Sunday, August 7, 2011

जीवनाचा अर्थ-जगणं.

“शेवटी जीवनात कुठेतरी समतोलपणा आणावाच लागतो.”

मला आठवतं ती संध्याकाळची वेळ होती.तो शुक्रवार होता.ऑफिस बंद झाल्यावर मी घरी जायला निघालो होतो.फ्लोरा-फाऊन्टन जवळ आल्यावर पेपर विकणारी पोरं खास एडीशन म्हणून एकाच बाजूला छापलेलं एक पानी पेपर विकत होते.ठळक बातमी होती की,
“वेस्टर्न रेल्वेच्या मोटरमनचा अचानक संप.त्यामुळे सर्व गाड्यांची ये-जा ठप्प झाली आहे.”

चटकन माझ्या डोक्यात विचार आला की लवकरात लवकर घरी पोहचायचं झाल्यास सर्वात उत्तम टॅक्सीकरून जाणं.जास्त विचार करीत बसलं तर टॅक्सीपण मिळणं नंतर कठीण व्हायचं.
माझ्या नशीबाने एक टॅक्सीवाला अंधेरीला जायला कबूल झाला.टॅक्सीत बसणार तेव्हड्यात नंदनला समोरून धावत येताना पाहिलं.नंदन सातपुते आमच्या समोरच्या कॉलनीत रहातो.

“मी पण येतो रे,तुझ्याबरोबर आपण भाडं शेअर करू”
असं म्हणतच नंदन माझ्या मागोमाग टॅक्सीत येऊन बसला.आम्ही अंधेरीच्या दिशेने निघालो.
एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात येऊन मी नंदनला म्हणालो,
“जगणं फार कठीण झालं आहे.केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही.घरून कामावर निघाल्यावर वेळेवर घरी पोहचूं किंवा कसं हे सांगणं कठीण झालं आहे. जीवनात सर्वात महत्वाचं काय आहे हे कळायला कठीण झालं आहे.”

“जीवनात सर्वात महत्वाचं काय आहे, ह्यावर बरीच मंडळी सहमत होत नाहीत.धन-दौलत,सत्ता-सामर्थ्य,प्रेम-जिव्ह्याळा, प्रसिद्धी-लौकिक,यश-सफलता….
सांगत राहिलो तर यादी वाढत जाईल.
मला मात्र,ह्या सर्व गोष्टी निरर्थक वाटतात,शिवाय एक, अतिशय ताकदवार गोष्ट सोडल्यास.
आणि ती म्हणजे जीवनात तुम्हाला स्वतःला खुशीत ठेवण्यात,आनंदी ठेवण्यात असलेली तुमच्यातली क्षमता.”
नंदन मला आपल्या मनात आलेला विचार समजावून सांगत होता.

मी नंदनला म्हणालो,
“लोकं आपल्याला महत्वाचं काय वाटतं त्याचा अर्थ लावण्यात,आपला वेळकाळ प्रचंड प्रमाणात खर्च करतात.हे लोक,आपलं अख्खं जीवन आणि त्यांना मिळत असलेल्या रिकामेपणाचा प्रत्येक सेकंद,चिंतन करण्यात,नियोजित कार्याची मोहीम करण्यात किंवा कंपनीत उच्चपदावर पोहोचण्यात, खर्ची घालतात.

माझं म्हणणं असं आहे की,वर्ष अखेर ह्या लोकांची लाखो रुपये कमवण्यात परिणती होते.ते स्वतःचं आयुष्य असंच जाऊ देतात.
कुणीतरी म्हटलंय,
“जन्माला आल्याआल्याच माणूस मरायच्या तयारीला लागतो.”

“मला तुमचं म्हणणं एकदम पटतं.मी माझेच शाळेत असतानाचे अनुभव आणि आता त्याबद्दल काय वाटायला लागलं आहे ते सांगतो”

असं सांगून नंदन पुढे म्हणाला,
“शाळकरी असताना,शाळा सुटल्यावर सरळ घरी जायचं,शाळेचा आठवडा संपल्यावर कुठे न जाता शनिवारी,रविवारी घरीच अभ्यास करीत रहायचं आणि आपला नंबर वर ठेवण्याच्या प्रयत्नात असायचं.कारण चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी गुण चांगले असायला हवेत.हे नक्कीच महत्वाचं आहे.कारण चांगलं शिक्षण मिळणं महत्वाचं आहे.

शिक्षण घेतलं नाही,तर उर्वरित आयुष्यात, कुठे हाटेलात टेबलं पुसायला रहायचं नाहीतर कुणाच्या घराच्या लाद्या पुसायला राहून जेमतेम पैसे मिळवून, उदरनिर्वाह करायचा.
शेवटी जीवनात कुठेतरी समतोलपणा आणावाच लागतो.

चांगल्या कॉलेजात जाऊन यशस्वी झाल्यावर चांगला जॉब मिळण्याचा संभव वाढतो. हे असंच चालायचं असतं.खरा विचार केल्यावर वाटतं,शाळा कॉलेजात गेलेला जीवनातला वेळ, संपूर्ण जीवनातला, चांगला वेळ समजायला हवा.”

मी नंदनला म्हणालो,
“आमचे वाडवडील कुठे कॉलेजात गेले होते.ते पण जीवन जगत होतेच ना?त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच व्हायचा.महिन्या अखेर किंवा वर्षा अखेर जमा झालेली मिळकत संसारात खर्ची घालायचे.पण ते सर्व कमवण्यासाठी इतकी दगदग होत नसायची. आपलं शहरातलं हे जीणं खूपच दगदगीचं झालं आहे.जीवनात आनंद असा मिळत नाही”

थोडासा विचार करून नंदन मला म्हणाला,
“मी शाळेत पहिला नंबर मिळवणार्‍यापैकी नव्हतो.एखाद्या नावाजलेल्या कॉलेजात मला प्रवेश मिळेलच अशातलाही मी नव्हतो.एखाद्या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर माझा फोटो येईल अशातलाही मी नव्हतो.कॅन्सरवर उपाय शोधणारा म्हणून माझं नाव व्हायला माझं अंधूकसं नव्हेतर अजिबात भाग्य नव्हतं.नोबेल-पीस-प्राईझचा तर विचारच सोडून द्या.

पण तुम्हाला सांगू का?जे आहे त्यात मी खुश आहे.जीवन हे काही तग धरून रहाण्यासाठी नसतं किंवा तुम्हाला नओळखणार्‍यांना तुम्ही कोण ते सिद्ध करून दाखवण्यासाठी नसतं.ह्यात कसलीही चुरस आहे असंही मला वाटत नाही.
जीवन हे आनंद मिळवीण्यासाठी असतं.माझ्या मते जीवनाचा अर्थ पुनरावर्ती असणं. जीवनाचा अर्थ- जगणं.”

अंधेरीला आल्यावर टॅक्सीतून उतरताना मी नंदनला म्हणालो,
“टॅक्सीचा खर्च तू माझ्याशी शेअर करू नकोस.तुझी कंपनी मिळाल्याने,प्रवासात गप्पा मारून, तुझे विचार शेअर करून माझी भरपाई झाली आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com