Wednesday, April 6, 2011

वाट चुकलेली.

त्यादिवशी मी आणि स्वाती “नेचर” वर एक टीव्ही कार्यक्रम बघत होतो.जपानी लोक जवळच्या समुद्रात देवमास्यांची शिकार करतात.असंख्य देवमासे पकडून त्यांच्या मासाचं जेवणात वापर करतात.देवमास्याची डीश “डेलीकसी” म्हणू जास्त किंमतीत विकतात.पर्यावरणवादी लोक, जपानी लोकांनी असं करू नये म्हणून,समुद्रात त्यांच्या शिकार करण्याच्या जागी जाऊन त्यांना विरोध करीत असतात.काहीवेळा एकमेकाच्या बोटी भर समुद्रात एकमेकावर आदळतात.त्यात हानीही होते.असा तो कार्यक्रम होता.

हे सर्व दृश्य टेव्हीवर पाहून झाल्यावर,स्वाती मला म्हणाली,
“ह्या देवमास्यावरून मला माझ्या लहानपणाची आठवण आली. पण ते सांगण्यापूर्वी अलीकडेच मी देवमास्यावर एक बातमी वाचली ती सांगते.ती अशी की एक चाळीस फूट लांबीचा देवमासा समुद्रात पोहत असताना चुकून असं वळण घेतो की तो समुद्राच्या जवळच्या खाडीत येऊन थांबतो.ही घटना वाचून, देवमासा वाट चुकू शकतो हे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.

खरंतर लहानपणी वाट चुकण्याच्या माझ्या संवयीचं मी इतकं मनाला लावून घेतलं नव्हतं.
तो मासा खाडीच्या किनार्‍याला चिपकून थांबला होता.गावातल्या वर्तमानपत्रात बातमी आल्याने देवमासा पहायला खूप गर्दी जमली होती.काही लोकानी त्या मास्याचं नामकरणसुद्धा केलं होतं.त्याला त्याचं नाव त्यांनी “कुबड्या” असं दिलं होतं.कारण एव्हड्या लांब मास्याच्या पाठीवर एक कुबड होतं.
समुद्रातल्या सस्तन मास्यांवर संशोधन करणारे शहरातले शास्त्रज्ञ मुद्दाम गावात येऊन त्याची पहाणी करीत होते.तो मासा एक “बाई” होती आणि ती गरोदरपण होती. त्यांच्याबरोबर येताना त्या शास्त्रज्ञानी रेकॉर्ड केलेली देवमास्याची गाणी (आवाज) आणली होती.पाण्याखाली कर्णा ठेवून गाणी मोठ्याने वाजवली जात होती.कदाचीत तो मासा ती गाणी ऐकून तिथून वळण घेऊन परत समुद्रात जाईल असा त्यांचा कयास होता.एका क्षणाला त्या गाण्यांचा आवाज त्या देवमास्याला एव्हडा कर्कश वाटला असावा की त्या मास्याने आपली शेपटी पाण्याबाहेर उंच उभारून पाण्यावर आपटून सर्व बघ्यांना घाबरवून सोडलं होतं.
जणू तो देवमासा सांगत असावा की,
“मला जरा शांतता द्या”
नंतर त्याची तयारी झाल्याबरोबर त्याने पुलटी मारली आणि तो देवमासा भर्कन समुद्राच्या दिशेने वेगाने निघून गेला.

ह्या देवमास्यासारखं मला माझ्या लहानपणी आमच्या शेजारात असंच चुकायला व्हायचं.मी ज्यावेळी सहा वर्षाची होते तेव्हा आमच्या घरातून शाळेत जायला बाहेर पडले असताना त्या एक मैलाच्या वाटेत मी चुकायची.तशी माझ्या शाळेकडची वाट एव्हडी काही खिचकट नव्हती. भाजी-बाजार आणि मासळी-बाजार संपून गेल्यावर उतार यायचा.उतार संपल्यावर एक तळं दिसायचं.तळ्याच्या डावीकडे आणि पुढे उजवीकडे वळण घेतल्यावर माझी शाळा यायची.

पण वाटेत खूप बघण्यासारख्या गोष्टी असायच्या.तळ्यात डुबकत असलेल्या कोळ्यांच्या रंगीबेरंगी होड्या दिसायच्या.होड्यांच्या शीडावर विचीत्र अक्षरात लिहिलेली होड्यांच्या मालकांची नावं वाचायला मजा यायची.
एखाद वेळेला मी नादात डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळली असावी.आणि पुढे उलटं केलं असावं.कारण एकाएकी अनोळखी घरं दिसायला लागली होती.आणि असं माझं बरेच वेळा व्हायचं. कुठे जाऊन आल्यावर परत त्याच ठिकाणी जाताना वाट चुकली जायची.

इतर लोक त्या वयातल्या माझ्या वाटचुकण्याच्या संवयीकडे पाहून माझ्यात काहीतरी समस्या आहे असं वाटून घ्यायचे.
मला नकाशा जवळ ठेव किंवा कुणाला तरी बरोबर घेऊन जावं असा उपदेश द्यायचे.कालांतराने चुकलेली वाट सुधारणं मला यक्श्चीत वाटायचं.विचार केला तर त्या सहा वर्षाच्या वयात मला माहित होतं की कुणाच्यातरी घरी जाऊन त्यांना विचारल्यावर मला चुकीच्या मार्गावरून माझ्याच मार्गावर जायला त्यांच्याकडून मदत होऊ शकते.

माझे हितचिंतक एक विसरायचे की वाट चुकणं हा मला मिळालेला एक उपहार होता.वाट चूकणं हा आश्चर्य दिसण्यासाठीचा एक प्रारंभ असतो.
काही चमत्कार जन्माला येत असताना ते पाहिल्याची साक्ष असण्याची जरूरी असते असं मला वाटतं.काळ दुभंगत असताना लक्ष देण्यासाठी मला दिलेलं आमंत्रण असायचं.

कुणाचाही दरवाजा खटखटून,एखादा नकाशा जवळ ठेवून किंवा एखाद्या सहकार देणार्‍या अनोळख्याला योग्य दिशा विचारता येतात आणि योग्य वाटेने जाता येतं ह्याची मला खात्री असायची.
खरा अर्थ मी असा काढला आहे की,जीवनात वाट चुकण्यापेक्षाही आणखी काही गंभीर गोष्टी होऊ शकतात.म्हणून,जीवानात मार्गनिर्देशन करण्याऐवजी आलोकन करावं असं मला मनोमन वाटतं.”

“देवमास्यावरून स्वाती मला काहीतरी नवीन सांगून गेली हे मात्र नक्की.”असं मी माझ्या मनात म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com