Thursday, December 10, 2009

मी आणि माझी आई.

“मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

वासंती बाहेरून दरवाजावर ठोकत आहे आणि आतून कुणीही तिला दरवाजा उघडून आत घेत नाही हे वासंतीच्या बाबतीत पाहिलेलं दृश्य अजून मला आठवतं.त्यावेळी वासंती अगदी लहान होती.असेल चार पाच वर्षाची.मी त्यावेळी तिला जवळ घेऊन आमच्या घरी न्यायचा प्रयत्न करायचो पण ती माझं ऐकत नसायची.

वासंतीची आई भारी शिस्तीची होती.तीला आपल्या मुलांनी लहान असताना सुद्धा जबाबदारीने वागवलेलं आवडायचं. पण वासंती त्या शिरस्त्यात बसत नव्हती.आणि त्यामुळे हे असले प्रकार वरचेवर व्हायचे.

खूप वर्षानी वासंती आमच्या घरी आली होती.गप्पा करताना हा दरवाजाचा विषय निघाला.
मला म्हणाली,
“मला आठवतं ती एक घटना सांगते.त्यावेळी मी तीन,चार वर्षाची असेन.मला पक्कं आठवतं,मी लाल रंगाचा झगा घातला होता. छातीवर गुबगुबीत सस्याचं विणलेलं चित्र होतं.मी घरात येण्यासाठी दरवाजाच्या बाहेरून दरवाजावर ठोठावत होते. बाहेर काळोख पडला होता.ते थंडीचे दिवस होते.माझी आई मला दरवाजा उघडून आत घेत नव्हती.
“नीट वागायचं कबूल आहेस का?”
आई आतून मला विचारायची.
मी मनात म्हणायची,
“नाही कबूल होणार.”
पण मला घरात यायचं होतं.मी दमली होती. बाहेर थंडी होती.बाहेर काळोख ही झाला होता.मला भिती वाटत होती कसलीही कबूली देऊन तीने मला आत घ्यावं अशा प्रयत्नात मी होती.
मी वासंतीला विचारलं,
“ती असं का करायची?”
“आता लक्षात नाही ती तसं का करीत होती.मी जरा हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची होती.कदाचीत माझ्या स्वभावाचा आईला वैताग आला असावा.मी नक्कीच तशी होती.कदाचीत माझ्या आईने तुम्हाला तसं सांगितलं ही असेल.मी टीनएजेर होई तो तशीच होती.हाताबाहेर गेलेली म्हणा हवं तर.”
वासंतीने तीच्या स्वभावानुसार खरं ते सांगून टाकलं.

“तुझी आई कडक स्वभावाची होती.मला आठवतं,मी तीला एकदा म्हणालो होतो की मुलं लहान असताना हट्टी असतात. मोठी झाल्यावर सुधारतात.पण मग ती मला तुझ्या धाकट्या बहिणीचं उदाहरण देऊन सांगायची की काही मुलं जात्याच तशी असतात.तुझ्या धाकट्या बहिणीची ती फार स्तुती करायची.”

माझं हे ऐकून वासंती म्हणाली,
“माझी आई माझ्यात बदलाव व्हावा म्हणून प्रयत्नात असायची, माझ्या धाकट्या बहिणी सारखी मी व्हावी म्हणून प्रयत्नात असायची. माझी धाकटी बहिण माझ्या आईची का्र्बन कॉपी होती. जबाबदार,प्रामाणिक, चांगल्या आचरणाची, सच्ची.
माहित आहे का माझी आई मला नेहमी काय म्हणायची?
“तू कधीच इतरांसारखी होणार नाहीस”
“अरेरे, हे काही मला माहित नव्हतं का?” मी मनात म्हणायची.

मी वासंतीला म्हणालो,
“तुला हे जर माहित होतं तर तू अशी का वागायचीस?”

“आईचं खरं होतं.हो,मी काहीतरी विकृत गोष्टी करायची आणि वर खोटं बोलायची.मी माझ्या आईकडून न मिळणार्‍या संमत्तीची धसकी घेतली होती शिवाय मी तीच्या मर्जीत बसत नाही हे समजून इतकी भयभीत व्हायची की ती काही म्हणाली तरी मी तीला होय म्हणायची.
मी कुणालाही दोष देत नाही.माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचं मुल्य-मापन करीत असताना मी मलाच म्हणते की मी जे करते ते असं कां करते? “

वासंतीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून मला वाईट वाटलं.मी म्हणालो,
“तू तुझ्या आईला ह्या बाबत कधी विचारलंस का?
डोळे ओले करीत वासंती म्हणाली,
“ह्या पुढे माझी आई मला कधीच मदत करू शकणार नाही.कारण आता ती ह्या जगात नाही.
“मी भाग्यवान आहे”
असं ती मला म्हणायची. आणि वर म्हणायची,
“कुणी भाग्यवान व्हावं अशी आशा करणार्‍याच्या पलीकडे मी भाग्यवान आहे.”
आणि तरीसुद्धा मी गोंधळ घालायची.त्या गोंधळाचा तीला कंटाळा यायचाच आणि माझा ही तीला कंटाळा यायचा.”
मी वासंतीला विचारलं,
“आता तुला कसं वाटतंय?”
ती म्हणाली,
“आता मी परत घराच्या बाहेर अडकली आहे.फक्त ते अडकणं जरा अलंकृत आहे.मी जर का खरीच अडकली असेन तर माझ्या आईच्या जीवनात अडकली आहे असं म्हटलं पाहिजे.तशीच चार,पाच वर्षाची मला मी वाटते.बरीच दशकं मी दरवाजा ठोठावीत आहे असं सारखं वाटतं.आणि तीने मला आत घेतल्या सारखं केलं आहे असं ही वाट्तं.पण मला वाटतं माझं उरलंसुरलं जीवन मी दरवाज्याच्या बाहेरच काढणार आहे.माझ्या मला मी समजले आहे की मी आवेशजनक बाई आहे आणि मी विचार न करता काहीही करते.मी नेहमीचीच तशी आहे.”

वासंतीला धीर देण्याच्या उद्देशाने मी तीला म्हणालो,
“कदाचीत असं असणंच बरं.घरात घेणं म्हणजे शर्तीने घेतल्यासारखं वाटतं.”
मला म्हणाली,
“माझ्यात माझ्या धाकट्या बहिणीचा एकही गुण नाही.त्यातला थोडासा अंशही माझ्यात नाही.आणि भविष्यातही तो गुण माझ्यात नसणार.अखेर मी असंच म्हणेन की मी तशी नाही ते ठीक आहे.मी तसं होण्याचा प्रयत्न केला आणि करीतही राहीन पण आता माझा तो प्रयत्न दरवाजाच्या बाहेर राहून माझ्या आईच्या शर्तीची भिती असलेला नसेल.
मला माहित आहे की माझी आई माझ्यावर प्रेम करायची.पण मला हे ही माहित आहे की ती प्रेम करायची कारण तीला दुसरा उपाय नव्हता. बोलून चालून ती माझी आई होती.
मी तीला आवडत नव्हते असं काही नाही.माझी ती जन्मदात्री होती. माझं व्यक्तीमत्व असंच होतं. त्यामुळे जर का माझं तिच्याशी नातं नसतं तर खचीतच मी तीला न-आवडणार्‍यापैकी असते.खरंच तीने कधीच प्रेम केलं नसतं.
मी जशी मोठी व्हायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की जे कोण आहेत ते जसे आहेत तसेच असतात.माझी आई पण.मी पण.”
आम्ही दोघं मैत्रीत न रहाण्याचं कारण आमच्यात पराकोटीची भिन्नता होती. मला तीने मदतीचा हात बरेच वेळा पुढे केला होता. माझं तीच्यावर प्रेम होतं.तरी पण मी तीला खूप ताप दिला आहे. आणि मी मलाच त्यासाठी दुषणं देते.आता माझ्या मनात सर्व ठीक ठाक वाटण्यासाठी एव्हडंच मी म्हणू शकते.”

“ते जाऊ देत.आता तुझी आई नाही.तुझी तू स्वतंत्र आहेस.दोन मुलं पण तुला आहेत,मग त्यांच्याशी तुझं कसं चालंय?”
मी जरा काचरतच वासंतीला विचारलं.

“आता मी माझ्याच घरात रहाते.त्यामुळे दरवाजाच्या बाहेर राहायची आता माझ्यावर पाळी नाही.माझ्या घरात माझ्यावर सर्व प्रेम करतात. मी त्यांना हवी हवीशी वाटते.मी गोंधळ करते पण प्रेमळ हातानी माझं स्वागत होतं.गोंधळ झाला तरी तो सुधारला जाऊं शकतो असं मला आश्वासन दिलं जातं.
माझी मुलं दरवाजाच्या बाहेर कधी ही नसणार.मी त्यांना समझ दिली आहे आणि मी वचनबद्ध आहे. ती माझी आज्ञा मोडू शकतात. माझ्या वस्तु मोडू शकतात माझं मन मोडूं शकतात.ती हट्टी असूं शकतात.पण त्यांना घरात येण्यासाठी जोरजोरात दरवाजावर ठोकायला लागणार नाही. मी माझ्या मला कुठेतरी कोंडून ठेवीन पण माझ्या मुलांना दरवाजा कधीच बंद नसणार.”

“वासंती तू जरी तुला हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची आहेस असं म्हटलीस तरी तू स्वपनाळू पण आहेस.नाहीपेक्षा जुन्या गोष्टी आठवून तू तुला एव्हडं अंतर्भूत करून घेतलं नसतस.”
असं मी वासंतीला म्हणालो.तीला हे मी म्हटलेलं फारच मनस्वी वाटलं.अगदी गंभीर होऊन मला म्हणाली,

“त्या मुलीची पडछाया मला दिसते.माझ्या आईच्या दरवाजावर त्या तीच्या चिमुकल्या मुठी आपटताना दिसतात ती मुसमुसून रडत आहे.ओरडत आहे.श्वास लागल्यासारखी ती हुंदके देत आहे.चिमुकली तीची छाती वरखाली होत आहे.तीचे काळेभोर डोळे आंसवानी थबथबले आहेत.ते अश्रू तीच्या त्या झग्याला ओले करीत आहेत.ती खूपच दुःखी झाली आहे. असं दृष्य माझ्या डोळ्यासमोर येतं.मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

मी वासंतीचा हात माझ्या हातात घेऊन त्यावर थोपटीत म्हणालो,
“जीवन म्हणजे एक कथानक असतं.प्रत्येकाची कथा वेगळी वेगळी.
“दोन घडीचा डाव ह्याला जीवन ऐसे नाव”
असं कुणीसं म्हटलंय ते अगदी खरं आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com