Monday, May 30, 2011

एकांत.


“माझ्या आजीला इंग्रजी बोलायला येत नव्हतं नाहीतर तिने इंग्रजीत नक्कीच सांगीतलं असतं,

“Please leave me alone”

“मला आठवतं,माझी आजी जेव्हा अगदी थकली होती तेव्हा तिला स्वतःहून उठून इकडे तिकडे जाण्याचा त्राण नव्हता.अशावेळी ती आम्हा कुणालातरी तिला उचलून घेऊन बाहेरच्या पडवीत नेऊन ठेवायला सांगायची.खाणं-पिणं अगदीच बेताचं झाल्याने,ती वजनाने अगदीच हलकी होती.पडवीत जमिनीवर तिला ठेवल्यावर,भिंतीला पाठ लावून ती बसायची.दोन्ही पाय गुडघ्यात मोडून गुडघे छाती जवळ घेऊन अधून मधून डोकं दोन्ही गुडघ्यात घालून झोपून जायची.झोपायची कसली,ग्लानीत असायची.कुणी तिला काही विचारल्यास वैतागून जायची.माझ्या आजीला इंग्रजी बोलायला येत नव्हतं नाहीतर तिने इंग्रजीत नक्कीच सांगीतलं असतं,
“Please leave me alone”

मालतीला मी एकांत काय असतो ते माझ्या आजीचं उदाहरण देऊन सांगत होतो.
मला मालती म्हणाली,
मला तर माझ्या ह्या वयात एकांत आवडतो.
एकांतात रहाण्यात मला विशेष आनंद होतो. त्यामुळे एकांतात राहून मी आनंदात असते एव्हडंच नाही तर अगदी हृदयाच्या कोपर्‍यातून तो एकांत मी अंगीकारते.ह्याचा अर्थ मी विरक्त झाले आहे असं नाही.माझ्या मित्र-मैत्रीणी बरोबर मी “सोशल क्रिचर” असते.आणि त्यांच्या बरोबर अगदी मन मोकळेपणाने बोलते.

काही लोक अगदी छातीठोकपणे सांगतात की,
“आम्हाला आजुबाजूला कोणतरी हवंच”
हे ऐकून मी संभ्रमात पडते.तसं पाहिलं तर रोजच कुणाशी नाहीतर कुणाशी संबंधात रहाणं ठिक आहे.मात्र दिवसाच्या शेवटी शेवटी अशी वेळ येते की,
“चला,आता खूप झालं.”

कामावरच्या आठ तासात बोलबोल बोलून,डोळ्याना डोळे भिडवून,आणि इकडे तिकडे थोडी थट्टा-मस्करी करून मी अगदी थकून जाते.आणि ह्यासाठीच मी दिवसातला काही वेळ “माझ्यात मी” होऊन रहाते. ह्याचा अर्थ मी एका कोपर्‍यात बसून ध्यान करीत चंदनाचा धूर माझ्या अवतीभवती असतो अशातलाही प्रकार नाही.उलटपक्षी मी टीव्हीचे फाल्तू कार्यक्रम बघत असेन,एखादा कविता संग्रह वाचीत असेन किंवा जे काही अर्ध कच्च मला जेवण शिजवता येतं ते शिजवीत तरी असेन.फोनची घंटी वाजली तर मी सरळ सरळ त्याकडे दुर्लक्ष करीन.पीसीकडे जाण्याचंही दुर्लक्ष करीन कारण इमेल वगैरे सारखे बोलचालीचे प्रकार टाळायला तोच मार्ग आहे.

इतर लोकांशी वागत असताना मला कसलाही कटूअनुभव आला आहे अशातला प्रकार नाही.मी थोडीशी लाजाळू आहे हे नक्कीच पण गर्दीला अगदीच बुजून जाणार्‍या एखाद्या व्यक्तीपेक्षा मी थोडं कमी बुजणारी आहे.मात्र मी माणूसघाणी आहे असं मी मला मुळीच म्हणून घेणार नाही.मी तशी नाहीच. अगदी खरोखरच मनापासून मला एकटं रहावसं वाटत असतं.एखादी वि.स.खांडेकरांची कांदबरी वाचण्यात जी मजा मला येते ती एखाद्या मैत्रीणीबरोबर जेवायला जाण्यात येत नाही.जर का तुम्हाला दिसून आलं की मित्र-मैत्रीणीची किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची मी सहजपणे टाळाटाळ करते तर तसं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे पण ते काही खरं नाही.

नीट समजावून सांगीतल्यावर किंवा “माझी मी” हा वाक प्रकार वापरल्यावर सगळं काही सोपं जातं.आणि ह्यातूनही मार्ग काढायचा झाल्यास उत्तम चलाखी म्हणजे मला जबरी सर्दी झाली आहे असं सांगीतल्यावर काम होऊन जातं.सरळ सरळ चौविस तास जर का कुणाशीही संबंध आला नाही तर मला अंगात बळ आल्यासारखं,ताजंतवानं झाल्यासारखं आणि निश्चिंत असल्यासारखं वाटतं. त्यानंतर मात्र जेव्हा मी माणसात मिसळून जाते तेव्हा त्यांना भेटायला बरं वाटतं. आणि बरोबरीने त्यांनासुद्धा मला पाहून -बहुदा- आनंद होत असावा.

मला वाटतं अलीकडे लोक फारच उत्तेजित झालेले दि़सतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शब्दांचा आणि चित्रांचा त्यांच्यावर सतत मारा चालू असतो. आकर्षून घेणार्‍या दिखाऊ करमणूकीचा आणि असेल नसेल त्या विवेकाचा अंत करणारं हे चक्र कुठेतरी खंडित करण्याची जरूरी आहे असं मला भासतं.हप्त्याच्या शेवटाला कुणी जरका लोकापासून दूर जात असतील तर अशाना मला ते करायला उत्तेजन द्यावसं वाटतं.वाटलं तर एखादी भीषण दृश्याची मुव्ही आणून पहावी,भरपूर तूप मिश्रीत चवदार वाटणारं जेवण जेवावं आणि एकांताच्या सत्यतेत मशगूल होऊन जावं असा मी त्यांना सल्ला देईन.”

मालतीचं बोलून झाल्यावर मी उठता उठता तिला म्हणालो,
“बरं तर,मला तुझी रजा घेण्याची वेळ आली आहे.तेव्हडाच तुला एकांत मिळेल.”

“टोमणा मला कळतो बरं का”
मालती मला निरोप देताना हसत हसत म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com