Tuesday, December 22, 2009

रंगात छपलेलं सौन्दर्य.

“ही अगाध चित्रकारी माझ्या मनात येणार्‍या उमेदीबद्दलची माझी समझ ताजी करते आणि त्यावर असलेली माझी श्रद्धा पुनःनिर्माण करते.”

ते पावसाचे दिवस होते.मी वर्दे यांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती.त्यांच्या घराच्या समोरच्या पटांगणात आम्ही खूर्च्या टाकून बसलो होतो.आकाशात ढग जमले होते.पण पाऊस येण्याची शक्यता बरीच कमी होती.काळे कुट्ट ढग पाहून आणि गार हवेची झुळूक मधून मधून अंगावरून गेल्यावर थोडातरी पाऊस पडून जावा असं मनात येत होतं.
तेव्हड्यात दोन मोठ्या ढगामधे अंतर येऊन त्या भेगेमधून संध्याकाळच्या सूर्याची सोनेरी किरणं दिसायला लागली होती.माझ्या मनात आलं अशाच वेळी सुंदर इंद्रधनुष्य तयार व्हावं.आणि तसंच झालं.ते सप्तरंगी इंद्रधनुष्य पहात असताना वर्दे यांची मुलगी, सूंदरी-कुंदा-आमच्यासाठी चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.रिकाम्या कपांच्या खणखण आवाजाने मला तीची चाहूल लागली.कुंदाला मीच सुंदरी म्हणायचो.खरोखरच ती लहानपणापासून सूंदर दिसायची. गोरा गव्हाळी रंग,लाल चुटूक ओठ, काळे भोर डोळे, कारण डोळ्यातला पांढरा भाग कमीच होता.सरळ नाक आणि गोड वरच्या पट्टीतला आवाज. अशी कुंदा त्यावेळी दिसायची.म्हणूनच मी तीला सुंदरी म्हणायचो.आता ती अर्थात मोठी झाली होती.पण सर्व सौन्दर्य टिकवून होती.
चहाचा कप माझ्या हातात देता देता आणि दुसरा कप आपल्या हातात घेऊन चहाचा घोट घेता घेता दुसर्‍या खूर्चीवर बसली.आणि मला म्हणाली,
“बोला”

मी कुंदाला म्हणालो,
“ते इंद्रधनुष्य बघ.विश्वकर्म्याची काय ही कलाकृती.?”
कुंदाला मी न जाणता काहीसं सक्रिय व्हायला कारणच दिलं.
मला म्हणाली,
“काका,रंगातलं सौन्दर्य मला विशेष आवडतं.
मग तो आ-वासून प्रेरणा देणारा छानदार जांभळट पर्वतांच्या रांगांच्या मागे दिसणारा आभाळातल्या गुलाबी आणि नारंगी रंगाच्या अस्थाला जाणार्‍या सूर्याच्या झगमगत्या छटा सारखा असो वा पांढर्‍या शुभ्र कागदावरचा काळ्या अक्षरातला उतारा असो.”

मी कुंदाला म्हणालो,
“काही लोकांचे ह्या जगातले निरनीराळे भेदभाव,मग ते माणसा माणसातले असो,रंगारंगातले असो किंवा सौन्दर्यातले असो जेव्हा आपल्या समजूतींची छेडछाड करतात तेव्हा, त्याचं मला विशेष कुतूहल वाटतं.रंगाचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास,एखादा लालभडक तिखट पदार्थ आपल्या ओठातून शिरकाव करून जीभेवर विराजमान होतो तेव्हा तोंडात पाण्याचा पूर येतो. नाकपुड्या फुगतात जेव्हा हिरव्या गार गवताजवळ गेल्यावर मातीचा सुगंध नाकपुड्या हुंगतात तेव्हा.जेव्हा काळे-करडे कभिन्न ढग उंच आभाळात लोंबताना दिसतात,तेव्हा उदासिनतेत डुबून गेल्यासारखं वाटतं आणि केव्हां एकदा उत्कंठा आणणारं,उत्साह आणणारं नारंगी रंगाचं वातावरण येईल असं वाटतं.किती हे रंग वातावरण निर्माण करतात?”

हे ऐकून कुंदा मला म्हणाली,
“असं असूनही कुठलाच रंग नाडी-स्पंदन वाढवीत नाही, जीभेला स्थिर करीत नाही,उदरात मंथन करीत नाही,भावना प्रज्वलीत करीत नाही जेव्हडं काळ्या आणि गोर्‍या रंगातलं वैषम्य करूं शकतं.”
“असं तू का म्हणतेस?”
मी कुंदाला प्रश्न केला.

“त्याचं असं झालं,”
ती म्हणाली,
“लहानपणी मी माझ्या आईवडीलांबरोबर एका जत्रेला गेली होती. असेन मी कदाचीत दोन-तीन वर्षाची.त्याठिकाणी माझ्या आईवडीलांची दुसर्‍या एका जोडप्याशी ओळख झाली.त्यांच्या बरोबर एक काळसावळी मुलगी होती.असेल चारएक वर्षाची.मी एकटीच जत्रेतल्या त्या उंच रंगीबेरंगी चक्राची राईड घ्यायला घाबरत होती.ती मुलगी माझ्याबरोबर मला साथ द्यायला जणू माझी मोठी बहिण होऊन पुढे आली.तीचं नाव मला आठवतं, केतकी.
ती माझ्या संरक्षणासाठी आपला हात हळूवारपणे माझ्या गळ्यात टाकून मला जवळ ओढून बसली होती.आम्ही दोन मुली मांजरांची दोन गुबगुबीत पिल्लांसारखी दिसत असावी.आमचा उत्साह माझ्या बाबांनी त्यांच्या कॅमेर्‍यात टिपला होता.आम्ही दोन मुली निरागस चेहर्‍याच्या,निष्कपट मनाच्या त्या फोटोत दिसत असाव्यात.”

मी म्हणालो,
“हो,तो मी तुझा फोटो पाहिला होता.मी तुझ्या बाबानां म्हणालो ही होतो,
“नातं ना गोतं पण अगदी मागच्या पुढच्या बहिणी सारख्याच दिसतात.”
पण त्या फोटोची तुला आज आठवण का आली?”

“कारण सांगते,मी ज्यावेळी अकरा वर्षाची झाली तेव्हा मला आठवतं आमच्या शाळेतल्या बाईंनी एक सुंदर नाचाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
आम्ही सर्व मुली त्यात हिरीरीने भाग घेतला होता.पण काही मुली निष्कारण भांडण उकरून माझ्याशी न बोलत्या झाल्या होत्या.मला आठवत्तं एक दोनदां काही मुलीनी कट रचून मला वर्गात कोंडून ठेवलं होतं. त्या फोटोतल्या मुलीची आठवण आली की माझ्या जीवनातले काही प्रसंग मला आठवतात.मघाशी तुम्ही जे भेदभावाचं काहीसं म्हणालात ना त्या भेदभावाने मला त्या फोटोची आणि इतर प्रसंगाची आठवण आली.”

मी म्हणालो,
“हे बघ कुंदा,तू काहीशी सुंदर चेहर्‍याची गव्हाळ रंगाची असल्याने बर्‍याच जणाकडे आकर्षित होत असावीस. ते तर त्यांच्यात असूया आणण्याचं कारण नसेल ना?”
“कदाचीत तुमचं म्हणणं बरोबर असेल.
कारण नंतर वरच्या शाळेत गेल्यावर पण मला अश्याच प्रकारचा अनुभव आला.”
असं सांगून कुंदा पुढे म्हणाली,
“निरनीराळ्या स्वभावांच्या मुलींशी माझी मैत्री असताना सुद्धा आणि मी नेहमीच त्यांच्याशी प्रेमळ वागणूक ठेवली असताना सुद्धा माझ्या वर्गातल्या एका मुलीने मला टाकून बोलायचा प्रयत्न केला.एकदा तीने माझ्याशी धक्काबूक्की केली.माझी पुस्तकं लपवली आणि असाच हा कटू अनुभव एकदा आमच्या शाळेच्या ड्रॉइंग टीचरनी पाहिला.आणि त्यापासून त्या मुलीवर अप्रत्यक्ष वचक आला. चकचकीत वाटणार्‍या माझ्या जगात मला फिका फिका प्रकाश दिसायला लागला.आणि अशीच एक दिवस मी मन कंपीत करणार्‍या एका फोटोअल्बमवर धडपडले. त्यात तो दोन लहान मुलींचा फोटो दिसला. तोच तो फोटो जो माझ्या बाबानी त्या जत्रेत काढला होता.”

जेव्हा मला माणसाच्या मनातली मनोहरता संपली असं वाटतं त्यावेळी हा फोटो माझा नैतिक होकायंत्र आहे असं मी समजते. ज्यावेळी त्या फोटोकडे मी पहाते त्यावेळी माझ्या संरक्षणासाठी तीने टाकलेला माझ्या गळ्यातला तो तीचा हात आणि मला चिकटून बसलेली ती मुलगी फोटोत पाहून मलाआकाशातल्या इंद्रधनुष्याची आठवण येऊन मी मंत्रमुग्ध होते.ती माझ्यापेक्षा जरा काळसावळी असली तरी आमच्या दोघातल्या प्रेमाच्या रंगाच्या छट्या त्या इंद्रधनुष्यासारख्याच वाटतात.
ही अगाध चित्रकारी माझ्या मनात येणार्‍या उमेदीबद्दलची समझ ताजी करते आणि त्यावर असलेली माझी श्रद्धा पुनःनिर्माण करते.”

मी म्हणालो,
“पण सर्वात महत्वपूर्ण म्हणजे खरोखरच ही चित्रकारी, ते रंग किती सुंदर असू शकतात ह्याची जाणीव करून देते.तुला नाही का वाटत?”
“काका,अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात.”
असं कुंदा म्हणाली.
आणि आम्ही दोघं परत आकाशाकडे पहायला लागलो.पण ते सप्तरंगी इंद्रधनुष्य केव्हांच फुसलं गेलं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com