Sunday, July 4, 2010

जीवनातली मजा.

मला मिठीत घेऊन,
“बाबा,मी हे केलं मी ते केलं”
हे ऐकल्यावर माझा चेहरा हंसण्याने प्रफुल्लीत व्हायचा.

“घरातून ऑफिसला जाताना आणि परत घरात आल्यावर हंसता चेहरा असावा.”
असं माझे वडील मला नेहमी सांगायचे.अगदी मी लहान असताना असं मला त्यानी सांगीतलेलं आठवतं.मी त्यावेळी ऑफिस म्हणजे काय हे समजायच्या वयातही नव्हतो.”
वडीलांची आठवण काढण्यासारख्या उपदेशाची आठवण येऊन मला अरविंद असं म्हणाला.

अलीकडेच त्याचे वडील गेल्याने मी त्याला भेटायला गेलो होतो. माझी त्याच्या वडीलांशी नेहमीच भेट व्हायची. पण अरविंद त्याच्या वडीलांसारखा डॉक्टर असला तरी तो सैन्यात डॉक्टर होता. कधी जर का मुंबईला आला तर मात्र मला भेटल्याशिवाय जायचा नाही.सैन्यातला पोषाख त्याला लहानपणापासून आवडायचा.आणि असा पोषाख वापरण्यासारखी त्याची शरीराची ठेवण पण उमदी होती.कॉलेजमधे असताना त्याने एनसीसी जॉइन केलं होतं.पण वडलांसारखी डॉक्टरकी करण्याचीही त्याला इच्छा होती.मग त्याच्या वडीलांनीच त्याला सुचवलं.
“डॉक्टर होऊन सैन्यात गेल्यावर तुझे दोन्ही उद्देश साध्य होतील”
असं अरविंद मला पूर्वी कधी म्हणाला होता.

“मी अलीकडेच माझ्या बाबांना,चेहरा हंसता ठेवावा ह्या त्यांच्या उपदेशाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते की त्यांना ते आठवत नाही.पण मी त्यांना नेहमीच तसं करताना पाहिलंय.
माझे वडील आनंदात राहिले,आणि मला वाटतं मी पण त्यांचं अनुकरण करायला लागलो.त्यांचं ते तृप्त आणि आनंदी जीवन भोगण्यासाठी तरी.”
मला अरविंद सांगत होता.

मी त्याला म्हणालो,
“तुझे बाबा अनुभवी डॉकटर होते.त्यांच्या त्या उपदेशामागे अर्थ भरलेला आहे.
कामावर जाताना हंसत राहिल्याने तुम्ही तुमचं काम मजेत करता असा इशारा मिळतो.तुम्ही समाधान आहात, तुम्हाला लोक पसंत करतात आणि रोजची इतर दगदग संभाळूनही तुम्ही मजेत आहात हे दिसतं.जीवन जगण्यासाठी काम हेच सर्वकाही आहे अशातला भाग नाही.मुलांबरोबर घरी रहाणं,निवृतीत रहाण्याचा आवेश असणं,किंवा आणखी काही पुनरावृत्तिचे प्रयास करणं अशा गोष्टी असू शकतात. जगण्याचं एखाद्ं ध्येय ठेवल्यावर
तुम्ही व्यस्त राहू शकता.”

“तुम्ही म्हणता ते अगदी मला पटलं.”
अरविंदच सांगू लागला,
“माझे वडील डॉक्टर होते.एका मोठ्या हॉस्पिटलात ते काम करायचे.निरनीराळ्या रुग्णाबरोबर आणि त्यांच्या नातेवाईकांबरोबर त्यांचा दिवसभर संबंध यायचा.घरी आल्यावर खुसखुशीतपणे हंसून ते आम्हाला त्यांच्या गोष्टी सांगायचे.ते आपलं काम खूशीने करायचे हे उघड व्हायचं”

“मी तुला आणखी गंमत सांगतो”
असं म्हणत मी अरविंदला सांगीतलं,
“घरी येताना आनंदी चेहरा असल्यावर आपल्या जवळच्यांशी आपण आनंदात असतो हे सिद्ध होतं.तुमची घरची मंडळी, बायको-मुलं पहायला तुम्ही आतूर असता.दिवसभरात काय घडलं ते ऐकायला तुम्ही आतूर असता,मुलं शाळेत असतील तर त्यांच्या गृहपाठ करण्याच्या कामात मदत करायला तुम्हाला मजा येते,रात्री सर्वांबरोबर जेवायला आनंद होतो.थोडक्यात लयबद्द जीवन जगण्यात मजा येते.”

“ज्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर हंसं कमी व्हायला लागलं,ते त्यांना कळल्यावर, ते कामाचा भार वाढल्यामुळे तो कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले.”
असं म्हणत त्याला त्याच्या लहानपणाची आठवण येऊन तो सांगू लागला,
“मी त्यावेळी किशोर वयात होतो.सकाळी,सकाळीच एमर्जन्सी कॉल आल्यावर त्यांना माझ्याबरोबर वेळ घालवायला कठीण जायचं. तसंच संध्याकाळीसुद्धा व्हायचं.ते म्हणायचे ,
“मला माहित आहे म्हणूनच मी असं करतोय”
माझे बाबा निवृत्त झाल्यावर त्यांचं रोजचं काम संपलं.आता त्यांची रोज हंसं चेहर्‍यावर आणण्याची कामगीरी संपुष्टात आली होती.पुढची काही वर्षं ते माझ्या आईबरोबर थोडी समाजसेवा करीत राहिले. वार्धक्याने अंथुरणावर पडून असलेल्या माझ्या आजोबांची सेवा करू लागले.आणि कधी कधी आजुबाजूच्या गावात जाऊन औषोध-पाण्याची मदत करू लागले.ते ह्या कामात गुंतल्याने पुन्हा थोडे हंसून कामं करू लागले.”

मी अरविंदला म्हणालो,
“तुझ्या बाबांचा उपदेश तू सैन्यात असताना कसा काय सांभाळू शकतोस.सैन्यातली ड्युटी म्हणजे दिवसाचे चोवीस तास काम.आणि तशात तू डॉक्टर मग काय विचारायलाच नको.”

“मी त्यांचा उपदेश लक्षात ठेवून रहायला लागलो.मी सैन्यात डॉक्टरकी करू लागलो.ते एक मला आव्हान होतं. आणि चेहर्‍यावर हंसू ठेवण्याचंही ते एक आव्हान होतं.मी सैन्यात सर्जन म्हणून असल्याने,रात्री,रात्री मला बोलावणं यायचं,दिवसा बाहेर मला काम करावं लागायचं.सैनिक रुग्णांची सेवाकरताना त्यांच्या जखमा पाहून बरेच वेळा मन खिन्न व्हायचं.तरीपण माझं काम ही एक अर्धी कामगिरी होती. माझ्या तीन सुंदर लहान मुली हे माझं विश्व होतं. काम संपताच त्यांचा सहवास मिळणार हे पाहून मन आतूर व्हायचं.घरी आल्याआल्या मला मिठीत घेऊन,
“बाबा,मी हे केलं मी ते केलं”
हे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर माझा चेहरा हंसण्याने प्रफुल्लीत व्हायचा.”
असं सांगून अरविंद क्षणभर गप्प झाला.

मला भासलं की त्याला त्याच्या वडीलांची आठवण आली असावी. लहानपणी दवाखान्यातून त्याचे वडील घरी आल्यावर त्यांना मिठी मारून बोबड्या शब्दात तो जे काही सांगायचा ते मी पाहिलं आहे आणि ऐकलंही आहे. त्याचीच त्याला आठवण आली असावी.

त्याचा हात हातात घेत मी म्हणालो,
“मला वाटतं,आपल्या कामाच्या निवडीची,कामावर जाताना आणि कामावरून घरी येताना, जर का चेहर्‍यावर हंसू आणण्यात परिणिती झाली,तर आपलं जीवन समृद्ध,संपूर्ण,अर्थपूर्ण होतच शिवाय जीवनात मजा येते ती वेगळीच.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com