Friday, May 27, 2011

नवे शुझ.



“काका! आय लव्ह यू”

असं मला म्हणत मुलाने आईकडे जाण्यासाठी धुम ठोकलील
आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीत आपआपसात कसला तरी वाद निर्माण झाला होता.आणि त्याचं परिवर्तन शेवटी कोर्ट-कचेरीत जाण्याइतपत पाळी आली होती.माझा एक मित्र मुकूंद सराफ वकिली करायचा.त्याच्याकडून ह्याबाबतीत चार शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.
बरेच कायद्याचे मुद्दे मला तो समजावून सांगत होता.आमचं बोलणं चालू असताना त्याचा सहाएक वर्षाचा मुलगा आमच्या जवळपास येऊन घुटमळत होता.बोलत असताना बाबांना त्रास द्यायचा नाही हे तो समजून होता.मला तो चलबिचल झालेला पाहून बरं वाटत नव्हतं.मीच मुकूंदाला मधेच थांबवून म्हणालो,
“अरे,त्याला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकून घ्यावस.”

“काही नाही रे,त्याला मी नवीन शुझ घेणार म्हणून बोललो होतो.तो आजच विकत घेऊया म्हणून सकाळपासून माझ्या मागे लागला आहे. म्हटल्याप्रमाणे कुठचीही गोष्ट मिळायला लागल्यावर मुलं अशी हट्टाला पेटतात.”
मला मुकूंद म्हणाला.

माझंही मुकूंदाशी बोलणं संपलं होतं.मला त्याच्या मुलाची कीव आली.एव्हडंच नाही तर त्याचा चेहरा पाहून मलाही माझ्या लहानपणाची आठवण आली. मी माझ्या आईकडे नव्या शुझसाठी असाच मागे लागायचो.माझी आई खूप शिस्तीची होती.कामाच्या प्राधान्याप्रमाणे ती निर्णय घ्यायची.

मुकूंदाच्या मुलाला माझ्या जवळ ओढून घेत मी मुकूंदाला म्हणालो,
“मला ह्याचा चेहरा पाहून माझं बालपण मला आठवलं रे.”

“मला कळलंय, मी त्याचा बाप, वकिल असूनही, त्याला शुझ घेण्यासाठी तू त्याची वकिली करणार आहेस.”
मुकूंद मला हसत हसत म्हणाला.

“मी काय सांगतो ते ऐक आणि मग तुझा निर्णय घे.”
असं म्हणून मी मुकूंदाला म्हणालो,
“मला आठवतं मी अगदी लहान होतो.होतो असेन पाचएक वर्षाचा.शुझ खरेदी करायला मला नेहमीच आवडायचं.माझ्या आईकडून मी वर्षाला एक शुझचा जोड विकत घ्यायचो.आणि त्या वर्षी मी खूपच उत्तेजीत असायचो.अशावेळी मला प्रभावित करणार्‍या अनेक गोष्टी असायच्या-शुझचा ब्रॅन्ड,त्याचा रंग,त्याचा वापर वगैरे.
एकदा मी ते शुझ घरी आणले की दुसर्‍या दिवशी शाळेत केव्हा जातो याची वाट पहायचो.नवे शुझ घालून शाळेत जायला खूप आतूर व्ह्यायला व्हायचं. नव्या शुझबद्दल काहीतरी विशेष वाटायचं.जणू मलाच मी विशेष समजायचो.जणू मीच मला नवीन समजायचो.कदाचीत त्यांचा वास किंवा ते वापरताना जे वाटायचं ते वाटणंच विशेष वाटायचं.काहीतरी विचित्र वाटायचं.

सुरवातीचा आठवडा मी माझे शुझ स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असायचो.पण नंतर हळू हळू ते स्वच्छ ठेवण्याचा विसर पडायचा. कदाचीत त्याची कदरही करीत नसायचो. नव्या शुझमूळे मला मी नवीन वाटायचोच, त्याशिवाय इतरही माझ्या नव्या शुझकडे बघत रहायचे.जे लोक मला म्हणायचे की माझे नवे शुझ मस्त आहेत म्हणून, ते ऐकून मला आनंद व्ह्यायचाच त्याशिवाय माझी कुणीतरी प्रशंसा करतंय असं वाटायचं.नवीन शुझ घेतल्यानंतर मिळणार्‍या आनंदाची अशी काहीशी कारणं देण्यासाठी मी माझ्या मनात सफाई देण्याच्या प्रयत्नात असयाचो.

मला नेहमी वाटायचं की पायातले शुझ म्हणजे सर्वकाही.कुणी तरी म्हटल्याचं आठवतं की,एखाद्याचे शुझ पाहून तुम्ही ती व्यक्ती कशा प्रकारची आहे हे सांगू शकता.ती व्यक्ती कुठून आली आहे,कुठे जाणार आहे असं काहीतरी.

शुझ एखाद्याचं व्यक्तिमत्व दाखवून देतं.तुम्ही खेळाडू आहात का,किंवा फॅशनेबल आहात का,तुम्ही अगदी टापटीप असलेले कपडे नेसले आहत का असं काहीतरी.म्हणूनच मला नेहमी वाटत असतं की नवी शुझची जोडी महत्वाची असते.

माझ्या प्रमाणे मी इतराना अशीच काहीशी कारणं देऊन त्यांच्या नव्या शुझशी अनुरक्त रहाताना पाहिलंय.त्या नव्या शुझना ते चिखल आणि घाणीपासून सुरक्षित ठेवून पॉलिश वगैर करून ठेवायचे.खरं म्हणजे शुझचा उपयोग तुमचे पाय सुरक्षित ठेवण्यासाठी असतो.काही का असेना नव्या शुझने मी उत्तेजीत व्ह्यायचोच शिवाय दुसरी दिवाळी आल्यासारखी मला वाटायची. मला जोश यायचा.

मी एक पाहिलंय की, नव्या शुझमुळे तुम्हाला तुमच्या विशिष्ट्तेचा बोध होत असतो.तसंच तुमच्याकडे असलेल्या खास शुझ सारखे आणि कुणाकडे नसतील तर तुम्हाला तुम्ही नक्कीच विशेष वाटून घेता.असं काही की जे खास तुमचंच आहे असं वाटण्यासारखं.लहानपणी मला हे असं तर निक्षून वाटायचं.”

माझं हे सांगणं मुकूंदाचा मुलगा निमूट ऐकत होता.मुकूंद मी सांगत असताना मधून मधून आपल्या मुलाच्या चेहर्‍याकडे बघत होता.मी पण मुकूंदला सांगत असताना बापा-मुलातली नेत्रपल्लवी ध्यान देऊन बघत होतो.माझं सांगून झाल्यावर मुकूंदाच्या मुलाने मला घट्ट मिठी मारली.माझ्याही डोळ्यात पाणी आलं.
“चल,आईकडून कपडे घालून घे.आपण तिघेही तुझ्यासाठी शुझ घ्यायला जाऊंया”
असं मुकूंदाने आपल्या मुलाला सांगीतलं.

“काका! आय लव्ह यू”
असं मला म्हणत मुलाने आईकडे जाण्यासाठी धूम ठोकली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com