Tuesday, May 24, 2011

सूर्योदय,सूर्यास्त आणि समुद्रचौपाटी



“परत कधीतरी गोव्याच्या समुद्रचौपाटीवर भेटू”
असं म्हणून मी पवारांचा निरोप घेतला.

अलीकडेच मी माझ्या एका मित्राकडे गेलो असताना माझी चंद्रकांत पवार यांच्याशी भेट झाली.पवाराना मागे मी एकदा गोव्याच्या बिचवर भेटलो होतो.पवार सैन्यात कामाला असतात.देशातल्या निरनीराळ्या शहरात त्यांची बदली होत असते. सध्या मुंबईला आले आहेत असं ते मला म्हणाले.
गोवा चौपाटीवरच्या आमच्या भेटीची आठवण काढून आम्ही बोलत होतो.

मी त्यांना म्हणालो,
“मला समुद्रचौपाटीबद्दल विशेष वाटतं.मात्र कुठचीही समुद्रचौपाटी नव्हे.ती चौपाटी जी मला,त्या चौपाटीवर आल्यावर, मी माझ्या मागे सोडून आलेलं सर्व काही विसरायला लावते.त्या चौपाटीबद्दल मला विशेष वाटतं जी,दिवसामागून दिवस काहीनाकाही कार्यक्रम ठेवणार्‍या माझ्यासारख्याला, संपूर्ण निराळीच व्यक्ती व्ह्यायला भाग पाडते अशा चौपाटीबद्दल.”

मला पवार म्हणाले,
माझंही अगदी तुमच्यासारखंच आहे.
“मला समय-सारणीचा अजिबात कंटाळा येतो,उपेक्षा करावीशी वाटते,कुठेतरी प्रवासकरून जायला लागणार आहे याचा विसर पडावा असं वाटावं,कुठेतरी उपस्थित व्हायला हवं याचा विसर पडावा असं वाटावं, अशा चौपाटीवर, माझ्या बायको-मुलांना बरोबर घेऊन, आनंदाचा आस्वाद घ्यावासारखा मला वाटतो.”

मला सकाळीच चौपाटीवर जावसं वाटतं.मी चौपाटीवर हजर रहाण्यापूर्वी कुणाही महाभागाच्या पावलांची खूण दिसू नये असं वाटतं.खाली अर्धी चड्डी, वरती टी-शर्ट,पाय पूरे मोकळे,जमलंच तर छोट्याश्या थर्मासात गरम गरम कॉफी घेऊन,अगदी एकटं, एकटं पाणी तुडवीत,तुडवीत चौपाटीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत चालत जावसं वाटतं.

सूर्य अजून क्षितिजावर दिसायचा आहे,आकाश अजून पिवळसर,लालसर दिसत आहे अशावेळी समुद्रावर जावसं वाटतं.सूर्य नंतर थोड्यावेळाने पाण्याच्या बाहेर स्वतःला रेटत येत असताना,नारंगी,पिवळ्या गोळ्यासारखा होऊन,सभोवतालचं आकाश वेगवेगळ्या चमकदार रंगानी रंगवलं गेलं आहे आणि पाण्याचे तुषार अजून पाण्याची धार सोडत नाहीत अशावेळी चौपाटीवर असावं असं वाटतं.पण हे सर्व सूर्योदयाची वेळ असल्याने पूर्वेच्या समुद्रावर शक्य होतं.म्हणजे कलकत्ता, मद्रास इथे चौपाटीवर गेल्यावर.”

मी पवाराना म्हणालो,
“चौपाटीवर आणि चौपाटीवर सापडणार्‍या खजिन्यावर मी फारच प्रेम करतो.समुद्राच्या लाटेबरोबर किनार्‍यावर येऊन सांडल्या जाणार्‍या रंगीबेरंगी गोट्या,सुंदर रंग असलेले चित्रविचित्र आकाराचे ओले शंख शोधून काढून वेचायला मला खूपच आवडतं.ते सापडल्यावर मी अगदी मोहित होऊन जातो.
पांढरे-सफेद,हिरवे आणि तांबसरभुरे दगड मला मिळाले आहेत पण अगदी क्वचित वेळेला मला निळे दगड सापडले आहेत.पण ज्यावेळेला ते मला सापडतात त्यावेळेला मला जरा विशेष वाटत असतं.ते मी सापडू शकतो हे मला माहित असतं,शिवाय आणखी सापडण्याच्या आशेत मी नेहमीच असतो.माझा काही तुमच्यासारखा प्रवास होत नाही.मुंबईच्या चौपाटीवर असा खजिना सापडणं आता दुरापास्त झालं आहे.
पण कोकणात आजगावला जाताना मी जेव्हा रेडीच्या चौपाटीवर जातो तेव्हा शंख आणि त्यासारख्या कवड्या नक्कीच मिळतात.शंख आणि कवड्यात बारीक प्राणी असतात.किंबहूना शंख किंवा कवड्या हे त्यांचं बाह्य आच्छादन असतं.ते अंगावर घेऊनच फिरत असतात.वेंगुर्ल्याच्या आणि खानोलीच्या चौपाटीवरून पण फार पूर्वी मी निरनीराळ्या कवड्या आणि शंख गोळा केले आहेत.वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या कवड्या घेऊन आम्ही पटावरचे खेळ खेळायचो.”

पवारांना पण काही सांगावसं वाटलं.ते म्हणाले,
“जेव्हा माझी मुलं माझ्याबरोबर चौपाटीवर येतात, आणि पाण्यात शिरत असताना लहान लहान लाटावर जोराजोरात पाय आपटून सर्व प्रथम होणारा थंड पाण्याचा स्पर्श टाळण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा ते दृश्य पहायला मला मजा येते. त्याच्याहीपेक्षा जरा मोठ्या लाटांत आत शिरून ती तरंगण्याचा बहाणाकरून पटकन डोकं वर काढून पाणी वर उडवीत माझ्याकडे पाहून आरडा-ओरडा करताना दिसतात,
“बाबा माझ्याकडे लवकर या.पाणी मस्त आहे”
असं ज्यावेळी सांगतात,त्यावेळी मीही त्यांना सामील होतो. नंतर पाणी एकमेकावर उडवून मनात येतील ते खेळ खेळतो.
ओठ नीळे व्ह्यायला लागतात,हाता-पायावरची चामडी सुरकुतायला लागते,लोंबायला लागते तेव्हा आम्ही पाण्याच्या बाहेर येतो.तोपर्यंत पाण्यात खेळण्य़ाचा आनंद लुटत असतो.

पाण्यातून झटदिशी बाहेर येऊन,वाळुतून धावत जाऊन सुक्या वाळूत ठेवलेले आमचे रंगीत टुवाल अंगाभोवती गूंडाळून गरम उन्हात थोडावेळ शांत पडून असतो.बरोबर आणलेलं कोल्ड-ड्रींक आणि चुरमुरीत खाणं खाऊन त्याचा फस्ता करतो.आनंद उपभोगायचे हेच तर क्षण असतात.सूर्याची किरणं अंगात शिरल्याने ज्यावेळी उबारा येतो,त्यावेळेला वाळूत तसंच पडून राहून लाटांचं संगीत ऐकायला पण मजा येते.थोड्यावेळाने उठून झाल्यावर परत सर्व करावं असं वाटायला लागतं.
सूर्याच्या किरणातून मिळणार्‍या उबेची भरपूर भरपाई होई तोपर्यंत सर्व जगापासून दूर रहावसं वाटतं.थंडी वाजायला लागल्यावर अर्धी चड्डी आणि टीशर्ट अंगात चढवावासा वाटतो.
सूर्य अस्ताला जाताना मला ते दृश्य पहायला खूप आवडतं.क्षितिजाच्या कडेला जाऊन सूर्य जेव्हा खाली खाली जात रहातो, त्यावेळेला पुन्हा एकदा आकाश रंगवायला सुरवात होते.हे सर्व पाहून झाल्यावर, निसर्गाच्या सौन्दर्यीकरणाच्या कामगीरीबद्दल, मी घरी जाताना माझ्या मुलांबरोबर, वाखाणण्या करीत वेळ दवडतो.पण हे सर्व सूर्यास्त होत असताना पश्चिमेच्या समुद्रावर गेल्यावर शक्य होतं.म्हणजे जास्त करून गोव्याच्या चौपाटीवर गेल्यावर.पण हे सर्व म्हणजे समुद्र्चौपाटीवर जाणं, सूर्योदय आणि सूर्यास्त पहाणं मला शक्य झालं आहे कारण मी देशाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला माझ्या सैन्यातल्या नोकरीच्या निमीत्ताने जात असल्यामुळे.
म्हणून मला सूर्योदय,सूर्यास्त आणि समुद्रचौपाटीबद्दल तसंच मला आणि माझ्या कुटूंबियाना त्यापासून जो लाभ होतो त्याबद्दल विशेष वाटतं.”

“परत कधीतरी गोव्याच्या समुद्रचौपाटीवर भेटू”
असं म्हणून मी पवारांचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com