Tuesday, January 12, 2010

प्रदीप गावड्याची वेगळीच भूक

“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.”

ती शनिवारची दुपार होती.अंधेरी लोकल पहिल्या प्लॅट्फॉर्मवर येणार असं चर्चगेटचा इंडीकेटर दाखवत होता.अंधेरी आल्यावर पटकन उतरून ब्रिजवर चढता यावं म्हणून मी प्लॅटफॉर्मच्या बाहेरच्या टोकाला जाऊन एका बाकावर बसलो होतो.दुपारचा पेपर वाचत होतो.तेव्हड्यात माझ्या बाजूला एक सदगृहस्थ येऊन बसले.गाडी यार्डातून आल्याने रिकामीच होती.चटकन चढून खिडकीच्या जवळ बसलो.समोरच्याच बाकावर ते गृहस्थ बसले.गाडी सुटायला अजून पाच मिनटं होती.शनिवारची दुपारची वेळ असल्याने तशी गाडी रिकामीच होती.आम्ही एकमेकाशी हंसलो.आणि नंतर बोलता बोलता कळलं की तो प्रदीप गावडे होता. आणि त्याचा मोठा भाऊ मला ओळखतो.

त्याचा मोठा भाऊ शंकर गावडे लहानपणी माझ्या वर्गात होता.ह्या गावड्यांचं घर आमच्या शाळेच्या बाजूला होतं.शंकर धरून हे पाच भाऊ आणि एक बहिण.आमच्या लहानपणी त्या जनरेशनमधे पाचसहा मुलांचं कुटूंब सर्रास असयाचं.”हम दो हमारे दो” ही घोषणा तोपर्य़ंत झाली नव्हती.आणि छोटा परिवार ठेवल्याने परिस्थिती सुधारता येते वगैर वगैरेचा प्रचार करणं त्यावेळी जरा अप्रशस्त भासायचं.
मुळात घरची परिस्थिती चांगली असेल तर मुलांचं जीवन निभावून जायचं.पण त्या व्यतिरिक्त घरचा कमवता माणूस मुलं वाढत असताना दुर्दैवाने आजारी झाला आणि कमाईवर गदा आली तर मग सर्वांचेच हाल व्हायचे.
गावडे कुटूंबाचं असंच काहीसं होतं.
प्रदीपची आणि माझी ह्याच विषयावर गाडीत चर्चा झाली.

मला तो म्हणाला,
“मी लिहायला वाचायला शिकायला लागल्या नंतरच माझ्या लक्षात आलं की बाकी इतर कुटूंबातली मुलं मी जसं जीवन जगतो तशी ती जगत नव्हती.
आमच्या गावातल्या लायब्ररीमधे माझी अधून मधून खेप व्ह्ययची. हावरटासारखी मी हाताला लागतील तेव्हडी आणि वेळ असे पर्यंत पुस्तकं वाचायचो.मला माहित नसलेल्या जगातल्या निरनीराळ्या ख्याली-खुशालीचं जीवन जगणार्‍या मुलांच्या जीवनाबद्दल माहिती काढण्याचं साहस करण्याच्या प्रयत्नात असायचो.
ही मुलं भुकेलेली कधीच नसायची आणि असलेल्या त्यांच्या गरजा सहज पुर्ततेला यायच्या.
बरेचदां मी स्वतः एका अलिशान बंगल्यात रहात असल्याचं दिवास्वप्न करायचो.बंगल्याच्या बाहेर सुंदर दिसणारं पांढर्‍या रंगाचं कुंपण,घरासमोर रंगीत फुलांची बाग,मोठाले कुत्रे,आणि नोकरमाणसांची धावपळ असलेलं त्या बंगल्यातलं वातावरण स्वप्नात पहायचो. “
दिवास्वप्नातून बाहेर आल्यावर मला खर्‍या जीवनाला सामोरं जावं लागायचं.माझ्या पाच भावंडांबरोबर जगण्याचं ते प्रात्यक्षीक असायचं.दम्या सारख्या दुर्दैवी रोगाने पछाडलेल्या माझ्या बाबांची सेवा करण्यात आमचा वेळ जायचा.ते स्वतःच अपंग असल्याने घरातली आवक सहाजीकच तुटपूंजी असायची.”
प्रदीप गावडे हे मला सांगत होता ते ऐकून मला खूपच गहिवरून आलं.

मी म्हणालो,
“तुझा थोरला भाऊ शंकर शाळेत खूपच हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचा.शिक्षक त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे.मला ते अजून आठवतं.मॅट्रिकला तो आमच्या शाळेतून पहिला आला होता.”
आपल्या थोरल्या भावाची माझ्या तोंडून स्तुती ऐकून प्रदीपला सहाजीकच बरं वाटलं.

मला म्हणाला,
“आमच्या घरी वीज नसायची.त्यावेळी मिणमिणत्या दिव्यात आम्ही रात्रीचा अभ्यास करायचो. माझे वर्गसोबती ह्या बद्दल माझ्याकडे पृच्छा करायचे. मला वाटतं वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना खोटी खोटी उत्तरं द्यायचो.आमची शिक्षणांत जशी प्रगती होत राहिली तशी घरची परिस्थिती पण सुधारूं लागली.”
आमची गाडी कुठपर्यंत आली ते मी खिडकीच्या बाहेर बघायला लागलो.ते पाहून प्रदीप मला म्हणाला,
“मी तुम्हाला बोअर तर करीत नाही ना?”
हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.
मी म्हणालो,
“आपण अजून दादरला पण आलेलो नाही.तुझी जीवनकथा ऐकायला मला कसं बोअर होईल? तुमच्या विषयी ऐकून मला नक्कीच तुम्हा सर्वांचा अभिमान वाटेल.”

प्रदीप पुढे सांगू लागला,
“अगदी लहानपणापासून माझ्या भावंडांबरोबर मिळेल ती कामं पत्करून,नवे करकरीत कपडे सोडाच पण वापरलेले कपडे मिळाले तरी त्यात समाधान राहून निदान रोजचं थाळीत जेवण पडलं तरी भले अश्या परिस्थितीत आम्ही दिवसांची गुजराण करायचो.अशावेळी इतर मुलं आपला वेळ संगीत शिकण्यात,सायकली घेऊन सहलीला जाण्यात,नवीन नवीन खेळणी विकत घेण्यात आपलं जीवन जगायची.
आमची आई काबड-कष्ट करायची.आमच्या घरी आम्ही दोन चार कोंबड्या पाळल्या होत्या.त्यांची अंडी विकून थोडे पैसे यायचे. त्याशिवाय आमची आई कुणाच्या घरी मदतीला जाऊन त्यांच्याकडून काय मिळेल ते घेऊन यायची.त्यामुळे आमची उपासमार क्वचीतच व्हायची.”
मी प्रदीपला म्हणालो,
“आणि आपल्या त्या वाढत्या वयात राक्षसी भूक लागते.तुमच्या त्या परिस्थितीत आणि एव्हड्या मुलांना उपासमार न होईल ह्यासाठी काबाडकष्ट करणारी तुझी आई खरीच “धन्य ती माऊली” असं माझ्या मनात आलं.”

“पण खरं सांगायचं तर माझी खरी भूक दुसरीच असायची.”
भूकेचा विषय निघाल्यावर प्रदीप आपल्या मनातलं खरं ते सांगू लागला,
“माझे आईवडील जे जीवन जगले त्यापेक्षा जरा चांगलं जीवन जगण्याची माझी भूक होती.आमच्या कामचालावू अस्तित्वापलिकडच्या अस्तित्वाच्या ज्ञानाविषयीची ती भूक होती.माझ्या बाबांना वाटायचं की आमचं असंच चालणार ती त्यांची समजूत खोटी करून दाखवण्याची माझी भूक होती.
माझीच नाही तर ही भूक माझ्या भावंडांची प्रभावकारी शक्ती होती ज्यामुळे ते प्रेरित होऊन आईवडीलांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सफल करण्यात यशस्वी झाले.मिळेल त्या शाळेत जाऊन शिकण्याचं आम्ही सर्वानी हौशीने पत्करलं.कारण शिक्षणच आमचं भावी आयुष्य उज्वल करण्याची पहिली पायरी होती.”
हे ऐकून मला प्रदीपच्या ह्या विचारसरणीचा खूप आदर वाटू लागला.
मी म्हणालो,
“कोण कोण काय काय शिकले ते ऐकून मला खरंच आनंद होईल.”

“माझी भावंडं निरनीराळ्या व्यवसायात आपआपली कार्यसिद्धि करून परिपूर्णतेला आली आहेत.माझा मोठा भाऊ शंकर आर्ट प्रोफेसर आहे.एक भाऊ फार्मासिस्ट आहे.एक व्हेट डॉक्टर आहे.एकाचा कपड्याचा धंदा आहे. मी के.सी.कॉलेजमधे क्लार्क आहे आणि माझी एकुलती एक धाकटी बहिण मुलींच्या शाळेत शिक्षीका आहे.”
प्रदीप सांगत होता.

मला राहवलं नाही.मी प्रदीपला पटकन म्हणालो,
“ह्या भुकेच्या तीव्रतेबद्दल जर का तुम्हाला एव्हडी चिंता नसती,किंवा प्रतिभेचं अगोदरच वरदान असतं,किंवा तुमचं जीवन छानछोकीचं असतं तर मला वाटतं तू कधीच जाणू शकला नसतास की तुला आणि तुझ्या भावंडांना हे यश संचित करता आलं असतं.”
माझं हे ऐकून प्रदिप खरोखर सद्गदीत झाला.आणि त्याला माझं म्हणणंही पटलं.आणि आम्ही अंधेरीला उतरण्यापूर्वी डोळ्यात पाणी आणून शेवटचं सांगून गेला.

“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.”
प्रदीप गावडे आणि त्याच्या कुटूंबाची चर्चगेट-अंधेरीच्या प्रवासात ही कहाणी ऐकून माझा वेळ सत्कारणी गेला असं मला वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com