Saturday, December 26, 2009

पहिला तारा पहाण्याचा प्रसंग प्रत्येक रात्रीचा.

“जरी माझं जीवन आनंदायी होतं तरी त्या आनंदावर माझा आवर असायचा.पण एखाद्या तृप्त जीवानात वाटावं तशी माझ्या जीवनात मी दिलचस्पी घेत नव्हतो.”

मला आठवतं त्या दिवशी मी दिल्लीहून दुपारची फ्लाईट घेऊन घरी आलो होतो.आदल्या दिवशीच्या मोठ्या मिटींगमुळे जरा थकवा आला होता.घरी आल्यावर फ्रेश होऊन थोडी विश्रांती घ्यायचं मनात होतं.
पण लिखीत निराळंच होतं.घरी आल्यावर कळलं की मि.महात्म्यांना जोरदार हार्ट ऍटॅक येऊन ते लागलीच निर्वतले. महात्मे आमच्या कॉलनीत राहायचे.

आल्या आल्या तसाच त्यांच्या घरी गेलो.महात्मे शेअरबाजारात ब्रोकर होते.कदाचीत शेअरमधे मंदी आल्याने त्यांची नुकसानी झाली असावी. त्याचा परिणाम असावा.त्यांचा मोठा मुलगा कमलाकर त्यावेळी कॉलेजमधे शिकायचा. वडीलांच्या पश्चात आता त्याच्यावर सर्व जबाबदारी आली होती.
महात्म्यांची आर्थीक परिस्थिती तशी चांगली होती.त्यानंतर कमलाकरने कॉलेज पुर्ण करून त्याच्या वडीलांच्या मित्राच्या शेअर बाजारातल्या फर्ममधे काम पत्करलं होतं.आणि आता कमलाकर स्वतः शेअर ब्रोकर झाला होता.
अशाच एका कंपनीच्या शेअर संबंधाने मी त्याला त्याच्या घरी भेटायला गेलो होतो.मला पाहून त्याला खूपच आनंद झाला.
मला म्हणाला,
“काका,तुम्हाला पाहिल्यावर माझे मला लहानपणाचे दिवस आठवले. आता पर्यंत पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं. पण माझ्या लहानपणाच्या संवयी आठवायला काहीतरी कारणं लागतात.तुम्हाला बघून त्या आठावणी काढून मन मोकळं करावंसं वाटायला लागलं”
मी कमलाकरला विचारलं,
“कुठल्या संवयी?”

मला म्हणाला,
“आकाशात तार्‍यांकडे बघून जे काही मनात असेल ते पुरं होऊ दे असं त्या तार्‍याकडून मागून घेण्यावर त्यावेळी मी विश्वास ठेवायचो.
मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी माझ्या झोपायच्या खोलीतून खिडकीमधून प्रत्येक रात्री जो पहिला दिसेल त्या तार्‍याकडे मनातली इच्छा पुर्ण होण्यासाठी मागावं हा माझा रोजचा रिवाजच झाला होता.”
मी कमलाकरला म्हणालो,
“हे बघ,किशोर वयातली ही एक प्रकारची कसोटी म्हणा किंवा किशोर वयातली कटुअनुभवाची अनुभूती म्हणा ह्या संवयीची त्यासाठी मदत होत असते.
आपल्या पेक्षा भव्य असलेल्या गोष्टीशी आपलं काय नातं आहे हे पहाण्यासाठी ह्या संवयीतून आपला नेहमीचा प्रयत्न होत असतो.जरी मनातल्या मागण्यांची पुर्तता तार्‍यांकडून होत नसली तरी काही दृष्टीने तसं करणं काहींना बरं वाटतं.”

“काका,मी कॉलेजमधे गेल्यावर ह्या रिवाजाला जरा खंड पडला आणि त्याचं मुख्य कारण कॉलेजच्या जवळच्या ज्या इमारतीत मी रहात होतो त्यातली माझी खोली खिडकी पासून जरा दूरच होती.पण ज्यावेळी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या घरी परत यायचो त्यावेळी वेळात वेळ काढून माझ्या जीवनात जे काय घडायाचं त्यावर विचार करायचो. आणि काही तरी नव्या गोष्टीसाठी तार्‍याकडे मागणी करायचो.”
कमलाकर सांगू लागला.
“एकदा एका वर्षी दिवाळीच्या सुट्टीत मी घरी आलो होतो.माझे बाबा त्या सुट्टीत निर्वतले होते.त्यांचा शेअर ब्रोकरचा व्यवसाय होता.त्या दिवाळीत मार्केटमधे खूपच मंदी आली होती.शेअरचे भाव खूपच खाली आल्याने माझ्या बाबांची बरीच आर्थिक हानी झाली होती.त्याचा त्यांच्या मनावर धक्का बसून हार्ट-ऍटॅकने ते गेले.हा मानसीक धक्का,अतीव दुःख,उदासिनता ह्यामुळे माझं डोकं नेहमी सुन्न व्हायचं. एकदा रात्री मी खिडकीतून बाहेर आकाशाकडे डोकावून पाहिलं पण तार्‍याकडे काही मागायची इच्छा होई ना.नव्हे तर तसं करणं बरोबर वाटे ना.माझा ह्या माझ्या संवयीवर असलेला
विश्वास उडाला होता अशातला हा प्रकार नव्हता.परंतु, मी तार्‍याकडून मिळणार्‍या आशा-अपेक्षांवर मन केंद्रीत न करता ही दुःखद घटना सहजपणे हाताळण्याचा प्रयत्न करीत होतो.”

“त्याचं काय आहे”
मी कमलाकरला म्हणालो,
“जशी वर्ष निघून जातात.आणि नंतर हळू हळू विचाराने पोक्त झाल्याने,शिक्षणामुळे,आणि जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळीच्या सहाय्याने जीवन सुखकर होत जातं.आणि ह्या किशोरावस्थेतली तार्‍याकडून इच्छा मागून घेण्याची संवयी लोप पावत जातात. कदाचीत मी असंही म्हणेन की त्या संवयीला घट्ट गुंडाळून बाजूला ठेवून दिलं जातं.”

“काका,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे”
असं म्हणून तो पुढे म्हणाला,
“अधून मधून मी वर आकाशाकडे बघत असे आणि थोड्या सहाय्याची मागणी करीत असे.पण बरेच वेळा माझ्याच मला मी तसं न करण्याची तंबी द्यायचो आणि त्यामुळे मझ्याकडून तार्‍याकडे काही तरी मागण्याचा बालीश प्रयत्न होत नसायचा.
जरी माझं जीवन आनंदायी होतं तरी त्या आनंदावर माझा आवर असायचा.पण एखाद्या तृप्त जीवानात वाटावं तशी माझ्या जीवनात मी दिलचस्पी घेत नव्हतो.”
“पण आता तुझं लग्न ठरलंय असं मी ऐकलंय.मग केव्हा लग्न करतोयस?”
असा मी कमलाकरला प्रश्न केला.

“अलीकडेच मी एक मुलगी पाहायला गेलो होतो.आणि ती मला पसंत पडली.मी सुद्धा तीला पसंत होतो.एक दिवस तीच्याबरोबर फिरायला जाऊन नंतर मी तीला तीच्या घरी सोडायला पण गेलो. तीला तीच्या घरात सोडून आल्यावर नेहमी वाटावं त्यापेक्षा त्यावेळी जरा निराळंच वाटलं.चालत चालत घरी येत असताना मी वर मान करून सहज आकाशाकडे पाहिलं.आणि कोणतंही मनात अनमान न आणता पहिल्या दिसलेल्या तार्‍याकडे मागणी केली.
आणि ती फळाला आली.माझं आणि तीचं आता लग्न ठरलंय.वयक्तीक दृष्टीकोनातून पाहिल्यास आता पर्यंत मला मी एव्हडा परिपूर्ण झालो असं जाणवलं नव्हतं.”
हे कमलाकरचं ऐकून मी जरा माझ्या गालातल्या गालात हंसलो.

“काका,तुम्ही हंसला, त्यावरून माझी खात्री झाली आहे की तुम्ही ह्या माझ्या म्हणण्यावर नक्कीच काही तरी स्पष्टीकरण म्हणा किंवा सफाई म्हणा देणार हे उघडंच आहे.”
कमलाकरने माझ्या मनातलं ओळखलं.
मी म्हणालो,
“तुझं बोलणं ऐकून लगेचच माझ्या मनात प्रश्न आला की तुझ्या बाबतीत हा ठरावीक समयाचा प्रताप होता का? की तो समय येई पर्यंत तुझ्या जीवनात ती मुलगी येण्याचं तू तुला आवरून ठेवलं हो्तंस?.तुमचं दोघांचं जन्मोजन्मीचं नातं असल्याने तीला भेटेपर्यंत वाटेत आलेल्या सर्व अडचणी निघून गेल्या असाव्यात का? हे काही खरं असेल असं मला वाटलं नाही.
नंतर माझ्या मनात आलं की कदाचीत ही तुम्हा दोघातली रहस्यमय प्रकिया आहे असं तर नाही ना?का एकमेकाचं होण्यासाठी निर्माण झालेली ती ओढ तर नाही ना?
हे जरा मला जास्त संयुक्तीक वाटलं.”

मला कमलाकर म्हणाला,
“काका,तुमचं हे ऐकून मला काय वाटतं ते खरं सांगू का, मी माझ्याच मनात म्हणतोय की तार्‍याकडे माझ्या इच्छापुर्तीची मागणी करण्याच्या माझ्या संवयीचा चमत्कारपूर्ण त्याग होण्यासाठी, माझ्या विचारात परीवर्तन होण्याचा हा प्रकार असावा. “

“जाउं देत रे,सकाळ झाली म्हणजे झालं.कुणाच्या कोंबड्याच्या आंरवण्याने सकाळ झाली ह्याला महत्व नाही.तुझं लवकरच लग्न होणार आहे हीच खरी आनंदाची गोष्ट आहे.ह्यावेळी मला दोन कवितेच्या ओळी उस्फुर्त सुचल्या.त्या ऐक.”
असं म्हणून मी म्हणालो,

“प्रकाश नीळ्या नीळ्या नभाचा
झगमगाट लुकलुकणार्‍या तार्‍याचा
पहिला तारा पहाण्याचा
प्रसंग प्रत्येक रात्रीचा
मागणी इच्छा पुर्तीची
होईल का ती खात्रीची”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com