Sunday, January 3, 2010

मोटरबाईक

“तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, आणि इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”

मोटरबाईक चालवणं मोठं धाडसाचं असतं.छातीवर हात ठेऊन कुणी सांगेल का की आतापर्यंत मला लहान किंवा मोठा अपघात झालाच नाही.कदाचीत शंभरात एखादा असं सांगणारा असेलही.पण सांगण्याचा मतीतार्थ असा की दोन चाकावर तोल सांभाळून चालवण्याचं हे वहान असल्याने अपघात होण्याची जास्त प्रवृत्ती असते हे अगदी उघडच आहे. आणि भर रस्त्यावर आणखी वहानं धावत असल्याने आपली चुकी नसतानाही दुसर्‍याच्या चुकीमुळे ह्या वहानाची जास्त नुकसानी होण्याचा संभव असतो हे नक्कीच.आणि ह्या वहानाच्या चालकाला तसं कसलंच संरक्षण नसतं.
तरूण वयात हे वाहन चालवण्याचा नुसता विचार जरी मनात आला तरी बरेच वेळा घरातून आक्षेप येतो तो आईचा.
“काय हवं ते कर पण हे वहान नको चालवूस बाबा!”
असं जनात नसलं तरी मनात म्हणणारी हमखास व्यक्ती म्हणजे आईच.
त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी.नवर्‍याच्या प्रेमाव्यतिरीक्त तीला तीच्या भवितव्याची सुद्धा काळजी असणं स्वाभाविक आहे.

मला आठवतं,अनंत करंदीकर अगदी तरूण वयापासून मोटरबाईक चालवायचा.कसं तरी त्याने आपल्या आईला पटवून दिलं होतं की तू एव्हडी काळजी करू नकोस.मी संभाळून हे वहान चालवीन.एव्हडे लोक मोटरबाईक चालवतात असं घाबरून कसं चालेल.?वगैरे वगैरे.
नंतर अनंताचं लग्न झालं.त्याच्या पत्नीने पण आईचा सल्ला पुढे सारला.तीला ही त्याने समजूतीने सांगीतलं.आणि पटवलं.
पण “होणारे न चुके” म्हणतात ना तशातला प्रकार झाला.एकदा अनंता कुर्ला-अंधेरी रस्त्यावरून येत असताना त्याला अपघात झाला.आणि त्यात तो दगावला.त्याचा मुलगा अविनाश त्यावेळी दोन वर्षाचा होता.

हल्लीच मी एका बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा असताना अविनाशने आपली गाडी थांबवून मला गाडीत बसायला सांगीतलं.मला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा त्याचा विचार होता,पण मी नंतर येईन म्हणून त्याला सांगीतलं.आणि मला त्याने स्टेशनजवळ सोडलं.
नंतर खूप दिवस निघून गेले.एके दिवशी अविनाश माझ्या घरी येऊन त्याच्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवशी मला आमंत्रण द्यायला आला होता.
मी त्यादिवशी त्याच्या घरी गेलो होतो.रात्री त्याच्याबरोबर गप्पा करीत बसलो होतो.त्याच्या वडीलांचा विषय निघाला.
मला म्हणाला,
“खरं म्हणजे हा अपघात, अपघात म्हणून वर्गीकृत होऊंच नये.
एक माणूस दारू पिऊन जाणून बुजून गाडी चालवायला जातो आणि दारूच्या नशेत असल्याने रस्त्यावरची आपली बाजू सांभाळू शकत नाही आणि सरळ सरळ माझ्या बाबांवर -जेव्हा ते मोटरसायकल चालवीत होते तेव्हा- त्यांच्या अंगावर गाडी घालतो.गाडीची आणि मोटरसायकलची बरोबरी कशी व्हायची?तीचा चक्काचूर होऊन माझे बाबा जागच्या जागी प्राण सोडतात.”

मी अविनाशला म्हणालो,
“मला सर्व आठवतं.तू त्यावेळी अवघ्या दोन वर्षाचा होतास.तुझ्या आईवर आणि आजीवर काय गुजरलं होतं ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे.”
मला म्हणाला,
“त्या रात्री झालेली ही घटना समजून घेण्याच्या वयात जेव्हा मी आलो त्यानंतर ज्या माणसाने मि.अनंत करंदीकर यांचा जीव घेतला त्या माणसाचा मी द्वेष करूं लागलो. ते वडील होते, पती होते आणि मुलगा होते त्याशिवाय बर्‍याच लोकांचे ते विशेष होते.
द्वेष,तीटकार हे जरा जास्त तिखट शब्द आहेत.पण हेच शब्द माझ्या मनात येतात जेव्हा, त्याने जे माझ्या बाबाना केलं त्याची आठवण येऊन माझं मन उद्विग्न होतं तेव्हा.
तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”

“खरं आहे तुझं.ज्याला लागतं त्याला कळतं.पण तरीही मी म्हणेन त्याचा आता विसर पाडून घेतलं पाहिजे.मला सांगायला सोपं आहे.पण अशा माणसाला क्षमा करण्य़ापलिकडे आपण काय करू शकणार?”
असं मी त्याला सांगून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होतो.

मला अविनाश म्हणाला,
“क्षमेवर माझा विश्वास आहे,पण एक साधा प्रश्न माझ्या मनात येतो.मी ज्याला ओळखतच नाही त्या माणसाचा मी तीटकार तरी कसा करू? आणि अशा माणसाला मी क्षमा तरी कशी करू की ज्याला मी ओळखतच नाही.वेळो वेळी हा प्रश्न मी मलाच विचारत असतो.
खरं म्हणजे हे दिवस आनंदाचे मानले पाहिजेत परंतु ते आनंदाचे क्षण अप्रिय काळ्याकुट्ट ढगानी विभूषित केले जात होते.ह्या सार्‍या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या मनाला एव्हडं दुःख होतं की माझ्या बाबांच्या गोष्टी आणि त्यांच्या चित्रांची माहिती मला माझ्या नातेवाईकांकडून ऐकावी लागते.
माझ्या झालेल्या नुकसानीचा विचार येऊन बेचैन होऊन त्या माणसाबद्दल विचार करायला बसल्यावर असं वाटतं काय होत असेल त्याला?”

“कुणा दुसर्‍याचं जीवन उध्वस्त करणं हा विचार सुद्धा मला भयंकर वाटतो. त्याच्या उरलेल्या आयुष्यात तो भोगत असलेली सजा ही तुझ्या त्याच्या विषयीच्या तीटकार्‍या पेक्षा दामदुप्पटीने जास्तच असणार. एका अर्थी असा विचार केल्याने हा विचार मला एक आशेचा किरण दाखवतो.अशी आशा की ज्या माणसाला तू केव्हाही पाहिलेलं नाही असं असून सुद्धा तुझ्याकडून त्या माणसाला क्षमा केली जावी. असा माणूस की ज्याने तुझ्या आठवणी ज्या तू जमवून ठेवल्या असत्यास त्या आठवणीच तुझ्याकडून त्याने चोराव्या.”
अविनाशला शांत करण्यासाठी मी त्याला समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केला.

“काका,तुमचं म्हणणं मला पटतं.कधी तरी एक दिवस ह्या माणसाला क्षमा करून मी एव्हडे दिवस माझ्या खांद्यावर वाहिलेलं त्याच्याबद्दलच्या तीरस्काराचं ओझं उतरून ठेवीन.त्यामुळे आता मला असा विश्वास करायला हरकत नाही की वेळ आली की सर्व विचार सोडून देऊन त्या माणसाला फक्त क्षमा करावी.म्हणूनच मी क्षमा करण्यावर विश्वास ठेवायला लागलो आहे.जरी अजून ती वेळ आली नाही तरी ती लवकरच येईल असा माझा दृढविश्वास आहे.”
अविनाश सद्नदीत होऊन मला म्हणाला.
अविनाशचा हा दृढविश्वास पाहून मला ही बरं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com