Sunday, January 10, 2010

शब्दांच्या ओळी शिवायला स्मृतिची सूई.

“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.”

त्या दिवशी माझी प्रो.देसायांबरोबर चर्चा चालली होती.विषय होता लेखनाबद्दल.
मी त्यांना म्हणालो,
“मला वाटत होतं की मी कंप्युटर जवळ बसलो की मला आपोआप शब्द सुचंत जाणार.मला वाटत होतं की लेखन करणं म्हणजे पेटी शिकणं,सायकल दुरुस्त करणं,चित्र काढणं यासारखं संवयीने होत असावं.कुठचीही कला कार्यान्वित करावी लागते.तसंच कार्य करायला गेलं की कल्पना सुचत जातात, विचार सुचत जातात.लेखनाबाबत असाच माझा समझ होता.”

भाऊसाहेब म्हणाले,
“मला जी माहिती आहे त्याप्रमाणे लेखन करायला स्मरणशक्ति उभारून यायला हवी.”
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
प्रो.देसायांना दुजोरा देत मी म्हणालो.
“मला माझ्या लहानपणाची एक गोष्ट आठवली.आमच्या शेजारी एक पानपट्टीची गादी होती.असाच एक माणूस त्या दुकानात पान खायला आला की पन्नास पैशांचं नाणं द्यायचा. पंचवीस पैशाचं उरलेलं नाणं तो कानाला अडकवून जायचा. हे असं करताना मी त्याला बरेच वेळा पाहिलं होतं.”
माझ्या एका लेखाच्या संदर्भाची आठवण येऊन मी त्यांना पुढे म्हणालो,
“माझ्या लेखनातल्या गोष्टीतला हा संदर्भ लक्षात ठेवून मी आणखी अवांतर माहिती त्यात लिहू लागलो.दुपार पर्यंत हजारएक शब्दाची गोष्ट लिहिली गेली आणि त्या गोष्टीची सुरवात त्या पानपट्टीच्या गादी पासून झाली. असंच मी आणखी दोन तीन दिवस लिहीत लिहीत माझ्या मनाला पूर्ण आनंद होईतो लिहीत राहिलो.आता माझ्याजवळ गोष्टीची सुरवात,गोष्टीचा अर्धा राहिलेला शेवट आणि गोष्टीचा मध्य भाग लिहीला गेला होता.”
“म्हणजे तुम्ही अर्ध्यावर गोष्ट सोडून दिलीत का?”
भाऊसाहेब मला आवर्जून विचारू लागले.

“हे झाल्यावर मी पुढचं लेखन थांबवलं.मी काय लिहीलंय याचा मागोवा घ्यायला लागलो पण यापुढे काय लिहायचं ह्याची कल्पना येत नव्हती.मला वाटायचं की सगळं चुकीचं लिहलं गेलं आहे.आणि नंतर एक विराम आला.अशा विरामाला आतापावेतो मी चांगलाच परिचीत झालो होतो.कदाचीत गोष्टीला पुन्हा पहिल्यापासून सुरवात करणं जास्त सोपं वाटायला लागलं.किंवा सर्व विसरून जायचं असंही वाटायला लागलं.”
प्रो.देसायांच्या प्रश्नाचं कुतूहल मी जास्त वाढवीत त्यांना असं सांगीतलं.

माझं म्हणणं ऐकून त्यांना एक तुलना सुचली.ते मला म्हणाले,
“मला वाटतं प्रेरणा ही प्रेमासारखीच चंचल बाब आहे.प्रेमाच्या निर्मितीची उपस्थिती जशी लग्नजीवनात असते अगदी तसंच लेखनाच्या प्रेरणेचं आहे.ज्याप्रमाणे काही झालं तरी तुम्हाला लग्नजीवनात रोजचंच उपस्थित राहून समर्पित व्हावं लागतं.पण जर का तुम्ही म्हणाल,
“मला जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी घरी असेन”
तर असं म्हणून लग्नजीवन चालेल का? काहीतरी भलताच घोटाळा व्हायचा.वरवर पृष्टभाग सांचपल्यास, खोलवरच्या गुढतेकडे डोळेझाक केल्यासारखं होईल.तुमचं काय मत?”

मी माझ्याकडून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.मी म्हणालो,
“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.
लिहीत असताना जेव्हा विराम येतो तेव्हा समजावं की अजून खरं लेखन व्ह्यायचं राहिलं आहे.जे सुरवातीला मी घाई करून लिहीत होतो ते परिपूर्ण झालं नाही असं वाटायला लागतं,लेखन जास्तच झालं असंही वाटायला लागतं,कुठेतरी जरा ढील आली आहे आणि थोडी दुरूस्ती हवी असंही वाटायला लागतं.गेले दोन दिवस जे मी लिहीत आलो ते फुकट जाणार असं ही मनात येतं.पण त्यातली खरं समजायची गोम अशी आहे की ही सर्व आपली हार आहे असं मानता कामा नये.”

भाऊसाहेबाना पुन्हा तुलना करून सांगण्याची हुक्की आली.
ते म्हणाले,
“विरामाचा उपयोग गोष्टीचं पुनःमुल्यांकन करण्यात करावा.काही काटछाट करावी.अगदी सुरवातीला काहीच नव्हतं आता निदान थोडं फार आहे.थोडातरी ढांचा आहे,सुंदर तुळा तयार आहे,पाया मजबूत आहे,आता फक्त घराची मजबूत बनावट कशी होईल ते शोधून पहायचं राहिलं आहे असं समजावं.”

मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरं सांगू का,माझा प्रामाणिक विचार असा आहे की कधीकधी असं वाटतं लेखन करणं हे काही येर्‍यागबाळ्याचं काम नाही. कदाचीत मला लेखनाची पुन्हा सुरवात करावी लागणार आहे,पण अगदी सुरवातीपासून नाही.कुठेतरी मधेच चालू करावं लागेल,की जीथे खरा अर्थ प्रकट होईल.सगळं जुळून आल्यासारखं वाटायला लागेल. सरतेशेवाटी अखेरच्या हस्तलेखात दिसावेत तेव्हड्याच शब्दांची काटछाट झालेली असणार.”

“लेखन करण्यासारखं असं दुसरं कुठलं काम असावं?”
अ्सा प्रश्न मी प्रो.देसायांना केला.
ते लागलीच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मलाच प्रश्न विचारून देऊं लागले.
“एखाद्या पेटीवादकाकडून गाण्यातले एखाददुसरे स्वर गाळून पुर्ण गाण्याची अपेक्षा करता येईल काय?
एखाद्या सुताराकडून कुंडा-कचर्‍याच्या टोपल्या न भरता घर बांधून घेता येईल काय.?
झगडा-बखेडा न होता एखादं लग्न निरंतर सुखात राहिल असं म्हणता येईल का?”
पंचवीस पैशाचं नाणं कानात अडकवलेल्या त्या गोष्टीतल्या माणसाच्या भुमिकेला आठवून तुमची स्मरणशक्ती उभारून आली त्या स्मरणशक्तीवर तुम्ही भरवंसा ठेवला.मला वाटतं जशी गोष्टीला सुरवात झाली तसाच तीचा शेवट होणार.”

“गोष्ट पूर्ण झाल्यावर तुमचं मत मला द्या “
असं म्हणून आम्ही चर्चा थांबवली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com