Sunday, April 3, 2011

शांततेतून सुसंयोग.


“अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात.”

आज हवा फारच छान होती.तशी थोडी थंडी होती पण उन्हात बसल्यावर थंडी जाणवायची नाही.तळ्यावर जाऊन शांत बसून विचार करायला उत्तम चान्स आहे असं मनात आणून घरातून निघण्यापूर्वी प्रो.देसायाना फोन करून पहावं असं मला वाटलं.

फोनवर त्यांची पत्नी आली आणि म्हणाली,
“आत्ताच ते फिरायला म्हणून बाहेर पडले आहेत.बहुतेक तळ्यावरच जातील.”

मी तसाच निघालो.तळ्याजवळ आल्यावर आमच्या नेहमीच्या बाकावर भाऊसाहेब काहीतरी वाचत असल्याचं दिसलं.किशोर कदमच्या कविता वाचत होते.मला पण किशोरच्या कविता आवडतात.विशेषकरून त्यांनी पावसावर लिहिलेल्या कविता परत परत वाचाव्या असं वाटतं. आईवरही त्यांची सुंदर कविता आहे.

“तुमचं वाचून झाल्यावर मला वाचायला द्या”
मी प्रोफेसरना म्हणालो.
“तुमच्यासाठीच हे पुस्तक आणलं आहे.तुम्ही येईपर्यंत वाचत होतो.”
असं मला ते म्हणाले.

“किती शांत आहे सगळीकडे.मला अशी शांतता खूप आवडते”
असं मी माझ्या मनातलं त्यांना सांगीतलं.कुणास ठाऊक, माझं असं बोलून झाल्यावर, भाऊसाहेब विचारात पडल्यासारखे वाटले.

“मला पण शांतता आवडते.पण माझ्या मनातली शांतता वेगळीच आहे.मला त्या शांततेबद्दल विशेष वाटतं.पण ती क्लेशकारी,चिन्ताजनक,अनुपयुक्त शांतता नव्हे.कुठचंही भाषण ऐकण्यासाठी केलेली,आज्ञाकारी, शांतता तर नव्हेच नव्हे.निसर्गात निर्माण झालेली शांतता, जेव्हा पाळ्या-पाचोळाची कुरकर ऐकू येते,रात्रकिड्यांचा आवाज ऐकू येतो तीही शांतता अजिबात नाही.

शांतता जी निर्मळ शांतिप्रिय असते,ज्यावेळी सुनसान खामोशी असते आणि त्याबरोबर सुटकार येतो,चिंतन करता येतं,ज्यात श्रद्धा असते अशी शांतता मला भावते.

जेव्हा अशी निखालस शांतता असते,तेव्हा “आतला आवाज” अंततः आणि उपहासपूर्ण श्राव्य असतो.आणि त्यापुढेही जाऊन म्हणावसं वाटतं की हे चिंतन जे आपल्या मस्तकात भरलं जातं ते प्रत्यक्ष आपलं स्वतःचच असतं.हा विचार मनात येऊन हायसं वाटतं.”

प्रोफेसर देसाई मला काहीतरी शांततेबद्दल सुनावणार आहेत हे मी त्यावेळीच जाणलं.आपल्या हातातलं किशोर कदमचं पुस्तक माझ्याकडे देत म्हणाले,
“माझ्या लहानपणातल्या आठवणी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो.
खरं म्हणजे आमच्या कुटूंबात मी अगदी शेवटाला झोपी जाणारा असायचो.अगदी पहाटेला कोंबडा आरवेपर्यंत जागा राहून शांततेची परिसीमा असलेली, म्हणजेच ज्याला रात्र म्हणावी, तिचा पूरंपूर आनंद उपभोगायचो.शांततेने घेरला गेल्यामुळे माझ्या चिंतनाच्या प्रक्रियेसोबत, मग ती कोणताही आडवा-तिडवा मार्ग घेत असली तरी,राहिल्याने तिचा माझ्यावर दबाव यायचा.

बिछान्यावर अंग टेकल्याटेकल्या, दिसव उगवल्यानंतर प्रथमच उद्भवलेल्या घटनांच्या आठवणींची जंत्री सामोरी यायची.शाळासोबत्यांबरोबर झालेली चर्चा,बाचाबाची आणि त्यातून उद्भवलेले विचार,मी गणीतात आणि पदार्थविज्ञानात प्राविण्य मिळवल्याबद्दल माझ्या आईकडून झालेली माझी प्रशंसा.नंतर कदाचीत,माझ्या भवितव्याबद्दल होऊ घातलेली माझी सुरवात,उद्याबद्दल,कदाचीत लवकरच येणारी माझी कॉलेजातली वर्षं,जीवनातल्या मध्य भागात येऊ घातलेला संकटकाळ,किंवा माझा निवृत्तीचा विचार की मी कोकणातल्या आमच्या घरात राहून घालवायचा,का प्रवासी होऊन देशभर प्रवास करून काळ बितवायचा.असे विचार यायचे.

अश्या ह्या चिंतनात रात्रीचे एक दोन तास निघून गेल्यावर माझ्याच जीवनाबद्दल सर्वसाधारण विचार यायचे-जीवनाचं जास्त सुलभीकरण करण्यापासून काळजी घेत असतानाही डोळ्यासमोर उद्भवणार्‍या त्याच जीवनाच्या प्रतिमेबद्दलचं कुतूहल वाढायचं.

ह्या शांततेच्या काळात मी जीवनाचा खरा अर्थ काय असावा हे समजण्यासाठी माझ्याच विचारांशी सामना देत असायचो. तरीसुद्धा असल्या विचाराने माझ्या “आतल्या आवाजाचा” थरकाप व्ह्यायचा.मी चकरावून जायचो.
पण असं होण्यात खरी गोम अशी की माझ्या ह्या सतत बदलणार्‍या शांततेबरोबरच्या नात्याचा,सतत बदलणार्‍या विचारांच्या नात्यातून उगम व्हायचा.”

हे ऐकून मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“विचाराबद्दल म्हणता म्हणून माझ्या डोक्यात काय विचार आला ते सांगतो.
विचार करणं हे शक्तिशाली असतं.पण जर का काळजी घेतली नाही तर,सहजच आपण स्वतःचाच घबराट करून घेऊ शकतो. निष्कारण काळजी लागते,मन विचार करण्यापासून अलग होऊ शकतं.अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात. पण असं झालं तरी हे गंमतीदायक आहे असं निश्चीतच वाटतं. म्हणूनच,गुढ आणि भयानक रितीने कुणालाही अचंबीत व्हायला वेळ लागणार नाही. कुणाला कसं वाटावं, हे केवळ विचार केल्याने प्रभावित होत असावं.केवळ सक्रियतेने विचार केल्यामुळे एखाद्याच्या विचाराना स्पष्ट आणि निश्चित पूरावा मिळण्याचा संभव आहे”.

“वाः! तुमचा विचार मला आवडला.”
असं म्हणून प्रोफेसर मला म्हणाले,
“मला विचाराल तर,जास्त करून ह्या शांततेचा विचार हा एक उपचार आहे असं मी समजतो- त्या वयात माझ्या चंचल मनाला,माझा जीवनाबद्दलचा जो समज होता त्याला स्पष्टीकरण देऊ केलं जायचं.ही शांतता एक आव्हान आहे असं मला वाटायचं.हे आव्हान,माझ्या विचारावर, मी दुर्लक्ष करू नये म्हणून, दबाव आणायचं.मी माघार घेऊ नये म्हणून मला त्याचा सामना करायला दबाव आणत असावं असं मला वाटायचं.

जरी त्या काळात मी एकाकी असलो,अवती-भवती काही नसलं तरी त्या शांततेला मला घाबरून चाललं नसतं.उलटपक्षी,त्या शांततेकडे मी विचार करण्यासाठी मिळालेली संधी असं समजायचो-विचारासाठी आणि चिंतनासाठी.
असं करत असताना ही शांती आनंददायक वाटायची. निश्चितच,मी माझं मन गुंतवायला बघायचो. त्यातच मला शांती मिळायची.आणि असं होता होता शांत झोपून जायची वेळ आलेली असायची.”

“माझंही असं कित्येकदा झालं असणार.अनेक रात्री मी पहाटेची झोप येईपर्यंत विचार करीत असणार. पण तुम्ही ज्या पद्धतिने रात्रीच्या त्या तुमच्या शांततेचा विचार करायचा हे वाखाणण्या सारखं आहे.”
असं मी प्रो.देसायाना म्हणालो.

“कसचं कसचं”
असं म्हणत रात्र होत आली आपण आता निघूया असं बाकावरून उठून मला प्रोफसरानी दर्शवलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com