Wednesday, December 30, 2009

माझ्या गळाला लागला मासा.

“मासा एव्हडा मोठा होता की त्या वयात मला आजोबांची मदत घेतल्याशिवाय ती भयंकर कामगीरी पार पाडता आली नसती.”

ह्यावेळी मी आजगावला- माझ्या आजोळी- जाताना बस वगैरे न घेता पायीच जायचं ठरवलं.वेंगुर्ल्याहून निघालो होतो.उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पहाटेच निघालो होतो.मधली लहान लहान खेडी पार करून जाता जाता उभादांडा नावाचं गाव लागतं.ह्याच उभ्यादांड्याला आपल्या सुनील गावसकरचं घर आहे.ह्या गावात मुख्य रस्त्याच्या आजुबाजूला घरं आहेत आणि बरीचशी घरं कौलारू आहेत.रस्त्यावर भरदुपारी संध्याकाळ झाल्याचं वातावरण दिसतं.आणि त्याचं मुख्य कारण कोकणातली वनराई. पाहू तिकडे माडाची,पोफळीची उंचच उंच झाडं आणि पोफळीवर किंवा तरूण माडाच्या झाडावर ज्याला कवाथा म्हणतात त्यावर पानवेली निक्षून दिसतात.

आणखी एक दोन खेडी चालून गेल्यावर घाटी लागते.घाटी चढून जाताना मजा येते.जसं जसं घाटी वर चढत जावं तसं तसं रस्त्याच्या कडेवर येऊन पाहिल्यास खालच्या पातळीवरची गावं दिसतात.आणि भर दिवसा घराघरातून धुराचे लोट आलेले दिसतात.लाकडं जाळून चुलीवर जेवण केलं जात असल्याने प्रत्येक घराच्या कौलावर धुरांडी लावलेली असतात त्यामुळे सर्व गावातून धुराचा लोट आलेला दिसतो.
घाटीच्या अगदी माथ्यावर आल्यावर खाली वाकून पाहिल्यावर मोचेमाडची नदी दिसते.”संथ वाहते कुष्णामाई “ह्या गाण्याची आठवण येते.मोचेमाडची नदी थोड्या अंतरावर वेगुर्ल्याच्या समुद्राला मिळून जात असल्याने पाणी संथ होत जातं.लहान लहान होड्या खपाटे,आणि साधारण आकाराची गलबतं एव्हड्या उंचीवरून पाहिल्यावर नदीवरून किती वाहातूक होते याची कल्पना येते.वेंगुर्ल्याच्या बंदरावर किंवा मांडवीवर ही मालवाहू गलबतं मुंबईला जाणारा माल घेऊन जातात.त्यात आजुबाजूच्या गावातला भाजीपाला,केरसुण्या,सुपं,रवळ्यासारख्या वस्तु,ऊस आणि सुकाबाजार म्हणजेच सुके मासे भरलेल्या टोपल्या असतात.काही वेळा हा माल वेंगुर्ल्याहून ट्रकने बेळगाव कोल्हापूर सारख्या शहरात पण जातो.

घाटीला उतार लागल्यावर चालायला जरा बरं वाटतं.सकाळच्यावेळी तर नदीवरून येणारा थंड वारा खूपच आल्हादायक वाटतो.
ह्यावेळी मी मोचेमाड गावात मुक्काम करायचं ठरवलं.एक रात्र काढून मग दुसर्‍या दिवशी पुढचा प्रवास करायचं ठरवलं. माझ्या लहानपणी माझ्याबरोबर शिकणारा डिसोझा ह्याचं हे मुळ गाव.शिक्षणासाठी तो वेंगुर्ल्याला राहायला यायचा. सुट्टीत आपल्या गावी मोचेमाडला जायचा.
मी त्याच्या बरोबर बरेच वेळा सुट्टीत राहायला गेलो होतो.
त्याचा पत्ता शोधत कोळीवाड्यात गेलो.आता गावात फारच सुधारणा झाली होती.पूर्वीच्या त्याच्या घराचं नवीन घरात रुपांतर झालं होतं.
एका घराच्या खळ्यात एक मोठ्या पोटाचा,डोक्याला टक्कल आलेला भरपूर मिशा आणि कल्ले असलेला माणूस दिसला.
“रॉड्रीक्स डिसोझा कुठे राहातात हो?”
असा मी त्याला प्रश्न केला.
“हांवच रॉड्रीक्स “
असं म्हणून माझ्याकडे बघून तो हंसला.
मी पण हंसलो.पण मी म्हणत होतो तो माझा शाळकरी मित्र हाच ह्याची मला खात्री नव्हती.मी पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वीच तो म्हणाला,
“अरे बामणा मी तुला ओळखलं.”
त्याने मला आत बोलावून घेतलं.
“ते कसं?”
मी त्याला आत शिरता शिरता विचारलं.
“अरे बामणा तुझ्या उजव्या गालवरची खळी माझ्या चांगली लक्षात आहे रे.”
डिसोझा मला शाळेत बामणा म्हणून हाक मारायचा हे माझ्या चटकन लक्षात यायला वेळ लागला नाही.
“तुझ्याकडे मी आज मुककाम करणार आहे.”
असं मी त्याला सांगून टाकलं.
“आणखी एक दिवस राहा.आता दिवस संपायला आला आहे. परवा तू जा तुझ्या आजोळला”
मला अगदी आग्रह करून डिसोझा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी आम्ही दोघं नदीवर गेलो होतो.नदीच्या किनार्‍यावर एका झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करीत होतो.
मित्र मंडळी,सखे-सोयरे ह्यांचामधे मिळून मिसळून राहिल्याने माणसाला काही ना काहीतरी फायदा होत असतो.त्याच्या कोळीवाड्यात झालेल्या स्थित्यंतराला बघून मी विषय काढला होता.कारण फार पूर्वी हा कोळीवाडा अगदी डबघाईला आलेला होता.
सरकारी मदत घेऊन आणि समाजातल्या मंडळीच्या सहकार्याने आम्ही आमची प्रगती करून घेतली.असं मला डिसोझा म्हणाला.

मी डिसोझाला म्हणालो,
“मैत्रीमधून आणि सख्ख्यामधून आपण जीवनात जमल्यास काहीही प्राप्त करूं शकतो ह्या म्हणण्यावर माझा विश्वास आहे.समाजात होणारा विकास किंवा शास्त्रीय आणि इंजीनियरींगच्या ज्ञानात होणारी उन्नति हे एकट्या दुकट्याच्या हातातलं काम नव्हतं.
सहयोग हे जीवनातलं मूळ तत्व आहे.मदतीशिवाय काही ही गाठणं शक्य होणार नाही.आणि हे माझं म्हणणं जीवनातल्या सर्व पैलुना लागू पडतं,अगदी जरी नदीतून एखादा मासा गळाला लागल्या पासून ते क्रिकेटमधे विजय मिळवण्यापर्यंत खरं आहे असं मला वाटतं.”
नदीवर काही लोक गळ टाकून मासे पकडत होते ते दृष्य बघून मला ते उदाहरण द्यावसं वाटलं.

डिसोझा जरासा विचार करताना दिसला.मला म्हणाला,
“तू ह्या मासा आणि गळाचं उदाहरण देऊन माझी जुनी आठवण जागृत केलीस.
माझे आजोबा अगदी माझ्या लहान वयापासून माझे मित्र कसे मला होते.आम्ही एकमेक जीवनातल्या अनेक क्षणाचे हिस्सेदार आहोत.
माझ्या सांठवणीतल्या अनेक बहुमुल्य क्षणामधला एक क्षण म्हणजे जेव्हा आम्ही नदीत एकदा गळ टाकून मासे पकडत होतो तो क्षण.
त्यापूर्वी मी कधी गळाला मासा लावून पकडलेला अनुभवला नव्हता.नव्हेतर नदीतल्या पाण्यातून मोठमोठाले मासे काढून किनार्‍यावर तडफडता पाहून मी भयभीत व्हायचो.
बहुदा त्यावेळी मी सातएक वर्षाचा असेन.तसा प्रकृतिने किरकोळ होतो.आणि तेव्हडा चतुरही नव्हतो.”
मी म्हणालो,
“सुट्टीत मी तुझ्याबरोबर इकडे आल्यावर मला आठवतं आपण सर्व तुझ्या आजोबाबरोबर नदीवर गळ टाकायला यायचो.मला असं मासे पकडणं आवडायचं.”

“त्यादिवशी नदीच्या काठावर मी आणि माझे आजोबा एका तासाच्यावर ताटकळत बसून मासा गळाला लागण्याची वाट पहात होतो.”
आपली एक आठवण डिसोझा मला सांगत होता.
“काही होत नव्हतं.पाणी संथ वहात होतं.आजूबाजूची झाडं आणि हवाही स्थिर होती.जणू समयसुद्धा स्थिर झाला आहे आणि कशाचीही हालचाल बंद पडली असं वाटत होतं.
नाही म्हटलं तर मात्र त्या चिखलामधे उडणार्‍या मोठ्या माशांची आणि मुर्कुटांचा गोंगाट कानाकडे होत होता.मधूनच एकटा दुकटा पक्षी मोठ्या झाडाच्या फांदीवरून आवज करताना ऐकू येत होतं.
माझे आजोबा डुलकी काढायला लागले असावेत पण मला खात्री नव्हती कारण मला स्वतःलाही थोडी डोळ्यावर झापड येत होती.
एक डुलकी येण्याच्या बेतात असताना एकदम माझ्या गळाला जोरात ओढ येऊन झटका बसल्यासारखं झालं.आणि गळाची काठी माझ्या हातून जवळ जवळ सुटली.ती काठी पाण्यात पडून वाहून जाण्यापुर्वी माझ्या आजोबांनी चपळतेने ती पकडली.
अजूनही मला कळायला अवघड होतंय की त्यावेळी आजोबा कसे जागे झाले आणि एखाद्या सहा इंद्रियबोध असलेल्या मांजरासारखं प्रतिक्रिया देऊ शकले.त्यांनी तो गळ माझ्या हातात दिला आणि मी तो पाण्यातून बाहेर खेचू लागलो.पण तसं करताना आजोबांची मला मदत घ्यावी लागली.गळाला मोठा मासा लागला होता.आणि त्या माश्याला किनार्‍यावर आणायला पण मला आजोबांची मदत घ्यावी लागली.मासा एव्हडा मोठा होता की त्या वयात मला आजोबांची मदत घेतल्याशिवाय ती भयंकर कामगीरी पार पाडता आली नसती.”

“तुझ्या एका चांगल्या आठवणीतून तू माझ्या म्हणण्याला दुजारा दिलास.”
असं मी डिसोझाला म्हणालो.
“मी तुला आणखी अनेक उदाहरणं देऊन सांगेन आपण दोघं जे म्हणतोय त्यात तथ्य आहे.कसं ते सांगतो”
आणि मी त्याला म्हणालो,
“चंद्रावर माणूस पाठवायला एका माणसाची कामगीरी नव्हती.क्रिकेटचा कॅप्टन एकटा मॅच जिंकू शकत नाही.मुलं स्वतःला शिकवूं शकत नाहीत.चंद्रावर माणूस पाठवायला कित्येक वर्षाची मेहनत आणि अनेक लोकांची मेहनत कारणीभूत होती.कॅप्टनला त्याच्या इतर दहा जणाची मद्त लागते तेव्हा तो मॅच जिंकतो.मेहनत घेणार्‍या शिक्षकांशिवाय मुलं शाळा शिकून बाहेर पडत नाहीत.
ह्या जगात एकट्याला काहीही साध्य होऊ शकणार नाही.जेव्हा लोकाना कळतं की स्वार्था ऐवजी निस्वार्थता असायला हवी,अहंवादी प्रवृति ठेवण्यापेक्षा सुजन असायला हवं असं झाल्यावर अशक्य शक्य करून दाखवता येईल.असाध्य रोग साध्य होईल.कठीण कर्म सोपं केलं जाईल.”

“असेच आपण लहानपणी नदीच्या किनार्‍यावर येऊन कुठचा तरी विषय घेऊन चर्चा करायचो.आणि माझे आजोबा आपला अनुभव सांगून आपली चर्चा वाढवायचे.तुला आठवत असेल.खूप दिवसानी मी तुझ्या बरोबर अशी चर्चा केली. नाहीतर आमचं रोजचं चालूच असतं.”
डिसोझा जुनी आठवण काढून आणि आजोबांची आठवण काढून डोळे फुशीत म्हणाला.
“बघुया,पुन्हा असा भेटण्याचा योग आला तर भेटूया”
असं म्हणत आम्ही दोघं डिसोझाच्या घरी जेवायला गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com