Tuesday, December 1, 2009

प्रतीरोध-क्षमता ही हृष्ट-पुष्ट होण्यापलिकडची बाब आहे.

"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."


मला कंटाळा आला की कोकणात निरनीराळ्या गावात जाऊन रहायला आवडतं.मग थोडे दिवस राहायचं झालं तर निदान तीथे एखादं हॉटेल असण्याची जरूरी आहे.पण सर्व ठिकाणी हॉटेलं असतील असं नाही.कुणा कडून माहिती काढून कोण कुठे रहातं ह्याचा उद्योग सहाजीकच निघण्यापूर्वी करावा लागतो.मग ओळख काढून त्यांच्या घरी रहायला मजा येते.

सावंतवाडी जवळच्या एका गावात जायचा योग आला. एकदा मुंबईहून एस.टीने प्रवास करताना सावंतवाडी येण्यापूर्वी ह्या गावात एस.टी थांबली होती.गाडीला काहीतरी काम निघाल्याने प्रवाशाना एक तास पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरून विश्रांती घ्यायला कंड्कटरने मुभा दिली होती.गावाचा परिसर मला खूपच आल्हादायक वाटला.भरपूर झाडी आणि बाजूने नदी वहाते.कोणाची ओळख काढून इथेच मुक्काम करावा असं वाटलं.जवळच्या हॉटेलात चहा आणि भजी घेऊन टेबलावर पडलेला ताजा पेपर वाचत होतो. त्यात स्थानीक कार्यक्रमाबाबत एक जाहिरात होती. कविसंमेलनाची ती जाहिरात होती. संमेलन दुसर्‍या दिवशी होतं.मी पण थोड्या कविता लिहिण्याच्या प्रयत्नात असतो.त्यामुळे ह्या कार्यक्रमात स्वारस्य घ्यावं असं वाटलं.फारतर सावंतवाडीत मुक्काम करावा लागेल एव्हडंच.

सावंतवाडीहून,आणि गोव्याहून काही होतकरूं कवीसंमेलनात भाग घ्यायला येणार होते.एक दोन स्त्रीयाही होत्या.सर्वांची नावं छापली होती.एका स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. कवयित्री साधना तिरोडकर.हॉटेलात मालकाकडे चौकशी केल्यावर कळलं की नदीकिनारी एका मोठया वाड्यात लहान लहान घरं आहेत,तीथे ती रहाते.आमची एस.टी. बिघडल्याने सावंतवाडीहून मेकॅनीक आल्यावर गाडी दुरूस्त होईल असं कळल्यावर हॉटेल मालकाच्या एका मुलाला घेऊन मला जी साधना वाटते ती तीच का म्हणून तीच्या घरी जायचं ठरवलं.आणि योगायोग असा की साधना माझ्या ओळखीची निघाली.
पूर्वी माझ्या कॉलेजात ती पण होती.मला पाहिल्यावर सहाजीकच तीने मला घरी रहाण्याचा आग्रह केला.
"तू कॉलेजात असताना कविता करायचीस ते मला ठाऊक होतं.तुझं नाव त्या हॉटेलातल्या पेपरात वाचलं नसतं तर केवळ तुला पाहून मी काही ओळखलं नसतं."

माझं बोलणं संपल्यावर साधना थोडी हंसली.
"तुझ्या हंसण्यावरून मात्र मी तुला ओळखलं असतं"
असं मी पुढे म्हणाल्यावर साधना मला म्हणाली,
"तू हंसला नसतास तरी मी तुला ओळखलं असतं.तुझं ते कोकणी हेल काढून-हेळे काढून बालणं माझ्या पक्कं लक्षात होतं.बाकी तुझा चेहरा आहे तसाच आहे फक्त टक्कल पडलं आहे.खरं तर तुझे केस त्यावेळी कुरळे कुरळे होते"

"ते जाऊं दे"
साधना माझी आणखी काही तरी फिरकी घेईल त्यापूर्वीच मी विषय बदलून तीला म्हणालो,
"पण तू ह्या खेड्यात केव्हा पासून राहायला आलीस.?
"संमेलन उद्या आहे.आज रात्री आपण भरपूर गप्पा मारूया."
असं म्हणून साधनाने मला रहायचा आग्रह केला.
जेवण झाल्यावर रात्री गप्पा झाल्या.
"तुझीच प्रथम हकीकत सांग"
असं मी साधनाला म्हणालो.

"इतराप्रमाणे मी पण अगदी कठीण काळ पाहिला आहे."
साधना मला म्हणाली.
"आजारपण,विश्वासघात,जवळच्यांचा मृत्यु वगैरे वगैरे.ज्या ज्या वेळी मी अशा कठीण काळातून जात असे त्यावेळी मनात म्हणायचे प्रत्येक व्यक्ती ह्या असल्या एक ना दोन प्रसंगातून जात असावी. आणि मी बरेचवेळा प्रतिरोध-क्षमतेचा म्हणजे ज्याला resilience म्हणतात त्याचा विचार करायची.सुखी जीवनासाठी प्रत्येकात थोडीतरी प्रतिरोध-क्षमता असायाला हवी."

मी म्हणालो,
"अलीकडे आपण ह्या क्षमतेचा जास्त विचार करीत नाही.त्याऐवजी पुस्तकातून किंवा टीव्हीच्या कार्यक्रमातून "अतिरिक्त विचार करा" किंवा "झालं गेलं विसरून जा" असा विचार दाखवला जातो ते पहातो."
"अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं"
असं म्हणून साधना म्हणाली,
"ह्या विचारातून परंपरागत पद्धतीने मनाला लागलेले घाव भरून काढण्याचे उपचार असले तरी अलीकडे माझ्या लक्षात आलंय की जे काही घाव होतात ते समयाचा आधार घेऊन माझ्यातून एखाद्या गाळणीतून गाळून घेतल्यासारखं केल्यावर मग मी जगाला कसं तोंड देऊ शकेन त्यातला फरक मला उघडपणे दाखवून देतात.
माझ्या तीशीतल्या वयात मी ह्या गोष्टींचा विचार करून निराश व्हायचे.आणि त्यामुळे मला तोंडावर हंसू आणणं पण कठीण व्हायचं.कधी कधी सकाळ होता होता जीव नकोसा व्हायचा.माझी निराशा त्यावेळी खूपच वाढली होती."

"मला आठवतं मी तुझ्या घरी एकदा आलो होतो.तेव्हा तू आजारी आहेस असं कळलं.आणि तू घरी नव्हतीस."
असं मी तीला म्हणालो.
"अखेर माझी बरेच महिन्यासाठी एका इस्पीतळात रवानगी झाली होती.मला फारच डिप्रेशन आलं होतं.पण माझं नशीब जोरदार होतं.मी लवकर बरी झाले होते.ते इस्पीतळातले अठरा महिने महाकठीण होते.मी माझ्या मुलांपासून, नव‍र्‍यापासून आणि माझ्या इतर मैत्रीणीपासून दूर राहिले होते.ह्या झालेल्या नुकसानीची मला खूपच खंत लागली होती.परत हृष्ट-पुष्ट व्हायला ज्याची जरूरी आहे ती गोष्ट, ज्याला काही लोक प्रतीरोध-क्षमता म्हणतात ती आणणं मला महाकठीण झालं होतं.
पण त्यानंतर माझ्या जीवनचक्राच्या धारेवरून केंद्रभागी येण्यात माझ्यात बदल झाला होता.
माझं संकंट निवळलं होतं पण माझी नुकसानी खूप झाली होती. माझ्या प्रौढ जीवनात मी पत्नी,आई आणि शेजारी म्हणून माझं जीवन जगले होते.आता माझी मुलं जवळ नाहीत.माझे पती निर्वतले. त्यामुळे मी एकटीच झाले होते.दुसरं जीवन जगण्याची मला जरूरी भासूं लागली.
"मग तू शहर सोडून इकडे रहाण्याचा विचार कसा केलास?"
असा मी साधनाला प्रश्न केला.

ती म्हणाली,
"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."
तेव्हाच माझ्या लक्षात आलं की प्रतीरोध-क्षमतेची अन्य रूपं असतात.मी बराच विचार करून ह्या गावात येऊन राहायचं ठरवलं.खरं तर माझं सासर तिरोड्याचं.पण माझी एक मावशी इथे रहाते तीची सोबत मिळेल म्हणून मी ह्या गावात रहाण्याचा विचार केला.माझ्या नवर्‍याच्या विम्याच्या आलेल्या पैशामधून एक जूनं घर इथे मी विकत घेतलं.मला इकडे फारसं कोणी ओळखत नव्हतं.मला लहानपणापासून बाग-काम करायचा नाद होता.घराच्या पुढे आणि मागे परसात मी सूंदर फुलांची झाडं लावली.घरातल्या खोल्यांची रंगरंगोटी करून घेतली.एक सर्वसाधारण बाई एक सर्वसाधारण जीवन जगते आहे असा विचार करून इकडे रहात आहे."

मला साधनाची एकंदर परिस्थिती ऐकून गहिवर आला.तीला बरं वाटावं म्हणून मी म्हणालो,
"जसं तळ-शिळेतून गाळून निघालेलं पाणी खोल झर्‍याला मिळून मग तो झरा एकाद्या जलाशयाला जाऊन मिळतो तसंच तू तुझं दुःख आणि तुझी खंत तुझ्यातून गाळून तुझ्या स्वतःच्या जलाशयात तीला जाऊं दिलंस."

विषय बदलण्यासाठी मी साधनाला पुढे म्हणालो,
"तुझ्या कविता लिहिण्याच्या नादाचं पुढे काय झालं ते सांग."
परत जरा हंसून साधना मला म्हणाली,
"मला आठवतं मी अगदी तरूण वयात दोन चार कवितेच्या ओळी लिहायची.लिहून झाल्यावर त्या ओळी वाचून माझाच मला आनंद व्हायचा.मधे दहाएक वर्षाचा खंड पडला.आता मी स्वतंत्रपणे कविता लिहून अलीकडे एक संग्रहपण छापून घेतला आहे.माझी प्रत्येक कविता म्हणजे निराशेतून आणि आनंदातून मार्ग काढून घेण्याचा एक प्रयत्न असतो.माझी प्रत्येक कविता म्हणजे नवीन मोका असतो तो आठवण करून देतो की ती कविता एक प्रतीरोध-क्षमतेचं नवीन रूपच आहे."

"मग तुझी एखादी कविता मल वाचून दाखवंच"
असा मी तिला आग्रह केला.
"माझ्या तानुचा-माझ्या मुलीचा- आज वाढदिवस आहे.लहानपणी ती एकदा पाय घसरून पडली होती.तीचा एक हात दुखावला गेला होता.आणि तो बरा होता होता परत ती त्याच हाताला दुमडून पडली आणि परत तिला प्लास्टर लावावं लागलं होतं.हे तिला सर्व नवीनच होतं.
तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं.सतत कुणालाही मदत करणारी तानु,एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी तानु,आज हिरमुसली होवून बसलेली पाहून मला एक कविता सुचली.ती मी तुला वाचून दाखावते"
असं म्हणून साधना वाचायला लागली,
"कवितेचं शिर्षक आहे"

"छळकुटा देव"

किती छळसी रे तू देवा
का करिसी तानुलीचा हेवा?
करिते ती सर्वांची सेवा
का पाडीसी तिला पुन्हा पुन्हा
कसली शिक्षा
अन कसला गुन्हा


बागेत बागडणारी
ती तानुली
फुलाना खुडणारी
ती तानुली
पक्षा संगे गाणारी
ती तानुली
फुल-पांखरासवे पळणारी
ती तानुली
बसे होवूनी हिरमुसली
घरी दिवसभरी


समजून घे रे देवा
पाडू नको तिला पुन्हा पुन्हा
करी झटकन उपाय
तिच्या दुखापतीला


ऋणी होवू आम्ही
तुझ्या ह्या मेहरबानीला
पुन्हा आणिल ती घरी चैतन्याला
आनंदी होवू आम्ही फिरूनी
बघुनी तिच्या मधुर हास्याला


"किती सुंदर विचार आहे.मला तुझी कविता खूपच आवडली.तुझा कवितासंग्रह पण मी वाचून काढणार आहे.उद्या नाहीतरी तू तुझ्या तुला आवडणार्‍या कविता संमेलनात वाचणार आहेस."
असं मी साधनाला म्हणालो.
"रात्र खूप झाली आहे.आता आपण झोपूया."
असं साधनाने सांगीतल्यावर आम्ही झोपायला गेलो.
दुसर्‍या दिवसाच्या कवीसंमेलनाच्या उमेदीत मी केव्हा झोपलो ते कळलंच नाही.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com