Friday, July 2, 2010

लहान,लहान स्वप्नं.

“खरंच,तुझा हा अनुभव माझ्या नातीला सांगायला हवा. तिच्या वयावर नृत्य शिकायला तिला हुरूप येईल.”
मी प्रमीलेचा निरोप घेता घेता तिला म्हणालो.

माझी मुलगी आणि तिची मुलगी परदेशातून दोन,तीन महिने सुट्टी घेऊन माझ्या जवळ रहायला आली होती.माझ्या नातीचा सुरवातीचा वेळ मजेत गेला.नंतर तिला कंटाळा यायला लागला.तिला काही तरी व्याप द्यावा म्हणून माझी मुलगी मला म्हणाली,
“आपल्या शेजारच्या बिल्डींगमधे रोज वाद्यांचा आवाज येत असतो.नृत्य शिकण्याचा क्लास आहे असं वाटतं.कधी कधी तबल्या/डग्याचे बोल आणि घुंगूराचे आवाज पण ऐकायला येतात.आपण हिला थोडे दिवस नृत्य शिकायला नेऊया.”

मला तिची कल्पना आवडली.आम्ही त्या क्लासात गेलो.आणि माझ्या नातीचं नृत्य शिकण्यासाठी नाव घातलं.
एका मोठ्या बोर्डावर माजी विद्यार्थी/विद्यार्थिनींची नावं होती.प्रमीला सुखटणकर हे नाव वाचून,का कूणास ठाऊक,ती आपली पमी तर नव्हे ना? असं मनात आणून क्लासात चौकशी केली.आणि माझा अंदाज खरा ठरला.तिच्या पत्यावर मी तिला भेटायला गेलो.
तिच्या नृत्याबद्दलच्या अनुभवाचा माझ्या नातीला काही फायदा होईल हा पमीला भेटण्याचा माझा एक उद्देशही होता.

“नृत्य करायची मुळात आवड असल्याशिवाय केवळ शिकायचं म्हणून शिकण्यात अर्थ नाही. असं मला वाटतं.तुला काय वाटतं?
तू तर त्यात अनुभव घेतला आहेस.”
मी प्रमीलेला म्हणालो.

“लहानपणापासून माझ्या मोठमोठ्या स्वप्नांचा मागोवा घ्यायला मला आवडायचं.अशी स्वप्नं जी माझं जीवन प्रभावित करतील, माझ्या जीवनाला निश्चित अर्थ लावतील.”
पमी स्वारस्य घेऊन मला सांगायला लागली.
“पण माझ्या तीशीच्या वयातच माझ्या लक्षात आलं की लहान लहान स्वप्नं पण अनपेक्षीत आनंद आणून देतात.”

“पण काही कला लहानपणीच शिकायच्या असतात नव्हेतर शिकायची आवश्यकता असते असं मी ऐकलंय.”
मी पमीला म्हणालो.

“असंच काही नाही.माझंच उदाहरण तुम्हाला सांगते”
पमी सांगू लागली.
“असंच एक लहान स्वप्नं माझ्यासाठी जन्माला आलं जेव्हा मी आणि माझे आईवडील टीव्ही वर एक नाच-गाण्याचा कार्यक्रम बघत होतो.पार्श्व संगीताच्या वातावरणात,तसंच आकर्षक हालचाल, आणि चेहर्‍यावरच्या मुद्रा दाखवीत ती एव्हडीशी लहान मुलगी नृत्य करताना पाहून मीच मला रंगमंचावर सूरुचिपूर्ण ढंगात आणि सहजपणे नाचत आहे अशा क्ल्पनेत गुंगून गेली होती.
काही दिवस गेल्यावर मी माझ्या आईच्या खणपटीला लागले की,मला नृत्यकलेच्या क्लासात जायचं आहे आणि नाच शिकायचा आहे.”

“काय वय होतं तुझं?”
मी उतावीळ होत पमीला विचारलं.

“मी दहाएक वर्षाची असेन.
एका धंदेवाईक क्लासात मी आणि माझी आई दोघं गेलो.काऊंटरवर एक बाई गंभीर चेहरा करून बसली होती.
“दहा वर्षाची मुलगी? नाच शिकायला फार उशीर झाला.”
ती बाई कपाळावर आठ्या घालीत,नापसंती दाखवीत माझ्या आईला म्हणाली.
बरेच वेळा नाच शिकून सिनेमात नाचायला जाण्याचं कुणाचं तरी मोठं स्वप्न असतं ते मनात धरून माझं नाच शिकण्याचं लहानसं स्वप्न आहे ह्याचा गैरसमज करून घेत ती बाई म्हणाली असावी.”
पमीने सांगून टाकलं.

“दहा वर्षापेक्षाही लहान वयात नाच शिकायला जाणं ही अपेक्षा मला जरा अती आहे असं वाटतं”
माझं मत मी दिलं.

पमी म्हणाली,
“माझ्या त्या लहानपणातल्या दिवसात नृत्यकला ही काही शिकायचं म्हणून शिकायचं असं खूळ नव्ह्तं तर ती कला त्यावेळी माझ्या वयाच्या लहान मुलीना झपाटून टाकणारी होती.
सर्वांच्याच घरी मानलं जायचं की शास्त्रोक्त पद्धतिने आत्मसात केलेली नृत्यकला,त्यातले हावभाव,गीरक्या घेण्याची कला, पावलांची फतकट,ढोपरातून वाकून आणि हातांच्या कोपर्‍यातली बांक लक्षात ठेऊन अर्धनारीनटेश्वराची ढब, आणि अन्य कितीतरी शिकण्यासारखे प्रकार म्हणजेच मुक्ति मिळ्याल्यासारखी आणि अभिमान करण्यासारखी कामगिरी असायची.ते ज्याचं त्याचं स्वप्न असायचं.”

“मग तू तो विचार सोडून दिलास काय?”
मी पमीला आणखी बोलकं करण्यासाठी म्हणालो.

“छे,छे! मी कसली सोडून देते? माझं स्वप्न होतं ना?”
माझ्या प्रश्नाचा चांगलाच परिणाम पमीवर झाला,असं दिसलं.ती पूढे जाऊन म्हणाली.
“दुसर्‍या शनिवारी आमच्या शेजार्‍यांची मुलगी,माझी मैत्रीण,करिना आणि मी माझ्या आईबरोबर जवळच्याच बिल्डिंग मधे नृत्यकलेचा क्लास आहे असं समजल्यावर तिकडे गेलो.जवळ जवळ दोन एक महिने आम्हाला तेच तेच शिकवलं जायचं.मी तशी स्वभावाने उतावीळ असल्याने मला आणखी धडे घेत शिकत रहाण्यात स्वारस्य वाटेना.माझं नृत्य शिकण्याचं लहानसं स्वप्न अधूरंच राहिलं.

नंतर जवळ जवळ दोन दशकं मी माझी मोठी आणि महत्वाची स्वप्नं पूर्णत्वाला न्यायला मन केंद्रीत करीत राहिले. मी शाळा पूर्ण केली.कॉलेजमधून डीग्री घेतली.शहरात रहायला गेले.आणि संसार करायला पण सुरवात केली.फक्त माझ्या नृत्य शिकण्याच्या लहानश्या स्वपनाची कौतूक करण्यासारखी बाब म्हणजे टीव्हीवर नृत्याच्या होणार्‍या स्पर्धेच्या कार्यक्रमाला निष्टेने पहाण्याचा माझा सराव. मला अजून वाटायचं की नृत्यकरणं किती सुखदायी असतं,पण मी कदापी तो अनुभव घेऊन रंगमंचावर नाचेन हे शक्य नव्हतं.”

“मग तूझं स्वप्न पूर्ण केव्हा झालं?मोठ्या वयावर का?”
पमीला मला असं विचारावंच लागलं.

“अगदी बरोबर.मला हेच सांगायचं आहे की आंतरीक इच्छा प्रबळ असेल तर वय आड येत नाही.व्यवसाय म्हणून रंगमंचावर जाऊन नृत्य करण्याचं वय निघून गेलं तरी करमणूक म्हणून कुठच्याही वयावर रंगमंचावर जायला आणि नृत्य करायला कुणाचाही अटकाव नसतो.”
पमी आता मुद्याचं बोलायला लागली.

“एकदा माझ्या एका मैत्रीणीने मला लहान मुलांच्या नृत्याच्या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून आमंत्रण दिलं.मी माझ्या लहान मुलीला घेऊन गेले होते.एक आजी शोभेल अशा वयाची बाई इतर लहान मुलांबरोबर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीचा एक नृत्याचा भाग म्हणून नृत्य करीत होती.शरीराने एकशिवडी,केस पिकलेली,आजी, अगदी सहजगत्या नाचाचे निरनीराळे प्रकार करून दाखवीत होती.मी प्रेक्षकात बसली होती.मला तिचं नृत्य पाहून कौतूक वाटत होतं. आणि पुन्हा एकदा मझ्यात नृत्य करण्याचा आनंद प्रतीत होत होता.

समारंभ संपण्यापूर्वी तिच बाई रंगमंचावर येऊन मायक्रोफोनवरून बोलली,
“तुम्हाला कुणालाही नृत्याचं शिक्षण घ्यायचं असेल तर अर्ज भरा.पुढल्या शनिवारपासून नव्याने प्रारंभ होईल.नृत्य शिकायला कधीही आणि कुणालाही उशिर झाला असं मानू नका.”

मला त्यावेळी भास झाला की ती माझ्याच डोळ्यात डोळे घालून मलाच उद्देशून बोलत आहे.मी तिला मानलं.माझं लहानपणाचं लहानसं स्वप्नं साकार करायला सुद्धा उशिर झाला नव्हता.
काही आठवड्यांचे नृत्याचे धडे घेतल्यावर मला मुक्ति मिळाल्यासारखं वाटलं.माझ्या लहान स्वप्नाचा पाठपूरावा केल्याने मी सूखी झाले.”

“खरंच,तुझा हा अनुभव माझ्या नातीला सांगायला हवा. तिच्या वयावर नृत्य शिकायला तिला हुरूप येईल.”
मी प्रमीलेचा निरोप घेता घेता तिला म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com