Friday, May 6, 2011

शिलाकी तकिया.

“प्रत्येकाजवळ उशी हवी.अशी उशी की त्या व्यक्तिचा स्वभाव ती उशी प्रतिबिंबित करते.”

शिला खूप दिवसानी बंगलोरहून आपल्या वडीलांना भेटायला म्हणून आली होती. शिलाला बंगलोरमधे कॉलसेंटरवर भरपूर पगाराचा जॉब मिळाला होता.
सुरवातीला दर विकएंडला ती विमानाने मुंबईला यायची.अलीकडे कामाची जबाबदारी वाढल्याने तिच्या खेपा कमी झाल्या होत्या.
ती येणार आहे ते मला तिने इमेलवरून कळवलं होतं.मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.

खूप गप्पा मारल्या.कॉलसेंटरवरच्या कामाची माहिती तिने मला दिली.सिटी-बॅन्कचा अमेरिकेतला खातेदार जेव्हा बॅन्केत फोन करून आपल्या खात्या विषयी काही माहिती विचारतो तेव्हा ती माहिती आम्ही त्याला बंगलोरवरून देतो.तिच माहिती तिकडच्या माणसाकडून द्यायला गेल्यास माहिती देण्यार्‍याचा वेळेचा खर्च आणि बंगलोरहून ती माहिती द्यायला आमच्या वेळेचा खर्च ह्यात पटीने तफावत असते. म्हणून बंगलोरचे हे कॉलसेंटर अमेरिकेतल्या उद्योगांना फारच फायद्याचे होतात.

तिकडच्या माणसाशी बोलताना अमेरिकन ऍक्सेन्टस आम्हाला शिकवले जातात.नावं पण त्याना समजतील अशी सांगावी लागतात.त्यासाठी इकडची कठीण नावं बदलून दुसरी नावं आपल्याला ठेवून घ्यावी लागतात.
“आय यॅम प्रद्युम्न”
ऐवजी
“आय यॅम पॅट”
किंवा
“आय यॅम अद्वैत”
ऐवजी
“आय यॅम ऍन्डी”
पण माझं नाव “शिला” तिकडे प्रचलीत असल्याने मला नाव बदलावं लागलं नाही.

शिलाकडून हे ऐकून मजा येत होती.पण रात्र बरीच झाली होती.मला घरी जायची घाई झाली होती.इतक्यात पावसाची जोरदार सर आली आणि बराच वेळ वाट पाहूनही पाऊस काही काढेना.
शिलाने मला रात्री त्यांच्याच घरी झोपून सकाळी जायला सुचवलं.
दुसरं गत्यंतरच नव्हतं.शिलाने माझा बिछाना घातला.आणि एक उशी ठेवली.मला दोन उशा घेऊन झोपायची सवय असल्याने मी तिला आणखी एक उशी देण्याची विनंती केली. शिला आत गेली आणि हसत हसत माझ्यासाठी दुसरी उशी घेऊन आली.मी तिला हसण्याचं कारण विचारताच मला म्हणाली,
“कधी तुम्ही रागाबरोबर उशीवर गुद्दे मारले आहेत का?तुम्ही एव्हडे नाराज झाला होता आणि तो राग तुम्ही उशीवर कधी काढलात का?
मी केलंय तसं.त्याच उशीकडून मी आरामही घेतला आहे.ज्या उशीला तुम्ही गुद्दे मारले तिच्याकडून तुम्ही आश्वासनाची पण अपेक्षा करता.”

मला बोलू देण्यापूर्वीच शिला मला आणखी सांगू लागली,
“उशीवर डोकं ठेवून तुम्ही एकटेच तुमच्या खोलीत,जेव्हा आणखी कुणालाही माहित होऊ नये असं तुम्हाला वाटून,कधी रडला आहात का? मी असं खूप वेळा केलं आहे आणि आणखी कित्येक वेळा करीन हे खात्रीने सांगते.”

मी शिलाला म्हणालो,
“ही दुसरी उशी आतून आणलीस ती खास तुझी आहे का?
कारण तिची आठवण येऊन तू मला उशीबद्दल कैवार येऊन सांगतेस असं वाटतं.”

“अगदी बरोबर ओळखलंत.”
असं म्हणून शिला मला पुढे सांगू लागली,
“ज्या उशीला तुम्ही एकदा गुद्दे मारलेत,आणि मग तिच्यावर डोकं ठेवून आरामही घेतलात,त्यावर तुम्ही गुपनीयता ठेवून रडता.उशा, आलोचना करीत नाहीत.पण त्या तुमच्या समस्या सोडवू शकणार नाहीत,एव्हड्या व्यस्तही नसतात.उशा सापडत नाहीत असं कधीही होत नाही.उशा दिवसातली कुठली वेळ आहे, ह्याबद्द्ल पर्वा करीत नाहीत.मला वाटतं उशी बेशर्त असते.तुम्हाला आराम हवा असेल त्यावेळी त्या मृदु असतात.
तुमच्या उपचाराच्यावेळी,तुम्हाला तुमचं आचरण समजून घेण्यासाठी,त्या मजबूत असतानाच कशावरतरी अंमळ लवंडावं असं तुम्हाला वाटण्यासाठी असतात.मला तरी उशांबद्दल विशेष वाटतं.”

मी शिलाला म्हणालो,
“मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं की,नाराज झालं असताना,उशीवर गुद्दे मारण्याचं जेव्हडं म्हणून लक्षात ठेवाल,तेव्हडंच उशीवर राग जरा स्वस्थ राहून काढा.तुही तसं करतेस ना?”

मला शिला म्हणाली,
माझ्या उशीने गुद्यावर गुद्दे सहन केले आहेत.माझ्या सांगण्याकडे कुणी लक्षच देत नाही हे पाहून मी हताश झाले असताना किंवा माझ्या मनासारखं होत नाही हे मी पाहिलं असताना माझ्याकडून उशीला खूपच चोप मिळाला आहे. माझ्या उशीचा खूप वापर झाला आहे. परंतु,मला माहित आहे की माझी उशी नेहमीच तत्पर असणार आणि हे माहित असल्याची खात्री असल्याने मला कसलीही जरूरी भासली तरी ती हजर असणार.
आताच तुम्ही दुसरी उशी मागीतलीत त्यावेळी ती हजर होती.”

“माझी एक आठवण तुम्हाला सांगते”
असं सांगून पुढे शिला म्हणाली,
“मला पहिला जॉब मिळाल्यावर मी एकटीच बंगलोरला गेले होते,तेव्हा माझ्या रहाण्याच्या जागी मला उशीकडून आरामाची जरूरी होती.मी तिकडे एकटी होते,प्रबल आणि स्वतंत्र होते,निर्भय मुलगी होते,तरीसुद्धा मला सुखकर उबदारपणा माझ्या उशीने मला नेहमीच दिला.

त्या पहिल्या रात्री,थेंब थेंब टिपटिपणारं नळातलं पाणी,काळाकुट्ट काळोख,आणि मी एकटी तरीपण दूर राहिलेला दिलासा मला उशीकडून मिळाला.मला हायसं वाटलं.मला माहित होतं सर्व काही ठीक असणार.माझ्या उशीने मला,त्या नव्या जागेतल्या पहिल्या रात्री,भयभीतीला सामोरं जायला बळ दिलं.
शांत झोप लागल्याच्या सुखाची तृत्पी मला माझ्या जवळ सतत असलेल्या सहयोग्याशिवाय शक्य नव्हतं.
माझ्या जीवनातल्या अशा अनेक प्रसंगात ह्या उशीने मला मदत केली आहे.”

रात्र बरीच होत होती. पाऊस काही थांबत नव्हता.अर्थात मी इकडेच झोपणार असल्याने मला काही फरक पडत नव्हता.मात्र हे आमचं बोलणं एकताना शिलाचे बाबा जांभया काढायला लागले होते.

म्हणून मी आवरतं घेण्यासाठी शिलाला म्हणालो,
“मला वाटतं प्रत्येकाची उशी असते.निरनीराळ्या रंगात आणि आकारात उशा मिळतात. प्रत्येक उशीची विशिष्टता असते.प्रत्येकाजवळ उशी हवी.अशी उशी की त्या व्यक्तिचा स्वभाव ती उशी प्रतिबिंबित करू शकते..मला वाटतं प्रत्येकाला तो आराम,तो दिलासा, ती शिथिलता त्याच्या उशीकडून त्याला मिळावी.म्हणून मी मात्र एका निष्कर्षाला आलो आहे की तुला उशीबद्दल विशेष वाटतं हे अगदी स्वाभाविक आहे. खरं आहे ना?”

शिला खुर्चीवरून उठून दिवा काढायला गेली.आणि मी समजलो की,
“होय,तुमचं अगदी खरं आहे.”
असंच तिला म्हणायचं असणार.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com