Tuesday, May 3, 2011

लिलूच्या गजाली.

“मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? “
हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.

दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फाऊन्टनच्या दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोर दिसली.
“अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर”
असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकिली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो,
“अगं तू वकील केव्हां झालीस ?”
“असं काय? तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते”
असं ती मला म्हणाली.

कोचर्‍याला माझ्या वहिनीच्या माहेरचे शेजारी- कोचरेकर, त्यांची लिलू मुलगी होती.
तिथून माझी ह्या कोचरेकर मंडळीशी ओळख होती.
“ये रे माझ्या घरी कधीतरी विकएन्डला.”
लिलू म्हणाली.
“पुढच्याच विकएन्डला ये,फादर्सडे आहे नाही का? “
मी हो म्हटलं आणि मी तिला
“बरंय”
म्हणून पुढच्या कामाला गेलो.

ती गिरगांवात राहात होती.तिने मला तिचा पत्ता पण दिला.त्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा घरी तिची मुलगी होती.नवरा फिरतीवर दिल्लीला गेला होता.
लिलूने अनंताश्रमातून दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली होती.मला काय आवडतं ते तिला माहित होतं. तिसऱ्याचं सुकं,बांगड्याचं तिखलं, पापलेटची आमटी, तळलेली सरंग्याची कापं, आणि लाल सोलाची सोलकढी एव्ह्यडे जिन्नस होते.भात मात्र घरीच केला होता, मला मास्यांचं जेवण असताना भात खूप लागतो हे पण तिच्या लक्षात होतं.
“सगळं जेवण तयार आहे,दोन वाजता जेवूया”
ती म्हणाली.
आणि कप,कप चहावर आमच्या जुन्या आठवणी काढून गजाली (गोष्टी) चालू झाल्या.
“आईवडील कसे आहेत ?”
ह्या माझ्या प्रश्नावर तिनेच सुरवात केली, तिची बातचीत संपेपर्यंत जेवण केव्हा झालं आणि बाहेर अंधार केव्हां झाला हे आम्हाला कळलंच नाही.
माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना ती बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो.

फादर्सडे असल्याने तिने आपल्या वडीलांचाच विषय चालू केला.
“माझ्या पन्नासाव्या जन्मदिवशी माझे वडील मला एक अजोड किंमतीची भेट देउन गेले.ते त्याच दिवशी वारले रे”
त्यांच्या मरणशैयेवरून मला ते माझ्या आयुष्याचा एक अनमोल धडा शिकवून गेले. त्यांच्या ८६ व्या जन्मदिवसाच्या तीन आठवडे आधी त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचं डॉक्टरनी आम्हाला सांगितलं.तीन आठवड्यानंतर ते गेले.आतापर्यंतच्या आयुष्यातल्या वागण्याच्या त्यांच्या पद्धतीनुसार, ह्याही गोष्टीवर त्यांचा ताबा ठेवून त्यांच्या इच्छेप्रमाणे ते गेले.
आम्हा सर्वांच्या इच्छेप्रमाणे मात्र ते घरीच गेले.
मला आठवतं त्या प्रसंगी मी माझ्या आईवडीलांच्या खोलीत बसले असता, त्यांच्या उभ्या आयुष्याचा मागोवा घेत असल्याचे जाणवून, किती कणखर आणि किती यशस्वी त्यांचं आयुष्य होतं, हे मी लक्षांत आणलं.
माझ्या वडीलानी आपल्या बायकोची आणि आम्हा तीन मुलांची काळजी घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करीत असताना, इतर सगळ्या जवळच्याना दुखवलं होतं. त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या खोलीत दुखावलेल्या जवळच्यांची लागलेली रीघ बघून, जणू विमान अपघात होवून खाली पडलेल्या सांगाड्याकडे पहात असलेल्या, वाचलेल्यापैकी प्रवाशासारखी माझी दैना झाली होती.

माझे वडील एक नामांकीत लेखक,असून माझे डोळे दिपून जातील एव्हडे चातुर्यवान, अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान असून सुद्धा त्यांच्यात एक खोट होती, हे मला कित्येक वर्षापासून माहीत होतं.त्यानी त्यांच्या नेहमीच्या, हताश मनस्थीतून निर्माण होण्याऱ्या, उद्वेगावर-म्हणजे रागावर- कसलीच डॉक्टरी मदत घेतली नाही.त्याना मदत घे म्हणून निक्षून सांगण्याचं कुणालाही धारीष्ट झालं नाही किंवा,
“वेळीच मदत घ्या अथवा कुटुंबाला मुकाल”
असंही सांगण्याचं धारिष्ट झालं नाही.

त्यांच्या मृत्युशय्येवरून त्यांनी मला जी गोष्ट शिकवली ती ते माझे वडील असूनही शिकू शकले नाहीत. कुटुंबियांशी प्रेमळपणे राहायचं असेल तर स्वतःच्या तृटीशी आणि स्वतःच्या चुकांशी दोन हात केल्याविना गत्यंतर नाही. हे त्यांना वेळीच समजलं नाही.

लिलूकडून हे सर्व ऐकत असताना चवदार मासे केव्हा फस्त झाले हे कळलंच नाही.जेवण संपल्यावर हात धूऊन उठल्यावर लिलूने सर्व आवरून घेउन मसालेदार पान माझ्या हातात आणून दिलं.मासे खाल्यावर मला पान लागतं ते पण तिला आठवलं.
“मी माझ्या वडीलावर खूप प्रेम केलं.मी सहा वर्षाची असताना पहिली गोष्ट लिहीली त्याबाबतीत ते माझे गुरू होते.मी भावंडात शेंडेफळ असल्याने बरेच वेळा मला त्यानी समजून घेतलं,माझ्याशी विनोदी वृत्तीने वागले.माझ्यावर कधी चिडले नाहीत. हे सर्व ते माझ्या मोठ्या भावंडाना देऊ शकले नव्हते.

बरेच वेळा माझ्या वडीलांच्या रागाचं वादळ शांत झाल्यावर, आमची आई आश्वासन देउन आम्हाला म्हणायची,
“मी खात्रीने सांगते ते रागाबरोबर बोलले जरी, तरी त्यांचं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे”
त्यांच्या आरडाओरडीचा जोर कमी कमी झाला की ते मंद्र्सप्तकात आपला आवाज आणून पश्चाताप झाल्यासारखं करून आम्हाला दिलासा देत पुन्हा असं न होण्याचा जणू आश्वासानच देत असत. बराच विचार केल्यावर मला वाटू लागलं की, माझे वडील एक उपचार न झालेले रागीष्ट-विकारी असून, त्यांचा अविचारी राग आणि चांगली मनसथिती ह्या दोलायमानाचा परिणाम, आमच्या आईच्या आणि आम्हा तीन मुलांच्या मनस्थितीची,मनाच्या चलबिचलतेमुळे, चाळण होत आहे.”

दुपारचे चार वाजले.लिलूने आपली गजाल जरा आवरती घेउन मला म्हणाली,
“तू खरोखरच बोर झाला असणार,मी थोडा चहा करते”
असे म्हणून ती चहा करायला गेली,आणि मला पण बाथरूममधे जाउन फ्रेश व्हायची संधी मिळाली.

चहाचा कप पुढे करीत ती म्हणाली,
“मी कुठे थांबली होते?हां,हां लक्षात आलं “
असं म्हणून तिने पुढे सांगायला सुरवात केली.
” रागीष्ट-विकारी” असे मी त्याना मघाशी म्हणाले त्याचा अर्थ ते जसा एखादा, रागाच्याभारात व्हायोलंट होवून खिडक्यांच्या कांचा फोडतो तसं काहिही करीत नव्हते.
एखादी माझ्या वडीलांसारखी व्यक्ति- जिच्या वागण्याची परिणीती, रोजच्या अडचणी आणि हताश परिस्थिती पाहून, उद्बेग करण्यात आणि माथेफीरू होण्यात आपोआप होत असते,तेव्हा अशा व्यक्तिला मनोवैज्ञानीक “ड्राय ड्रंक” अशा सज्ञेत वर्णन करतात पुष्कळदा बाहेरच्या जगात असे लोक आपला राग आणि चीडखोरपणा आवरून घेतात,परंतु घरच्या चार भिंतीत मात्र त्यांचा तो राग उचंबळून येतो.माझे वडील खऱ्या संकटकाळी क्वचीतच आरडा-ओरडा करीत. पण ते केव्हा फिरतील हे आम्हा घरच्या मंडळीना सांगणं कठीण व्हायचं.
अगदी जसं एखाद्या दारू पिणाऱ्याच्या घरच्या मंडळीना, सामोरं केव्हा जावं लागेल हे समजत नाही तसं.आणि म्हणून घरचे आम्ही सतत नवीन संकटाचं तुफान न येण्यासाठी सतर्क राहून त्याना चिडायला होईल असं कारण देत नसू.

आमच्या घरात आमचं चलबीचल स्थितित असणं हे आम्ही ओघानेच शिकलो होतो. जस जशी मी वयाने मोठी होत गेले तस तशी ह्या संवयीतून, सुटका करण्यासाठी मी माझ्या वडीलांबरोबर अगदी प्रामाणिक असायची.जरी त्यांच्या तावडीतून सुटका झाली तरी, त्यांच्या रागीष्टपणामुळे संकटाला तोंड द्यायला मी असमर्थ असायची.
माझ्या वडीलाना ते गेल्या दिवशी भेटायला जमलेल्या जवळच्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर त्यांचे डोळे मला सांगत होते की,
“वेळीच उपचार न झाल्यामुळे तुमच्या वडीलांच्या रागीष्ट विकाराने, घरातल्या तुम्हा सर्वांवर भावनीक आघात नव्हे तर शारिरीक आघात सुद्धा झाला असून,तुम्हा सर्वांच्या मनाला लूळं करून टाकलं आहे.”
आमची आई, माझ्या वडीलांची विश्वासू पत्नी होती,तिच्यावर झालेल्या मानसिक आघातामुळे,ती अनेक शारिरीक विकृत्यानी अंथरूणाला खिळली होती.

तिचं तरूण वयातलं जीवन तिने त्यांचा सततचा चीडचीडेपणा,आरडा-ओरड सहन करीत घालवलं होतं. हे दृश्य सहन न होण्यासारखं असायचं.तिची मानहानी करून झाल्यावर, आपल्या कमकुवतेची ते तिला कबुली देत,दयेचा आणि भेटींचा जणू पाऊस पाडीत,आई त्यांची समजूत घालायची. आणि मोठया मनाने त्यांना समजून घ्यायची. हिच त्यांची एकमेकावर प्रेम करण्याची रीत असायची.”

लिलूच्या लक्षात आलं की स्वीट-डीश म्हणून तिने ताजे बेसनचे लाडू माझ्यासाठी केले होते, मला हे लाडू आवडतात हे पण तिच्या आठवणीत होतं.
“अरे मी माझी ही कर्मकथा सांगता सांगता बेसनचे ताजे लाडू तुझ्यासाठी केलेत ते द्यायला विसरले बघ.कप कप चहापण करते”
असं म्हणून ती आत गेली.जरा पाय मोकळे करण्यासाठी मी उठून गॅलरीत फ्रेश हवा घेण्यासाठी म्हणून गेलो.

गरम गरम चहा आणि बेसनचे चार लाडू घेऊन लिलू बाहेर आली.आणि पुढ्च्या गजाली तिने चालू केल्या.
” वय वाढत जाता जाता माझ्या आईचे स्नायू आणि पोट अगदी गाठावलेलं झालं होतं.डॉक्टर म्हणाले, स्ट्रेस मुळे तिने हळू हळू मृत्युची वाट धरली आहे.
माझा भाऊ पण मधुमेयाने आणि पार्किनसन मुळे अपंगावस्तेत होता.परंतु,मला जे आठवतं त्यानुसार तो भावनिक अपंग होता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास गमावल्यामुळे पंगु झाला होता.जर का जीवन हे एक लॉटरी आहे असं समजलं,तर माझ्या भावाजवळ बक्षिस न मिळणारं तिकीट होतं असं समजायला हरकत नाही.
माझा भाऊ माझ्या वडीलांची स्वप्नपुर्ती करायला असमर्थ ठरला.त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.पण प्रेमाचा त्यांचा अर्थ सतत एखाद्याच्यामागे लागणं!
असा होता असावा. आणि त्यामुळे माझ्या भावाचा कायापालट स्वतःलाच कमी लेखण्यात झाला.त्याचं कधी लग्न झालं नाही, नाही तो आयुष्यात काही बनू शकला, आणि शेवटी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, एक अपंग म्हणून एका नर्सिंग होममधे जीवन कंठीत होता.

माझ्या भावाच्या तुलनेत माझी मोठी बहिण त्यामानाने एक सुखी जीवन जगत होती. पण त्याचं कारण ती माझ्या वडीलांपासून दूर होती. जवळ जवळ तिचे त्यांच्याशी संबंधच तुटले होते.त्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसात तिन मुलांपैकी एकच मुल (मी) त्यांच्या जवळ हजर होतं.

जेव्हा माझे वडील मानसिक आणि शारिरीक वेदनेतून मृत्युच्या दिशेने प्रवासाला लागले होते,तेव्हा माझ्या मनात वरचेवर एक विचात येत असायचा. आणि तो म्हणजे हा त्यांचा दुःख देणारा अंत, स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला हानी देऊन जात आहे. माझ्या वडीलाना वेळीच उपचार मिळाले असते,तर हे सर्व टाळता आलं असतं.

अगदी अलिकडे अलिकडे समाजाने दारू पिणाऱ्या व्यक्तिंचं व्यसन ही एक जोरात पसरणारी समस्या असल्याचे स्विकारून, ते व्यसन त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबियाना पण दुःखाच्या खाईत लोटू शकतं, असं ओळखलं आहे.आणि त्या व्यक्तिला उपचार करून बरं करता येतं हे पण जाणलं आहे.

त्याशिवाय उपचार करणार्‍या संस्था पण अस्तितवात आहेत, समस्यांचा अभ्यास करून कुटुंबाने त्या समस्यांशी दोन हात करून,कशी सईसलामत सोडवणूक करून घ्यायची हे पण शिकवलं जातं,परंतु रागीष्टपणाच्या विकारावर असले काही उपाय अजून दिसत नाही.उलट हा रागीष्टपणा म्हणजे एक व्यक्तिगत स्वाभाविक दर्गूण आहे, असा समज झालेला आहे.

खूप उशीर झाल्याने मी लिलूची रजा घेतली,पण
” उरलेली तुझी कथा ऐकायला मी पुढच्या आठवड्यात नक्की येतो पण जेवायला नाही फक्त चहा प्यायला “
असं आश्वासन दिलं.ती हिरमुसली होऊ नये म्हणून,
“तुझ्या कथेचा शेवट चांगलाच होणार आहे.”
असं मी लिलूला जाता जाता म्हणालो.

पुढच्या विकएन्डला मी तिला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी चहाच्यावेळी येईन.आणि त्याप्रमाणे मी तिला भेटलो.मला पाहून तिचा चेहरा खूपच आनंदी दिसला. मलाही फार बरं वाटलं.

इकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,मला म्हणाली,
“शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेलं नुकसान डोळ्यांना दिसत नाही. जर का शारिरीक नुकसान झालं नसेल तर डॉक्टरपण मुद्दाम म्हणून लक्ष घालीत नाहीत, जोपर्यंत रुग्ण त्यांची मदत मागत नाही तोपर्यंत. खूपदा मी आणि माझी आई माझ्या वडीलाना तपासून घ्या म्हणून मागे लागत असू, पण त्यानी कधीही आमचं म्हणणं ऐकलं नाही.

एकदा आमच्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की आमच्या आईची प्रकृती दिवसे दिवस खालावत जाण्याचे कारण मुख्यतः आमच्या वडीलांचा तिच्यावर होणारा शाब्दिक अत्याचार हा आहे.आणि जेव्हा आम्ही डॉक्टरना, वडीलाना उपचार देण्याची विनंती केली,त्यावर ते म्हणाले,
“हा उतार वयातला प्रॉब्लेम असून ते स्वतः माझ्याकडे तपासायला आल्याशिवाय उपचार करणं शक्य होणार नाही.”

मागे एकदा मी मनोवैज्ञानीकांना भेटून वडीलाना उपचार देण्याचा प्रयत्न केला.हा काही बरा न होणार असा विकार नाही असं बऱ्याच तज्ञाचं मत होतं.शब्दिक अत्याचार हा शारिरीक अत्याचारापेक्षा गंभीर असून त्याचे दूरवर परिणाम होतात.”

परत एकदा चहा करण्यासाठी लिलू आत गेली आणि चहा घेऊन आल्यावर पुढे म्हणाली ते मला खूपच धक्कादायक वाटलं.
“माझे वडील निर्वतल्या नंतर तीन महिन्यानी माझी आई गेली.मी अपेक्षा करीत होते की निदान ते गेल्यानंतर तरी शाब्दिक अत्याचाराविना ती उरलेले आयुष्य आनंदात घालविल, हे माझे फक्त मनोरथच ठरले.”
६३ वर्षांचं त्या दोघांचं आयुष्य एकमेकाशी कमालीचं गुंतलेलं होतं.अगदी तसंच माझ्या भावाचं भविष्य पण.
माझ्या वडीलांच्या पहिल्या डेथ ऍनिव्हर्सरी नंतर अवघ्या पांच दिवसानी माझा भाऊ गेला.
माझ्या वडील त्यांच्या पश्चात मला त्यांची एक आठवण ठेवून गेले.त्याचा मला माझ्या उरलेल्या आतुष्यात उपयोग झाला.
वर्षापूर्वी मी आईवडीलांच्या खोलीत बसले असताना एक संपल्क केला. काही होवो, ह्या पुढे असे प्रकार माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या पिढीत तरी रीपीट होऊ नयेत.
एकदा एका मनोवैज्ञानीकाला माझ्या आई,वडील आणि भावाचे फोटो दाखवले ते पाहून तो पटकन म्हणाला,
” कुणाच्याच तोंडावर हंसं दिसत नाही. ते सर्व दिसतात डिप्रेस्ड,डिप्रेस्ड आणि डिप्रेस्ड.”

आता पर्यंत लिलूची ही सर्व कथा निपूटपणे एकून घेत होतो.लिलू मला म्हणाली,
“माझं हे सर्व ऐकून मी तुला उगीचच त्रास दिला असं नाहीना वाटत.अरे,आपल्या जवळच्याकडे ओघ घालवायला बरं वाटतं.”
त्यावर मी म्हणालो हो,
“मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? “
हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.

डोळ्यात पाणी आणून म्हणाली,
” मी मेल्यावर माझ्या कुटुंबाचा फोटो-आल्बम पाहून माझ्या मुलीला आमच्या सर्वांच्या चेहर्‍यावर हसं,हसं आणि हसंच दिसलं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com