Monday, May 9, 2011

सुदैवी समजणारी आई


“सर्व काही असंच चालणार असं जे मी मानत असते, ह्याकडे लक्ष द्यायला शिक.” इति माझी आई.

काही माणसं जन्माला येतात ती दुसर्‍यासाठी येत असावीत.आपलं सर्व संभाळून दुसर्‍याकडे लक्ष देण्यासाठी त्याचं आयुष्य असावं.काही म्हणतील हे विधीलिखित असावं.
काही का म्हणेणात,नंदिनीचं आयुष्य आपल्या आईसाठी होतं.

आईचं कोकणात मोठं घर होतं.मागचा मांगर दुरूस्तिला काढला होता.मांगराच्या जवळ गाईचा गोठा होता.तिची आई दुध काढायला गोठ्यात जाण्यापूर्वी मांगरातून दुधाची चरवी आणायला गेली.मांगरात कामासाठी ठेवलेली एक तुळई तिच्या डोक्यावर पडून डोक्याला बराच मार लागला.बराच उपाय करूनही तिच्या प्रकृतित खास अशी सुधारणा झाली नाही.
आता नंदिनीची आई खूपच म्हातारी झाली आहे.मी तिला भेटायला गेलो होतो.
नंदिनीची आई चाळीस वर्षाची असताना ही घटना घडली.नंदिनी त्यावेळी सोळा वर्षाची होती.निळकंठ हा नंदिनीचा मागचा भाऊ.
आईची सेवा कोण करणार?नंदिनीने आपलं लग्नही केलं नाही.
तिने आपलं सगळं आयुष्य आईच्या सेवेत घालवलं.केव्हडा मोठा त्याग होता.

मला नंदिनी म्हणाली,
“माझी आई मला सांगत असते की ती सुदैवी आहे.हे ऐकून मला नेहमीच हे तिचं म्हणणं आश्चर्यचकीत करतं.खरं म्हणजे मला नेहमीच वाटतं की माझी आई विलक्षण दुर्दैवी आहे.

पन्नास वर्षापूर्वी,ती चाळीस वर्षाची होती.त्यावेळेला तिच्या डोक्याला मार लागून ती प्रचंड जखमी झाली होती.त्यानंतर तिचं सर्व आयुष्य दुसर्‍यावर अवलंबून राहिलं.तिला तिचं नाव माहित आहे पण ती कुठे रहाते ते किंवा तिचं वय काय आहे हे आठवत नाही. तिला चालता येत नाही आणि स्पष्ट बोलता येत नाही.

तरीपण ती वेगळ्याच तर्‍हेने विचार करीत असते.
“अरे देवा!
असं म्हणून ती पुढे म्हणते,
“मी किती सुदैवी आहे”
जेव्हा मी तिला विचारते,
“आई,तुला काय म्हणायचं आहे”
ती म्हणते,
“तू आणि नीळकंठ आहात की”
नीळकंठ माझा भाऊ.
हे तिचं म्हणणं मला पटत नाही.एव्हडी तिची स्वतःची हानी झाली आहे त्याचं काय? त्याचंच मला नवल वाटतं.-चालायला जमत नाही,वाचायला येत नाही,विचार करायला येत नाही,आंघोळ करता येत नाही,घरातून बाहेर जाता येत नाही,आपल्याच प्रेमळ माणसांना मनासारखं जेवण करून वाढता येत नाही.

मला जेव्हा माझी आई विचारते,
“तू कशी आहेस?”
मी म्हणते,
“मी ठिक आहे”
त्यावर ती मला म्हणते की,मी खूप नशीबवान आहे.पण मला मी नेहमीच नशीबवान आहे असं वाटत नाही.असे बरेच दिवस असतात उदा.तिच्या सानिध्यात असताना फार कठीण जातं.परत परत ती तेच तेच प्रश्न विचारत असते,जणू एखाद्याला स्मरण नसतं त्याला सांगावं लागावं.
मी कुठे आहे?मी कुठे रहाते? आपण कुठे चाललो आहोत?
तिच्या प्रश्नांची उत्तरं सोपी असतात.पण तेच तेच सांगायला जरा जड जातं.

मला नेहमी वाटत असतं की माझी आई इतरांसारखी असायला हवी होती.माझी आई कशी मला ती हवी होती.उलटपक्षी बर्‍याच अर्थाने तीच माझं मुल कशी आहे.दोघांचं कमनशीब म्हटलं पाहिजे.पण मी नेहमीच विचार करीत असते की,माझी आई गेली पन्नास वर्षं कल्पना न करण्यापलीकडे हाल काढत असूनसुद्धा स्वतःला सुदैवी समजते,ह्यातून मला काही तरी शिकलं पाहिजे.

ज्यावेळी ती मला मी नशीबवान आहे असं सांगते,त्यावेळी मला वाटतं माझी आई मला आठवण करून देत असते की, सर्व काही असंच चालणार असं जे मी मानत असते, ह्याकडे लक्ष द्यायला शिक.उदा.द्यायचं झाल्यास,मी हरएक गोष्ट करू शकते,त्या ती गेली पन्नास वर्षं करू शकलेली नाही.

माझी आई मला सांगते की ती नशीबवान आहे,त्यावेळी ती मला जीवनाकडे कसं पाहिलं पाहिजे ते दाखवीत असते.
नशीबवान वाटावं अशा गोष्टींची निवड कर असं सांगत असते.अगदी पडत्या काळातसुद्धा त्याची निवड कर.काहीच करू शकणार नाहीस अशाच वेळेला ती शोधून काढ.मला वाटतं हे मात्र करणं कठीण आहे.पण तिने ते करून दाखवलं आहे.आणि त्याला ती साक्षी आहे.

तिला जसं वाटतं तसं मलाही मी नशीबवान वाटून घ्यावं असं वाटत असतं.आणि काही वेळा,तिचे आभार,मला तसं वाटतंही”

तो मदर्स-डे होता.नंदिनीचं हे सर्व ऐकून मला वाटलं ह्यालाच खरा मदर्स-डे म्हणायला हवं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझ कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com