Monday, July 19, 2010

नीटनेटका बिछाना.

“पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”

वसुधा करमरकरने वरळी सीफेसवर नवीन जागा घेतली आणि एक दिवस तिने मला आपल्या घरी बोलावलं होतं. तिच्या मुली आता चांगल्याच मोठ्या झाल्या होत्या.प्रत्येकाची बेडरूम होती.आणि वसुधाची स्वतःची बेडरूम होती.
मी तिच्या घरी गेलो त्यावेळी तिची जागा न्याहाळून पहात होतो.प्रत्येक बेडरूम्सना लहान बाल्कनी होती आणि बाल्कनीत बाहेर आल्यावर समुद्राचं मस्त दर्शन होत होतं.प्रत्येक बेडरूममधे हळूच डोकावून पाहिल्यावर माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटली नाही आणि ती म्हणजे प्रत्येकाचा बिछाना.

एखाद्या मोठ्या होटेलमधे बिछाने करून ठेवले जायचे तसेच काहीसे नीटनेटके,आणि निरनीराळ्या रंगीत चादरीने आच्छादलेले बिछाने पाहून माझं सहज कुतूहल वाढलं.

वसुधाच्या लहानपणी मी तिच्या घरी वरचेवर जायचो.वसुधाचं घर अगदी नीटनेटकं दिसायचं.प्रत्येक वस्तू आपआपल्या जागी ठेवलेली दिसायची.कालच व्यवस्थीत फासून फुसून ठेवलेली आहे अशी प्रत्येक वस्तू दिसायची. हा व्यवस्थीतपणा म्हणजे त्यांच्या घरातला एक प्रकारचा “मॅडनेस” म्हटलं तरी चालेल.

मी कधी कधी वसुधेच्या आईला म्हणायचो,
“ही शिस्त आमच्या घरी अजिबात पाळली जाणार नाही.तुमच्या सर्वांची कमाल आहे.”
“वसुधाच्या आजीकडून ही शिस्त आमच्या घरात आली आहे.”
वसुधाच्या आईने एकदा मला सांगीतल्याचं आठवतं.
बहुदा,वसुधाने तेच आपले संस्कार आपल्या वरळीच्या घरात परीपूर्णतेला आणलेले दिसले.
मी वसुधाला म्हणालो,
“हा तुझ्या घरातला नीटनेटकेपणा आपल्याला खूपच आवडला.तुझ्या लहानपणी तुझ्या घरी आल्यावर जसं वाटायचं तसंच हे तुझं घर बघून आठवलं.”
माझी ही प्रशंसावजा टिप्पणी ऐकून वसुधाला मला वाटतं, तिचे जुने दिवस आठवले असावे.थोडेसे डोळे तिरके करून आणि भुवया उंचावून ती मला म्हणाली,

“प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर मला माझं अंथरूण-पांघरूण म्हणजेच माझा बिछाना नीटनेटका करायला अजूनही फार आवडतं.मला माहित आहे की रोज रात्री झोपल्यावर आणि नंतर सकाळी उठल्यावर आपण बिछान्याचा सगळा घोळ करून ठेवतो.पण एक मात्र नक्कीच की,सकाळी उठल्यापासून,दिवसभर कामं करून करून हाडांचा चोळामोळा झाल्यावर रात्री नरम गुबगुबीत उशा घेऊन अंथरूणात अंग झोकून दिल्यावर जे काय बिछान्यात वाटतं ते आगळंच म्हणावं लागेल.

मोठी होत असताना हळूहळू अंथरूण-पांघरूण नीटनेटकं करून बिछाना तयार करण्याची कला मी माझ्या आई आणि आजीकडून शिकले.पण मी लहान होती त्यावेळी आजीबरोबर बकबक करीत असताना ती तिचं अंथरूण नीटनेटकं कशी करायची ते न्याहळंत असायची.”

मलाही तिच्या लहानपणाची आठवण आली.विशेषकरून आमच्या बिल्डिंगमधला जिन्या खालच्या धोब्याची. एकवेळ सूर्य जरा उशिरा उगवेल पण वसुधाच्या घरी हा धोबी सक्काळी आल्याशिवाय गत्यंतर नसायचं.वसुधाची आजी दरवाज्यात त्याची वाट पहात असायची.आणि त्याला जरा उशिर होईल असं भासल्यास त्याला ऐकायला जाईल अशा आवाजात आपल्या मोडक्या हिंदीत ओरडून सांगायची,
“भय्याजी,तुमकू कैसा समजता नही? आठ बजनेको आया.हमकू भी काम है!”
भय्या हे आजीचं वाक्य पुरं होण्यापूर्वीच येऊन ठपकायचा.हो,त्याचं बरोबर आहे.वसुधाची आजी त्याचं कायम गिर्‍हाईक होत ना!
मी वसुधाला तिच्या आजीच्या ह्या वाक्याची आठवण करून दिल्यावर मला म्हणाली,
“मला माझ्या आजीची खूपच आठवण येते.शिस्त आणि स्वच्छता म्हणजे काय ह्याचं बाळकडू आम्ही तिच्याकडूनच प्यालो.
तुम्हाला सांगते,”
असं म्हणत मला सांगू लागली,

“त्यावेळी आमच्या घरात,आठवड्याभरात चादरी किंवा उश्या खराब झाल्यातरच घरी धुतल्या जायच्या, नाहीतर आठवड्याच्या शेवटी सर्वांच्या अंथरूणावरच्या चादरी,उश्यांची कव्हरं आणि पांघरूणं नविसरता धुतली जायची आणि स्वच्छ घड्याकरून कपाटातल्या कप्प्यावर नीट डाळून ठेवली जायची.दर आठवड्याला बिल्डिंगमधल्या जिन्याखालच्या धोब्याकडून चादरीना आणि उश्यांच्या कव्हरांना इस्त्रीकरून सकाळीच त्या आणून द्यायचं धोब्याचं काम असायचं.”

“त्याचा अर्थ तुमचं कपाट बिछान्याच्या उश्या,चादरी आणि पांघरूणं ह्यानी भरून जात असेल नाही काय?”
मी वसुधाला कौतूक म्हणून प्रश्न केला

“हो अगदी बरोबर.ते कपाट खास ह्या गोष्टी ठेवण्यासाठीच होतं.
एक सेट धोब्याकडे दिला असताना दुसरा सेट वापरात असायचा.”
वसुधा म्हणाली.आणि आपल्या शालेय जीवनातली एक आठवण सांगताना मला म्हणाली,

“मला आठवतं मी एकदा दहा दिवस शाळेतल्या मुलींबरोबर ट्रिपला गेले होते.प्रत्येक खोलीत दोन मुली झोपायचो. प्रत्येकाने आपली खोली नीट ठेवायची आम्हाला आमच्या बाईंकडून ताकीद दिली गेली होती. खोलीतला माझा भाग अर्थातच मी व्यवस्थीत ठेवायची.
माझ्या बरोबरची मैत्रीण कुरकूरन का होईना माझ्या संगतीत अंथरूण-पांघरूण व्यवस्थीत कसं ठेवायचं ते ती शिकली. ट्रिप संपल्यानंतर ह्यासाठी तिने माझे निक्षून आभार मानल्याचं मला आठवतं.”

“ते तुझे जीवनातले दिवस पार पडून आता बरीच वर्षं होऊन गेली. आता तुझा संसार तू करायला लागली आहेस.तुझं स्वतःच घर झालं आहे.गंमतीत सांगतो,तुझी खोली हा तुझा गढ झाला आहे आणि तुझा बिछाना हा तुझा खोलीतला बुरूज झाला आहे.”
मी वसुधाला माझा विचार सांगीतला.

“मला आठवतं-त्यावेळी आमची मुलं लहान होती-आमच्या आनंदाच्या दिवसाचा मी, माझा नवरा आणि आमची तीन मुलं आमच्या बिछान्यात एकमेकाला लिपटून पहाटेच्या प्रहरी पेंगुळण्यापासून प्रारंभ करायचो.”
वसुधा सांगत होती,

“खरं पाहिलंत तर आमची मुलं ह्या जगात आली ती मऊ,लुसलूशीत बिछान्यासाठी व्याकूळ होऊनच आली अशी मी कधी कधी कल्पना करते.लहान असताना माझी मुलं सकाळीच बिछान्यातून उठायला फार कुरकूर करायची.
एखादा आमचा दुःखाचा दिवस आम्ही सर्व आमच्या बिछान्यात एकत्रीत होऊन देवाची प्रार्थना करण्यात संपवायचो.

बिछाना करणं हा माझ्या जीवनातला एक गंमतीदार दुवा आहे.
तो दुवा असल्याने त्या दुव्यात भरपूर आठवणी आणि दिलासे, तसंच कुटूंब आणि घर सामिल व्हायला मदत होते. मला माहित आहे नीट बिछाना करण्याने जग काही जिंकलं जात नाही पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”
तेव्हड्यात, वसुधेच्या एका मुलीने गरम गरम चहा आणि भजी आणून आमच्या समोर ठेवली आणि ती हंसत हंसत निघून गेली.
चहा घेता घेता आम्ही निराळ्याच विषयावर बोलायला लागलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com