Monday, August 29, 2011

गुण- वैगुण्य़.


“माझं मन मला सांगतं की,तुझ्यात असलेल्या कमतरतेला तू नाकारलंस किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंस,तर तुझ्यात असलेल्या उत्तम गुणांचं महत्व कमी होऊ देण्यात तू प्रवृत्त होशील”.

प्रो.देसायांची वाट बघत आज मी बराच वेळ तळ्यावर बसलो होतो.आणि मी माझा वेळ ,मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचत, मजेत घालवत होतो.
आपण तळ्यावर येणार म्हणून भाऊसाहेबांनी मला सकाळी फोन करून सांगीतलं होतं.मी थोडा काळजीत होतो.पण तेव्हड्यात समोरून,मकरंद- प्रोफेसरांचा नातू- आणि बहुदा त्याचा एक मित्र ,असे ते दोघे लगबगीने येताना मला दिसले.काहीतरी खास काम आल्याने भाऊसाहेब आज येऊ शकत नाहीत असा निरोप त्यांचा नातू घेऊन येत असणार हे मी तेव्हाच ताडलं.

“आज तुमच्याबरोबर चर्चा करायला आजोबांनी मला आणि माझ्या ह्या मित्राला तुमच्याकडे पाठवलं आहे. मा्झा हा मित्र-सुनील तावडे-आजोबांशी एका विषयावर मघापासून चर्चा करीत होता.तेव्हड्यात माझ्या मामाने आजोबांना लगेच बोलावलं म्हणून ते त्याच्या घरी गेले आहेत.”
प्रो.देसायांचा मुक्काम-पोस्ट मुलीच्या घरी असतो.मधुनच ते आपल्या मुलाकडे जातात.

“चर्चेचा विषय काय होता.?मी विचारू शकतो का?”
म्हणून मी सुनीलला विचारलं.
“एकाच व्यक्तीत गुण-वैगुण्य असलं तर त्याचे फायदे-तोटे काय?”
हा मी प्रश्न मकरंदच्या आजोबाना विचारून त्यांचे विचार जाणून घेत होतो.”
असं सांगून नंतर सुनीलने मलाच प्रश्न केला,
“सिगरेट ओढणं,बिअर पिणं ह्या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे?”

मी म्हणालो,
“ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.मी फक्त एव्हडंच म्हणेन की,संयम राखून कुठचीही गोष्ट केल्यास तसं करायला काही हरकत नसावी.मात्र आपल्या सुदृढ शरीराला भविष्य काळात प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने त्याचा काय उपद्र्व होईल ह्याची पूर्ण जाणीव असणं बरं.”

मला सुनील म्हणाला,
“अधुनमधुन कधीतरी मला आमच्या घराच्या बाल्कनीत जाऊन उघड्यावर एखादी सिगरेट ओढायला आवडतं,आनंद होतो.असंच अधुनमधून कधीतरी मित्रांबरोबर एखाद्या गरमीच्या दिवसात मी एक दोन ग्लासीस थंडगार बिअर पितो.आणि कधी कधी जास्तही पितो.अर्थात हे मी मुद्दाम करतो.
वरचेवर मी भरपूर तूप घालून मखमखीत सांजा खातो.तसंच मला कामावर जायचं नसल्यास दुपार होई पर्यंत,आणि कधी कधी त्याहून नंतर मी घरी अंथरूणात लोळत असतो.

असं असलं तरी मी माझ्या शरीरावर प्रेम करतो.आठवड्यातून तीन वेळा मी योगाभ्यास करतो.फिल्टर करून पाणी पितो.कसलंही खत घालून केमिकल्स टाकून उगवलेल्या भाज्या मी खात नाही.मी ऑरग्यानीक भाज्या खातो.मी भरपूर काम करतो.फावल्या वेळात समाज कार्य करतो.माझं कॉलेजचं शिक्षण पूरं झालं तरी अजूनही मी काहीनाकाहीतरी शिकत असतो.चाकोरीच्या बाहेर जाऊन मी अनोळख्यालाही मदतीचा हात पुढे करतो.
लहान मुलं आणि पाळीव प्राण्याशी मी नेहमीच दयाशील असतो.
मी अतिशय काटकसरीत रहातो.एका मित्राबरोबर रहात्या जागेत भागीदारीने रहातो.पहिले कपडे फाटल्याशिवाय दुसरे नवीन कपडे घेत नाही.माझ्या खोलीत जुनं फर्निचर आहे.आणि माझ्याकडे टीव्ही नाही.

रोजच्या जीवनातल्या ह्या माझ्या खास वागण्याच्या तर्‍हा माझे पाय शक्यतोवर जमीनीवरच रोवून ठेवतात. माझी अशी इच्छा आहे की एखाद दिवशी प्रत्येकाने थोडा वेळ काढून “थोडीशी” घेऊन पहावी,दुपारची वामकुक्षी घेऊन पहावी,भरपूर पुरण घातलेली,जाड पूरणपोळी वाटीभर साजुक तुपात किंवा घोळवलेल्या वाटीभर दुधात बुडवून खाऊन पहावी.”

“तू ज्या काही चांगल्या गोष्टी करतोस,त्याचा अर्थ मुळीच नाही की वाईट गोष्टी करायला तू मुखत्यार होतोस”
मी सुनीलाला, माझं मत देत देत त्याच्याकडून आणखी विचार ऐकून घेण्याच्या इराद्याने, असं म्हणालो.

“हा विचार त्याहीपेक्षा खिचकट आहे”
असं सांगून सुनील मला म्हणाला,
“माझ्यात असलेल्या दोन्ही बाजू मी मिळवून-जुळवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.मी कबूल करतो की मी काहीसा चमत्कारीक वागतो आणि काहीसा आत्मसंयमी रहातो.सकाळीच थोडा आळशी असतो पण नंतर मी खूप कष्ट घेतो.मी शिस्तीत असतो पण मी थोडा चंचलवृत्तीचाही आहे.माझ्या शरीर स्वास्थ्याबद्दल आणि मानसिक संतुलनाबद्दल मी कदर करतो,तरीपण अधुनमधून,माझ्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या करायला मी प्रवृत्त होतो.”

मी सुनीलला म्हणालो,
“माझी अशी समजूत झाली आहे की तुझ्यात असलेल्या ह्या द्विविधताचा,छिन्नमनस्कतेचा तू आदर केल्याने तुला तू प्रबल,सुखी आणि सरतेशेवटी पूर्णपणे सशक्त बनवत आहेस असं तुला वाटत असावं.तुझं मानसिक संतुलन रहातं,तुझ्या मित्रमंडळी बाबत,तुझ्या कुटूंबियाबाबत,किंवा अनोळख्याबाबत तू समजुतीने घेत असावास.
नाहीपेक्षा तू त्यांच्याबाबतीत चक्रावून गेला असतास.”

“तुम्ही माझ्या अगदी मनातलं सांगीतलंत”
खुशीत येऊन सुनील मला म्हणाला.
त्यानंतर मला म्हणाला,
“बिछान्यावर झोपून रहाण्यात,लोळत रहाण्यात काय वाटत असतं हे मला माझ्या अनुभवाने माहित असल्याने,दुसरा एखादा भावनांच्या आहारी जाऊन त्याचा तोच, मनाने पंगू झाल्याने त्याच्या बिछान्यातून उठायला त्याला बळ येत नसलं तर त्याचं हे वागणं मी जाणू शकतो.

अधुनमधून दिखावा म्हणून मी थोडे फॅशनेबल शुझ खरेदी करण्यात पैसे उडवीत असतो,माझं हे पाहून, एखाद्या पैसे खर्च करण्यात विशेष विचारकरणार्‍याने, अशावेळी असल्या गोष्टीवर विशेष दाद देऊन अवलोकन केलं तर ते मी समजू शकतो. मला अधुनमधून बिअर पिण्यात चैतन्य येत असल्याने मजा येते,त्यामुळे व्यसनाधीन व्हायला एखादा कसा प्रवृत्त होत असेल याची मला कल्पना येते.ह्या सर्व गोष्टीची मला जाण आहे.पण मी त्यात गुंतून रहात नाही.

माझ्याच वैगुण्याबद्दल मला विशेष वाटत असल्याने त्याचं खंडण करणार्‍यांचा आदर करायला मला शक्य होतं.आपली ही अजब दुनिया ज्यात भरपूर चांगलं आणि भरपूर वाईट भरलेलं आहे तिला समजून घ्यायला मला तात्विक वादाचा किंवा मुल्यांकनाचा सहारा घेण्याची जरूरी भासत नाही.संदिग्धता आणि गुंतागुत ह्या दोन्ही गोष्टी मी अंगिकारतो.”

सुनीलचे हे मुद्दे मला कौतुकास्पद वाटले.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्यात असलेल्या वैगुण्याने तुला हतबल करून टाकण्यापूर्वी,वैगुण्याची मनोरंजकता तू हाताळल्यामुळे, त्याचं पर्यव्यसान, सोशिकतेत,संतुलनात, आनंदात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समानुभूतित होत असावं.
माझं मन मला सांगतं की,तुझ्यात असलेल्या कमतरतेला तू नाकारलंस किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंस,तर तुझ्यात असलेल्या उत्तम गुणांचं महत्व कमी होऊ देण्यात तू प्रवृत्त होशील.

माझं म्हणणं सुनीला आवडलेलं दिसलं.तो मकरंदकडे पहात होता. मकरंद काहीतरी बोलेल ह्या अपेक्षेत होता.तेव्हड्यात मकरंद मला म्हणाला,
“तुमच्याशी चर्चा करून सुनीलचं समाधान झालेलं दिसतं.गुण-वैगुण्याबाबत माझ्या आजोबांचं मत नक्कीच वेगळं होतं.ते स्वतः त्यांचं मत तुम्हाला पुढल्या खेपेला सांगतील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com