Monday, December 28, 2009

सूड

“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.”

ऍम्सटरडम मधून निघालेली फ्लाईट डिट्रॉइट्ला उतरण्यापुर्वी ते विमान पेटवून लोकांना मारण्याचा कट असफल झाला.ही आजची ताजी आणि बहुचर्चीत बातमी प्रो.देसायांच्या नजरेतून सुटली नव्हती.
तेवीस वर्षाच्या सुशिक्षीत (?) व्यक्तीने असं करून कुणाचा सूड साध्य करण्याचा प्रयत्न केला होता कुणास ठाऊक.

मला ज्यावेळी आज संध्याकाळी प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा प्रथम हा विषय काढून बोलल्याशिवाय त्यांना रहावलं नाही.
भाऊसाहेब म्हणाले,
“कुणी तरी म्हटलंय की खारट पाणी पाहिल्यावर तहानेलेल्या माणसाच्या तहानेवर जेव्हडा परिणाम होईल तेव्हडाच सूडवृतीचा परिणाम मनोभावनेवर होईल.”
हे ज्या कुणी म्हटलंय ते मला अगदी पटतं.सूडाने फक्त जे अमुल्य आहे त्याचा र्‍हास होईल.मग तो पैसा असो,मालमत्ता असो,किंवा आणखीन काही महत्वाचं असो.सूडाचा परिणाम नेहमीच काहीतरी नाश होण्यातच होतो.
मला वाटतं,लोकांच्या ह्या सूडवृत्तीचा हा इरादा जरा अतीच झाला आहे.लोकांकडे इतका शस्त्रांचा साठा असणं हे काही खरं नाही. त्यामुळेच गॅन्ग-वॉर चालू होतं.आणि त्याची परिणीती मग भयंकर हानीत होते.

मला माझ्या लहानपणीचं आठवतं.माझ्यात आणि माझ्या एका मित्रात वाकडेपण आलं. एकदा मी त्याला जोरात ढकललं.त्याचं डोकं भिंतीवर आपटलं.आणि तो खाली पडला तो उठेना.नंतर कळलं त्याला चक्कर आली.मला त्यावेळी वाटलं की माझ्या हातून त्याची हत्याच झाली.
मला त्यावेळी वाटलं होतं की माझे आणखी काही मित्र माझा द्वेष करतील.तो पण माझा द्वेष करील असं ही वाटलं होतं.नंतर त्याने मला माफ केलं ती गोष्ट वेगळी.आणखी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्यावेळी माझ्या लक्षातही आलं नाही की मी त्याचा सूड का घेतला ते.

मला वाटतं लोकं विसरा आणि माफ करा अशा वृत्तीत राहिले तर जीवन सुखकर होईल.
युद्ध करण्याची खुमखूमी एव्हड्यानेच येते की दुसर्‍याचा देश आपण जिंकावा असं एखाद्या देशाला वाटतं.प्रथम लोकांनी शांत राहून विचार करावा की आपण असं करायला का उद्युक्त होतो.सूड नुसतंच नुकसानी करीत नाही तर त्याचा फैलाव ही होतो.एकमेकावर सूड घेतल्याने आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचाही सूड घेतला जातो. जीवन उध्वस्त होतं,घरं उध्वस्त होतात.
मला वाटतं जगाचे कधीतरी डोळे उघडतील.सूडामुळेच नुकसानी होते हे लोकांच्या लक्षात येईल.आणि जगात शांतता नांदेल.पण ते होण्यापूर्वी किती अमुल्य गोष्टींचा र्‍हास करावा लागेल कुणास ठाऊक.”

प्रो.देसाई जरा भावनावश झालेले मी पाहिले.म्हणून मी त्यांना एव्हडंच म्हणालो,
“भाऊसाहेब,काही गोष्टी का घडतात हेच कळत नाही.पण एक मात्र नक्की.
“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.”
हे जे कुणी म्हटलंय ते मात्र मला अशावेळी अगदी पटतंय.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com