Sunday, July 25, 2010

शॉवर खालचं गुणगुणं.

“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.


माझी पुतणी-नंदा-हायकोर्टमधे वकीली करते.रोजच्या केसीस संभाळून,कामाचा रगाडा संपवून मग घरी उशीरा येते.परत घरी आल्यावर एका गृहिणीची कामं आहेत ती उरकावीच लागतात.मला हा तिचा दिनक्रम माहित होता.

अलीकडेच आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या काही केसीसबद्दल मला तिचा कायदेशीर सल्ला घ्यायचा होता.म्हणून मी तिला फोन केला.सर्व कामं आटोपून ती आरामात असेल म्हणून रात्री दहाला मी तिला फोन केला.ती आंघोळीला गेल्याचं तिच्या नवर्‍याने सांगीतलं.जाऊ देत. इतक्या रात्री त्रास नको म्हणून मी फोन ठेवला.परत दुसर्‍या दिवशीच तेच झालं.मग मी ठरवलं की तिला रविवारीच जाऊन प्रत्यक्ष भेटावं.

गेल्या रविवारी मी तिच्याकडे गेलो होतो.मला ती भेटली.जरा निवांत दिसली.म्हणून माझी तिच्याकडची कामं उरकून घेतली.आणि कुतूहल म्हणून तिला विचारलं,
“काय गं? तू रोज घरी आल्यावर रात्री आंघोळ करतेस का?
त्याचं विशेष काय कारण आहे.?जरा मला कुतूहल वाटलं म्हणून विचारलं.”

मला नंदा म्हणाली,
रोज मला आजुबाजूच्या लोकांचं-समाजाचं-मनावर दडपण येत असतं.मी कपडे कसे घातले,काळ्या कोटावर सफेद गळपट्टा कसा बांधते, मी केस कसे विंचरते,मी कशी बोलते,न्या्याधीशाकडे वाद कसा घालते,कशी चालते आणि वागते ह्याबद्दल इतर ज्यावेळी माझ्याबद्दल विचार करताना दिसतात, त्यावेळी मला चिंता लागते.हे दडपण दिवसातून तासनतास माझ्या डोक्यावर भार होऊन रहातं. माझ्या वकीली पेशामुळे रोज शेकडो लोकांना मी सामोरी जात असल्याने ह्या चिंतेत रहाते. शिवाय रोजच्या चिंता असतातच.दुसर्‍या दिवशीच्या केसीसचा अभ्यास करायचा, मुलांचा अभ्यास,घरच्या कटकटी ह्या चालूच असतात. दिवसाच्या शेवटाला मला अगदी दमायला होतं.”

मधेच मी तिला अडवून म्हणालो,
“आणि दिवसातून दोनदां म्हणजे सकाळी आणि हे रोज रात्री आंघोळ करण्याचं जादा काम घेऊन आणखी तुझं टेन्शन तू वाढवतेस असं नाही का वाटत तुला?”
माझ्या प्रश्ननाचा रोख कळायला ती वकील असल्याने तिला कठीण गेलं नाही.

हंसत,हंसत मला म्हणाली,
“काही कामं केवळ कामं म्हणून पहाता येत नाहीत.त्यात विरंगुळापण असतो त्याशिवाय त्यात फयदापण असतो. रात्रीची गरम शॉवरच्या खालची पंधरा मिनीटांची आंघोळ हा मला त्यातला एक प्रकार वाटतो.कामाच्या भाराखाली दबून गेल्यावर अशाच वेळी-आत्ताच गरम गरम शॉवरच्या खाली आंघोळ घेतली-ह्या अनुभवाची हताशपूर्ण आठवण यायला लागते. ती शॉवर खालची आंघोळ दिवसभरच्या इतरांच्या मागण्यांचं दडपण चक्क धुऊन टाकते.हे मला एक वरदान कसं वाटतं.”

“मला तुझं म्हणणं पटतं.”
असं सांगून मी तिला म्हणालो,
“ते गरम पाणी,सगळ्या विवंचना वितळून टाकत असणार.कुणीही जवळपास नसतं,कुणीही तुला निरखून पहात नसतं.आणि कुणीही तुझ्याबद्दल निवाडा घेत नसतं.तू आणि तूच फक्त असतेस. तुझ्या तू एकटीच सुखद वाटण्यार्‍या शुद्धित असतेस खरं ना?”

“तुमचं वर्णन अगदी मार्मिक आहे असं मला म्हणाली.
“रोज रात्रीच्या ह्या आंघोळीमुळे मला काहीतरी होतं.मी गुणगुणायला लागते.
अशावेळी मी काही करू शकत नाही.संगीताचे स्वर माझ्या मुखावाटे लहरत बाहेर येतात.
“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.माझे वयक्तिक श्रोते माझ्या समोर असतात,आणि मी कशी गाते ह्याची त्यांना पर्वा नसते.शिवाय गाणं संपल्यावर माझे श्रोते मला उभं राहून टाळ्या देतात.
संबंध दिवसात माझ्या डोक्यावर भार टाकणार्‍या दडपणाला केवळ शॉवर खाली गायल्याने उतार येतो. गाण्यातला प्रत्येक स्वर रोजचा चिंतेचा भार आपल्याबरोबर वाहून नेतो आणि पुन्हा रात्रभर तो भार माझ्या मनात येणार नाही ह्याची तजवीज करतो.शॉवर घेऊन झाल्यावर माझं मन स्वच्छ होतं आणि निश्चिंत होतं.ती शॉवर खालची पंधरा-वीस मिनीटं,काहीही वाईट होऊ देत नाहीत, मला कसल्याही चिंतेत टाकत नाही्त.कपडे नेसून झाल्यावर आणि माझा चेहरा बाथरूम मधल्या वाफेने धुसर झालेल्या आरशात पाहिल्यावर माझ्या विषयी आणि माझ्या जीवनाविषयी समझोता करायला मी तत्पर होते.
शॉवर खाली गायल्या शिवाय मला वाटत नाही की मी,इतरांचं माझ्यावर आलेल्या दडपणाला, सामोरी जाईन किंवा कसं.
माझ्या विषयी मला बरं वाटायला मला जे योग्य आहे ते करण्यावाचून गत्यंतरच नाही.”

“शॉवर खाली आंघोळ घेताना गाण्या इतकं ते जर सुलभ असेल तर तू ते नक्कीच करत रहावं,कारण माझ्या एक लक्षात आलं की, ही चैन सगळ्यांनाच उपलब्ध नसावी पण तुला मात्र शॉवर खाली गाण्यात विशेष वाटतं हे मला पटतं.”
मी उठता उठता तिला म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com