Sunday, December 20, 2009

लाल गुलमोहराचं झाड.

“मला वाटतं प्रतीक्षेतली मनोहरता वेगळीच असते.चंद्राच्या प्रकाशाची चंदेरी झगमग नुकतीच क्षीतीजावरून इंच इंच वाढत असताना फक्त स्वर्गातून त्याचा महिमा पाहणं शक्य असावं अशी ती प्रतीक्षा अशावेळी वाटते.”

करमकराना फक्त एकच मुलगा होता.पराग.
त्याचं त्यांनी वेळेवर लग्न करून दिलं.परागची पत्नी सुंदर दिसायला होती.पराग ही राजबिंडा दिसायचा.त्यांचं लग्न होऊन बारा वर्ष झाली होती.तरीपण त्यांना मुल नव्हतं.सगळेच काळजीत होते.त्यातल्या त्यात करमकर आजीआजोबा.
जवळ जवळ सर्व प्रयत्न करून,डॉक्टरी उपाय करून सुद्धा निराशे शिवाय काही पदरी पडलं नाही.
करमरकर आजोबा एकदा मला म्हणाले होते,
“बर्‍याच गोष्टी विधीलिखीत असतात.प्रयत्न करणं आपलं काम.”
मी त्यांना म्हणाल्याचं आठवतं,
“प्रत्येक आजी आजोबांना आपल्याला एखादं नातवंड असावं हे वाटणं अगदी स्वाभावीक आहे.कुणाच्या नशीबात काय आहे हे कुणास ठाऊक.? पण कधीही काहीही होऊ शकतं अशी आशा ठेऊन रहायला काही कष्ट पडत नाहीत.”
“तुमच्या तोंडात साखर पडो”
मला करमरकर आजी म्हणाल्या होत्या.

आणि अगदी तसंच झालं.जवळ जवळ परागच्या लग्नाला बारा वर्ष उलटून गेल्यानंतर मुल होण्याची आशा निर्माण झाली होती. करमरकर आजी आजोबांना जगावंसं वाटण्याची घटना घडली.
आज करमकरांच्या प्रतीक्षेला सोळा वर्ष पुरी झाल्याने तीच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला आम्हाला त्यांनी बोलावलं होतं.
करमकर आजी आजोबा आता खूपच थकले होते.पण नातीच्या वाढदिवशी ते खूप उमेदीत होते.
सोळा वर्षापूर्वी नात झाल्याचं कळल्यावर जेव्ह्डा आनंद ह्या दोघांवर दिसत होता तेव्हडाच आनंद आज मला दिसला.

मी दोघांनाही उद्देशून म्हणालो,
“तुम्हाला आज प्रतीक्षेच्या जन्माची आठवण येत असेल नाही का?”
करमरकर आजोबांची स्मृती वयाच्या मानाने तल्लख दिसली.
मला म्हणाले,
“हो मला अजून तो दिवस आठवतो.
बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधली वेटिंगरूम अगदी शांत होती.
पण माझी छाती धडधडत होती.आम्हाला पहिलं नातवंड होणार होतं.आणि ते सुद्धा खूप वर्षानी.मी तिकडच्या खिडकीच्या बाहेर गुलमोहर झाडावरच्या लाल रंगाच्या फुलावरती कावळे चोंच मारून काही तरी काढून खात होते ते बघण्यात दंग होतो.संध्याकाळची वेळ होती. सूर्याची उन्हं खाली उतरत होती. परागची आई बेचैन झालेली आणि थोडी काळजीत तर थोडी देवाच्या प्रार्थनेत गुंग झालेली मला दिसली. सर्व वातावरण प्रतीक्षेने व्यापलं होतं.
एकदम बाळंत-खोलीतलं दार उघडलं.नर्स बाहेर आली.तीच्या डोळ्यातली चमक आणि तोंडावरचं हंसू मला अजून आठवतं.ती म्हणाली,
“या, आजी आजोबा तुम्हाला नात झाली.तीला जाऊन भेटा.”
आमची प्रतीक्षा अगदी टोकाला पोहोचली होती.आम्ही दोघं त्या नर्स बरोबर डिलिव्हरी-रूममधे गेलो.बाळाची आईचा चेहरा आनंदी दिसला. कपड्यात गुंडाळलेल्या त्या एव्हड्याश्या जीवाला आपल्या दोन हाताच्या घडीत घेऊन तीच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन आम्हाला पाहून पराग हळूच बोलला,
“माझी प्रतीक्षा.”
एव्हडा उत्तम क्षण दुसरा कुठला नसावा.
आणि पुढे आम्ही तीला प्रतीक्षा म्हणायला लागलो.तीच्या आईलापण ते नाव आवडलं.”
मी म्हणालो,
“मला वाटतं प्रतीक्षेतली मनोहरता वेगळीच असते.चंद्राच्या प्रकाशाची चंदेरी झगमग नुकतीच क्षीतीजावरून इंच इंच वाढत असताना फक्त स्वर्गातून त्याचा महिमा पाहणं शक्य असावं अशी ती प्रतीक्षा अशावेळी वाटते.”

करमरकर म्हणाले,
“दूर गावात शिकत असलेलं आपलं मूल सुट्टीत घरी आल्यावर कसं वाटावं,एखादा जीवश्च-कंटश्च मित्राबरोबर पुनर्भेट झाल्यावर कसं वाटावं, आपल्याला अतीशय आवडणार्‍या जागेत परत आल्यावर कसं वाटावं, आपल्याला अतीप्रीय असलेल्या व्यक्तीची उबदार मिठी मिळाल्यावर कसं वाटावं तसं ह्या प्रतीक्षेचं असतं.
आणि तुम्ही म्हणता तसं, त्या हळू हळू वाढत जाणार्‍या चंद्रप्रकाशा सारखी ही अपेक्षा वाढता वाढता नव्या उमेदीला जन्म देते.”

आजींच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मला ही त्यांना अधिक आनंदी करण्यासाठी स्फुर्ती आली.
“ती उमेद की जेव्हा प्रवासातून सुरक्षीतपणे आल्यावर मिळणारी आपल्या माणासाची जवळीक,ती उमेद की ज्यातून आपल्याला आपल्या जवळच्यांच्या गळ्यात गळा घालायला मिळणारी संधी.
आणि कदाचीत,अवास्तवीक राहून ही आपल्या मनात आलेली कल्पना खरी व्हावी म्हणून केलेली उमेद.”

“पण बरेच वेळा आपण ज्या गोष्टीचं स्वप्नं करतो ते आपल्या अपेक्षे प्रमाणे होईल असं नसावं.”
आजीनीं परागचं लग्न झाल्यावर बारा वर्ष त्याला मुल होण्याच्या अपेक्षेत दिवस कसे गेले हे नकळतच सांगीतलं.
त्या पुढे म्हणाल्या,
कधी कधी अपेक्षाभंग होणं,मनाला लागणं,नाराज करणार्‍या घटना होणं हे चालूच असतं.कधी कधी आपल्या योजना उलट्या सुलट्या होणं हे ही चालूच असतं.जसं लांब राहून मग घरी परत येण्याच्या योजना मनासारख्या होत नाहीत.मैत्रीत बदलाव येतो. कधी कधी इच्छेलेली भेट घडत नाही.”

करमकर आजोबांना झालेल्या जुन्या गोष्टी विसरून जाऊन आता सकारात्मक विचार करावा हे आजींना आणि मला सुचवण्यासाठी आपला मुद्दा सांगण्याची उमेद आली.
ते म्हणाले,
“परागच्या आईचं जरी खरं असलं तरी, कधी कधी नवीन घटना अपेक्षेची जागा घेतात.कदापी अपेक्षीत नसलेलं,किंवा योजनेत नसलेलं, किंवा स्वप्नात नसलेलं घडून येतं.
आपल्याकडे असलेल्या बुद्धिचातुर्यातून,असलेल्या दृष्टीकोनातून,धैर्यातून काही घटना उघडल्या जातात आणि आपला दृष्टीक्षेप नव्या शक्यतेत रुपांतरीत होतो.”
मी ही म्हणालो,
“आणि असं घडल्यावर आपण नव्या प्रतीक्षा करूं लागतो.आणि असं करीत असताना आपलं हे नव्या अपेक्षांचं गलबत आपल्याला जीवनाच्या समुद्रात तरंगत ठेवतं.आणि असं तरंगत असताना आपण करीत असलेल्या फक्त त्या सानंद अपेक्षाच आपल्या जवळ नसतात तर कदाचीत त्यातून आपल्या स्वप्नात ही नसलेल्या,कल्पनाही न केलेल्या अपेक्षा परिपुर्ण होण्याची शक्यता असते.
आणि त्याचं जीतंजागतं उदाहरण म्हणजे तुमची प्रतीक्षा.”
प्रतीक्षेचं नाव घेताच ती आमच्या जवळ वाढदिवसाच्या केकच्या डिशीस घेऊन आली आणि आम्हा तीघांना नमस्कार करून गेली.
आम्ही तीघानीही तीला,
“दीर्घायुषी हो”
असा आशिर्वाद दिला हे उघडंच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com