Thursday, July 22, 2010

आठवणी.

स्मरण शक्तिबद्दल मला विशेष वाटतं.आपल्याला जर का स्मरणशक्तिच नसती तर जीवन अगदी कंटाळवाणं आणि अंधकारमय झालं असतं.
मनातल्या स्मृति प्रत्यक्षात आणून जीवन सुखकर होतं.पण स्मरण म्हणजे तरी काय?काहीतरी आहे म्हणून आहे काय?की,जे घेऊनच आपण जन्माला येतो?का ही गोष्टच काही निराळी आहे.?

लहानपणी मी कोकणात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या मावशीकडे जायचो.दर वर्षी आम्ही तिच्याकडे जायचो.करली नदी ओलांडून गेल्यावर शेताच्या कुणग्यातून वाट काढत जावं लागायचं.उन्हाळा असल्याने नदी अगदीच कोरडी व्हायची.
पुलाचा कोणीच वापर करत नसायचा.नदीतल्या पाण्याच्या डबक्यांपासून दूरमार्ग काढून जाता यायचं.

मावशीचं कौलारू घर दुरून दिसायचं.पायवाटेवरून चालताना तिचं घर ठरावीक जागेवरून दिसायचं.कारण तिच्या घराच्या सभोवती माडाच्या झाडांची इतकी गर्दी झालेली असायची की घर छपून जायचं.दिवस मोठे असल्याने संध्याकाळ होऊनही काळोख व्हायला उशीर व्हायचा.
पिवळ्या रंगाने भिंती रंगवलेल्या असल्याने घर आजुबाजूच्या हिरव्यागार वातावरणात उठून दिसायचं.
घराच्या जवळ आल्यावर धुरकट वातावरणात लाकडं जाळल्याचा वास यायचा.कौलांच्या छपरामधून मिळेल त्या खाचीतून चुलीत जळणार्‍या लाकडांचा धूर हवा तसा बाहेर यायचा.जणू घराला आग लागली की काय असा दुरून भ्रम व्हायचा.

मावशीच्या घरात शिरल्यावर मस्त सुगंधी उदबत्यांचा वास येऊन मन प्रसन्न व्ह्यायचं.मावशी दारातच उभी असायची.डोळ्यात आनंदाची चमक आणि हंशात तृप्तिचे भाव उमटल्याने मावशीला कडकडून मिठी दिल्याशिवाय मन प्रसन्न होत नसायचं.आम्ही आल्याने मावशीच्या घरात सर्व वातावरण उत्तेजीत व्हायचं. त्यामुळे माझ्या मस्तकात जुन्या आठवणींच काहूर माजायचं. थोड्यावेळाने आम्ही सर्व मावशीच्या जेवण्याच्या खोलीतल्या लहानशा टेबलाच्या सभोवती येऊन बसायचो आणि इथेच चर्चा चालू व्हायची.

“आठवतं का?”
ह्या दोन शब्दानी चालू होणारी चर्चा मला याद आणायची की हे स्मरण,ही स्मरणशक्तिच आम्हा सर्वांना जवळ आणत असते.हेच दोन शब्द आपल्याला भूतकाळात नेऊन सोडतात.त्यावेळी सर्व काही औरच होतं असं वाटून अशा विषयाला हात घालून प्रत्येकाचा चेहरा आनंदाने प्रफुल्लीत झालेला दिसायचा.आणि हीच खरी त्या स्मरणशक्तिची किमया म्हटली पाहिजे.

आमच्या लहानपणीच्या आठवणी उफाळून यायच्या.
आमचे आजोबा आमच्याबरोबर काजूच्या झुडपाच्या रानातून डोंगरावरून खाली चालत जाताना कसे पाय सरकून पडले. पडल्यावर ते कसे खजिल झाले होते.त्याना पटकन उठता आलं नाही म्हणून नलुच्या- माझ्या मावस बहिणाच्या-हाताचा आधार घेऊन ते कसे उठले,बिचारे आजोबा पडलेले पाहून पुरूषोत्तम-माझा मावस भाऊ-ओक्साबोक्शी कसा रडायला लागला,आपले आजोबा आता जगणार नाहीत ह्याचं अपरिमित दुःख होऊन तो कसा रडत होता.

आजोबा त्यावेळी त्याला जवळ घेऊन सांगत होते,
“बाळा,आयुष्यात असं खूपदा पडायला होतं.पण खचून जायचं नाही.कुणाचा ना कुणाचा आधार मिळत असतो.तो घेऊन पुन्हा आपल्या पायावर उभं रहायचं.जसा मी आता उठून उभा राहिलो.”
आजोबांचं सांगणं बिचार्‍या पुरूषोत्तमाच्या त्त्या वतात त्याच्या डोक्यावरून जात होतं,पण तो उपदेश इतर आम्हां सर्वांना होता हे कळायला कठीण झालं नाही.
आमची दुसरी मावशी, लहानपणी तिला शाळेत खेळात मिळाली बक्षीसं एखाद दिवशी पहाटे उठून झाडून पुसून परत कपाटात कशी लाऊन ठेवायची.ती चमकदार धातूची बक्षीसं पाहून तिचा चेहरा किती आनंदी व्हायचा.

ह्या सर्व आठवणीनी मन उल्हासित व्ह्यायचं.
आठवणी तुमच्या जीवनाला पुर्णत्व आणतात.मला काही गोष्टींचं स्मरण व्ह्यायला लागलं की,कुणालातरी सांगावसं वाटत असतं. आपल्या आठवणीचा कुणी भागीदार झाला तर त्याला पण जीवनात नवीन ऐकायला आनंद होतो.ऐकणार्‍याच्या आणि सांगणार्‍याच्या भावना ह्या आठवणी ऐकून मतं बदलू शकतात.

जीवनातल्या प्रत्येक अमुल्य क्षणांना चिकटून राहावं.कारण कुणास ठाऊक कदाचीत ते क्षण महान स्मृति होऊन रहातील. आपल्याच मुलांना सांगायला त्या आठवणी उपयोगात येतील. कदाचीत त्या क्षणांचं स्मरण तुमच्या मेंदुत ताजं होऊन राहील. कदाचीत त्यांची उजळणी तुमच्या वयाबरोबर टिकून राहिल. मनात त्या स्मृति कायमच्या रहातील.मला तरी ते महत्वाचं वाटतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com