Monday, March 7, 2011

ढगातला खेळ आणि माझे आजोबा.

“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.”

वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्‍हेतर्‍हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा वेळ घालवावा म्हणून माझ्या नातीने मला सुचना केली.

समुद्र म्हणजे मला तरी जीव की प्राण आहे.तासनतास समुद्रावरच्या वाळूत बसून उंच उंच लाटांकडे पहात रहावं.कुठची लाट किती जोरात फुटणार आहे त्याचं मनात भाकीत करून जास्त फेस आणून फुटलेली लाट जास्त मोठी असते असं मनाशी समजावं.पश्चिमेकडचाच समुद्र दिसत असल्याने, सूर्योदय पहाण्याचा योग येत नाही.पण सूर्यास्त काही कमी सूंदर नसतो.सूर्याकडे उघड्या डोळ्यानी बघवतं अशा स्थितीत सूर्यबिंब खूपच अल्हादायक वाटतं.आणि हे बिंब खाली खाली समुद्रात बुडायला जात असताना आपला रंग इतका बदलतं की दुपारचा हा रखरखीत दिसणारा सूर्य मावळतीला इतका सुंदर असेल अशी कल्पनाही करवत नाही.सूर्य रखरखीत आहे तसाच आहे पण हे वेळेचे, वातावरणाचे आणि हवेच्या जाड-पातळ असण्याच्या स्थितीचे खेळ आहेत हे लक्षात आलं तरी,

“मानसीचा चित्रकार तो
मावळतीचे सूर्यफूल ते,सूर्यफूल ते करतो”

ह्या कवितेच्या ओळी आठवून निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडच असं वाटल्याशिवाय रहात नाही.

पण हा झाला खेळ सूर्यफूलाचा.त्यापूर्वी होणारा ढगांचा खेळ खेळायला मला तितकच आवडतं.
माझ्या नातीला हा सूर्यास्ताचा देखावा आवडतोच त्याशिवाय माझ्या सारखाच ढगांचा खेळ खेळायलाही आवडतो. आणि हा ढगांचा खेळ मला माझ्या आजोबांनी शिकवला.आणि मी आता तो ढगातला खेळ माझ्या नातीला शिकवण्याच्या प्रक्रियेत असतो.

माझे आजोबा मला आणि माझ्या भावाला घेऊन वेंगुर्ल्याच्या चौपाटीवर जायचे.चौपाटीवर जायला आमच्या घरून एक तास तरी लागायाचा तेव्हा,
तसंच, खानोलीची घाटी चढून वर गेल्यावर फेसाळ समुद्र दिसायचा.घाटीच्या अगदी उंचीवर पोहोचायला वीस मिनीटं तरी लागायची तेव्हा,
आणि तसंच, आमचा हात धरून शाळेत जायला दहा मिनीटं लागायची तेव्हा,
आमचे आजोबा आमच्याबरोबर ढगांचा खेळ खेळायचे.

धूर सोडणारं आगगाडीचं इंजिन, एखादी मोठी घूस किंवा मोठा कासव पाहायला त्या आकाशातल्या कापसाच्या धुरात मला मुळीच कठीण जात नसायचं.पण माझे अजोबा,वरच्या श्रेणीचा आकार पहायचे.आणि आम्हाला वर्णन करून सांगायचे.
“तो तिचा हात आहे.तिच्या हातात एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू आहे.दिसलं त्या पिल्लाचं शेपूट?”
असा वर आम्हाला प्रश्न करायचे.

असंच एकदा माझी आजी,आजोबा आणि आम्ही दोघे भाऊ, वेंगुल्याहून गोव्याला जात होतो.आमची बस एका माळरानात आल्यावर बंद पडली. आजुबाजूला सगळं उजाड रान होतं.बसच्या ड्राइव्हरने आम्हाला सांगीतलं की दुसरी बस येई तोपर्यंत आम्हाला बाहेर उघड्यावर किंवा बसमधे बसून रहावं लागणार.आजी बसमधे बसली आणि आम्ही आणि आमचे आजोबा बाहेर एका खडकावर जाऊन बसलो.

माझ्या आजोबांनी आकाशात एका ढगात एक मोठा राक्षस पाहिला.त्या राक्षसाचं आमचे आजोबा वर्णन करून सांगत होते.हळू तो राक्षस मोठा होत गेला.त्याचे केस पिंजारायला लागले.पंधरा एक मिनीटात तो राक्षस नाहिसा झाला.फक्त अवघ्या पंधरा मिनीटा नंतर तो आकाशाचा भाग होता तसा मुळीच दिसेना.

पुढे जीवनात माझ्या लक्षात आलं की हे आपलं जीवनसुद्धा आकाशातल्या ढगांच्या रचनेसारखं आहे.माझ्या ध्यानात यायचं की माझा दिवसाचा नित्यक्रम काही वेळेसाठी मुळीच बदलायचा नाही.पण माझे विचार त्या क्रमाच्या पुढच्या भागाबद्दल त्या त्या दिवशी किंवा त्या त्या क्षणाला बदलत रहायचे.

मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.
जेव्हा आकाश पूर्ण ढगाळलेलं असायचं आणि ढगांच्या विचित्र काळसर छटा दिसायच्या त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की जीवन असंच काळकूट्ट आणि घृणित असतं.म्हणून त्यातून लहान-सहान गोष्टी पाहून,चेहर्‍यावर हसू आणायला हवं.सरतेशेवटी सूर्याची किरणं येऊन स्वच्छ प्रकाश दिसून माझा दिवस जोशपूर्ण होणार आहे असं नक्कीच वाटायचं.

ज्या आकाशाला कधीही स्पर्श करता येणार नाही ते सदासर्वकाळ त्याच जागी असणार.अगदी साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते ती म्हणजेच त्या आकाशाकडे पाहून आनंद मिळू शकतो नव्हेतर मिळवता आला पाहिजे.
जीवनातल्या साध्या,सध्या गोष्टी दुर्लक्षीत होतात.वाटत असलेल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे वस्तुनिष्टपणे न पहाता एक पाऊल मागे घ्यावं असं मला वाटतं.आणि आकाशाकडे पाहून एखादं फुलपाखरूं,एखादा ससा किंवा एखादी, कुत्र्याचं पिल्लू हातात घेतलेली, मुलगी पहावी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com