Thursday, August 25, 2011

जादूगिरी


“जोपर्यंत ती लहान मुलगी मी माझ्यातून हरवून बसत नाही तो पर्यंत मी जादूवरचा विश्वास हरवून बसणार नाही.”

“लहानपणी मला नेहमीच वाटायचं की,जादू करतात ती खरी असते.त्यावेळी मी जिकडे तिकडे जादूचे प्रयोग पहायची.टीव्हीवर जादूचे प्रयोग व्हायचे.
शहरात जादूचे प्रयोग करणारी कंपनी यायची. दाखवली गेलेली चलाखी,समजून घ्यायला माझी किशोर वयातली बुद्धी त्यावेळी विवरण करू शकत नव्हती.”
सविता मला सांगत होती.

त्याचं असं झालं,एक दिवशी,सविता आपल्या दोन लहान मुलांना घेऊन जुहूच्या चंदन थियेटरात जादूचे प्रयोग होणार आहेत ते दाखवण्यासाठी बिल्डिंगमधून खाली उतरून रिक्षाची वाट बघत रस्त्यावर उभी होती.ती संध्याकाळची वेळ होती.सविताला रिक्षा मिळत नव्हती असं वाटतं.मी ज्या रिक्षेतून आलो आणि उतरत होतो तिच रिक्षा मी तिला दिली.मुलांना लगबगीने बसवून माझे थॅन्क्स मानीत ती रिक्षात शिरताना मला,
“पुढल्या खेपेला आपण भेटूं तेव्हा बोलूं”
असं घाईघाईत सांगून निघून गेली.

त्यानंतर एक दिवशी,आपल्या बाल्कनीतून मला पाहून टाळी मारून माझं लक्ष गेल्यावर वर या म्हणून मला खुणावत होती.वर तिच्या घरी गेल्यावर मीच तिला, त्यादिवशी कुठे एव्हड्या लगबगीने जात होतीस म्हणून प्रश्न केला.

मला म्हणाली,
एखाद्या सुंदर तरूण मुलीला पेटीत झोपवून करवतीने तिचं अर्ध शरीर कापून पुन्हा तिला एकसांधी करणं, किंवा एखादा गुबगूबीत पांढरासफेद ससा डोक्यावर ठेवलेल्या हॅटमधून काढून दाखवणं हे फक्त जादू केली गेली एव्हडं म्हणण्या पलीकडे मला त्यावेळी समजत नव्हतं.

असे बरेच जादूचे प्रयोग मी पाहिले होते.अल्लाउद्दीन आपल्या जादूच्या चटईवर बसून शहरावरून उडत जायचा.
सिन्ड्रेलाचं रूप परिवर्तन करून तिला राजाच्या राजवाड्यात घेऊन जाणं,वगैरे.
जादूचे बरेचसे प्रयोग स्पष्ट न झाल्यासारखे आणि काल्पनीक वाटतात.असं असलं तरी मी जशी मोठी होत गेले तशी माझ्या बालपणात माझ्या आजुबाजूला होणारी जादू मी पहायची ती खरोखरीची असायची.”

असं म्हणून झाल्यावर, सविता माझ्याकडे कुतूहलाने पहात होती.माझ्याकडून प्रश्न विचारण्याची अपेक्षा करीत असावी.तिच्या चेहर्‍यावरून तसं मला भासलं.मला प्रश्न विचारायला उशीर होत आहे असं पाहून आपणच मला म्हणाली,
“तुमच्या शास्त्रीय दृष्ट्या विचार करणार्‍या मनाला मी काही तरी आव्हान करते आहे असं वाटणं सहाजीक आहे”.

माझ्या प्रश्नाची वाट न पहाताच मला सविता पुढे म्हणाली,
“माझी आई, दिवाळी आली की किंवा गणपतीचे दिवस आले की, अस्तव्यस्त दिसणारं घर सुंदर सजवून रहाण्यालायक दिसेल अशी जादू करायची.माझी आजी तिच्या स्वयंपाकखोलीत जादू करायची,दिवाळीसाठी निरनीराळे जिन्नस बनवायची.
वेळेवर् पाऊस पडणं,सूर्योदय आणि सूर्यास्त होणं, हे पण जादूचेच प्रयोग आहेत.पौर्णिमेचा चंद्र आणि लुकलूकणारे तारे ही पण जादू्च आहे.

आता मी वयाने मोठी झाल्यावर माझे जादूबद्दलचे विचार जरा पोक्त झाले आहेत.जरी मला माहित झालंय की कुणी अल्लाऊद्दीन नसतो,कुणी सांताक्लॉझ नसतो,सिन्ड्रेलाही नसते तरी खरी जादू आपल्याच अवतिभोवती असते.नवीन बालक जन्माला येण्यात,एखाद्या उपवर मुलीला तिचा सुंदर राजकूमार मिळण्यात, आकाशातून तारा निखळण्यात खरी जादू होत असते.

मला वाटतं जादूवर विश्वास ठेवण्यासाठी तुमचं हृदयही तरूण असायला हवं.माझ्यातला काहीभाग अजून सात वर्षाच्या मुलीचा आहे.त्या वयात, आवासून बघत असताना, जादूगाराने जादूची कांडी फिरवून रिकाम्या टोपलीतून दोन सुंदर पारवे फडफडत बाहेर काढणं किंवा कोंबडीचं फुल बनवणं, असले जादूचे प्रयोग पहाण्यात मला आश्चर्य वाटायचं.

जोपर्यंत ती लहान मुलगी मी माझ्यातून हरवून बसत नाही तो पर्यंत मी जादूवरचा विश्वास हरवून बसणार नाही.”

“तेव्हाच माझ्या लक्षात आलं.त्यादिवशी ज्यावेळी मी सोडून दिलेली रिक्षा तू पकडून लबगीने जायला निघाली होतीस त्यावेळी तुझ्या चेहर्‍याकडे पाहून तुझ्या मुलांपेक्षा, तूच लहान आहेस असं मला भासलं.”
सविताला मी म्हणालो.तिचा हसरा चेहरा पहाण्यालायक होता.तिचं तेही हसणं लहान मुलीचं हसणं असल्यासारखं मला भासलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com