Wednesday, July 14, 2010

तुमचा जादूवर विश्वास आहे का?

“त्यांच्या अस्तित्वाच्या पुस्तकाचं हे रोजचं एक पान आहे असं समजून ते रहातात.असं पुस्तक की त्याला शेवट आहे जो अगोदरच लिहिला गेलेला आहे.”

“कधी कधी स्पष्ट करून सांगता येणार नाहीत अशा गोष्टी घडत असतात.काही गोष्टीत तर अर्थच नसतो.तरीपण ती गोष्ट होऊन गेल्यावर आणि आपल्याला ती पुर्ण समजली नसल्यावर आपण स्वतःलाच विचारतो,
“ही जादू तर नसेल ना?
का हे विधीलिखीत आहे?
का हे कपोलक्ल्पीत आहे?
का आपल्या अंतरमनातले खेळ आहेत?”
हे काहीतरी तर्कसंगत आहे असं आपण मानतो.पण त्यात काहीच अर्थ नाही हे नक्कीच.
बरेच लोक अशा रोमांचकारी पण काल्पनिक वाटणार्‍या गोष्टीवर विश्वासून,
“सर्व काही आपोआप होणार”
असं आपल्या मनात म्हणून,
“विधीलिखीत आहे आणि जसं घडेल तसं आपल्याला राहिलं पाहिजे आपल्या हाती काही नाही”
अशी समजूत करून आपलं जीवन जगतात.
त्याचाच अर्थ ते त्यांना जे हवं आहे त्यासाठी संघर्ष करायला तयार नसतात.उलट ते प्रतिक्षा करीत बसतात.काही तरी जादू होईल असं त्याना वाटत असतं.
त्यांच्या अस्तित्वाच्या पुस्तकाचं हे रोजचं एक पान आहे असं समजून ते रहातात.असं पुस्तक की त्याला शेवट आहे जो अगोदरच लिहिला गेलेला आहे.”
मनोहर माझ्याशी गप्पा मारताना मला सांगत होता.

मला पुढे म्हणाला,
“मी एका तीस वर्ष वयाच्या बाईला भेटलो होतो.ती प्रकृतिने चांगलीच सुधृड होती.पण ती बरीचशी निषक्रिय म्हणा किंवा आळशी म्हणा हवं तर, अशी होती.स्वतःच्या अडचणीचं तिला भान नव्हतंच शिवाय इतरांच्या पण आपल्या कुटूंबियाना धरून.झालं शेवटी तिचा नवरा तिच्यापासून दूर राहायला लागला.तिच्या मुलांचा सांभाळ तिची आई करू लागली.इतकी ती अक्रियाशील होती की तिच्या आईला तिची मुलं सांभाळण्यापलीकडे दुसरा पर्यायच नव्हता.
काहीच करायला ती मागत नव्हती हीच तिची अडचण होती.तिने प्रयत्नपण केला नाही.
तिने जीवनातला आनंद घेतलाच नाही.कारण ती रिक्त होती. ती कशाची बरं वाट पहात असावी?
“जादूची”
ती म्हणायची.
“सर्व काही आपोआप होणार”
असं पुढे म्हणायची.
ही जादू अस्तित्वात नाही हे कळायला तिला फारच उशीर झाला होता.”

मनोहरचं हे स्पष्टीकरण ऐकून मला जरा गंमत वाटली.तो जे काही म्हणतोय त्यात तथ्य आहे हे नक्कीच.त्याला आणखी विचार करायची चालना देण्यासाठी मी त्याला अगदी निराळ्या विचाराचं उदाहरण देण्याचं ठरवून त्याला म्हणालो,

“उलट,अशीही एक वयस्कर बाई मला माहित होती की तिच्या जवळ काहीही उरलं नव्हतं तरीपण जीवन आनंदाने जगण्याची तिची इच्छा होती.”
आणि मी पुढे सांगू लागलो,

“मी पण एका वयस्कर बाईला भेटलो होतो.
सदा हंसतमूख दिसणारी ही आजुबाजूच्या परिसरात सगळ्यांना ठाऊक होती.सर्वांच्या अगोदर उठून सकाळीच पार्कमधे जाऊन भराभर चालण्याच्या व्यायामात दंग असायची.एखाद्या वीस वर्षाच्या तरूणीला लाज वाटेल अशी तिची दिवसभराची धामधूम असायची.
अशा धामधूमीचं तिचं वय नव्हतं हे सगळ्यांना माहित असून, आम्ही तिच्याकडे विस्मयाने पाहायचो.जीवनाचा हरएक क्षण तिने आनंदाने घालवला असेल.जो तिला भेटेल तो तिच्या सवयीचं पालन करण्याच्या प्रयत्नात असायचा. गेल्या तीन वर्षात जे तिने सफल केलं ते तिने गेल्या पंचायशी वर्षात सफल केलं नसेल. अठ्ठयाऐशी वर्षावर ती वारली. ती कविता करायची.दोन नवीन भाषा शिकली होती.भरपूर प्रवास केला होता.तिचं प्रारब्ध तिनेच बनवलं होतं.”

माझं हे ऐकून मनोहर मला म्हणाला,
“ह्या दोन निरनीराळ्या घटनामुळे लोक जादूबद्द्ल बोलतात आणि विश्वास ठेवतात त्या विषयी खरोखरच विचार करावा असं मला वाटू लागलं आहे.
तरीपण माझ्या मनात एक विचार येतो की,आपल्याला एकच आयुष्य मिळतं आणि ते प्रत्येकाने परिपूर्ण जगावं असही मला वाटतं. दिवसातलं एक मिनीट,महिन्यातला एक दिवस, वर्षातला एक महिनाही वाया जाऊ देऊ नये.काहीही आणि सर्वकाही शक्य आहे जर का आपण ते मिळवण्यासाठी झटलो तर.”

“तुझं म्हणणं मला शंभर टक्के पटतं”
असं सागून मी मनोहरला शेवटी म्हणालो,
“जीवन आश्चर्याने भरलेलं आहे.मला एका गोष्टीवर भरवसा आहे की वाट पहात बसलो तर काहीही होणार नाही. आणि जादू होण्याची वाट पहात राहिलो तर काहीच होणार नाही हे निश्चीत.जीवन आनंदाने जगावं हा आपला अग्रक्रम असला पाहिजे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com