Monday, August 1, 2011

असंच एक बालपण.



“आपल्या जन्म-दिवशी आपल्याला कोणतं बक्षीस मिळणार ही विवंचना असायची.इन्स्युरन्सचा हप्ता भरला पाहिजे ही काळजी नसायची.”

मयुरेशला मी त्याच्या अगदी लहान वयात पाहिलं आहे.आता तो कॉमर्स शिकून एका बॅन्केत नोकरीला आहे.त्याची बायकोपण त्याच बॅन्केत नोकरीला असते.सहा वर्षाची त्याला मुलगी आहे.
त्यादिवशी तो आणि मी गाडीत एकाच डब्यात जवळ जवळ बसलो होतो.संध्याकाळची वेळ होती.गाडी चर्चगेटहून निघाली तेव्हडंच.नंतर पुढची स्टेशनं थांबत थांबत पुढे सरकत होती.सिग्नल सिस्टीममधे काहीतरी बिघाड झाल्यामुळे सर्वच गाड्या अगदी हळू हळू चालल्या होत्या.
मयुरेश जांभया काढीत होता.दिवसभर काम करून कंटाळलेला दिसला.काहीतरी विषय काढावा म्हणून मी त्याला म्हणालो,
“काय तुझी छोकरी काय म्हणते?कितवीत आहे आता?”
मला मयुरेश म्हणाला,
“आता पहिलीत आहे.फार अभ्यासू आहे.पुस्तकं वाचायला तिला खूप आवडतात.रोज रात्री झोपण्यापूर्वी एक तरी नवी गोष्ट तिला सांगावी लागते.चुकून एखादी गोष्ट रिपीट झाली की तिच्या लक्षात लागलीच येतं. आपण ऐकली आहे म्हणून सांगते.मग मलाच लक्षात आणून दुसरी एखादी गोष्ट सांगावी लागते. त्यानंतर झोपते.”
मी मयुरेशला म्हणालो,
“बालपण आहे.जीवनात सर्वात चांगली अवस्था असलेलं वय.तसं पाहिलंस तर म्हातारपण पण चांगलंच असतं.फक्त दोन गोष्टींची जरूरी असते.एक म्हणजे तंदुरूस्थी आणि पैसे गाठीला हवेत.”
माझ्या म्हणण्याचा अर्थ मयुरेशला कळला.आणि आपल्या बालपणाची त्याला आठवण आली असावी.

मला म्हणाला,
“जीवानातल्या निरनीराळ्या अवस्थेमधे मला बालपणाबद्दल विशेष वाटतं.माझ्याप्रमाणे बर्‍याच लोकाना तसं वाटत असावं.बालपण ही माझी अशी अवस्था होती की मला थकणं हा शब्द माहित नसायचा.तसंच दमणूक काय असतं हे ही मला माहित नसायचं.दिवस लांब वाटायचे आणि रात्री लहान वाटायच्या. अंत नसलेला जोम अंगात असायचा.सकाळी उठल्यावर अंगात दुखरेपणा नसायचा.केवळ रात्र झाल्याने झोपावं लागायचं.खेळातल्या एखाद्या खेळण्यासारखं मला मी वाटून घ्यायचो. एकतर चालू नाहीतर बंद.
धावणं,उड्या मारणं,खेळणं हीच क्रियापदं मला माहित असायची.
नोकरीत असलेल्या कुणाच्यातरी गुलामासारखी माझी अवस्था नसायची.शाळेतलं जीवन म्हणजे तासा-तासाने वाजणार्‍या घंटे मधलं जीवन असायचं.
त्यावेळी माझी एकच एक मैत्रीण म्हणजे माझी आई.तिने हाक मारल्यावर धावत जाऊन तिला साद द्यायचो. त्यावेळी माझा चिंतेचा विषय म्हणजे माझं खरचटलेलं ढोपर नाहीतर मुरगळलेलं पाऊल.

माझ्या मित्र-मैत्रीणी नेहमीच माझ्या आसपास असायच्या.एखाद्या हाकेबरोबर सर्व जमायच्या.
“कामात व्यस्त असल्याने येता येणार नाही”
असली वाक्यं ऐकायला मिळायची नाहीत. पावसात भिजणं,उन्हात करपणं आणि थंडीत कुड्कूडणं ह्याबद्दल बालपणात काही विशेष वाटत नसायचं.
मजा यायची.

पोस्टमनने पत्र आणून दिलं की समजावं,आजी आजोबा भेटायला येत आहेत.घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडण्याची ते नोटीस-वजा पत्र नसायचं. बालपणातली एक गोष्ट मला आवडायची की त्या वयात रडणं म्हणजे कमकुवतपणा नसायचा.आई मदतीला येऊन सर्व काही ठीकठाक करणार आहे ह्याचं त्या रडण्यात आश्वासन असायचं.जीवनातली ही अवस्था नेहमीच असावी असं त्यावेळी वाटणं,आपण पुढे काय होणार आहो ते ह्या अवस्थेतच घडलं जाणं हे विचार करण्यासारखं आहे.
ह्या वयात एखादी दुःखद घटना म्हणजे एखादं कुत्र्याचं पिल्लू सायकलच्या चाकाखाली येणं.कामावर खाडे झाल्याने महिन्याचा पगार कमी मिळणार असलं ते दुःख नसायचं.

व्यस्त दिवस म्हणजे, शेजारच्या मुलांबरोबर क्रिकेट मॅचची पैज लावून, दिवसभर खेळण्यात वेळ घालवण्याचा दिवस.बॅन्केत जाऊन महिन्याची बिलं भरणं,किंवा रांगेत उभं राहून ट्रेनचा पास काढणं अशासाठी व्यस्त रहाणं नसायचं.आपल्या जन्म-दिवशी आपल्याला कोणतं बक्षीस मिळणार ही विवंचना असायची.इन्स्युरन्सचा हप्ता भरला पाहिजे ही काळजी नसायची.”

मयुरेशचं हे बालपणाबद्दलचं एकाएकी त्याच्या मनात आलेलं चिंतन ऐकून मला बरं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“ह्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे.अंधेरी जवळ आली आहे.स्टेशन येण्यापूर्वी मी माझ्या मनातलं तुला सांगतो,
त्या बालपणातल्या दिवसातल्या साधेभोळेपणाबद्दल,निष्कपटेतेबद्दल मला विशेष वाटतं.वाईट वृत्तीच्या माणसाला त्यावेळी बदमाश म्हणायचे, आतंकवादी म्हणत नसायचे.मला वाटतं,बालपणाची ही अशी अवस्था होती की त्याकडे मागे वळून पहावं असं वाटण्या सारखं होतं,आणि जरी ते दिवस निराशजनक असेनात का,उरलेल्या जीवनात खिन्नता असेना का,त्यावेळी निदान भरवसा होता,विश्वास होता,त्यावेळी स्वप्न रंगवता येत होती.म्हणूनच मलाही,तू म्हणतोस तसं, जीवनातल्या इतर अवस्थेपेक्षा माझ्या बालपणाबद्दल विशेष वाटतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com