Friday, August 19, 2011

एक चॉकलेटची गोळी.


“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.”

त्या दिवशी मी जे.पी.रोडवरून चार बंगल्याच्या दिशेने चाललो होतो.दुपारची वेळ होती.बाहेर प्रचंड उन आणि त्याबरोबर उष्मा होत होता.उन्हापासून सावरायला छत्री उघडून चालत होतो.अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्सच्या फुटपाथवर लांबून प्रमिलेला येताना पाहिलं.
“छत्री थोर तुझे उपकार”ह्या शिर्षकाखाली कुणीतरी छत्रीचे अनेक फायदे आणि उपकार मोठ्या कल्पकतेने लिहिल्याचं आठवलं.
पावसापासून,उन्हापासून वाचवायला,हातकाठी म्हणून वापरायला,कुणी अंगावर धावून आल्यास छत्रीची टोकदार बाजू वापरून संरक्षण करायला उपयोग होतो.तसंच कुणालातरी सामोरून येताना टाळायलापण छत्रीचा उपयोग करता येतो हा बेरकी विचार माझ्या मनात पटकन येऊन गेला.
पण त्याच क्षणी प्रमिलेवर हा उपाय करणं ठीक नाही असं माझं दुसरं मन मला सांगायला लागलं.

प्रमिलेसारखी साधीभोळी,नावासारखीच प्रेमळ,आदर करणारी,मोकळ्या मनाच्या मुलीने मला अशातर्‍हेने तिला टाळताना पाहिलं तर तिला खूपच वाईट वाटेल असं माझ्या त्या दुसर्‍या मनाला वाटलं.बरेच दिवस मी तिच्या घरी गेलो नव्हतो.ती बोलवायची पण मला ते जमलं नाही.तिचे आजोबा माझी खूप आठवण काढतात असं ती म्हणायची.त्यांचं वय झालंय.नंतर वाईट वाटायला नको वेळात वेळ काढून त्यांना भेटून आलं पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं.पण गंमत काय आहे,घरी गेल्यावर प्रमिलेच्या तावडीत सापडल्यावर चार गोष्टी सांगीतल्याशिवाय ती मला सोडायचीच नाही.

शेवटी व्हायचं तेच झालं.
“मी तुम्हाला लांबून पाहिलं होतं.आज माझ्या आजोबांचा जन्म दिवस आहे.तुम्ही भेटला म्हणून त्यांना सांगीतलं आणि तुम्ही घरी त्यांना भेटायला आला नाहीत तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल.”
मला प्रमिला लागलीच म्हणाली.
“चल तू पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो.”
असं मी तिला सांगीतलं.

प्रमिलेला लहानपणापासून चॉकलेट खाण्याची आवड.आजोबांबरोबर बाजारात गेली की त्यांच्याकडे हटकून चॉकलेट मागायची.आजोबा तिच्याबरोबर आपणही चॉकलेट खायचे आणि तिलाही द्यायचे.आता एव्हडी मोठी झाली तरी तिच्या घरात एक मोठा गोल टिनचा चॉकलेटचा डबा असतो.त्यात ती विभिन्न प्रकारच्या चॉकलेटच्या गोळ्या भरून ठेवीत असते.कुणी लहान मुल घरी आलं की ती त्यातल्या एक दोन गोळ्या त्याला ती देतेच शिवाय माझ्या सारखा वयाने मोठा आला तरी त्याला ती डबा उघडून समोर ठेवते.
“निवडून तुमच्या आवडीची गोळी घ्या” असं सांगते.
प्रमिलेला आणि तिच्या आजोबांना चॉकलेट फार आवडतं हे मला माहित होतं.आजोबांच्या चॉकलेट आवडीची सवय प्रमिलेनेच त्यांना लावली होती.
त्यांच्या जन्मदिवशी कॅडबरी चॉकलेट त्यांना द्यावं म्हणून मी तिला पुढे जा असं सांगीतलं.कारण मला त्या दोघांसाठी चॉकलेट पॅकेट्स विकत घ्यायची कल्पना सुचली.

तिच्या घरी गेल्यावर तिच्या हातात एक पॅकेट आणि आजोबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातात एक कॅडबरीचं पॅकेट दिलं.
आज मला चॉकलेटवर चारगोष्टी सांगायचं प्रमिलेने ठरवलं होतं असं वाटलं.आपल्या गोल टीन डब्यातली चॉकलेट गोळी घ्यायला माझ्या समोर डबा उघडला.मी रावळगावचं एक चॉकलेट घेतलं.आणि तोंडात टाकलं.माझ्याबरोबर हसली.थोडसं मला खटकलं.म्हणून मी तिला विचारलं,
“काय ग? लहान मुलासासारखा गोळी ताबडतोब तोंडात मी टाकली म्हणून हसलीस का?”

मला प्रमिला म्हणाली,
“अजीबात नाही.इतकी वर्ष मी चॉकलेट खात आली आहे,ह्या चॉकलेटच्या गोळीबद्दल मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते.”
डबा बंद करून माझ्या जवळ येऊन बसली.तिचे आजोबाही आमच्या बाजूला बसले होते.
मला पुढे म्हणाली,
“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.ती चॉकलेटची गोळी, लहान असो वा मोठी असो,नेहमीच उदास वातावरणाचं आनंदात रुपांतरीत करू शकते.वय झालं म्हणून काय झालं?एखाद्याने चॉकलेट तुमच्या हातावर ठेवलं तर तुम्हाला थोडं वेडंखुळं व्हायला काहीच हरकत नाही.

मला नेहमीच वाटत असतं की,प्रत्येकाच्या तोंडात छोटासा गोड-खाऊ दात कुठेतरी असतोच.शिवाय जीभेवर निरनीराळी चव समजण्यासाठी निरनीराळी जागा असते त्यात गोडचव ओळखण्याची जागा कुठच्याही वयावर संवेदनशील असतेच.
त्यामुळे चॉकलेटची गोळी तोंडात टाकल्यावर ती चाखण्याची तीव्र इच्छा जागृत होऊन नक्कीच बरं वाटतं.

हे पण शक्य आहे की प्रत्येकाने आपल्या आवडीची चॉकलेटची गोळी निवडून चाखली तर आजुबाजूच्या जगात नक्कीच गुण्यागोविंदाने जगावं कसं वाटेल.माझी खात्री आहे की एक चॉकलेटची गोळी कुणाच्याही चेहर्‍यावर हास्य आणल्याशिवाय रहाणार नाही.आणि ते हसूं दुसर्‍याला हसायला लावून हा हास्याचा प्रवास चालू राहून सर्वच सुखी झाल्यासारखे होतील.
मग त्या गोळ्या चॉकलेटच्या असोत,मिंटच्या असोत,रावळगावच्या गुळाच्या गोळ्या असोत नाहीतर कॅडबरीच्या किंवा साठेंच्या टॉफी असोत,त्यात जो चॉकलेटी प्रकार असतो त्याने मनाची तृप्तीच होते.

एखाद दिवस बराच कटकटीचा गेला असेल,दिवस संपता संपता कटकट वाढत गेली असेल पण जेव्हा मी घरी येते आणि हा माझा चॉकलेटचा गोल टिनचा डबा उघडते आणि पहिली गोळी तोंडात टाकते त्यावेळी जणू दिवस जागच्या जागी थांबल्यासारखा वाटतो.माझ्या सर्व कटकटी विरघळून गेल्या सारख्या वाटतात. आरामात पडून माझी आवडती गोळी चोखत रहाते.
गंमत म्हणून तुम्हाला सांगते.
मुलाकडीची मंडळी पाहून गेल्यावर मुलगी नापसंत असल्याचा निर्णय कळवल्यावर त्या मुलीला दुःखी रहाण्यात थोडा वेळ जातो,वाईट वाटण्यात थोडा वेळ जातो पण म्हणून काही सर्वच वेळ असा घालवण्यात हाशील नसतं अशावेळी मला वाटतं एक चॉकलेटची गोळी चघळल्यावर सर्व शीण निघून जाईल.
माझी एक मैत्रीण दिसायला अशी तशीच होती.नापसंती झाल्याचं समजल्यावर पिशवी भरून चॉकलेटच्या गोळ्या आणून त्यात ती तिची सर्व दुःख बुडवून टाकायची.जरी तिचं मन पूर्ण सावरलं गेलं नसलं तरी जे काय घडलं त्याचा विचार विसरून जाऊन आपल्या आवडत्या गोळ्या निवडून चघळण्यात तिला त्या वेळेचं नक्कीच चांगलं वाटण्यात रुपांतर करता यायचं.

म्हणजे ह्याचा अर्थ अस नव्हे की घरातलं कुणी गेल्याने दुःखाचा होणारा तणाव एका चॉकलेटच्या गोळीने कमी होईल.पण एक मात्र मला नक्कीच कबूल करावं लागेल की,मला आवडणारी एक गोळी माझ्या तोंडात चाखण्यासाठी टाकल्यावर त्यातून विरघळून निघणारा साखरी चांगूलपणा माझ्यात थोडीशी सुखाची भावना आणतो.

काही माझ्याशी सहमत होणार नाहीत.तुम्ही कधी जाणवून घेतलंय काय?कुणीतरी आपली आवडती गोळी तोंडात टाकल्यावर त्याचा चेहरा कसा दिसतो?मी पैजेने सांगीन की,त्याच्या चेहर्‍यावर सातमजली हसू दिसेल.सगळं आजुबाजूचं विसरून जाऊन तो मुळात उदास का झाला ह्याचाही विचार करायचा विसरून जाईल.

पुढच्या खेपेला तुम्ही मनातून कोसळला तर बाहेर जाऊन तुम्हाला आवडणार्‍या चॉकलेटच्या गोळ्या घेऊन या.तुमच्या जीभेवर ठेवा आणि काय होतं ते पहा.माझी खात्री आहे की येणार्‍या सर्व समस्यांचा उलगडा होईल.गोळी जीभेवर पडल्यावर साखर भरधाव वेगाने अंगात शिरून, उदास वाटण्याचं रुपांतर आनंदात करून दिवस चांगला जाईल.आनंदाचं एखादं मिनीट का होईना,तसं होत असल्याने, मला चॉकलेटच्या गोळीबद्दल विशेष वाटतं.”

प्रमिला हे मला सर्व सांगत असताना मी मधून मधून आजोबांच्या चेहर्‍याकडे बघत होतो.आजोबांना तिचं म्हणणं पूर्ण पटल्यासारखं मला दिसत होतं.
त्यांना मी दिलेलं कॅडबरी चॉकलेटचं पॅकेट त्यानी उघडून त्यातला एक तुकडा माझ्या हातात देत मला म्हणाले,
“माझ्या जन्मदिवशी मुद्दाम येऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल थॅन्क्स.”
आणि दुसरा तुकडा आपल्या तोंडात टाकून मला म्हणाले,
“प्रमिलेचा मी आजोबाच नव्हे काय?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com