Saturday, August 13, 2011

ज्यावेळचं त्यावेळी.


“दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?”

मी नवा फ्लॅट मागेच बुक केला होता.आणि आता तो तयार झाला होता.त्याचे उरलेले सर्व पैसे दोन दिवसात भरायची मला बिल्डरकडून नोटीस आली होती.
माझं देना बॅन्केत खातं होतं.बरीच अशी माझी डिपॉझीट्स मला कॅश करून घ्यायची होती.पण त्या बॅन्केच्या मॅनजेरने हे सर्व व्हायला आठ दिवस लागतील असं सांगीतलं.

मला चटकन मालतीची आठवण आली.ती देना बॅन्कच्या हेड ऑफिसमधे वरच्या हुद्यावर काम करीत होती.मालती हौस म्हणून गाण्याचे कार्यक्रम करायची.तिचा आवाज छान होता.लहानपणापासून तिचा हा छंद होता.अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमात तिची आणि माझी ओळख झाली होती.

रविवारचा दिवस होता तिलाच भेटायला मी तिच्या घरी गेलो.मालती मला म्हणाली,
“तुम्ही काही काळजी करू नका.सोमवारी साधारण एक वाजता तुम्ही माझ्या ऑफिसात तुमचे सर्व डिपॉझीट्सचे पेपर्स घेऊन या.”
मी तिला म्हणालो,
“हे बघ,ते सर्व पेपर्स आता आणले आहेत.तुच ते तुझ्याबरोवर घेऊन जा.”

दुसर्‍या दिवशी सोमवारी मी मालतीच्या ऑफिसमधे गेलो.
गेल्या गेल्या माझ्या हातात हव्या असलेल्या रक्कमेचा चेक देत मालती मला म्हणाली,
“ह्या ह्या कागदावर सही करा.झालं, तुमचं काम संपलं आहे.
ज्यावेळचं त्यावेळी काम करायची मला सवय झाली आहे.
हे असं व्हायला त्याच्या मागे थोडी पार्श्वभूमीका आहे.
आपण चहा घ्यायला कॅन्टीनमधे जाऊया.तिकडे मी तुम्हाला माझे विचार सांगते.”

मी मालतीचे थॅन्क्स मानले आणि चेक नीट बॅगमधे ठेवून तिच्या बरोबर कॅन्टीनमधे गेलो.चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मालती मला म्हणाली,
“जीवनातून मार्ग काढायचा झाल्यास सोप्यात सोपा मार्ग म्हणजे ज्यावेळचं त्यावेळी करणं.न केल्यास खेद होण्यापलीकडे दुसरं मनाला दुःख होण्यासारखं कारण नसावं.आणि नंतर आलेली संधी त्याच क्षणी घ्यायला हवी होती पण बोटातून निसटली असं वाटायला लागावं.

मला आठवतं मी हायस्कूलमधे आठवीत असताना मला एक संधी आली होती.एका कार्यक्रमात स्टेजवर गाणं म्हणायची.मी ती संधी घेतली नाही.
कारण मी घाबरली होती.मला ते काम जमणार नाही असं वाटत होतं.नंतर काही महिने गाणं न म्हणण्याच्या माझ्या निर्णयाचा माझ्या मलाच मी दोष देत राहिले.
संशय आणि गोंधळ ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरं काहीही आणायला मला वेळच मिळत नव्हता.

अगदी प्रामाणिकपणे मलाच मी विचारलं असतं,
“ज्यावेळचं त्यावेळी मी केलं असतं तर असं काय झालं असतं.?”
कुणास ठाऊक?मी दुसरी लता मंगेशकर झाली असती.
कदाचीत नसतेही.पण निदान खात्री करून घ्यायला माझ्या अंगाला काही झोंबलं नसतं.

जेव्हा मी माझ्या भवितव्याचा विचार करायची त्यावेळेला मला दिसून यायचं की मला अगदी साधी जीवन-शैली जगावी लागणार आहे. परंतु,काहीवेळा मला दिसून यायचं की वाटणार्‍या नव्या भीतीवर मी मात करीत आहे.किंवा एका नव्या साहसाचा मी पाठपुरावा करीत आहे.
अशा जीवनाचा विचार येऊन माझ्या मलाच हसू यायचं.

दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?
अर्थात,मला तसं वाटणार नाही कारण मी त्या दोनही गोष्टी कधीही केलेल्या नाहीत.

पण केलं असतं तर नंतर, काहीतरी तडीस नेल्याची,आणि पुढे कधीतरी ह्याहीपेक्षा काहीतरी सनसनाटी गोष्ट करण्याची उत्सुकता असल्याची कल्पना मला करता आली असती.जरी मला माऊंट एव्हरेस्ट चढून जाण्याची चुरस करता आली नाही तरी,अनुभवातून मला सांगता येईल की,ज्यावेळचं त्यावेळी करणं फायद्याचं असतं.

मला आठवतं, माझ्या हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात,मला एका नाटकात गाणं म्हणायला संधी मिळाली होती.त्यासाठी मला शहरात जाण्याची जरूरी होती. शहरातल्या नाटकाच्या मंचावर गाऊन दाखवणं, म्हणजे एव्हड्या गर्दी असलेल्या श्रोत्यांत,ज्यात अनेक दर्दी गायक बसलेले आहेत,मला जरा कठीण वाटलं होतं.पण मला हे ही माहित होतं की,माझ्यात गाऊन दाखवायचं थोडंफार कौशल्य आहे. शिवाय अशी आलेली मोठी संधी निसटून जायला मला नको होतं.

शहरातला भयंकर उष्मा,आणि त्यात गाण्याच्या चुरसीचा ताण हे असून सुद्धा मी माझ्यात असलेलं सर्व काही दिलं आणि त्याबद्द्ल मला अभिमानही वाटला. मला माहित होतं की माझ्याकडून इतकं काही चांगलं गायलं गेलं नव्हतं.पण मला त्यामुळे नाराज व्ह्यायला जरूरीचं वाटलं नाही.

दुसर्‍या कुठल्याही स्पर्धेत पुन्हा भाग घेऊन माझ्या मलाच आव्हान द्यायला माझी तयारी झाली होती.मी काहीही करू शकते हे माहित झाल्यावर, जीवनात,भरपूर धाडस करणं आणि मनाला समाधानी वाटून घेणं यासाठी,जगायला मी तयार होते.प्रश्न होता फक्त ज्यावेळचं त्यावेळी करणं.
जीवनात खेद वाटून रहाणं,ज्यात मला गम्य आहे ते इतर करीत आहेत ते मी पहात रहाणं आणि ते करायला मला धाडस न होणं हे काही योग्य नाही.

माझा सर्व वेळ खर्ची करून जीवनात काय काय सफल करून घ्यायचं आहे याची एका मागून एक यादी करण्यात माझा काही फायदा होणार नाही असं मला वाटतं.त्यापेक्षा मी माझ्या जीवनाकडे, ज्यावेळचं त्यावेळी साध्य करून घेण्यात,लक्ष देते.त्यामुळे जगात असलेला सर्व वेळ, मला नवी यादी करायला, प्राप्त होतो.

माझ्या लक्षात आलं आहे की,आठवीत असताना आलेली संधी मी घेतली नाही म्हणून काही ह्या शतकातली मोठ्यात मोठी घोडचूक झाली अशातला भाग नाही.पण अजूनही मला त्यानंतर झालेला खेद लक्षात आल्यावर दुःख होतं.
मला अजूनही वाटतं की,हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शहरात जाऊन मोठ्या समुहात गायल्या नंतर त्याबद्दल वाटणं आणि आठवीत गाणं म्हणण्याची संधी आल्यावर माझ्या हातून ती संधी सुटली त्याबद्दल वाटणं,ह्या दोन्ही भावना वेगवेगळ्या होत्या.
मी ठरवलंय़ की,परत मागे वळून आठवीतल्या हुकलेल्या संधीच्या खेदाची भावना चुकूनसुद्धा मनात आणणार नाही.

म्हणून मी जाहिरपणे हेच म्हणेन,
“एखाद्या जॉबसाठी अर्ज करायचा झाल्यास आणि त्या जॉबला तुमच्याकडे असलेल्या अनुभवापेक्षा जास्त अनुभवाची गरज आहे असं वाटत जरी असलं तरी,ज्यावेळचं त्यावेळीच करावं.”

मालती जे काही मला सांगत होती ते मला पूर्णपणे पटलं होतं.
नव्हेतर मी पण मालती सारखाच विचार करीत आलो आहे.
उठता उठता मी तिला म्हणालो,
“तुझ्या सारखंच माझं आचरण आहे.ज्यावेळच्या त्यावेळीच मी हा फ्लॅट बुक केला होता.आणि तुझ्या सहकाराने मला त्या फ्लॅटचं पझेशन ज्यावेळचं त्यावेळी घेता येईल.आपल्या दोघांची विचाराची फ्रिक्वेन्सी जुळली हा मात्र योगायोग म्हटलं पाहिजे.”
माझं हे ऐकून मालती खूश झाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com