं ब्लड-प्रेशर खाली जायचं आणि माझ्या मनावरचा ताण नाहीसा व्ह्यायचा.वास्तवापासून दूर राहिल्याने मस्त वाटायचं.हे ठिकाण सहजासहजी सोडून जायला आता मला वेळ नाही असं मी माझं मन वळविण्याच्या प्रयत्नात असायचो. माझ्या आजोबांच्या शेतावर माझा कायाकल्प झाल्यासारखं मला वाटायचं.जीवनात नेहमीच व्यस्त रहाण्यापलीकडे आणखी काहीतरी आहे असं वाटायचं.”

संजय मला म्हणाला,
“मी अनेकाना त्यांच्या मनावर इतका तणाव असलेले पाहिलेत की कशात काही अर्थ नाही अशा अवस्थेला ते आलेले असातात.कधी कधी इतपर्यंत कळायला लागतं की,काही लोकाना वाटत असतं की,ह्यातून दूर जाऊन एखादी अशी जागा पहावी की सर्व काही जाऊ दे असं वाटायला लागावं.”

मी म्हणालो,
“बरेच वेळा संशोधनाचं काम करीत असताना मी बांधला-जखडला गेलेलो आहे असं मला वाटत रहायचं.माझा तणाव मला कधीच सोडून जाणार नाही असं मला वाटत असायचं.इतरांसारखा स्वपनांच्या मागे मी लागलेला असायचो.आणि मी त्यात विलंब केला तर इतर मला टाकून पुढे जातील ह्याची भीती मला वाटत असायची.पण मग माझ्या मलाच आठवण करून द्यावी लागायची की,आजोबांच्या शेतावर जावं.”

संजयला हे ऐकून डोक्यात कल्पना आली. मला म्हणाला,
“मला वाटतं की,बर्‍याच लोकाना, शब्दांत सांगता न येण्यासारखं, सूख कुठे मिळेल ती जागा ठाऊक असते.पहिलं पाऊल टाकून त्या जागी जायला त्यांना जरा कठीण होत असावं,पण एकदा त्याजागी गेल्यावर सूखच तुमची वाट पहात असतं.हवी हवी असलेली विश्रांती शरीराला मिळण्यासाठी तुम्ही पात्र झालेले असता.मलासुद्धा तुम्ही पाहिलेल्या जागेसारखी एखादी जागा शोधून काढावी लागेल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com