Thursday, April 21, 2011

कार्यरत करणारी सकाळ.

“तसंच जीवनात उतावळेपणाने न वागता, आहे तसंच जीवन उपभोगायला, हे आंघोळीचे क्षण, मदत करतात.आणि पुन्हा उद्या उजाडल्यावर मला प्रयत्नात राहून ती यादी संपूष्टात आणता येतेच ते अलायदा.”

पद्मा एका फायनान्स कंपनीत व्हिपी आहे.मला थोडी गुंतवणूक करायची होती.म्हटलं पद्माच्या ओळखीचा फायदा घ्यावा.म्हणून तिच्या नरिमनपॉइन्ट्वरच्या ऑफिसात तिला भेटायला गेलो होतो.पद्मा तिच्या कॅबिनमधे नव्हती.तिचा पिये म्हणाला,
“तुम्ही त्यांची अपॉइन्टमेन्ट घेऊनच या”
तशीच मी पुढल्या आठवड्यातल्या गुरवारची अपॉइन्टमेन्ट घेतली.त्या गुरवारी माझी वाट पहात पद्मा बसली होती.मला पाहिल्यावर तिला फारच आनंद झाला.खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो.

इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यात वेळ गेला.मुद्याचं बोलण्यापूर्वी तिच्या बॉसचं तिला बोलावणं आलं.उठताना मला म्हणाली,
“ह्या रवीवारी माझ्या घरीच या.मी तुमची वाट पाहिन.शिवाय माझ्या बाबांना तुम्हाला भेटून खूप बरं वाटेल.”
बरं म्हणून मी ऊठलो.

त्या रवीवारी तिच्या घरी मी लवकरच गेलो.ती पेडर रोडवर रहाते.बेल वाजवल्यावर तिच्या बाबांनीच दरवाजा उघडला.मला पाहून ते खूश झाले.
“सकाळीच मी तुम्हाला उठवलं नाही ना?पद्माचीपण झोपमोड केली की काय?”
मी तिच्या बाबांना म्हणालो.

“अहो कसली झोपमोड?पद्मा केव्हाचीच उठलेली असते.मग रवीवार असो की आणखी कोणता दिवस असो.उठल्याबरोबर ती प्रथम आंघोळीला जाणार.”
पद्माच्या बाबांनी मला रोखठोख सांगीतलं.
तेव्हड्यात पद्मा तीन कप चहाची ट्रे घेऊन आली.

माझ्याजवळ चहाचा कप पूढे करीत पद्मा मला म्हणाली,
“माझे बाबा सांगतायेत ते अगदी खरं आहे.मी सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय दुसर्‍या कसल्याच कामाला लागत नाही.ही सवय मी माझ्या आजीकडून घेतली आहे.”
असं म्हणून पुढे सांगू लागली,
“आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाबद्दल मला विशेष वाटतं.
दिवस उजाडल्यावर काही लोकाना सकाळीच एक कप कॉफी प्यायला किंवा ताजं वर्तमानपत्र वाचायला हवं असतं.मला मात्र सकाळीच आंघोळीची जरूरी वाटते.उगवलेल्या दिवसासाठी सुचणार्‍या विचारातले काही उत्तम विचार मला ह्या नेहमीच्याच,साध्यासुध्या आंघोळीच्यावेळीच सुचतात.नित्य-दिन -कामं करायची यादी मी ह्याचवेळी करते.दूरवरच्या कामाची आंखणी मी ह्याचवेळी करते.उदा.ह्या आठवड्यात मिटिंग कुठच्या शहरात आहे?तिकडे जाण्याच्या तिकीटाची व्यवस्था वगैरे.”

“पण हे सगळं तुझ्या लक्षात कसं रहातं?”
मी तिला विचारलं.
मला म्हणाली,
“पण ह्या आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाची एक कटकट म्हणजे,टॉवेल गुंडाळून मी बाथरूमच्या बाहेर आले, की ते क्षण आणि त्यावेळचे विचार संपुष्टात येतात.जसे रात्री झोपण्यापूर्वीचे झटकन विसरून जाणारे विचार येतात अगदी तसे.जरका मी कागद आणि पेन घेऊन बाथरूमात गेले नाही आणि विचार टिपले नाहीत तर शेवटी ते विचार मी विसरून जाते,कधीकधी काहीसे अंधूकसे हे विचार आतल्या मनात आठवण म्हणून रहातात एव्हडंच.दिनचर्या चालू झाल्यावर मी माझे नित्य-कार्यक्रम संपवीन किंवा कसं हे जवळ जवळ माझ्या मनातल्या हेतू ऐवजी माझ्या नशिबावरच अवलंबून असतं.

परंतु,माझे प्रयत्न निरर्थक जात नाहीत.आंघोळीमुळे माझ्ं शरीर साफ होतं एव्हडंच नाही तर माझा उत्साहपण ताजा-तवाना होतो.मी सकाळी उठते आणि माझ्या डोक्यातली पुस्सट झोप साफ करते.नित्य-कर्माच्या तयार केलेल्या यादी पलिकडे जाऊन त्या दिवसाचं माझं लक्ष्य गाठण्यासाठी मला हवी ती शांतता मला इथेच मिळू शकते.त्या खास दिवसाविषयी विचार करून मग तो दिवस कसा घालवावा याचा विचार करायची मुभा मला इथेच मिळते.

एखाद्या ग्रिटिंग-कार्डावर लिहिलेल्या मजकूरासारखा लहान लहान गोष्टींचा विचार करून माझंच मला मी समजावून घेते.-आयुष्यात समतोल वृत्तिने रहावं,लहान मुलांच्या नजरेतून जगाकडे पहावं,कुंडीतल्या कुठच्या रोपाना फुलं येऊ घातली आहेत,वगैरे.”

माझी मुलं ज्यावेळी लहान होती त्यावेळी मी गृहिणी म्हणून घरातच असायची.शेजार मला नवाच होता.काही मैत्रिणी मिळवल्या आणि काही कामं काढून दिवस हेतुःपूरस्सर संपवायची. आता दहा वर्षानंतर ते दिवस मला आठवतात आणि त्या दिवसाना मुकल्यासारखं वाटतं.पण ते दिवस कष्टाचे-हालाचे होते हे मला माहित होतं.निसुक होऊन बिछान्याला पाठ टेकवायची,थकवा यायचा,आणि वाटायचं ह्यालाच म्हणावं का जीवन?.आणि दुसरा दिवस उजाडल्यावर-बहूदा कुणाकडून तरी “आई!” अशी- हांक ऐकायला यायची.बाथरूमकडे धाव घ्यायची.आणि मनात पहिला विचार यायचा,
“होय!,हा नवीन दिवस उजाडला आहे,सर्व काही ठिक होणार आहे.आजचं साहस काय होणार आहे ते मात्र माहित नाही.”

आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाबद्दल मला विशेष वाटतं,कारण ते क्षण त्यानंतर मला ताजी-तवानी करून,माझ्या क्षमतेच्या आणि हेतूंच्या तजवीजीला लागण्यासाठी मदत करतात. आंघोळीचे क्षण मला, नम्र रहाण्याचं,आई म्हणून आणि पत्नी म्हणून संतोषी रहाण्याचं,माझी अडखळलेली कामं पुर्णत्वाला आणण्याच्या क्षमतेचं आणि संवेदनाशील असताना आजुबाजूला असलेल्या वयस्करांना आठवणीत ठेवण्याचं प्रोत्साहन देतात.

जरी कदाचीत,माझ्या रोजच्या ज्या काही योजना असतात त्या साध्य करायाला किंवा त्यात प्रगती करायला मला जमलं नाही तरी मामुली दिसणारे हे नित्याचे आंघोळीचे क्षण मला मनःशांती आणि चिंतन करायला लाभदायक ठरतात.त्यामुळे माझ्या जीवनाची आणि त्यात सामावून गेलेल्या इतरांची कदर करायला मला क्षमता देतात.
तसंच जीवनात उतावळेपणाने न वागता आहे तसंच जीवन उपभोगायला, हे आंघोळीचे क्षण, मदत करतात.आणि पुन्हा उद्या उजाडल्यावर मला प्रयत्नात राहून ती यादी संपूष्टात आणता येतेच ते अलायदा.”

मी पद्माशी अशाच गप्पा मारीत बसलो तर माझं मुळ काम पूर्ण होणार नाही असं माझ्या मनात येईतोपर्यंत पद्माच म्हणाली,
“मी माझं हे आंघोळीचं पूराण सांगत बसली तर त्यादिवसासारखं व्हायचं.तुमचे कागद मला द्या.मी वाचून झाल्यावर त्यावर निर्णय घेऊन तुम्हाला सांगते.”

“नक्कीच उद्याच्या तुझ्या आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणात माझा विषय तुझ्या यादीत आण म्हणजे झालं.”
असं हसत हसत म्हणत मी उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com