Thursday, July 8, 2010

या,सुखानो या!

“ह्या जगात आपला ताबा ठेवण्यासारख्या फारच थोड्या गोष्टी असतात.आणि तुझं वयक्तिक सुख प्रदर्शीत करणं ही त्या ताबा ठेवण्यासारख्या थोड्या गोष्टीतली एक गोष्ट आहे.”

मला एक नवी सायकल माझ्या पुतण्यासाठी विकत घ्यायची होती.आम्ही दोघे मिळून विजय कारखानीसच्या दुकानात गेलो होतो.विजय माझ्या पुतण्याचा शाळकरी मित्र होता.विजय त्याच्या कारखान्यात सायकली ऍसेंबल करतो आणि दुकानात नेऊन विकतो असं कळलं.विजय स्वभावाने बोलका होता.अर्थात धंद्यात बोलकेपणाची जरूरी असते.त्यामुळे गिर्‍हाईकाला आपलसं करायला मदत होते.विजयने सांगीतलं की थोडावेळ थांबलात तर
कारखान्यातून नवं पाच गीअर्स असलेलं मॉडेल आम्हाला तो देऊ शकेल.लगेचच आमच्यासाठी त्याने त्याच्या दुकानात काम करणार्‍या माणसाला कारखान्यात पाठवून दिलं.आम्ही त्याची परत येण्याची वाट पहात असताना मी विजय बरोबर गप्पा मारीत होतो.

“सध्या धंदा कसा काय चालला आहे? “
असं मी विजयला विचारलं.

“चाललाय.पण काही धांवत नाही.”
असं विजय हंसत हंसत उत्तरला.आणि म्हणाला,
“माझी स्वतःची काही मूलभूत दृढमतं आहेत.जसा काळ पुढे चालला आहे तसं मला वाटतं ही माझी मतं मला रोजच्या जीवनात आणि ह्या धंद्यात सामोर्‍या येणार्‍या अडचणी पार करायला मदत करत राहिलीत.
ज्यावर माझा दृढविश्वास आहे आणि कदाचीत जे माझ्या जास्त मदतीला येतं त्या सुखाबद्दलच्या माझ्या मताविषयी मला विशेष वाटतं.”

मला हे ऐकून रहावलं नाही.मी विजयला म्हणालो,
“इतरांप्रमाणे तुझी सुद्धा हीच इच्छा असावी की जीवन सुखी असावं.आणि मला नेहमीच वाटत असतं सुखी व्हायला यश मिळणं हे सर्वतोपरी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं.आपल्या हाताबाहेर असलेल्या बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव,आणि बाहेरची परिस्थिती, बरेच वेळा ज्याला प्रारब्ध किंवा भाग्य असं म्हणतात, ह्यावर ते सूख अवलंबून नसतं असं मला वाटतं.”
विजय़च्या चेहर्‍यावर आनंद दिसला.त्याला माझ्याशी ह्याच विषयावर बोलायचं आहे असं दिसलं.

“माझ्या दृष्टीने ह्या माझ्या सुखाबद्दलच्या मताचं समर्थन करायला दोन तत्व कारणीभूत होत असावीत.सुखाबद्दल इच्छा प्राप्त व्हायला हीच दोन तत्वं जास्त महत्वाची आहेत.
पहिेलं तत्व म्हणजे माझी जीवनाकडे पहाण्याची वृत्ति.आणि गंमत म्हणजे ही वृत्ति दुसर्‍या तत्वाशी संलग्न असते.
आणि हे दुसरं तत्व म्हणजे,दुसर्‍यांना मदत करण्याची मनापासून अंगात असलेली आवड.”
विजय मला सांगू लागला.तेव्हड्यात त्याच्या एका नोकराने नवी करकरीत सायकल आमच्या समोर आणून ठेवली. माझा पुतण्या सायकलकडे निरखून पहात होता.त्याला ती आवडलेली दिसली.
तो त्याचा व्यवहार पूर्ण करायला गेला. तोपर्यंत मी विजयशी बोलत बसलो.

मी विजयला म्हणालो,
“कुठच्याही धंद्यात उन-पाऊस असतोच.ह्या उन-पाऊसावर धंद्याचं यश-अपयश अवलंबून असतं.पण धंद्यात चिकाटी हा सर्वोत्तम गूण असावा लागतो.हे जास्त करून गुजराथी लोकांकडून शिकण्यासारखं आहे.”

“आता मराठी लोक पण धंदा करायला पुढे सरसावले आहेत. माझ्याच बाबतीत बोलायचं झाल्यास मला नोकरी करणं पहिल्यापासून आवडत नव्हतं. पण तुम्ही म्हणता तसं धंदा चालू केल्यावर तो कसा चालेल हे काळच दाखवीत असतो.
निराशेने अंधकारमय झालेलं माझं पंधरा वर्षापूर्वीचं जीवन मला आठवतं.त्या जीवनाबद्दल सकारात्मक वृत्ति ठेवण्याऐवजी मी बाहेरून काय बदल होईल याची वाट पहात असायचो.धंद्यात बरकत येऊन मी सुखी होण्यासाठी माझ्या जीवनात काही गोष्टी घडून येण्याची आवश्यकता आहे अशी माझी समजूत करून घेऊन मी वाट पहात असायचो.

एकदा मी माझ्या आईला हा माझा विचार सांगीतला.
ती मला म्हणाली,
“वाट बघत रहाण्यात काही अर्थ नाही.सुख मिळवण्यासाठी तू स्वतः तुला सामिल करून घ्यायला हवं.”
तिने पुढे आणखी एका वाक्यात सांगीतलं,
“ज्यांचा सुखी होण्यासाठी सामिल होण्याचा प्राथमीक उद्देश, दुसर्‍यांसाठी काही करण्याचा असतो, तेच फक्त सुखी होतात.”

ही कल्पना बरीच वर्ष माझ्या बरोबरच विकसीत होत होती.आणि मला आता विश्वास वाटायला लागलाय की त्या कल्पनेत काहीतरी सत्य सामावलेलं आहे.एक प्रकारची आंतरीक समाधानी आणि सर्व काही आलबेल आहे असं वाटणारी मनस्थिती दुसर्‍या कुठल्याही मार्गाने शक्य होणार नाही ती मला इतरांच्या सुखात माझ्याकडून थोडीशी भर घालण्याने होते.”

विजयच्या आईचा उपदेश विजयकडून ऐकून मलाही विजयला थोडं सांगावसं वाटलं.माझा पुतण्याही आपलं सायकलबद्दलचं सर्व काम आटोपून आमच्यात येऊन बसला.

मी विजयला म्हणालो,
“तुझं दैव वाईट असल्याने किंवा तुला जे जे म्हणून हवंय ते मिळत नसल्याने तू सुखी होणार नाहीस याची तुला काळजी वाटूं नये.तुला जे काही हवंय त्यातल्या बर्‍याच गोष्टी तू कधीच प्राप्त करू शकणार नाहीस हे नक्कीच आहे. तरीसुद्धा तू सुखीच रहाणार, कारण जास्त करून,तुझे उद्देश साध्य करण्याचे तुझेच प्रयत्न पाहूनच, तू सुखी होणार.”

“तुम्ही म्हणता तसाच विचार करीत मी पुढे सरकत आहे.”
असं सांगत विजय मला म्हणाला,
“सुदैवाने मी जे काम करतो ते मला खूपच आवडतं.आणि त्याशिवाय माझं हे सायकलचं वर्कशॉप आहे.सायकलचे सुट्या भागाचे समूह आणून मी सायकली तयार करून घेतो आणि त्या विकतो.त्यासाठी माणसं ठेवली आहेत.त्या शिवाय भाड्याने सायकली पण देतो.हळू हळू मी मोटरसायकल्स आणि स्कुटरचे भाग आणून तेही बांधायला सुरवात केली आहे.माझ्या कारखान्यात लोकांची वरदळ होत असल्याने अनेक लोकांच्या भेटीगाठी होऊन ओळखदेख वाढल्याने एकप्रकारे इतरांची सेवा केल्याचं सूख मला मिळतं.
एक मात्र खरं की माझ्या लक्षाची उंची पाहून,आणखी काहीतरी यत्न करावे लागणार हे नक्कीच.मी पाहिलंय की माझ्या जीवनात माझ्या आवडीनिवडीत विभिन्नता आहे.आणि इतरांचा ज्यात सहभाग आहे अशा घटनात भाग घ्यायला मला विशेष आनंद होतो.आणि एक दिवस हाच माझा चेहरा माझ्या व्यक्तित्वाचा एक अनौपचारिक नक्षा बनून रहाणार.आणि इतर, माझा चेहरा पाहून संकेत ठरवायला मुक्त होतील”

मला विजयचा हा निर्धार आवडला.मी त्याला म्हणालो,
“माझी खात्री आहे की जसा तू मोठा होत जाशील तशी तुझ्या चेहर्‍यावरची दिखावट संभाळण्याची तुझी जबाबदारी वाढत जाणार. तुझं जीवन तू सुखी वा दुःखी ठेवशील तसा तुझा चेहरा प्रिय वा अप्रिय दिसणार..थोडेच लोक आपल्या हंसतमूख चेहर्‍यामागे खेद आणि असंतोष लपवून ठेवायला यशस्वी होतात.”

“म्हणजे ह्या तुमच्या म्हणण्याचा अर्थ असाच ना,माझं जीवन जर का खेदजन्य असेल तर ते माझ्या चेहर्‍यावर दिसल्याशिवाय रहाणार नाही.आणि तसं व्ह्यायला मीच दोषी ठरेन.”मला विजयने सांगून टाकलं.

“अगदी बरोबर”
असं म्हणत विजयचा निरोप घेताना त्याला मी म्हणालो,
“ह्या जगात आपला ताबा ठेवण्यासारख्या फारच थोड्या गोष्टी असतात.आणि तुझं वयक्तिक सुख प्रदर्शीत करणं ही त्या ताबा ठेवण्यासारख्या थोड्या गोष्टीतली एक गोष्ट आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com