Sunday, March 13, 2011

जीवन एक देणगी.



  • अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
    “नेकी और पुछ,पुछ?”

    नाहीतरी आता वसंत ऋतूला सुरवात व्हायला लागली आहे.बरेच दिवस थंडीला कंटाळून बाहेर फेरफटका टाकायला मिळाला नव्हता.संध्याकाळच्या वेळी एखादा स्वेटर चढवून,सोसण्या एव्हडी थंडी असल्याने,तळ्यावर जायची तलफ आली.
    प्रो.देसायाना फोन करून विचारलं.
    “आज पासून तळ्यावर भेटायचं का?”
    अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
    “नेकी और पुछ,पुछ?”
    हे ऐकल्यावर माझ्या मनात आलं की आज प्रो.देसायांकडून काहीतरी खास ऐकायला मिळणार.आणि तसंच झालं.

    मला भेटल्यावर म्हणाले,
    “मी नेहमीच म्हणत असतो की जीवन ही एक देणगी आहे.जीवनातला येणारा प्रत्येक दिवस,तुम्हाला एक चांगलं पाऊल पूढे टाकण्याची संधी देत असतो.कुठेतरी वाचल्य़ाचं आठवतंय,
    “नकारात्मक दृष्टी ठेऊन रहाणारा तो, की जो येणार्‍या संधीत अडचणी निर्माण करतो आणि सकारात्मक दृष्टीने पहाणारा तो, की जो अडचणीतून संधी निर्माण करतो.”

    मी म्हणालो,
    मला आठवतं माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की,
    “चेहर्‍यावर हसूं ठेवीत शाळेत गेलास आणि एखाद्या पेन्सिलची जरूरी भासल्यास कुठूनही सापडते.एखादी लहानशी गोष्ट सुद्धा तुझ्या चेहर्‍यावर हसूं आणू शकते.मित्रांच्या घोळक्यात केलेला एखादा विनोद किंवा चेहर्‍यावर चांगला भाव प्रदर्शित करून तुझा दिवस प्रफुल्लित होऊ शकतो.”

    “अगदी बरोबर आहे तुमच्या आजोबांचं म्हणणं”
    असं सांगून प्रो.म्हणाले,
    “मला वाटतं ह्या असल्या प्रशंसात्मक,आशाजनक,सकारात्मक प्रवृत्तिमुळे काही ही होऊ शकतं.कारण खरंच काहीही होऊ शकत असतं.तुम्ही कुणाच्या प्रेमात पडू शकता,नवीन मित्र मिळवू शकता,नव्हेतर जग बदलू शकता.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे ते कुणाला ठाऊक आहे?.तेव्हा काहीतरी चांगलं होणार याच्या तयारीत राहिलं पाहिजे.ही खुशी-मजा संसर्गजन्य आहे असं म्हटलं तरी चालेल.उजाडलेल्या नव्या दिवसाचा परिपूर्ण उपयोग करून घेणं ही त्या दिवसाची सुरवात होऊ शकते.तुमच्या आनंदाची भागीदारी कुणाशी केली गेली तर.दुःख आणि उदासीन रहाण्यापासून जगाला वाचवलं गेलं तर काय हरकत आहे?.मानतो मी की हे माझं बोलणं थोडं नाटकी दिसतं,पण त्यात फरक करता येतो.सुरवातीलाच हसतमुख राहिल्याने जगाला दैदिप्यमान करता येतं.”

    “मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगतो”
    असं सांगून मी प्रोफेसराना म्हणालो,
    “मला आठवतं काही वर्षापूर्वी मी माझ्या आजोबांबरोबर रहायला गेलो होतो.माझे आजोबा जातीचे शिकारी होते. छेर्‍याची सिंगल-बार बंदूक घेऊन ते कवड्याची शिकार करायचे.त्यांचा नेम ऊज्जू होता.उडत्या कवड्याला सुद्धा मारायचे.झाडावर बसलेल्या कवड्याला उडून जाण्यासाठी मला टाळ्या मारायला सांगायचे.आणि कवडा फांदीवरून उडाल्यावर, नेम धरून शिकार करायचे.रानात रानडुक्कराची टोळी आली म्हणून गावातले लोक सांगायला
    आल्यावर शिकार करायला त्यांच्या जवळ डबल-बाराची बंदूक होती ती खांद्यावर घेऊन बाहेर पडायचे.मला शिकार करण्यात गोडी वाटावी म्हणून मुद्दाम मला घेऊन जायचे.

    एकदा मला आठवतं त्यांच्या लहानश्या खोलीत मी गेलो होतो.काही कारणाने मी बराचसा उदासीन झालो होतो. समोर एक सोफा होता त्यावर लवंडलो होतो.त्यांच्या खोलीत भिंतीवर लटकवून ठेवलेलं सांबराचं लांब शिंगाचं मुंडकं, खोलीच्या मध्यावर पसरवून ठेवलेलं बिबट्या वाघाचं कातडं, खिडक्यांच्या गजापासून लटकवून ठेवलेले चित्र विचित्र पक्षांच्या भुसा भरून ठेवलेल्या कृति,मधेच भिंतीवर टांगून ठेवलेली डबल बाराची बंदूक ह्या सर्वांकडे कौतूकाने पहात होतो.ते सर्व पाहून माझं कुतूहल जागृत झालं.मला उदासीन झालेला पाहून त्यांना काहीतरी वाटलं असावं.पण मला काही बोलले नाही.काम करत राहिले.

    एकाएकी,नकळत हुबेहूब दिसणारा आणि अनुभूति देणारा एक उंदीर माझ्या अंगावर येऊन पडला.मी किचाळलो.
    कामात व्यग्र असलेले माझे आजोबा,लाल चेहरा करून,हसत हसत जोरात ओरडले,
    “अरे तो नकली उंदीर आहे.”
    असं म्हणून आणखी हसत राहिले.मला पण माझं हसूं आवरत नव्हतं.माझी उदासिनता पार निघून गेली होती.”

    मी पुढचं सांगण्यापूर्वीच प्रोफेसर मला म्हणाले,
    “ह्यातच सकारात्मक रहाण्याची क्षमता असते.”
    आणि पुढे सांगू लागले,
    “आपल्याकडून जमलं तर हीच सोनेरी किरणं जगाला उजळून टाकता येतात.ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रत्येक क्षणाला कृतज्ञ रहावं.कारण कृतज्ञता,संतुष्टता आणते आणि त्यामुळे सकारत्मक व्ह्यायला होतं.
    कुणीतरी म्हटलंय,
    “जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.त्यामुळे जास्त मिळण्यात सांगता होते.पण जर का जे नाही त्याकडे लक्ष केंद्रीत केलं तर संतुष्ट होण्याइतकं कधीच मिळणार नाही. विचार केल्यावर ह्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं.तुम्ही आनंदात असाल तर जग तुमच्याशी आनंदात राहिल.जीवनात ह्याचीच जरूरी असते.”

    मी प्रोफेसराना म्हणालो,
    “थोडक्यात,तुमचं म्हणणं आहे की आनंदी रहा.आनंदात रहा आणि संपूर्ण जीवन जगा.आयुष्य एकदाच मिळतं.बरोबर ना?
    चला तर आता काळोख होत आलाच आहे.आपण निघूया आणि उरलेलं आयुष्य संपूर्ण जगूया. कारण जीवन ही एक देणगी आहे.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrkrishnas@gmail.com