Friday, May 13, 2011

स्व-प्रेरित सुख

"पण सरतेशेवटी सुखी होण्यासाठी तुमच्यावरच तुमची मदार असायला हवी."

संध्याकाळच्या वेळी आज बाहेर मस्त हवा होती.थंडी मुळीच वाजत नव्हती.स्वेटरची तर मुळीच गरज भासत नव्हती.लोकं बाजारातून रंगीबेरंगी फुलांचे रोप आणून कुंडीत लावत होते.घरून निघून तळ्यावर पोहोचेपर्यंत प्रत्येकाच्या घरासमोर फुलांच्या कुंड्या पाहून मस्त वाटत होतं.आता यापूढे सहाएक महिने हे असंच वातावण असणार ह्याची नुसती कल्पना करून मन आनंदी होत होतं,मन सुखावत होतं.

बारामहिने तेरा काळ असंच वातावरण असतं तर त्याची कसलीच किंमत वाटली नसती.दोन तीन महिने कड्याकाची थंडी सहन करून झाल्यावर हा बदल जास्त जाणवतो.आज प्रो.देसाई तळ्यावर भेटल्यावर ह्या अशा सुखाविषयी चर्चा करावी अशी मनात लहर आली.आणि भाऊसाहेब नक्कीच तळ्यावर भेटणार ह्याची खात्री होती.प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन बसले होते.माझीच वाट बघत बसले होते.ते तसं मला म्हणाले.
मी हसत होतो ते पाहून मला म्हणाले,
"तुमहाला काहीतरी सांगायचं आहे असं दिसतं.काय विशेष.?

मी म्हणालो,
"तुमच्याही लक्षात आलं असेल.तुमच्या घरून तळ्यावर येताना तुम्ही नव्या बहरलेल्या फुलांच्या कुंड्या जागोजागी पाहिल्या असतील.माझ्या मनात आलं की हे डोळ्यांना मिळणारं सुख,आपलं मन किती आनंदी करतं.अशी काय जादू ह्या फुलात आहे.?वसंत ऋतुच्या ह्या मोसमात रंगीबेरंगी फुलं लावून जो तो प्रसन्नता आणण्याच्या लहरीत असतो.स्वतःला सुखी करून जो तो दुसर्‍यालाही सुखी करतो.हे घेण्यासारखं आहे. आणि ते सुद्धा फुलांच्या माध्यमातून."

माझ्या म्हणण्याचा थोडावेळ विचार करून भाऊसाहेब मला म्हणाले,
"मला नेहमीच वाटतं की,कुणीही स्वतःला सुखी ठेवायला स्वतःच जबाबदार असतो.मला सुखी करण्यासाठी ह्या जगात दुसरा कुणीही जन्माला आलेला नसावा असं मला वाटतं.लोकाना वाटत असतं कधीकधी ते दुःखी असतात याचं कारण त्यांना कुणीतरी दुखावलेलं असतं.खरं तर तुम्हीच दुःखाचा स्वीकार केल्याने दुःखी होता.

कुणी जर का तुम्हाला दुखावलं,तर ती अवस्था स्वीकारायची तुमची जबाबदारी आहे,नाहीतर आशावेळी स्वतः प्रसन्न रहाण्यासाठी जे काय हवं ते तुम्ही केलं पाहिजे.मला वाटतं,काही लोकाना वाटत असतं त्यांना कुणी दुसर्‍याने सुखी करायला हवं.फुलांबद्दल तुम्ही म्हणालात त्यावरून माझ्या डोक्यात असा विचार आला.

कुणी तुमच्या जीवनात आलं.आणि तुम्हाला आनंदी केलं.त्याला ते कारण नसतात.परंतु,तुम्हाला त्यांच्या सहवासात राहिल्याने तसं वाटत असतं.जर का तुमचा कुणी पाणउतारा केला तर झालं हे काही खरं नाही असं तुम्हाला वाटत असतं.पण तुम्ही एक विसरता की,सुखावर तुमचा काबु पाहिजे.आणि हेच तुम्ही तुमच्या जीवनात अखेर पर्यंत विसरता.

मला मुळीच म्हणायचं नाही की दुसरे तुम्हाला सुखी करू शकत नाहीत.कारण दुसरे तुम्हाला सुखी करू शकतातही.मला एव्हडंच म्हणायचं आहे की,जर सदैव तुम्हाला सुखी रहायचं असेल,तर तुमच्यावर तुम्ही भरवसा ठेवा.दुसर्‍यावर ठेवू नका.

तसंच,एखाद्या दिवशी सर्वच काही मनावेगळं होत असेल,आणि तुम्हाला वाटत असेल की ह्यात काही सुधारणा होणार नसेल तर काही तरी करून आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा असं मी सांगेन.किंवा तुम्हाला जे काही आवडतं त्याचा विचार मनात आणा.उदा.तुम्हाला आवडणारं गाण शांत जागी जाऊन ऐका,
वाटलं तर चांगली झोप घ्या.अशीच रंगीबेरंगी फुलं पाहून तुमचं मन रिझवा.

सुख कुठेतरी तुमच्यात तुम्हाला सापडेल.फक्त तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे.मला तरी व्यक्तिशः गाणं गायला किंवा ऐकायला आवडतं.मी ज्यावेळी असं करतो त्यावेळी दुसर्‍याच जगात जातो आणि सुखी होतो.प्रत्येकाची अशीच एक जागा असते आणि तिकडे गेल्यावर कल्पनेच्याबाहेर ते त्यांच्या लहरीत येतात.
आता तुम्ही ही फुलं पाहून सुखी झाला.असे कैक लोक असतील की त्यांना ही फुलं दिसत असूनही विशेष काही वाटणार नाही.त्यांच्या सुखाची जागा निराळी असू शकते.

म्हणून मला वाटतं की खरं सुख तुमच्यातच तुम्हाला सापडेल.कुणा दुसर्‍यात सापडणार नाही.मला वाटतं सुखी व्हायला दुसर्‍याची तुम्हाला मदत होईल पण सरतेशेवटी सुखी होण्यासाठी तुमच्यावरच तुमची मदार असायला हवी."

मी प्रो.देसायाना म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्यासाठीच तुमच्याशी चर्चा करायला मला बरं वाटतं.ह्यापुढे बारिक-सारिक कारणावरून वाईट वाटून घेण्याचं मी निश्चितच टाळीन.सुखावर काबू ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. निदान पुढले सहामहिने फॉल सुरू होईपर्यंत ही फुलंच मला आठवण देत राहतील हे मात्र नक्की."
सूर्यास्त झाल्या झाल्या थंडी वाजायला लागली.आम्ही दोघेही चर्चा संपवून निमूट उठलो.


श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com