Sunday, May 15, 2011

झोपेची मजा.

“मेलेल्याला निवांत झोप लागते”
हे म्हणणं मी माझ्या जीवाला लावून घेतलं होतं.”

रमेशचा निवृत्तिचा पहिला दिवस.एरव्ही नेहमी निरनीराळ्या शिफ्टवर तो काम करीत असल्याने,अचूक अशी त्याची भेट घेता यायची नाही.आज नक्कीच रमेश घरी भेटणार म्हणून त्याच्या घरी निवृत्तिच्या शुभेच्छा द्यायला म्हणून गेलो होतो.

“आज बेधडक तुला न विचारता तुला भेटायला आलो.तू घरी भेटणार याची खात्री होती.बरेच वेळा निवृत्ति मिळाल्यावर लोकांना मिक्स फिलींग असतं. इकडे तर आराम मिळेल म्हणून आनंद होतो, आणि इकडे तर वेळ कसा जाईल म्हणून वाईट वाटतं.तू मात्र बराच खूश दिसतोस.”
मी रमेशला म्हणालो.

“तुमचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाही.पण मी खूश जादा आहे.आणि माझं त्याबद्दल कारण ऐकून तुम्हाला गंमत वाटेल”
असं म्हणून रमेश मला सांगू लागला,
“झोपेबद्दल मला विशेष वाटतं.खरोखरच झोप खुप विस्मयकारी आहे.झोपेच्या विशिष्टतेचा एक भाग म्हणजे झोप लागण्याच्या खर्‍या कारणाचं रहस्य काय असावं?.माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून माझ्या ध्यानात आलंय की झोप आपल्याला ताजंतवानं नक्कीच करते,रिचार्ज करून नव्या दिवसासाठी ती आपल्याला तयार करते.पण मी ही झोप का बरं घ्यावी? सात-आठ तासाच्या कल्पना शक्तिच्या विश्वात पडून रहायला मला काय कारण असावं?
सगळ्या मानवजातीला त्याचं रहस्य आहे तसंच मलाही आहे”.

“झोपेच्या विषयावर तुझा रिसर्च भरपूर असणार कारण शिफ्टचा तुझा जॉब असल्याने झोपेपेक्षा झोपमोड काय असते हे तू जास्त अनुभवलं असणार.”
मी रमेशला म्हणालो.

“एकदम बरोबर”
असं म्हणत रमेश मला सांगू लागला,
“झोपेमधे उपचारात्मक उपाय योजना असते.झोप उपचार करू शकते ह्याचा मी कधीच विचार केला नाही. म्हणतात ना,
“मेलेल्याला निवांत झोप लागते”
हे म्हणणं मी माझ्या जीवाला लावून घेतलं होतं.मी झोपायचं टाळायचो.रात्र जागवायचो.टीव्हीवर चित्रपट पहाण्यात वेळ घालवायचो. किंवा वाचन करीत वेळ काढायचो.इकडे तिकडे वेळ घालवायचो.
हे सगळं मी करायचो आजारी पडण्यापूर्वी.एकदा मी माझ्या पोटात कृमी होऊन आजारी झालो.मला आठवतं मी नव्वीत होतो. दिवाळीची सुट्टी पडणार होती.वर्गात एकाएकी,जादूटोणा झाल्यासारखं होऊन,मी डुलक्या काढायला लागलो.सुरवातीचे दोन दिवस, जरा हास्यास्पद वाटायचं.जणू मी गांजा पिऊन बसलोय असं वाटायचं.
घरी गेल्यावर मी नेहमीच्या सवयीपेक्षा अगोदर झोपायला जायचो.नंतर नंतर मी माझ्या वर्गात गेल्या गेल्या डुलक्या काढायला लागलो.
मला आठवतं,माझे इतिहासाचे गुरूजी मला माझ्या झोपेतून उठवायचे.शाळेच्या इमारतीला एक चक्कर मारून येऊन एक ग्लास पाणी पिऊन मग वर्गात यायला सांगायचे.कारण त्यांच्या विषयात मला नेहमीच कमी गुण मिळायचे.

नंतर एक दिवशी मला माझ्या इंग्रजी शिकवणार्‍या गुरूजीनी वर्गाच्या बाहेर काढलं.मला त्यांनी मुख्याधपाना भेटायला सांगीतलं.मी गेलो.पण ते जागेवर नव्हते.म्हणून मी त्यांच्या कचेरीच्या बाजूच्या खोलीत एका कोचावर जाऊन त्यांची वाट पहात बसलो होतो. करतां,करतां तिथेही मी झोपी गेलो.जाग आल्यावर भिंतीवरच्या घड्याळात साडे पाच वाजले होते.माझा इंग्रजीचा वर्ग मी साडे नऊला सोडला होता.आठ तास आणि पंधरा मिनटं मी झोपेतच होतो.म्हणजे एक दोन विषयाचे तास चुकले नाहीत तर अख्खा दिवस वाया गेला.माझे तास चुकले,माझी लंच चुकली आणि नाटकाची प्रॅक्टिसपण चुकली.

तेव्हाच कुठे मी ठरवलं की मी मला डॉक्टरला दाखवावं. डॉकटरानी अनमान काढलं की मला सायनस इन्फेकशन झालं आहे.ते ऐकून मला बरं वाटलं. मला काय होतंय ते मला कळलं.मी औषध घ्यायला सुरवात केली.दोन एक आठवड्यानी माझ्या लक्षात आलं की काही खरं नाही कारण मी अजून वर्गात डुलक्या काढत होतो.
माझी आई मला रक्त तापासून घेऊया असं म्हणाली.रक्त दिल्यानंतर तीन एक दिवसानी तपासणीचा निर्णय आला की मला, माझ्या पोटात कृमी वाढल्यामुळे, झोप येत असते.
रोज एक छोटीसी गोळी घेऊन नंतरचे दोन आठवडे घरी भरपूर झोपून काढले.

ह्या दोन आठवड्याच्या काळात मी झोपेतल्या अदभूत गोष्टीचा सुगावा लावला.त्या काळात माझ्यात सुधार होत असताना,माझे मित्र शाळेत जायचे.वर्गात शिकायचे,टेस्टस द्यायचे आणि मी जवळजवळ झोपेत असायचो आणि झोपेतल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचो. माझ्या लक्षात आलं की माझा कल ऐदी होण्याकडे झुकत आहे.जीवनातला हा सर्वांत मस्त काळ आहे.झोपत रहायचं आणि आळशीपणा करायचा असं मला वाटायला लागलं.

पण ह्या वयात असं करून कसं चालेल? फक्त निवृत्तिच्या वयात आल्यावर त्या जीवनात असं करणं संभवनीय आहे.
अशा तर्‍हेचा झोपेचा अनुभव घेतल्यामुळेच निवृत्त जीवनाचा उद्देश गाठण्याकडे माझं मन झुकायला लागलं.

कर्म-धर्म-संयोगाने माझा असा जॉब होता की मला शिप्ट्स असायच्या.रात्रपाळी असल्यावर रात्र जागून काढावी लागायची आणि दुसर्‍या दिवशी झोप पूरी व्ह्यायची नाही.एकूण झोपेचं खोबरं व्हायचं.पण माझा जॉब मला खूप आवडायचा.त्यामुळे शिफ्टकडे मी दुर्लक्ष केलं.

आज निवृत्त होताना मला खूप बरं वाटतंय.एकतर शिफ्टचा जॉब संपूष्टात आला आणि दुसरं म्हणजे यापुढे मला भरपूर झोप घ्यायला मुभा मिळणार आहे.माझा लहानपणातला झोपेचा अनुभव आणि झोपेबद्दलचं माझं स्वप्न आता पूर्ततेला येणार आहे.म्हणून मी खूश आहे.”

“व्यक्ती तशा वल्ली”
असं म्हणत मी रमेशची रजा घेतली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com