Thursday, January 14, 2010

इतिहासातून शिकण्याजोगं.

“इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता असते”

आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.आम्ही दोघे मिळून तळ्यावर फिरायला जाणार होतो.प्रो.देसाई सध्या आपल्या मुलाच्या घरी थोडे दिवस राहायला गेल्याने त्यांची कंपनी थोडे दिवस आम्हाला मिळणार नव्हती.
पण झालं असं की मला कळलं वैद्य पण काही आवश्यक काम आलं म्हणून त्यांच्या पत्नीबरोबर बाहेर गेले होते.वैद्यांचा मुलगा- गिरीश- घरी भेटला.

मला म्हणाला,
“काका, मी आज तुमच्याबरोबर तळ्यावर येतो.आज मला काही कामानिमीत्त सुट्टी घ्यावी लागली होती.काम काही झालं नाही आणि घरी राहून मी पूर्ण बोअर झालो आहे.”
मी त्याला म्हणालो,
“अलभ्य लाभ.नाहीतरी रोज तू एव्हडा कामात गुंतलेला असतोस,माझ्या वाट्याला कसा येणार.?चल जाऊया.”

चालता चालता मी त्याला म्हणालो,
“हल्ली होत असलेल्या हाणामारी,सुयीसाईड बॉम्बर्स,आतंकवादी आणि जास्त करून एका धर्मात काही लोकात उसळून निघालेली जीहादची घोषणा आणि त्यानुसार मनुष्यहानी करून तथा-कथित क्रान्ति आणण्याचे त्यांचे विचार पाहिल्यावर वाटतं हे लोक इतिहासातून काही शिकलेले दिसत नाहीत.
“जे लोक इतिहास शिकत नाहीत ते नक्कीच इतिहासाची पुनरावृती करायला अभिशापित होतात.”
असं कुणी तरी म्हटलं आहे.तुला कसं वाटतं.?”

गिरीश मला म्हणाला,
“रोज पेपरात आपण वाचतो त्या घटना अगदी सारख्याच नसल्या तरी जवळ जवळ सारख्याच अर्थाच्या असतात.मग त्या काल ऐकलेल्या असो वा परवा ऐकलेल्या असो वा एक आठावड्यापूर्वी ऐकलेल्या असोत.इतिहासाकडून शिकायची संवय मला वाटतं लोक विसरून गेले आहेत.”
आज प्रि.वैद्य नसले तरी त्यांचा गिरीश मला चर्चा करायला चांगलाच सापडला हे पाहून मी मनात खूश झालो होतो.
मी त्याला म्हणालो,
“काय रे गिरीश,तुला शाळेत इतिहासाचा विषय शिकावा लागला असेलच.काही आठवतं का तुला एखादा किस्सा?”

“मला लहानपणी माझ्या वर्गातली गोष्ट आठवते.माझ्या मनावर तीचा चांगलाच परिणाम झाला आहे.”
गिरीशने विषयाला हात घातला.
मधेच त्याला अडवीत मी म्हणालो,
“एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण ज्यावेळी परिणामकारक बदलाव आणण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा रचनात्मकता ही नक्कीच हिंसा करण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
पण ते जाऊदे तू काही तरी वर्गातल्या गोष्टीबद्दल सांगत होतास.”

“हो,वर्गातल्या गोष्टीबद्दल मी म्हणालो,”
गिरीश सांगू लागला,
“त्याचं असं झालं,एकदा आमचे इतिहासाचे शिक्षक जगाच्या इतिहासाबद्दल बोलत होते.आम्हाला त्यानी आतापर्यंत जगात झालेल्या अनेक क्रान्तिबद्दल यादी तयार करून प्रत्येक घटनेबद्दल चार ओळीत टीप लिहायला सांगीतली होती.
त्या यादीचा विचार केल्यावर एक ठरावीक चित्र दिसलं ते आमच्या शिक्षकांनी आमच्या लक्षात आणलं.जेव्हड्या म्हणून क्रान्ति झाल्या होत्या त्या सर्वांमधे रक्तरंजीकता जास्त होती.त्या हिंसेने परिपूर्ण झालेल्या क्रान्ति असायच्या.त्यातली एकही क्रान्ति रक्त न सांडता झालेली नव्हती.जेव्हा क्रान्ति विषयी विचार केला जाई तेव्हा त्यात आपल्या उद्देशासाठी जीवीताची प्रचंड हानी करायला लोक उद्युक्त झालेले दिसले.त्यावेळी,तुम्ही म्हणता तसं, आमच्या पैकी कुणाच्याही असं लक्षात आलं नाही की क्रान्ति अहिंसक पण होऊ शकते.
आमच्या शिक्षाकानी ह्य विषयावर चर्चा करायला चालना दिल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की अहिंसक क्रान्ति झाल्याची इतिहासात नोंद आहे.
त्यामधे वैज्ञानिक क्रान्ति, औद्योगिक क्रान्ति,ज्ञानोदय आणि नवजागरण ह्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत.ह्या प्रकारच्या सर्व क्रान्तिमधे रचनात्मक विचार,आणि कार्यकुशलतेचा अंतर्भाव होता आणि हिंसा बिलकूल नव्हती.वर्गात क्रान्तिबद्दल आम्ही सुरवातीला विचार करीत होतो तेव्हा आमच्या मनात ह्या गोष्टी लक्षात अजिबात आल्या नाहीत उलट हिंसा आणि रक्त सांडण्याचे प्रकार लक्षात आले.
कल्पकता किंवा रचनात्मकता विषयी विचारच सुचला नाही.हे सुचल्यानंतर मात्र माझा विचार बदलला आणि वृद्धिंगत झाला.”
मला गिरीशचे विचार सकारात्मक वाटले.

मी म्हणालो,
“हिंसा होऊन झालेली क्रान्ति नेहमीच परिणामकारक होत नाही.एकदा का हिंसा होऊन क्रान्ति झाली की नंतर शांती मिळेलच ह्याची खात्री नाही.आणि त्या क्रान्तितून उपलब्ध झालेली ध्येयं साध्य होतीलच याची खात्री नाही.उलट हिंसात्मक क्रान्तितून आणखी हिंसा होण्याचा संभव बळावतो.”
“काका,तुमचं म्हणणं मला एकदम पटतं.मी पुढे जाऊन म्हणेन,
अहिंसात्मक क्रान्तिमधून समाजावर जास्त परिणामकारक आणि कायमचा ठसा बसतो.असंच मलाही वाटतं.”
गिरीश माझ्याशी सहमत झाला हे मला जरा बरं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तू मघाशी उल्लेख केलेल्या अहिंसात्मक क्रान्तिंचे परिणाम शेकडो वर्षं होऊन गेली तरी आजही प्रत्यक्षात दिसतात. त्यातून मिळालेली उदाहरणं आणि त्याची उपयुक्तता नंतरच्या पीढीशी पायाभूत राहून अजूनही व्यवहारात आहे. इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता आहे.”

“काही वेळा हिंसेची जरूरी नसते उलट हिंसाच समाजात आणायच्या नव्या बदलावाला पायओढ करायला कारणीभूत ठरते.आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता काय चाललं आहे ते. आतंकवाद्यांच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या धर्मात सांगीतलेल्या काही गोष्टींचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावून घेतला आहे.पण असं करणं जास्त वेळ टिकणार नाही.”
गिरीशचं हे म्हणणं ऐकून मी त्याला म्हणालो,

“म्हणून बदलाव आणायचा असल्यास रचनात्मकतेचं समर्थन जास्त झालं पाहिजे.हे इतिहासातून शिकून असा इतिहास घडवला गेला पाहिजे.पण तू मघाशी म्हणालास तसं लोक इतिहासाकडून शिकायला विसरून गेले आहेत,ही चूक त्यांच्या ज्यावेळी लक्षात येईल,तो पर्यंत हे सगळं आपल्या सारख्याला सहन करावं लागणार आहे,असं मला वाटतं.”

दोघेही आम्ही एकमेकाशी एव्हडे सहमत झालो होतो की मी सुरवात केलेल्या ह्या विषयावर पुढे चर्चा करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com