Friday, July 16, 2010

शक्तिमान शब्द.

आज पाऊस खूपच पडत होता.रविवारचा दिवस होता.मासे खायची हूक्की आली होती.पण पावसात कोळीलोक समुद्रात पडाव टाकीत नाहीत.त्यांच्या मास्या्ची जाळीं गुंडाळी करून घरात ठेवलेली असतात.होड्या उलट्या करून माडाच्या झापाच्या छप्पराखाली किनार्‍यावर नीट डाळून ठेवलेल्या असतात.
मग मासे कसे मिळणार?

अंधेरीच्या मासळी बाजारात बर्फात ठेवलेले मोठे मासे-पापलेटं,सरंगे,सुरमई मिळतात.पण आमच्या सारख्या अट्टल मासे खाणार्‍याला हे मासे भाताच्या उंडीबरोबर-घासाबरोबर नाकाच्या वर पण जाणार नाहीत,तोंडांत जायचं तर सोडूनच द्या,कारण ते ताजे नसतात.
पण माझ्या ओळखीच्या काही कोळणी खाडीतले ताजे मासे अंधेरीच्या मासळी बाजारात घेऊन येतात हे मला माहित होतं.

गुंजूले,खेकडे,चिंबोर्‍या,सुळे,तिसर्‍या-शिंपल्या हे मासे अशावेळी खूपच चवदार लागतात.विशेषकरून त्यांचं झणझणी तिखलं किंवा नारळाचा रस घालून केलेली आमटी मस्तच होते.

चला काय मिळतं ते बघूया म्हणून धाके कॉलनीतून चालतच आंबोलीच्या रस्त्याने शॉर्टकट घेत बाजारात गेलो. विनय कोचरेकरला बाजारात शिरताना पाहिलं होतं.त्यावेळी मी कोळणीकडून मासे घेऊन पिशवीत टाकण्याच्या गडबडीत होतो.परत मान वर करून पाहिल्यावर विनय दिसेनासा झाला. अंधेरीच्या बाजारात तोबा गर्दी असते. उत्तरेकडून पार्ल्यापासून ते दक्षिणेकडून गोरेगांव पर्यंत लोकं रविवारचे हटकून अंधेरीच्या मासळी बाजारात येतात. एरव्ही स्थानीक जागी त्यांना मासे मिळतात पण त्या ठिकाणी मास्यांच्या प्रकारांची निवड बेताचीच असते.

विनय कोचरेकराला भेटायची खूपच इच्छा होती.बघू पुढल्या खेपेला! असं म्हणून मनाची समाधानी केली.
मासळी बाजारातून बाहेर पडल्यावर मास्यांना लागणारा मसाला म्हणजे-कोथिंबीर,लिंबू,आलं,कडीपत्ता हे सर्व आम्हा मासे अट्टल लोकांचं एक दुकान आहे तिकडे गेलो.आणि मनासारखं झालं विनय पण खेकडेच तेव्हडे घेऊन मसाला घ्यायला त्याच दुकानात आला होता.
मला पहिल्यावर टिपीकल मालवणीत हेल काढून म्हणाला,
“अरे तू असतोस कुठे?”
“तुला पण मी हाच प्रश्न करतो”
मी हंसत हंसत विनयला म्हणालो.

“तू काय आता सेंट्रल लायब्ररीत चीफ लायब्ररीयन झालास असं मी ऐकलं होतं.”
असं मी त्याला म्हणालो आणि पायी पायी चालत त्याच्याबरोबर घरी जायला निघालो.मासे, बासे होण्यापूर्वी घरी गेलेलं बरं असा आमचा दोघांचा विचार होता.विनय आंबोली रस्त्यावर फिल्म स्टुडियोच्या बाजूच्या वाडीत रहातो. त्याचं घर आल्यावर मला घरी बोलवत होता.पण मी माझ्या हातातली मास्यांचे पिशवी वर करून दाखवली आणि तो समजला.पुढच्या रविवारी नक्कीच येईन असं सांगून मी घरच्या वाटेला लागलो.

त्या रविवारी संध्याकाळाचा मी विनयच्या घरी गेलो होतो.
साहित्य,कविता वगैरे विषयावर आम्ही गप्पा मारीत होतो.चांगलाच रंगात येऊन विनय मला म्हणाला,

“मुखावाटे बोललेल्या शब्दांची क्षमता मी जाणतो.प्रत्येक स्वरातल्या सामर्थ्याविषयी मला विशेष वाटतं. अ-आ-इ-ई-उ-ऊ-ए-ऐ-ओ-औ-अं आणि अः पण.आणि हे स्वर विलक्षणपणे आपल्या चुलत भावंडांना-व्यंजनाना-क्रियाशील करतात,त्याबद्दल पण विशेष वाटतं.विरामचिन्हांच्या लयीबद्दल मला खास आदर आहे. प्रश्नचिन्हांच्या,अर्धविरामांच्या,उद्गारचिन्हांच्या,लंबवृत्तांच्या आणि शब्दाच्या लयीमधे हळूच बाधा आणणार्‍या क्षणभरच्या विरामांच्या आणि लगोलग स्पष्टीकरणाच्या भडीमाराचं साठवण ठेवणार्‍या कंसांच्या बळाची पण मला प्रशंसा करावीशी वाटते.

मला आठवतं कॉलेजमधे शिकत असताना तोंडावाटे बोलल्या गेलेल्या शब्दांच्या प्रेमात मी पडलो होतो.एकदा आमचे प्रोफेसर एका गुहेची दृष्टांतकथा सांगत होते.एकाएकी माझ्या लक्षात आलं की माझ्या डोळ्यांच्या मागे आतून काहीतरी चमकायला लागलंय.जणू माझ्या मेंदुच्या कडा फुगायला लागल्या आणि जहाजाच्या शीडासारख्या फडफडायला लागल्या.लेक्चर संपल्यावर मी माझ्या प्रोफेसरांना म्हणालो देखील की,
“सर,तुमचं लेक्चर म्हणजे एक स्वरमेळ आहे असं मला वाटतं”

हे खरं आहे की, जसे इतर लोक संगीतावर प्रेम करतात तसं मी ह्या मुखावाटे आलेल्या शब्दांवर प्रेम करतो.मला संगीत आवडत नाही असं नाही. ऐकतो आणि सोडून देतो.मला संगीत हे जेवणातल्या थाळीतल्या भाजी सारखं वाटतं.मात्र तोंडाने कथन केलेली गोष्ट गरम गरम जीरेसाळ भातावर हळदीच्या रंगाचं वरण वाढून त्यावर साजूक तुपाचा चमचा ओतल्यासारखा मुख्य जेवण आहे असं वाटतं.आणि त्या कथनात आलेले समर्पक वाकप्रचार हे झणझणीत वाटणार्‍या खोबर्‍याच्या चटणीतला मिरचीचा, कोथंबीरीचा जीभेच्या टोकाला आलेला स्वाद कसा वाटतो.”

लायब्ररीयनच तो! विनय लायब्ररीत दिवसभर पुस्तकांच्या गराड्यात राहून शब्दांचा सहवास कसा विसरेल.? म्हणून मुखावाटे आलेल्या शब्दांचं सामर्थ्य सांगताना सूर आणि व्यंजनापर्यंत खोलवर जाऊन विचार करायाला शेवटी त्याला भाग पडलं असावं असा मी माझ्या मनात विचार केला.आपणही थोडी माहिती द्यावी म्हणून अलीकडेच मी इंग्रजी अक्षरांचा स्मॉल-ट्रुथ म्हणून कसा वापर केला आहे ह्याची माहिती द्यावी म्हणून त्याला म्हणालो,
“तू हे जे काही सूर आणि व्यंजनाच्या समुहातून निर्माण झालेल्या शब्दांचं मार्मिक वर्णन केलंस ते ऐकून मी थक्कच झालो.तुला कदाचीत माहित असेलही, पण मी जे अलीकडे वाचलं त्या इंग्रजी अक्षरांच्या ताकदी बाबत तुलाच सांगणं योग्य होईल असं मला वाटतं.कारण शब्दांवर प्रेम करणार्‍या तुला कुठल्याही भाषेतला शब्द का असेना,त्यांचं महत्व ऐकून आणखी भाऊक व्हायला आनंद होईल.
एक कागद पेन्सिल मला जरा दे.म्हणजे मी तुला माझ्या म्हणण्याचं विवरण करून दाखवीन.”

विनयने कागद आणि पेन्सिल आणून दिल्यावर मी म्हणालो,
“जरूर तेच कागदावर लिहितो.
इंग्रजीमधल्या सूर आणि व्यंजनाला मिळून दिलेल्या आकड्यातून निर्माण होणार्‍या बेरजेवरून शब्दाची ताकद समजण्याचा प्रकाराला स्मॉल-ट्रुथ म्हणतात.जीवन शंभर टक्के बनवण्यासाठी आणि हे रोजच्या वापरातल्या शब्दातलं स्मॉल-ट्रुथ शोधण्यासाठी जर का,A ते z च्या अक्षरामधे A=1 तर B=2 असं करता करता Z=26 असं संबोधल्यास कोणत्याही शब्दाची ताकद अजमावली जाते.आपल्या जीवनात अनेक अर्थांचे शब्द महत्वाचे असतात.जसे-
प्रेम,ज्ञान,कष्ट,नेतृत्व,दैव,पैसा,वृत्ति वगैरे.त्या इंग्रजी शब्दांची टक्केवारीत ताकद पहायचं ठरवलं तर,
उदा.

LOVE=L+O+V+E=12+15+22+5=54%
kNOWLEDGE=11+14+15+23+12+5+4+7+5=96%
अशा तर्‍हेने हव्या त्या शब्दातल्या अक्षराच्या नंबराची गोळा-बेरीज केली तर,
HARDWORK=98%
LEADERSHIP=89%
LUCK=47%
MONEY म्हणजेच पैसे ना?
पैसे आयुष्यात महत्वाचे असं जो तो म्हणतो नाही काय?
पण
MONEY=72%, जीवनात ताकदीची आहे.

“असं जर आहे तर मग जीवनात 100% ताकदीचा शब्द कोणता?”
विनय अगदी उताविळ होऊन मला विचारायला लागला.
मुद्दामच जरा आवंढा गिळण्यात वेळ घालवण्याचा अविर्भाव करीत मी म्हणालो,

“प्रत्येक समस्येवर उपाय आहेच,फक्त आपली वृत्ति म्हणजेच- ATTITUDE- बदलली तरच, आपण ऊंची गाठू शकतो.
तेव्हा ATTITUDE ची ताकद अजमावल्यास,

ATTITUDE=1+20+20+9+20+21+4+5=100%
याचाच अर्थ आपल्या जीवनाकडे आणि कामधंद्या्कडे पहाण्याची आपली वृत्ति जीवनाला 100% यशस्वी बनवू शकते.
वृत्तिमधेच सर्व आलं.वृत्ति बदला आणि जीवन बदला.”

इंग्रजी शब्दातली ताकद अशीपण अजमावली जाते हे विनयने माझ्या कडून ऐकलं ते पहिल्यांदाच ऐकलं हे कबूल केल्याचं सांगून मला शेवटी विनय म्हणाला,
“शब्द कुठल्याही भाषेतला घ्या.मुखावाटे आलेल्या शब्दाची ताकद मी मानतो.शब्दातलं एखाद-दुसरं अक्षर जरी स्वतःहून काहीसं ताकदवान असलं, तरी दोन किंवा दोनापेक्षा अधीक अक्षराच्या समुहामुळे बनलेल्या शब्दाला निरंकूश ताकद असते हे मात्र निश्चित.हे शब्द मला भूरळ पाडतात,मला अचंबीत करतात,मला भयभीत करतात, मला वैताग आणतात,मला संतुष्ट करतात,नव्हेतर हे शब्दच माझ्या अस्तित्वाचा उगम आहे असं मला वाटतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com