Thursday, March 31, 2011

वाचन ज्ञानेंद्रियाद्वारे.



“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.”

बरेच दिवसानी रमेश माझ्या घरी आला होता.कॉलनीत आजुबाजूच्या परिसरात काय काय सुधारणा होत राहिल्या आहेत ह्याची चर्चा होत असताना मला रमेशने एक चांगली बातमी सांगीतली.
मला म्हणाला,
“कॉर्नरवरच्या नव्या बिल्डिंगमधे दुसर्‍या मजल्यावर एक नवीन लाइब्रेरी येणार आहे.त्याचं पुढल्या रविवारी उद्घाटन आहे.”
रमेशला वाचनाचं लहानपणापासून खूपच वेड आहे.त्याच्या घरात एक खोली तर पुस्तकानी भरून गेलेली आहे.नवीन दिसलेलं आणि त्यात स्वारस्य असलेलं पुस्तक दिसलं तर तो लागलीच विकत घेतो.आणि वेळ मिळेल तसा वाचूनही टाकतो.रमेश कुठेही दिसला तरी त्याच्या हातात एखादं पुस्तक असतंच.
लाइब्रेरीच्या उद्घाटना दिवशी आम्ही त्याठिकाणी गेलो होतो.तिथल्यातिथे वाचनासाठी ऐसपैस जागा होती.सर्व रॅक्स नीट रांगेत लावल्या होत्या.आईलमधे भरपूर जागा होती.निरनीराळ्या विषयावर पुस्तकं होती.हे सर्व बघून रमेश खूपच खूश दिसला.
मला म्हणाला,
“माझी सोय झाली.”

घरी आल्यावर आमची पुस्तकाच्या वाचनाविषयी चर्चा झाली मला रमेश म्हणाला,
“पुस्तकाच्या वासाबद्दल मला विशेष वाटतं.एखाद्या पुस्तकाची स्वच्छ,करकरीत पानं,त्यावर येत असलेला शाईचा वास,किंवा एखादा,वाचावा वाचावा वाटणारा,बाहेरून आकर्षक दिसणारा जिज्ञासा वाढवणारा,भरपूर ज्ञान देणारा जूना गौरव ग्रंथ ज्याची पानं वाचून वाचून पिवळट झालेली आहेत,अश्या पुस्तकाचा वास मला आवडतो.”
मला हे रमेशचं जगावेगळं पुस्तकाच्या वासाबद्दलचं सांगणं ऐकून गंमत वाटली.

मी म्हणालो,
“तू सतत पुस्तकं वाचत असल्याने तुझ्या डोक्यात हा पुस्तकाचा वास भरलेला दिसतोय.मी असा विचार करतोय ह्याचं कारण कोकणात आंब्याचे दिवस आले की प्रत्येकाच्या घरात आंब्याची “आडी” घातलेली असते.सुरवातीला आंबे कच्चे असतात.आंबे पिकायला लागले की “आडीतून” घमघमाट यायला सुरवात होते.लाइब्रेरीत गेल्यावर तुला असाच पुस्तकाचा घमघमाट येतो की काय?”

माझं हे ऐकून रमेश हसला.
मला म्हणाला,
“त्याला एक इतिहास आहे.त्यासाठी माझ्या लहानपणी तुम्हाला घेऊन जावं लागेल.
पुस्तकाच्या वासाबद्दल तोपर्यंत विचार केला नव्हता.जेव्हा लहानपणी मी माझ्या एका मित्राबरोबर एका लायब्ररीत काही पुस्तकं वाचायला घरी न्यावीत म्हणून बरीच पुस्तक चाळत बसलो होतो.वाचण्यासारखी बरीचशी पुस्तकं जवळच्या टेबलावर ठेवून माझा मित्र ज्या आईलमधे गेला होता तिकडे जाऊन कुतूहलाने मी त्याच्याकडे पहात होतो.

माझ्या मित्राला इतिहास हा विषय जास्त आवडत असल्याने त्या पुस्तकाच्या सेक्शनमधे तो पुस्तकं चाळत बसला होता.त्याने सुद्धा बरीचशी वाचायला आवडणारी पुस्तकं बाजूला करून माझ्याच टेबलावर जमाकरून ठेवली होती.तो प्रत्येक पूस्तक बाहेरून न्याहाळून झाल्यावर नंतर पहिलं पान उघडून त्यातली समरी वाचून आवडल्यास ते पुस्तक निवडत होता.पुस्तकाचा ढिग करून झाल्यावर मी आणि तो टेबलाजवळ येऊन बसलो होतो.मी त्याच्याकडे लक्ष देऊन पहात होतो.प्रत्येक पुस्तक मधेच उघडून तो ते त्याच्या नाकाकडे नेऊन दीर्घ श्वास घेतल्यावर त्याचा वास घेत होता.
नंतर संध्याकाळी आम्ही दोघे घरी आणलेल्या पुस्तकातून वाचायला कुठचं पुस्तक प्रथम घ्यावं ह्याचा विचार करीत बसलो असताना मला माझ्या मित्राला विचारल्याशिवाय रहावलं नाही.
कधी कधी वाचायला पुस्तकं चाळत असताना,मी त्या पुस्तकाचं डिझाईन,अक्षरांचा आकार आणि पुस्तकाचं कव्हर ह्या बाबत थोडा चोखंदळ असतो.पण पुस्तकाचा वास? त्याचा वास कसा येतो ह्याबद्दल कुणाला पर्वा असावी?
मी म्हणालो,
“तू प्रत्येक पुस्तकाचा वास का घेत होतास?”
तो मला म्हणाला,
“पुस्तक हे एखाद्या ग्लासातल्या वाईन सारखं असतं.पाचही इन्दीय-शक्तीचा वापर करण्याची त्यात प्रक्रिया असते.वाईनने भरलेलं ग्लास नाकाजवळ आणल्यावर येणारा तो कोरडा सुगंध, दिसणारा बरगंडी रंग,फेसातून येणारा कूरकूरा आवाज,थंडगार स्पर्श,जीभेवरून अलगद, टाळ्यापर्यंत जाताना लागणारी चव कशी वाटते,अगदी तसंच.”
पण त्याने मला एक मात्र निक्षून सांगीतलं की पुस्तकाची चव मात्र त्याने कधीही घेतलेली नाही.

एक एक पुस्तक घेऊन त्याने मला तसं करायला सांगीतलं.
मी डोळे मिटून घेतले आणि प्रत्येक पुस्तक उचलून दीर्घ श्वास घेऊन पाहिला.माझ्या जे लक्षात आलं त्याने माझी कुतूहलता वाढली.
प्रथम एका पुस्तकाला उघड उघड जुनकट वास आला.एका पुस्तकाला ताज्या हवेचा वास आला. आणि एकाला एखाद्या खर्चीक पेपराचा वास आला.प्रत्येक पुस्तकाला निरनीराळा वास असला तरी,त्यात लिहिलेलं ज्ञान समजून घेण्यासाठी माझी आतुरता वाढत होती.काहीतरी नवीन ज्ञान मिळेल याची आठवण येऊन भावना उद्दीत्प झाल्या होत्या,स्वच्छ हवेचा झरोका येऊन गेला होता. वाचनाची प्रचंड आतुरता असलेल्या मला पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे जाणारा दरवाजा होता.आणि तो त्या पुस्तकाचा वास त्या मार्गातला एक भाग होता.”

हे सर्व ऐकून मी रमेशला विचारलं,
“अजूनही तू तेच करीत असतोस काय?”
“हो मला ते केल्याशिवाय रहावंत नाही.”
असं सांगून रमेश म्हणाला,
“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.प्रत्येक वेळी मी वाचलेल्या पुस्तकाचा पुढचा चॅप्टर वाचायला बसलो,एखाद्या बूकडेपोमधून नवीन पुस्तक विकत घ्यायला गेलो,किंवा एखाद्या लाइब्रेरीतून पुस्तक आणायला गेलो की त्या साध्याच पण महत्वाच्या प्रबोधनाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आताशा मी पुस्तकाचं नुसतं बाहेरचं कव्हर आणि त्याचं डिझाईन बघत नाही,पानांचा गुळगूळीत स्पर्श घेत नाही,शाईचा वास घेत नाही,पानावरून पोहत जाणार्‍या शब्दांचं बोलणं ऐकत नाही, तर माझ्या नाकात आता पानापानावरचा ज्ञानाचा सुगंध पण शिरल्याशिवाय रहात नाही.”
मला हा रमेशचा ज्ञानेंद्रिया द्वारे वाचन करण्याचा प्रकार ऐकून खूपच गंमत वाटली.

मी त्याला शेवटी म्हणालो,
“तुझं हे सर्व ऐकल्यावर मला जो विचार सुचला तो तुला सांगतो.
पुस्तक नुसतं त्यात लिहिलेल्या आतल्या ज्ञानाची वाचकाबरोबर भागीदारी करीत नाही तर पुस्तक त्या वाचकांना वाचनाच्या प्रवासात असताना त्यांच्या ज्ञानेंद्रियातूनही मार्ग दाखवतं.खरं ना?”

चेहरा अगदी खुलवून मला रमेश म्हणाला,
“वा! ज्ञानेश्वरांना गीता एका वाक्यात कळली असं म्हणतात तसंच काहीसं तुम्ही माझा अनुभव एका वाक्यात मलाच सांगीतला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com