Wednesday, January 20, 2010

तांब्याचं कडं.

“प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

मागे एकदा मी मामा काण्य़ांच्या हॉटेलमधे चहा आणि बटाटावडा खाण्याच्या उद्देशाने गेलो होतो.मला वाटेत कर्णीकांची शोभा भेटली, तीला पण मी माझ्या बरोबर कंपनी म्हणून बोलावलं.आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो आणि दोन कप चहा आणि दोन प्लेट वडे आणि त्याच्या बरोबर मामा काण्यांची खास चवदार लाल रंगाची सुकी चटणी मागावली. कांद्याच्या भजांच्या भांड्यात उरलेला चूरा मिरचीच्या तिखटाबरोबर मिक्स करून नंतर तीचा भूगा करून ती चटणी ते बनवतात म्हणून मी ऐकलं होतं.भज्याच्या चूर्‍याचा अश्यातर्‍हेने चांगलाच उपयोग होतो.

मला कुणीतरी सांगीतलं होतं की मिसळ -पाव मामा काण्यांकडे फ़ार पूर्वी पासुन मिळायची.मामा काण्यांच्या हॉटेलला ह्या २०१० च्या फेब्रुवारीला शंभर वर्ष पूर्ण होणार.बापूसाहेब काणे स्वतःच मला त्यादिवशी फोनवर म्हणाले. उसळ गरम करून त्यात कच्चा बारीक कांदा,बारीक शेव आणि थोडाच उसळीचा रस्सा घालून ती पावाबरोबर मिसळ-पाव प्लेट म्हणून विकली जायची.शंभर वर्षापूर्वी ती डीश फारच लोकप्रीय होती.
बापूसाहेब काणे हे मामासाहेबांचे थोरले चिरंजीव.म्हणजे मामासाहेबांची दुसरी पिढी.

माझी आणि बापूसाहेबांची ओळख tifrमधली. मला आठवतं त्याप्रमाणे बापूसाहेब काही वर्ष स्विडनला कंप्युटर सॉफ्ट्वेअर शिकायला गेले होते. tifr मधल्या CDC 3600 नावाच्या कंप्युटरवर इतरांबरोबर आम्ही दोघे काम करायचो. हा कंप्युटर डॉ.भाभा यानी अमेरिकेतल्या CDC corporation ह्या कंपनीतून मिनियापोलीसमधून आयात केला होता.बापूसाहेब सिनियर प्रोग्रामवर होते आणि मी हार्ड्वेअर इंजिनीयर होतो.फोरट्रॉन,कोबोल,पास्कल वगैरे कंप्युटरच्या भाषा-languages-मधे बापूसाहेबांचा हातखंडा.त्यातल्या त्यात फोरट्रॉनवर बापूसाहेब काण्यानी
पुस्तकंही लिहिली होती.

tifr मधे काम करून ड्युटी संपल्यावर म्हणजे संध्याकाळचे पाच वाजल्यानंतर बापूसाहेब तडक हॉटेलात काम करायला यायचे.
कधी गल्ल्यावर बसलेले दिसायचे तर कधी भटारखान्यांत स्वयंपाक्याना सल्ला द्यायला जायचे.अजूनही ते बरेच वेळा हॉटेलात फेरफटका मारतात.
त्यावेळी मिसळपाव म्हणून मामाकाण्यांची डीश प्रसिद्ध होती आता मिसळपाव म्हणून तात्या अभ्यंकरांचं संकेतस्थळ प्रसिद्ध आहे.
आणि काही वर्षानी भारताने पाठवलेल्या चंद्रावरच्या रॉकेटचं नाव सुद्धा मिसळपाव असलं तर मला नवल वाटणार नाही.

तर त्याचं असं झालं, मी आणि शोभा बसलेल्या टेबलावर बाजूला एक बाई येऊन बसली.
शोभाच्या उजव्या हातातल्या तांब्याच्या कड्याकडे ती निरखून पहात असताना मी पाहिलं होतं.ती बाई शोभाला असा गहन प्रश्न विचारील हे माझ्या मनातही नव्हतं.अगदी तीच्या मर्मावर घाव घातल्या सारखं मला वाटलं.
तीने शोभाला विचारलं,
“तुम्ही तुमच्या उजव्या मनगटावर तांब्याचं कडं का वापारता?”
शोभाने जरा त्या बाईकडे निरखून पाहून तीची खात्री केली की खरंच ही बाई गंभीर होऊन प्रश्न विचारतेय ना.
मध्यंतरी हे फॅड आलं होतं आणि आता निघूनही गेलं.
“तुम्ही फॅशन म्हणून नक्कीच वापरत नसाल.वापरण्याच्या मागे काहीतरी कारण असणार”
तीने दुसरं वक्तव्यं थोडं हसंत हसंत केलं.आणि ती कारण विचारू लागली.

शोभा तीला म्हणाली,
“माझे आजोबा अलीकडेच गेले.त्या दिवशी मी एकदा हे कडं मनगटावरून काढलं होतं.तसंच जेव्हा माझी आजी गेली होती तेव्हा तीच्या सन्मानासाठी मी असंच ते मनगटावेगळं केलं होतं.”
क्षणभर थांबून आवंढा गिळून शोभा पुढे म्हणाली,
“हे कडं भरवश्याचं आणि त्यागाचं चिन्ह आहे असं मला वाटतं.माझी आजी कॅन्सरने गेली.हा रोग आजार्‍याला आणि सुदृढ असलेल्याला सुद्धा जेरीला आणतो.हा रोग कुणाचं तरी जीवन घेऊन जातोच पण बरोबरीने कुणाचे आजी,आजोबा वडील,आई,बायको/नवरा,भावंड,मुलही घेऊन जातो.
मला वाटतं हे कडं कुटूंब,मित्रमंडळी,जीवित असणं किंवा मृत्युपावणं ह्याचं प्रतिनिधित्व करीत असतं असं मी मानते.मी ते माझ्या मनगटावर ऐक्य दाखवण्यासाठी वापरते.जे अजून जीवंत आहेत,जे असल्या दुर्धर रोगाचा सामना करीत आहेत त्यांच्यासाठी वापरते.”

मी म्हणालो,
“ह्या रोगा बाबतीत आपण किती सुशिक्षीत व्हायला हवं हे आपल्यावर अवलंबून आहे.अगदी सुरवात दिसताच ह्यावर उपाय योजना व्ह्ययला हवी.आणि सरकारने आणि सामाजिक संस्थांनी ह्या रोगावर हिरीरीने संशोधन करायला हवं.”

माझ्याशी सहमत होत शोभा म्हणाली,
“हे कडं मी धैर्य़ाने आणि मी स्वतः कदाचीत ब्रेस्ट कॅन्सरची मोठी जोखीम असलेली असं समजून मनगटावर वापरते. माझी मुलगी सुद्धा ह्या रोगाला बळी पडण्याचा संभव आहे अशा विचाराने वापरते.आणि कधी कधी मी माझ्या नवर्‍याची आठवण काढून मनात म्हणते माझ्या जाण्याने तो आपली पत्नी घालवून बसणार आहे.”

मी म्हणालो,
“सर्व तर्‍हेच्या कॅन्सर रोगावर नक्कीच एक दिवस उपाय निघेल.जे बिचारे त्या रोगाला बळी पडले त्यांच्या लढतीच्या समर्थनासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या ह्या लढाईमधून इतरांचं जीवीत सुरक्षीत व्ह्यायला मदत होईल.”
माझ्या आणि शोभाच्या विचारामुळे त्या बाईच्या एका प्रश्नाला आमच्या अनेक उत्तराने तीला कंटाळा आणला असावा.पण तीच्याकडून मोठं गमतीदार स्पष्टीकरण मिळालं.
ती म्हणाली,
“माझी आई ब्रेस्ट कॅन्सरने गेल्या नंतर मला असंच कुणी तरी कडं दिलं होतं.मी वापरत नसले तरी जे वापरताना दिसतात त्यांना मी निक्षून त्यांच्या वापरण्याचं कारण मात्र विचारते.
प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

उठता उठता शोभा म्हणाली,
“मला आशा आहे की ह्या कड्यातर्फे ह्या रोगाच्या लागणीची इतरांना आठवण दिली जाईल.आणि एक दिवस ह्या रोगातून वाचलेले लोक इतराना, त्यांच्या कुटूंबियाकडून त्यांच्याबद्दल कहाणी ऐकवण्या ऐवजी त्यांचाकडून त्यांची कहाणी ऐकवतील.”
चहाचा शेवटचा घोट घेत मी ही उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com