Wednesday, August 10, 2011

आजीचं सूर्यकिरण.


“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्या सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!”

अंधेरीला जाणार्‍या बस स्टॉपवर मी बसची वाट पहात एकदा उभा होतो.समोरच्या कॉलनीतून अशोकला येताना पाहिलं.तो पण बसने जाण्यासाठी बस स्टॉपवर आला.मला पाहून, मला हलो म्हणाला.

“रोज मी मनात म्हणत असतो,एकदातरी सवडीने तुला विचारावं.पण संधीच मिळाली नाही.तेव्हा आज तुला नक्कीच विचारतो,नचुकता दर रविवारी तू सातबंगल्यावरच्या वृद्धाश्रमात थोडावेळ जाऊन येतोस.असं मला कुणीतरी सांगीतलं.तिकडे तुझं कुणी नातेवाईक रहायला आलंय का?”
मी अशोकला सरळ सरळ प्रश्न केला.

तेव्हड्यात धाके-कॉलनीची स्पेशल बस आली.रिकामीच असल्याने आम्ही एकाच बेंचवर जवळ जवळ बसलो होतो.दोघेही आम्ही दादरला जात होतो.
त्यामुळे गप्पा मारायला चांगला वेळ मिळाला.तिकीटं काढून झाल्यावर अशोक मला म्हणाला,
“मला तुम्ही हे कधीना कधी विचारणार हे माहित होतं.
मला आत्ता खरोखरच आठवत नाही ते कसं घडलं ते.कदाचीत माझ्या आजी आजोबांवरच्या माझ्या प्रेमामुळे असावं.तसं पाहिलंत तर वयस्कर लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.जेव्हा मी त्यांच्या खोलीत जातो,ते मला ओळखतही नसले तरी,त्यांच्या चेहर्‍यावर जेव्हा आनंदाची छटा उमलते तेव्हा मला खूपच बरं वाटतं.

सातबंगल्याला आमच्या शेजारी एक वृद्धाश्रम आहे.अलिकडेच मी दर रविवारी त्या वृद्धाश्रमाला भेट देतो. त्यांचं भजन चाललेलं असेल किंवा कसलही प्रवचन चाललेलं असेल त्यावेळी मी त्यांच्यात जाऊन बसतो. अशाच एका रविवारी मला नेहमीच भेटणार्‍या,चेहर्‍यावर बर्‍याच सुरकूत्या असलेल्या,आजीला मी सामोरा गेलो.तिने माझा हात गच्च ओढून धरला.मला वाटलं भजन ऐकताना मी तिच्या जवळ बसावं म्हणून तिने असं केलं असेल.
उलट,ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली.तिच्या खोलीतल्या भिंतीवर बरेच फोटो लटकवलेले होते ते मला दिसले.तिच्या नातवंडांच्या-पंतवंडाच्या फोटोपासून ते तिच्याच आईवडीलांच्या फोटो पर्यंत बरेच फोटो होते.

मला ती ते फोटो का दाखवत आहे हे माझ्या लक्षात येईपर्यंत,
ती मला म्हणाली,
“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्यां सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!.मला ह्या वृद्धाश्रमात यायचं नव्हतं.
आणि जर मला शक्य झालं तर मी लागलीच सोडूनही जाईन.
“माझ्या नातवा,”तू माझी सहनशीलता वाढवलीस.
दर रविवारची मी तुझ्या येण्याची वाट बघत असते.माझ्या उदास वादळी जीवनात तू मला सूर्यकिरणासारखा वाटतोस.तू मला खास आणि महत्वाचा वाटतोस.तुझा पण एक फोटो मला ह्या भिंतीवर लावायचा आहे.”

माझी त्या आजीवर इतकी छाप पडलेली पाहून माझाच मला अचंबा वाटला.मला ती सूर्यकिरण म्हणाली हे ऐकून मला आवडलं.माझ्याच आयुष्यात अशीच सूर्यकिरणं आलेल्या घटनांची मी आठवण काढू लागलो.
एकदा खोलीत अगदी गडद काळोख होता.मी निपचित पडून होतो.त्या काळोखातून सूर्याचं एक किरण माझ्यावर पडलं.माझं जगच प्रकाशमान झालं.मला आशा निर्माण झाली.सूर्याच्या किरणाबद्दल मला विशेष वाटतं.

ह्या सूर्याच्या किरणांबद्दल विशेष गंमत म्हणजे ती नेहमीच येत असतात.विशेषकरून भयंकर वादळ येऊन गेल्यावर ती येतात.
सदानकदा निरभ्र आकाशाकडे पाहून ते आकाश किती विस्मयकारक असतं हे मी जाणलं होतं.पण त्या निरभ्र आकाशातल्या सौंदर्याकडे आवासून पाहायला वादळाचा अनुभव घेतला नसता तर कळलं नसतं.

ह्या सूर्यकिरणावर माझा विश्वास आहे.मला हवं त्यावेळी आणि हवं तसं हे सूर्यकिरण येईलच असं नाही.पण ती किरणं निरनीराळ्या प्रकारची असावीत.माझ्यासाठी, ती सुरकूतल्या चेहर्‍याची माझी आजी जी मला दर रविवारी वृद्धाश्रामात गेल्यावर भेटते,जी माझं नाव नेहमीच विसरून मला,
“रे, नातवा”
अशी हाक मारतेच आणि त्याचवेळी मला एक गोड हसू देऊन माझ्यावरचं प्रेम दाखवते, तसंच माझी धाकटी बहिण मला घरात येताना पाहून,
“दादा आला,दादा आला”
असं ओरडून जाहीर करते,ती किरणंच आहेत.

आनंद मिळण्यासाठी,ही किरणं माझ्या अंगावर पडतात.जीवनातल्या कठीण प्रसंगात,अंधाराच्या जागेत मार्ग काढण्यासाठी ही किरणं मला प्रकाश दाखवतात.मला माहित आहे की ही किरणं माझ्या अंतरात आहेत,वादळाच्यावेळी वादळ येऊन गेल्यावर ती दिसावीत म्हणून मी वाट पहात असतो.तसंच मी पण किरण बनुन दुसर्‍याच्या जीवनात फरक पाडीन अशा संधीच्या प्रतिक्षेत असतो.म्हणूनच मला कुणाचं तरी सूर्यकिरण व्हावं असं वाटत असतं.”

अशोकचं हे बोलणं ऐकून मला खरोखरच त्याच्याबद्दलचा आदर द्विगूणीत झाला.मी त्याला म्हणालो,
“अशोक,तू ग्रेट आहेस.नुकताच तू कॉलेजात जायला लागलास.वयस्कर लोकांत राहून त्यांच्या चेहर्‍यावरच्या आनंदी छटा पाहून तुला आनंद होतो हे तुझं अवलोकनच ग्रेट आहे.तुला चांगलं भवितव्य आहे.एकतर तू चांगला कवी होशील किंवा चांगला लेखक होशील असं मला वाटायला लागलं आहे.
माझ्या तुला शुभेच्छा आहेत.तुला विचारावं म्हणून आज मी संधीचा फायदा घेतला ते बरं झालं असं मला वाटतं.”

माझा हात आपल्या हातात घेऊन आवंढा गिळत अशोक मला म्हणाला,
“तुमच्या शुभेच्छाच मला बस आहेत”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com