Thursday, January 7, 2010

हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला

“आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.”

एकदा माझ्या पुतण्याची सहा वर्षाची मुलगी खेळता खेळता चक्कर येऊन पडली.त्यातून थोडीशी सावध झालेली पाहून त्याने तीला जवळच्या क्लिनीकमधे डॉक्टरच्या देखरेखीखाली ठेवली होती.तीला पहाण्यासाठी मी पुतण्याबरोबर त्या क्लिनीकमधे गेलो होतो.
तीला तपासत असलेला डॉक्टर माझ्या ओळखीचा निघाला.डॉ.अशोक गोखले.गोखले क्लिनीकचं उदघाटन त्याच्या वडीलांनी केलं होतं.त्याचे वडील माझ्या ओळखीचे होते.

मला पाहून त्याला आनंद झाला.नंतर तो मला त्याच्या कॅबिनमधे घेऊन गेला.त्याच्या बैठकीच्या खूर्चीच्या मागे भिंतीवर एक सुंदर हस्तचित्र टांगलेलं होतं.चित्र मला आवडलं.निरखून पाहिल्यावर चित्राच्या खाली डॉक्टर अशोक अशी सही होती.
अशोक नुसता डॉक्टर नव्हता,चांगला चित्रकारही होता हे पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.
चित्रात एक मुलगी दाखवली होती.तीने डाळींबी रंगाचा झगा घातला होता.वय असेल तेरा-चवदा वर्षाचं.समुद्रकिनार्‍यावर पाण्यात असलेल्या एका होडीत ती एक पाय टाकतेय आणि दुसरा पाय पाण्यात होता. तीच्या हातात वल्हं होतं.आणि होडीचं पांढरं शीड वार्‍यावर फडफडत होतं.खरं तीचं वय वीस-पंचवीस होतं हे नंतर मला डॉक्टरकडून कळलं.चित्रात दिसायला लहान दिसत होती.

मी कुतूहल म्हणून अशोकला म्हणालो,
“तू चित्र फारच सुंदर काढलं आहेस.पण ही मुलगी कोण आणि त्याला काही पार्श्वकथा आहे काय?”
“हे चित्र पाहून मला सगळेच असं विचारतात.”
अशोक म्हणाला.
“सर्वांनाच मी त्या मुलीची कथा सांगत नाही.पण तुम्हाला सांगेन.पण एका अटीवर तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे.माझ्या बाबांनापण तुम्हाला बघून आनंद होईल.तुम्ही क्लिनीकमधे येऊन गेला असं सांगीतल्यावर ते मला नक्कीच तुम्हाला घरी बोलावलं का नाही म्हणून विचारणार. त्याशिवाय ह्या चित्राला जी कथा आहे ती दोन ओळीत सांगता येण्यासारखी नाही.”
माझं कुतूहल जास्त वाढवीत अशोक मला म्हणाल्याचं पाहून मी त्याला म्हणालो,
“तू डॉक्टर आहेस,चित्रकार आहेस,आणि मला वाटतं कथाकार पण आहेस.मी एक दिवस नक्कीच तुझ्या घरी येईन.पण ह्या चित्राची कथा मला सांगायला विसरू नकोस”

आणि एक दिवस मी त्याच्याकडे गेलो.मला पाहून त्याच्या वडलांना खूपच आनंद झाला.
विषय निघाल्यावर मला अशोक म्हणाला,
“मला वाटतं गोष्टी ऐकणं हे मनाला चांगलं औषध आहे.
मी माझ्या मुलांना रात्री झोपण्याच्यावेळी नियमीत एखादी गोष्ट सांगतो.आणि कधी कधी माझी नेहमीचीच आवडणारी गोष्ट पण सांगतो.गोष्टीचं नाव आहे,
“हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला”.
अशोकच्या घरात गेल्यावर भिंतीवर टांगलेली बरीच चित्र माझ्या नजरेतून सुटली नाहीत.बैठकीच्या खोलीत एक भलं मोठं चित्र मी पाहिलं.अशोक सांगत असलेली गोष्ट त्या चित्रात दृश्य म्हणून मला दिसली.

अशोक पुढे सांगू लागला,
“गोष्ट अशी आही की हरी हा एक अगदी विरळ केसाचं डोकं असलेला मुलगा एका मोठया कागदावर चित्र काढीत होता आणि कुंचल्याने ते चित्र रंगवीत होता.अशी त्या गोष्टीची सुरवात आहे.आणि नंतर सर्व साधारण त्याच्या वयाची मुलं चित्र काढतात तसंच हरी चित्र काढायला लागतो. त्या चित्राच्या आधारे तो आपल्या जीवनाची गोष्ट तयार करतो . पहिल्यांदा तो एक मोठी रेषा काढतो. मग एक मोठं क्षीतीज काढतो.नंतर काढतो,एक चंद्र काळ्याभोर आकाशात.आणि मग एक जमीनीवर वळणावळणाची पायवाट काढतो जणू ती पायवाट म्हणजे त्याचा जीवनमार्गच आहे. ह्या मार्गावर तो
आपल्या जीवनात होणार्‍या सहासाच्या घटना दाखवण्याच्या प्रयत्नात असतो.नंतर तो एक मोठं अरण्य दाखवतो.आणि त्या अरण्यात इतर झाडांबरोबर एकच मोठं आंब्याचं झाड काढतो.
त्या आंब्याच्या झाडाच्या मुळा़शी एका मोठ्या सापाचं वारूळ काढतो.त्या वारूळात रहाणारा साप त्या झाडावर लागलेल्या रसबाळ आंब्यांचं संरक्षण करण्यासाठी असतो.पण एव्हडं काढून झाल्यावर हरीला स्वतःलाच त्या सापाबद्दल अचंबा वाटतो.तो स्वतःच त्या सापापासून एव्हडा भयभीत होतो की तो पुढे सापाबद्दलची गोष्ट लिहिण्यापासून माघार घेतो.त्याचा त्या थरथरणार्‍या हातामुळे जांभळ्या रंगाची ती कागदावरची रेष वाकडी-तीकडी काढली जाते.

आणि हे त्याला कळण्यापूर्वीच त्याचं ते जीवनाचं कथानक एका संकट-स्थितिला पोहचलेलं असतं असं त्याला भासतं.तो एकाएकी पुढे समुद्र दाखवून स्वतः त्या समुद्रात बुडत्या स्थितित आहे अशी कल्पना करतो.पुढे हरीची गोष्ट पुन्हा त्याला विस्मयीत करते.त्याला त्यावेळी हवं तेच त्याच्या डोक्यात येतं.स्वतःला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी एक सुंदरशी होडी काढून ती घेऊन तो किनार्‍याला जाण्याच्या मार्गाला लागतो.
ही गोष्ट ऐकायला माझ्या मुलांना आवडतं.म्हणून नंतर मी त्याचं एक चित्रच काढून लावलं आहे.चला तुम्हाला दाखवतो.”
असं म्हणून अशोक मला आतल्या बैठीकीच्या खोलीत घेऊन गेला.

अशोक पुढे म्हणाला,
हरीची ही गोष्ट मला संपदाची आठवण करून देते.”
“ही कोण संपदा?”
मी अशोकला विचारलं.
“तुम्ही माझ्या क्लिनीकमधे त्या चित्रात पाहिली ती संपदा.”
असं सांगून अशोक पुढे म्हणाला,
“त्याचं असं झालं की मी माझ्या क्लिनीकचं नुकतंच उध्गाटन केलं होतं.एक दिवशी रस्त्यावरच्या एका कचर्‍याच्या पेटीजवळ एका सफेद कपड्यात गुंडाळून टाकून दिलेलं मुल आमच्या क्लिनीकची आया माझ्या जवळ आणून देते.ती मुलगी असते.ते निष्पाप मुल पाहून मला त्याची दया येते.मी त्या मुलीला ठेवून घेतो.एक संपत्तिच सापडली असं समजून मी त्या मुलीचं नाव संपदा ठेवतो.

संपदा नंतर वयाने जरी मोठी झाली होती तरी दिसायला ती एखाद्या पोरकट मुली सारखी दिसायची.ती हळू हळू शाळेत ही जाऊ लागली. ती वाढत असताना माझ्या लक्षात आलं की तीला जन्मतःच एक रोग झाला होता.त्या रोगामुळे तीची वाढच खुंटली होती.त्यामुळे ती सदासर्वकाळ खुरटलेलीच दिसायची.पण संपदा तीचं हे जीवनाचं भावनेने भरलेलं सामान पाठीवर ठेऊन कधीच फिरत नव्हती.तीचा गोड आवाज आणि तीच्या बडबड करण्याच्या संवयीचा वापर करून स्वतःबद्दल तीने असं चित्र रेखाटलं होतं की तीच्या जीत्याजागत्या जगाला कशाची सीमाच नव्हती.कुणी जरी तीचं
बडबडणं ऐकायला कबूल झालं तर ती सर्व बोलून टाकून ऐकणार्‍याला प्रसन्न करायची. त्या बडबडीत तीची भावि-स्वप्न असायची.
कॉलेजबद्दल,करीयरबद्दल,लग्न आणि नंतर मुलांबद्दलची तीची स्वप्न असायची.”

मला अशोकच्या संपदाबद्दलच्या माहितीचा आणि चित्रातली संपदा आणि होडीचा काय संबंध असावा ह्याचं कोडं पडलं.
मी म्हणालो,
“तीला कोणा कोळ्याने कचर्‍याच्या डब्याजवळ टाकून तो निघून गेला का?”
माझ्या प्रश्नाचं अशोकला हसूं आलं.
मला म्हणाला,
“असंच एक दिवशी,मी माझा स्टेथॅस्कोप माझ्या कानावरून दूर करून खरंच तीच्याकडून ऐकायला सुरवात केली. संपदाला तपासण्यासाठी, किंवा तीच्या प्रकृतीचं निदान करण्यासाठी नव्हे तर नुसतं तीच्याजवळ बसण्यासाठी, तीच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी.
तीचं जीवन बघून मला हरीच्या गोष्टीची आठवण येऊ लागली.
हरीने काढलेल्या गोष्टीतल्या सापासारख्या नित्यनियमाने भयंकर, अतिक्रुर सापांशी संपदा सामना करीत होती. आजाराशी,दुःखाशी,भेदभावाशी ती सामना करीत होती.

तीला माहित होतं की एक दिवस तीचा अंत होणार आहे.तो दिवस फार दूर नव्हता.परंतु,ह्याशिवाय आणखी काहीतरी तीला माहित होतं.आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.
ते अरण्य आणि त्यातलं ते एकच एक आंब्याचं झाड असलेल्या कहाणी पुरतं आयुष्य मर्यादीत नसतं.नव्हेतर,अशी जीवनाची कहाणी की ज्यात तीच्या जीवनाचा अनुभव ऐकण्यासाठी अन्य कुणीही भाग घेत असताना तीला होत असलेल्या यातनांची साक्ष म्हणून ते आयुष्य हजर असतं.
तीची जीवन कहाणी डॉक्टरना,शिक्षकाना,मित्राना संपदा सांगत असताना ती नुसती त्या रोगाने जर्जरलेली व्यक्ती, अशी दृष्टोप्तीत न येता उलट ती अशी व्यक्ती दिसायची की जीला अपेक्षा आहेत, स्वप्नं आहेत आणि इच्छाही आहेत.
आपली कहाणी सांगण्याची तीची क्षमता ही त्या समुद्रातल्या होडी सारखी होती त्या होडीच्या सहाय्याने ती निराशेच्या समुद्रात न डुबता किनार्‍याला येऊ शकली.

ती गेल्याचं मला कळल्यानंतर मी खूपच दुःखी झालो.तीलाच माझ्या कल्पनेत आणून ते चित्र मी तयार केलं.त्या होडीत ती चढली आहे आणि त्या होडीचं वल्हं म्हणजे तीची आशा आणि त्या होडीचं शीड म्हणजे तीचं स्वप्न असं मी त्यात रेखाटलं आहे.”

संपदाबद्दल ऐकून मला खूपच गहिवरून आलं.मी अशोकला म्हणालो,
“रात्री झोपताना सांगीतल्या जाणार्‍या गोष्टी सारख्या ह्या जीवनाच्या गोष्टी साध्या आणि दिलासा देणार्‍या असू शकतील किंवा कदाचीत खिचकट,भ्रामक आणि भयभीत करणार्‍या पण असू शकतील.पण मला वाटतं असल्या कसल्याही प्रकारच्या कहाण्या ऐकण्याची क्रियाच व्याधी मधून बरं होण्याचा महत्वाचा उपाय असू शकतो.”

माझ्याशी सहमत होत,अशोक मला म्हणाला,
“तसंच “हरी आणि त्याचा कुंचला” ह्या कहाणीशी तुलना करताना मला वाटतं त्या कहाणीतल्या क्षीतीजा प्रमाणे औषधाचं नवीन क्षीतज तयार करून त्या क्षीताजा पर्यंत शीतल चंद्राच्या चांदण्याखालून चालत जाण्यासाठी चित्रातल्या रेषेसारखा दोघानी मिळून तयार केलेल्या जीवनाचा मार्गाचा उपयोग डॉक्टर आणि आजारीमाणूस करतील.”
एका सर्वपल्ली माणसाबरोबर माझा वेळ मजेत गेला.आणि मी त्रुप्त झालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com