Monday, January 25, 2010

माझी दाभोलीची भेट.

“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”

आज बरेच दिवसानी मी कोकणातल्या दाभोली गावाला गेलो होतो.माझ्या चुलत भावाची ह्या गावात बरीच शेतीवाडी आहे.भातशेती तो तर करतोच त्याशिवाय ऑफसिझनमधे भाजीची पण लागवड करतो.त्याशिवाय त्याच्या कडे गाईगुरं आहेत,शेळ्या-मेंढ्या आहेत,कोंबड्यांची खुराडं ही आहेत.
अलीकडे तो बराच थकला आहे असं मी ऐकलं होतं. शिवाय थोड्या दिवसापूर्वी त्याच्या पत्नीचं-म्हणजेच माझ्या वहिनीचं- एकाएकी निधन झालं होतं. म्हणूनच त्याची भेट घेण्यासाठी मी दाभोलीला आलो होतो.त्याचा मुलगा अलीकडे माझ्या भावाला कामाचा जास्त व्याप न देता स्वतःच सर्व कारभारात लक्ष घालीत होता.

मी घरात शिरताच माझी पहिली भेट झाली ती माझ्या भावाच्या नातवाशी.मुंबईला इन्जीनीअरींग कॉलेजमधे तो तिसर्‍या वर्षात शिकत होता.त्याला मला बघून आनंद झाला.त्याच्या मागोमाग माझा पुतण्या बाहेर आला.निपचीत पडलेल्या माझ्या भावाच्या खोलीत मला घेऊन गेला.तो शांत झोपलेला पाहून मी खूणेनेच पुतण्याला सुचवलं की आपण नंतर तो जागा झाल्यावर येऊंया.
माझा पुतण्या आणि त्याचा मुलगा आम्ही बाहेरच्या पडवीत गप्पा मारायला बसलो होतो.घरातलं दुःखी वातावरण पाहून,समजूत घालण्याच्या उद्देशाने विषय काढावा म्हणून मी त्यांना म्हणालो,
“जसं आपल्याला हवं तसंच आपलं जीवन असेलच असं होत नाही.”
आणि पूढे म्हणालो,
“असं म्हटलं जातं की,
“सुख शोधायचं असेल तर जे आपल्याला मिळतं तेच आपल्याला हवं असतं असा समज आपल्यात असायला हवा.”

माझा पुतण्या मला म्हणाला,
“अशी गुढावस्था प्राप्त करून घेणं सोपं नसतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचे चेहरे न्याहाळल्यावर,ही गुढावस्था प्रात्प न व्हायला मी काही एकटाच नाही असं मला दिसून येतं.”
आणि मला पुढे म्हणाला,
“आता पर्यंतच्या आयुष्यात अनेक धक्के खावे लागले.मी ज्यावेळी तरूण होतो तेव्हा मी माझ्या पडेल त्या कामात व्यग्र असायचो. शारिरीक आपत्यांना तोंड द्यावं लागायाचं.रात्री रात्री पर्यंत कामं करावी लागायची.दुसर्‍या कामाचा शोध घ्यावा लागायचा.विचार करायला वेळच गवसत नव्हता.”

आपल्या वडीलांची री ओढत त्याचा मुलगा म्हणाला,
“अलीकडे माझ्या आयुष्यात मला भासलं त्याप्रमाणे माझ्या आजीच्या निधनाने उलटापूलटी आली आहे.वयाने ती एव्हडी वृद्ध झाली नव्हती. तरी एकाएकी ती निघून गेली.आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं.ती एकाएकी निघून गेल्याने मला अपरिमित दुःख झालं आहे. दुःखी माणसाचा चेहरा मला मी प्रात्प करून घेतला आहे.
लहानपणाच्या संवयी प्रमाणे कुणी जरी विचारलं,
“कसं चालंय?”
तर ओघाने
“ठिक ठाक”
असं उत्तर यायचं.पण आता तसं होत नव्हतं.”

मी त्याला म्हणालो,
“आपण हंसलो तर जग आपल्या बरोबर हंसणार नाही काय?
आणि रडायला मात्र एकट्यालाच लागतं.
मात्र अतिउत्तेजीत क्रियाशीलतेत चटकन निसटून जाता येत नाही हे अगदी खरं आहे.”
माझा भाऊ उठल्यावर त्याची भेट घेऊन रात्री त्याच्या बरोबरच जेवण करून आम्ही सर्व झोपलो.
सकाळी उठल्यावर चहापाणी होण्यापूर्वी गाईंच्या गोठ्यात एक फेरी टाकावी म्हणून गेलो.तिकडे नातू गाईचं दूध काढताना दिसला. इन्जीनीयरींग शिकत असला तरी घरी आल्यावर शेतकर्‍याची कामं किती उत्साहाने करतो ते पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.मी त्याच्या जवळ एक लहान स्टूल ओढून घेऊन बसलो.सूर सूर आवाज करीत गाईच्या आंचळातून येणार्‍या दुधाचा त्या पितळेच्या चरवीत पिचकार्‍यांचा आवाज ऐकून मला जरा मजाच वाटली.

मी नातवाला म्हणालो,
“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”
माझा हा विचार त्याला इतका आवडला की,भरलेल्या चरवीवरचा दुधाचा फेस फुंकून हाताने बाजूला करीत असताना मला म्हणाला,
“कालचीच गंमत मी तुम्हाला सांगतो.चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.”

दुधाची भरलेली चरवी नोकराकडे देत मला पुढे सांगू लागला.
“काल सकाळीच मी नेहमी प्रमाणे आमच्या कपिलेची आंचळं धूऊन असाच दोन पायात पितळेची चरवी धरून दूध काढीत बसलो होतो.ते सफेद अमृत मला सोन्याच्या मोलाचं वाटतं.माझ्या आजीचा मोत्या माझ्या मागे घुटमळत होता.कपिलेचं दूध काढीत असताना मोत्या नेहमीच गोठ्यात येऊन त्याला आवडणार्‍या कोपर्‍यात जाऊन बसतो. माझं लक्ष मोत्याकडे गेलं. तो त्या कोपर्‍यात जाण्यापूर्वी एकदम थांबला.जरा चकीत झाल्या सारखा दिसला आणि तो कोपरा सोडून दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसला.मी दुधाची चरवी भरल्यानंतर बाजूला ठेऊन त्याला तिथे काय दिसलं ते पहायला म्हणून त्या जागी गेलो.
सफेद-काळ्या केसांचा पुंजका तिकडे पडला होता.काल मी आमच्या तानुलीच्या-शेळीच्या- शेपटीवरचे केस भादरले होते.ती आता दोन महिन्याचं पोट घेऊन फिरत असते.लवकरच तीला छबकडं होईल. केसाचा तीला उपद्रव होऊं नये म्हणून मी तीची नीगा ठेवीत होतो.तो केसांचा पुंजका उचलून मोत्या जवळ गेलो आणि त्याच्या नाका जवळ नेऊन पाहिलं.त्याने तात्पूरतं हुंगल्यासारखं करून शेपटी हलवली.जणू त्याला सांगायचं होतं की,
“मला ठाउक आहे.”

हे ऐकून त्याला मधेच थांबवीत मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“एखादी केवळ गोष्ट,एखादा केसाचा पुंजका,एखादी जमिनीला आलेली खांच,एखादा कागदाचा तुकडा सुद्धा आकस्मिक भय ह्या प्राण्यांत आणू शकतो.
कारण त्या क्षणाला त्यांना तेव्हडंच दिसतं.हे प्राणी ती एकच एक दिसलेली गोष्ट आजुबाजूला असलेल्या गोष्टींच्या संदर्भात पाहू शकत नाहीत.”
“अगदी बरोबर आहे तुमचं.कसं ते सांगतो.माझ्या पण मनात तसाच विचार आला.”
आणि मला तो पुढे म्हणाला,
“त्या मोत्याला भासलेल्या भितीतून माझ्या लक्षात आलं की मी पण असाच माझ्या आजीच्या निधनाकडे बघीतलं तर?.त्या केसाच्या पुंजक्यासारखी मला ती घट्ना वाटून घेतली तर?.”
असं म्हणून माझ्याकडे तो उत्तराची अपेक्षा करतो आहे असं वाटलं.

हे ऐकून मला त्याचं कौतूक वाटलं.इन्जिनीयरींगच्या तीसर्‍या वर्षात शिकत असल्याने किती पोक्तपणा त्याला आला आहे हे पाहून मी मनात म्हटलं ह्याला आताच विचारावं की होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल खंत करीत बसणं किती संयुक्तीत राहील?.
मी म्हणालो,
“तुला हवं तसं हे जीवन नसेलही.पण कसंतरी करून जर एखाद्याच वेळेला त्या कपिलेच्या पांढर्‍या अमृताकडे तू सोन्याच्या मोलाने पाहू शकतोस,सुखद स्मृतिना आठवू शकतो्स,तर कदाचीत असंच एखादं कारण धुंडाळून तू जीवनाचा मार्ग काटू शकशील.”
म्हणे पर्यंत नोकर,
“चहा तयार आहे सर्व वाट बघतायत.”
असा निरोप घेऊन आल्यामुळी आम्ही तो विषय तीथेच सोडून आत चहाला गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com