Friday, January 22, 2010

आशावादी अनिल.

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.”

अनिल-अरूण हे भाऊ भाऊ मागे पुढे जरी जन्माला आले तरी जणू जूळेच भाऊ कसे वाटतात.दोघांत दोनएक वर्षाचं अंतर असावं.आता त्यांची लग्न वगैरे झाली आहेत आणि एकाच बिल्डिंगमधे जवळ जवळ फ्लॅट घेऊन रहातात.आज का कुणास ठाऊक बरेच वर्षानी त्यांची आठवण आली म्हणून सहजच अनिलच्या घरी गेलो होतो.अनिल मला पूर्वी एकदा भेटला होता आणि तो म्हणाल्याचं आठवतं,
“मला त्या अपघाताचं काही आठवत नाही.लोकं सांगतात त्यामुळे मला माहित होतं.मेंदूवर इतका गंभीर आघात होता का?”

अलीकडेच मी माझ्या एका मित्राबरोबर एका चर्चा सत्राला गेलो होतो.त्याचा विषय होता,
“How memory functions”
त्यातलीच लक्षात असलेली माहिती अनिलला ऐकून उपयोगी होईल ह्याच उद्देशाने मी त्याला भेटायला गेलो होतो.
रविवारचा दिवस असल्याने अनिल घरी भेटेल याची खात्री होती.मला पाहून त्याला आनंद झाला.
माझा पुतण्या आणि अनिल-अरूण एकाच शाळेत जायचे.त्यांची शाळा चालत जायला लांब होती पण रिक्षेने जायला सोयस्कीर असल्याने,हे तीघेही बरेच वेळा एकाच रिक्षेने शाळेला जात येत असत.

नशिबाचा भाग आहे,का कुणास ठाऊक त्यांच्या रिक्षेला एकदा अपघात झाला त्यादिवशी माझा पुतण्या त्या रिक्षेत नव्हता.त्याला बरं नव्हतं म्हणून त्यांच्याबरोबर शाळेत गेला नव्हता.मला वाटतं त्यावेळी ही मुलं जवळ जवळ पंधराएक वर्षाची होती.मी अनिलला त्या अपघाताची आठवण काढून म्हणालो,
“तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो.त्यातून तुम्ही दोघे भाऊ बचावला हाच त्यातला सर्वांत आनंदाचा क्षण आहे.”
अनिल त्या दिवसांची आठवण काढून म्हणाला,
“आमच्या लहानपणी झालेल्या त्या गंभीर अपघातातून आम्ही सहीसलामत बचावलो हे आमचं नशीब समजलं पाहिजे. मला वाटतं मी पंधराएक वर्षाचा असेन.बरा होऊन मी माझ्या अंथरूणातून जो उठलो तो त्या क्षणापासून त्या पूर्वीची सर्व स्मृति मी विसरूनच गेलो होतो.खरं सांगायचं तर मी बरा झालो हे कुणी मला सांगीतलं,त्यातून उठलो हे पण माझ्या स्मृतित नव्हतं.”

मी अनिलला म्हणालो,
“स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एन्सायक्लोपिडीयामधे असतात त्याच्यापेक्षाही लाखोपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.
स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो.”
अनिल म्हणाला,
“मी आणि माझा भाऊ अरूण आम्ही दोघे शाळेत जाण्यासाठी रिक्षा केली होती.तुमचा नितीन त्याच दिवशी आमच्या बरोबर नव्हता. रिक्षावाल्याने समोर येणार्‍या ट्र्कशी टक्कर टाळण्यासाठी एकदम डाव्या बाजूला रिक्षा फिरवली आणि आम्ही दोघे भाऊ रिक्षेच्या बाहेर फेकले गेलो.मी ताबडतोब बेशुद्ध झालो.जवळ जवळ चार दिवस मी कोमात होतो.हे पण सर्व मला आठवत नाही लोक म्हणतात ते मी तुम्हाला सांगीतलं.”

मी अनिलला म्हणालो,
“हीच तर आपल्या मेंदूतली गंमत आहे.तुला मी त्यातली मेंदूची प्रकिया सांगतो त्यामुळे तू म्हणतोस की तुला सर्व काही आठवत नाही त्याचं कारण समजेल.
त्याचं काय आहे,शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते.”

“मला हॉस्पिटलमधे भेटायला येणारा प्रत्येक जण मी लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करीत असे असं मला लोकांनी सांगीतलं.ह्या प्रार्थनेमुळे जरी मला बरं होता आलं तरी कूठल्याही शारिरीक क्षतिनंतर स्वास्थ्यलाभ व्हायला म्हणजेच recovery व्हायला बराच वेळ लागतो.माझंही तसंच झालं.कधी कधी मला वाटतं मी अजून बरा व्हायचा आहे.”
माझं मेमरीबद्दलचं स्पष्टीकरण ऐकून अनिल आपली recovery कशी होत गेली ते आठवून आठवून सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

मी अनिलला मेमरीची आणखी माहिती देत म्हणालो,
“रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.
रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.
रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.
रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.
रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.”

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.
मला वाटतं स्वास्थ्यलाभ ही एक निरंतर प्रकिया आहे.म्हणजेच ती प्रक्रिया कधीही अंत पावणारी नाही.ह्या बाबतीत मला सकारात्मक म्हणजेच आशावादी रहावंसं वाटतं.कारण निराशावादी रहाणं म्हणजेच स्वास्थ्यलाभण्यापासून वंचीत असणं.”
अनिलचं ही आशावादी प्रवृत्ती मला आवडली.

मेमरी विषयी अनिलला अधीक सांगण्याचं सोडून देऊन मी त्याला म्हणालो,
“आशावादी असण्याचा अर्थच असा आहे की,
“जे काही घडत आहे ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असतं असं भर देऊन सांगीतलेलं मत.”
पण त्याचा संबंध श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान, विश्वास,प्रत्याशा, आत्मविश्वास,आकांक्षा ह्या शब्दांशी पण जोडला जातो. आणि ह्या सर्व शब्दांवर आशावादी व्यक्ति भरवंसा ठेवते. कारण त्या सर्व शब्दात त्यांच्या अर्थाचं मूर्तरूप सामावलेलं असतं.”

“एखादा डॉक्टर म्हणो वा नाम्हणो की,
“तुम्ही अपेक्षेपेक्षा सुधारलात किंवा कुदारलात”
तरी डॉक्टरचं ते म्हणणं ऐकूनही मला तुम्ही आशावादी म्हणा किंवा त्याचा संबंध असलेले इतर शब्दाप्रमाणे म्हणा त्या सर्व शब्दातलं बळ मी स्विकारतो.”
अनिल माझ्याशी जणू सहमत होऊनच म्हणाला.

त्यावर मी त्याला म्हणालो,
“बिकट झालेल्या परिस्थितीतून स्वास्थ्यलाभ झाला तर त्याकडे नुसत्या शारिरीक दृष्टीकोनातून झालेली प्रगती असं समजून चालणार नाही.किंवा ही प्रगति एखाद्या आलेखावर नोंदण्यासारखी नसते.
मला विचारशील तर मी म्हणेन स्वास्थ्यलाभ होत रहाणं हा एक प्रवास आहे.आणि ह्या प्रक्रियेच्या जरूरीचा तीव्रतेने बोध झाल्यावर त्यानंतरचा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रवास आपल्यात सामिल करून घेतो.”
आणखी पुढे जाऊन मी त्याला सांगीतलं,
“मला वाटतं,स्वास्थ्यलाभ हा सहजासहजी आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही.किंवा तो त्या प्रक्रियेतला काही रिवाज होऊ शकत नाही.
उलट स्वास्थ्यलाभ हा आपल्याकडून होणार्‍या प्रकटनाचा प्रकार आहे. ते तुमचं मनोबळ आणि व्यक्तित्व त्यातून विकसीत करतं.आणि ह्या प्रक्रियेपासून तुम्ही दूर राहून काहीही साध्य केलंत तरी ह्या गोष्टी इतकं ते अर्थपूर्ण होणार नाही.श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान वगैरे महत्वपूर्ण शब्द ह्या प्रक्रियेत अंतर्भूत असतात.”

“काका,बरेच दिवसानी आपण भेटलो हे बरं झालं.मला राहून राहून वाटायचं की मी आशावादी रहाण्यात जरा अतीच करतोय.पण तुमच्याचकडून आशावादी असण्याचा अर्थ कळला.ते बरं झालं. कारण सर्व तर्‍हेच्या नाडी/नस वगैरेच्या मोजमापानुसार माझी स्वास्थ्यलाभाची प्रक्रिया पूर्णत्वाला आल्याचं मला सांगीतलं गेलं. आणि मी आता इतरांप्रमाणे पूर्ण सामान्य झालो आहे.
पण खरं पाहिलं तर मी जो पूर्वी होतो तसा आता नाही.माझा स्वास्थ्यलाभ पूर्णत्वाला येणं शक्य नाही हे मला नक्कीच माहित आहे.”

शेवटी हंसत हंसत मी अनिलला म्हणालो,
मला वाटतं तुला आशावादी रहाण्यापासून थांबवलं जाणं हे ही शक्य नाही.हे मात्र मला नक्कीच माहित आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com