Wednesday, March 16, 2011

सुखासाठी घरगुती उपाय


Posted: Thu, 17 Mar 2011 02:28:24 +0000

“माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.”

मला आठवतं एकदा बाळ्या डोंगरे वर्गात हसतो म्हणून आमच्या संस्कृतच्या गुरूजीनी त्याला त्यांचा तास संपेपर्यंत बाकावर उभं रहायची शिक्षा दिली होती.
“मी तुम्हाला नळ-दमयंतीची कथा संस्कृतमधून मराठीत भाषांतर करून सांगत असताना,तू माझ्या वर्गात सतत हसत असतोस त्यामुळे माझं लक्ष केंद्रीत होत नाही.”
असं सागून त्याला एकदा वर्गाच्या बाहेर जा म्हणून सांगीतलं होतं.
ह्यावेळेला त्याला बाकावर उभं रहाण्याची शिक्षा दिली होती.
आमचे संस्कृतचे गुरूजी आमच्या शाळेत नवीन आले होते.त्यामुळे बाळ्याची संवय त्यांना नवीनच होती.
बाळ्या बाकावर उभारून शिक्षा भोगत असताना सुद्धा हसतो म्हणून गुरूजीना त्याचा आणखी राग येत होता.त्याला ते खूप बोलले होते.
“तुला स्वतःची लाज कशी नाही.?इतका कोडगा कसा तू?
असंही बाळ्याला त्यांनी विचारलं होतं.पण बाळ्या हसतच होता.तो गुरूजीना कसलीच प्रतिक्रिया देत नव्हता.

खरं म्हणजे बाळ्याचा चेहराच हसरा होता.आणि त्याचं मुख्य कारण त्याचे वरचे समोरचे दात जरा पुढे होते. त्यामुळे दात दिसून तो हसल्या सारखा वाटायचा.बाळ्या स्वभावाने अगदीच गरीब होता.बिचार्‍याने आमच्या संस्कृत गुरूजींचं एव्हडं बोलणं खाऊन मनाला लावून घेतलं नाही.
नंतर एकदा गुरूजीनी त्याची माफी मागीतली.
“तू हे मला सांगायचं नाही काय?”
असं सांगून गुरूजीने त्याच्यावरच जबाबदारी टाकली.
नंतर कळलं आमच्या गणीताच्या शिक्षकानी बाळ्याची खरी हकीकत संस्कृत शिक्षकाना सांगीतली होती.

हे सगळं सांगण्याचं कारण,त्यादिवशी माझी आणि संजयची हसण्याच्या सवयीवर चर्चा झाली.संजय मात्र खरंच वाक्या- गणीक,शब्दा-गणीक हसत असतो.ती त्याची स्टाईल आहे.
म्हणून मी बाळ्या डोंगर्‍याची गोष्ट संजयला सांगीतली.
मला संजय म्हणाला,
“हास्याला काय म्हणून समजावं? ह्याची अनुभूती वर्णनाच्या पलीकडची आहे.हास्यामुळे पोटात दुखायला लागतं,डोळे पाण्याने भरतात,आणि बरेच वेळा काहीसं डोकंसुद्धा दुखायला लागतं.गालातल्या गालात हसणं, खदखदा हसणं, खीदीखीदी हसणं,फिदीफिदी हसणं आणखी असे अनेक हसण्याचे प्रकार असतील.
ह्या हसण्याच्या प्रकारामुळे होणारे अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे,बघ्यानी,नव्या मित्रानी दिलेली विचीत्र नजरफेक.मला वाटतं हास्य व्यसनकारी आहे.त्याने व्यसनी झालेल्याचं जीवन प्रचंडप्रमाणात बदलण्याचा संभव असतो,असं माझं मत झालं आहे.

मी दुःखी असो,आनंदात असो,उदास असो वा वेडपट झालो असलो तरी त्याची अंतिम परिणीती हास्यात होते. कदाचीत माझ्या भावना अती झाल्याने त्यांचं हास्यात विमोचन होत असावं.किंवा कदाचीत ओल्या जखमेला मलम-पट्टी लावण्य़ाची माझी ही स्वतःची पद्धत असेल.
तुम्हाला, माझ्या हास्याशी परिचय करून द्यायचा झाल्यास मला मी पहिलीत शिकत होतो त्या काळात तुम्हाला घेऊन जावं लागेल.

आमच्या बाई आम्हाला शिकवण्यात गुंग झाल्या असताना मधेच मला एकदम सूं सूं करण्याची तीव्र इच्छा झाली.तसा मी जरा लाजवटच होतो.माझा हात वर करून बाईंचं लक्ष माझ्याकडे वेधण्याचा मी प्रयत्न केला.बाईंचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही.किंवा त्या कदाचीत गोष्ट सांगण्यात इतक्या मग्न झाल्या असाव्यात की तात्पुर्त त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं असावं.पण व्हायचं ते होऊन गेलं.पुढच्याच बाकावर बसलो असल्याने माझ्या डोळ्यातल्या आसवांचा झरा आणि जमिनीवर आलेल्या पाण्याच्या पुराला पाहून त्या माझ्याकडे आकर्षित झाल्या.सहाजीकच माझे कपडे ओले झाले. अपमानीत झालेल्या मला शाळेच्या ऑफीसमधे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला.माझ्या आईला बोलावून घेण्यात आलं. माझ्या आईचं लक्ष जेव्हा माझ्यावर गेलं तेव्हा तिलापण हसूं आवरेना.त्याचवेळेला मला तिने सहजच विचारलं,
“कसा गेला तुझा वर्गात वेळ? तुझ्या कपड्यात तुला पाहून सगळ्यांना तू आवडला असशील नाही काय?”
माझ्या आईचे हे शब्द ऐकून मी ओक्साबोक्सी रडण्यापेक्षा हसायलाच लागलो.माझं “ढोपर खरचटलं” होतं त्यावरची ही मलमपट्टीच होती.रडून दुःखी होण्यापेक्षा मी हसून माझा उरलेला दिवस उज्वलीत केला.

असाच दुसरा प्रसंग माझ्या आठवणीत पक्का राहिला आहे तो म्हणजे जेव्हा मी माझ्या पहिल्याच जॉबला सुरवात करतानाचा.ह्याही वेळी माझ्या हसण्याच्या सवयीने मला माझी शोभा होण्यापासून वाचवलं.सकाळपासून मान वर नकरता काम करीत होतो.
ज्या दुकानात मी काम करीत होतो त्यात गिर्‍हाकाची बरीच वर्दळ असायची.संध्याकाळ झाली होती आणि एक बाई दुकानाच्या मालकाकडे काहीतरी चौकशी करीत होती.मालकाला तिची भाषा समजत नव्हती.मालकाला कुणीतरी सांगीतलं की तिची भाषा मला समजते.मी काम करीत होतो तिथून मला बोलवण्यात आलं.मला मालक म्हणाला,
“ही बाई काय बोलते ते भाषांतर करून मला सांग.”
मला कानडी भाषा अर्धवट येत होती.मी तिला कानडीत विचारायचा प्रयत्न केला.त्या बाईने आपल्या कपाळावर आलेली केसाची बट बोटाने गरगर फिरवून मागे सारली.नंतर आपली मान जराशी तिरपी करून मला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.ती तेलगू भाषेत बोलत होती असं मला वाटलं.आम्ही दोघंही काही क्षण गोंधळलेलो होतो हे निश्चीत.लगेचच आमच्यासकट मालक आणि दुकानतले सर्व जण हसायला लागले.त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.

मला वाटतं हसू संसर्गजन्य असतं,उपचारात्मक असतं,आणि सूचक असतं.मला वाटतं हसण्यामुळे लोक जवळ येतात. दुकानातल्या त्या तेलगू बोलण्यार्‍या बाईचं उदाहरण आहे.हास्याने समस्या सुटायला मदत होते.निदान जीवनातले ताण कमी होतात.मला वाटतं हास्यातून तुम्ही थोडक्या शब्दात बोलता.आपण चालण्यापूर्वी,बोलण्यापूर्वी प्रथम हसायला शिकतो.म्हणून हसण्यावर माझा भरवसा आहे.जखमेवरची ती एक मलमपट्टी आहे.संघर्ष होत असताना हास्य मित्राची भुमिका घेते.सरतेशेवटी सुखासाठी हास्य एक घरगुती उपाय आहे.”

मी संजयला म्हणालो,
“मला हे जर माहित असतं तर मी माझ्या संस्कृत गुरूजीशी बाळ्याची खरी माहिती सांगण्यासाठी अर्धमागाधीत किंवा पाली भाषेत बोललो असतो.तुझ्या कानडी आणि तेलगू घटने सारखं झालं असतं आणि वर्गात तरी मी सर्वांना हसवलं असतं.”
माझं हे ऐकून संजय मात्र त्याच्या स्टाईलमधे हसला.हे काही कमी नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com