Saturday, April 9, 2011

आला खुशीत समिंदर.

“ज्यांनी समुद्र त्यांच्या जन्मात कधीच पाहिला नव्हता, ते समुद्राला प्रथमच पाहून आपआपसात बोलत होते,
” ऐसे कितने गंगामय्याके पानी ये एक सागरके लिये पुरा होगा.”

माझा मित्र गिरीश पै याने गोव्याला एका बिचवर एक टुमदार घर बांधलं आहे.मला तो ते त्याचं घर बांधत असताना येऊन बघून जा म्हणून कित्येकदा सांगायचा.

“त्यावेळी नाही आलास.पण आता निदान त्या घरात गृहप्रवेश करताना तरी तू येऊन जावंस.गृहप्रवेश हा एक सोपास्कार आहे.गेले दोन तीन महिने मी माझ्या घरात रहात आहे. समुद्राकडे पाहून माझ्या मनात आलेले विचार तुला सांगावेत ही माझी मनोमन इच्छा आहे.”
असं मला आवर्जून म्हणाला.
ह्यावेळी वेळात वेळ काढून मी त्याच्या गोव्याच्या घरात रहायला गेलो होतो.

मला समुद्राचं किती वेड आहे ते गिरीशला पूर्वी पासून माहित होतं.कोकणातला समुद्र,मुंबईचा समुद्र आणि गोव्यातला समुद्र ही व्हेकेशनमधे रहाण्याची माझी ठिकाणं असायची हेही त्याला माहित होतं.गिरीशलाही माझ्यासारखं समुद्राचं वेड आहे.म्हणूनच त्याने गोव्याला घर बांधलं.

मला म्हणाला,
“मला नेहमीच वाटत असतं की समुद्राचा आणि माणसाचा गुतागुंतीचा लागाबांधा असावा. पुढे असंही वाटतं की समुद्राशी आणि आपल्या नित्य जीवनाशी हा लागाबांधा शारीरिक आणि आध्यात्मिक असा असावा.माझ्या जीवनात हा समुद्राशी असलेला लागाबांधा ठळकपणे उघडकीला आलेला आहे असं मला वाटतं.समुद्रापासून दूर रहायला मी कधीच राजी होत नाही.म्हणून मी इथे घर बांधलं.”

मी गिरीशला म्हणालो,
“माझ्या वाचनातून माझ्या लक्षात आलं आहे की,जीवनाची उत्पत्ति समुद्रातून झाली आहे. जीवनाच्या उभयरोधी रसायनाच्या पाहिल्या पेशींचं पोषण होण्याच्या दृष्टीने समुद्र हा अगदी समर्पक माध्यम असावं.त्या पेशींचं अनुकरण माणसाच्या प्रत्येक पेशीतल्या द्रवपदार्थात फैलावलेलं असतं.
माझं शरीर, माझ्या अतिसंवेदनशील काळात,समुद्राची प्रतिलिपी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ति होऊ नये. माझ्या आईच्या उदरात मी विकसित होत असताना तिच्या गर्भाशयातल्या लवणयुक्त द्रवात मी बुडून गेलेलो असतानाच्या वेळेपासून ते डोळ्यातल्या अश्रूने माझे डोळे साफ-स्वच्छ करेपर्यंत, माझ्या वेदना दूर करेपर्यंत आणि माझा आत्मा प्रकट होई पर्यंत,मी माझ्याबरोबर समुद्राला घेऊन असतो.”

समुद्राबद्दलचं माझं हे मत ऐकून गिरीश भारावल्यासारखा दिसला.आपला अनुभव सांगताना मला म्हणाला,
“पालन-पोषणाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास,समुद्र सुखदायी मुळीच नाही.तो भीतीदायक असतो, असतो,रहस्यमय असतो,शांत असतो,मानून घेणारा असतो,तरीपण भु-भागावरच्या जीवनाला प्रतिकूल असूनही तो मला मात्र आधार वाटतो. रोज माझ्या घरातल्या खिडकीतून मी त्याला न्याहाळत असतो.
कोळ्यांच्या अनेक होड्या रात्रभर दूरवर पाण्यात राहून,सकाळीच जेव्हा टोपल्या भरभरून अनेक तर्‍हेचे मासे कोळी घेऊन येतात ते पाहून माझं मलाच हसू येत असतं.समुद्र आपल्या पोटातून काढलेलं अन्न, आनंदाने इतर जीव-जंतुना पुरवीत असतो.त्याचबरोबर ते मेलेले असंख्य मासे पाहून माझ्या मनात खेदही होतो.समुद्रात पोहत असताना अनेक प्रचंड लाटावर आरूढ होऊन भीत-भीत माझ्या मला मी पाण्यावर झोकून दिलेलं आहे ते मला आठवतं. समुद्राचं ते भयंकर रूप मी न्याहाळल्ं आहे.परंतु,समुद्राविना माझं जीवन अपूरं आहे.एक प्रकारची आध्यात्मिक क्षमता मी समुद्राकडून मिळवली आहे.माझ्या अगोदर पिढ्यानपिढ्यानी हे अनुभवलं आहे.”

“मी पण समुद्रावर खूप लोकांचं लेखन वाचलेलं आहे.”
असं म्हणून मी गिरीशला पुढे सांगीतलं,
“आतापर्यंतच्या अभिलिखित इतिहासावरून आणि निरनीराळ्या संस्कृतीतून आढळत आलेल्या समुद्राच्या रहस्यमयतेमुळे आणि प्रधानलक्षणामुळे, समुद्रानेच, अनेक लोकप्रिय कथालेखनात आणि आध्यात्मिक शिकवणूकीत, आपलं स्वतःचं स्थान अढळ करून ठेवलं आहे.”

“हे तुमचं वाचन झालं.पण मी माझं प्रत्यक्ष अनुभवलेलं सांगतो”
असं सांगत गिरीश मला म्हणाला,
“मला वाटतं,समुद्राकडे लोक आजही जेव्हडे आकर्षित होत आहेत तेव्हडेच अनादिकालापासून आकर्षित होत असावेत.मी रोज माझ्या घरातून पहात असतो की देशातल्या सर्व भागातून लोक समुद्र-दर्शन घ्यायला येत असतात.एव्हडा मोठा पाण्याचा साठा पाहून अचंबीत होत असतात. त्यांच्या गावातल्या नदीच्या पाण्याच्या किती पटीने हे समुद्रातलं पाणी असेल अशी स्वतःच्याच मनात पृच्छा करीत असतात.एकदा मला आठवतं उत्तर-प्रदेशमधून आलेलं एक कुटूंब, ज्यांनी समुद्र त्यांच्या जन्मात कधीच पाहिला नव्हता, ते समुद्राला प्रथमच पाहून आपआपसात बोलत होते,
“ऐसे कितने गंगामय्याके पानी ये एक सागरके लिये पुरा होगा.”

समुद्राला पाहून माणूस आपल्या स्वतःला समुद्राचा एक भाग आहे असं समजून रहातो.
मला वाटतं,ते समुद्र पहायला येतात कारण गुंतागुंतीच्या लागाबांध्याने ते समुद्राशी एकरूप असतात.आणि मला हेही वाटतं की समुद्राद्वारा आपण सर्व गुंतागुंतीने एकमेकाशी लागाबांधा ठेवून आहोत.

शास्त्रीयदृष्ट्या,मी समुद्राकडे पहात असताना, आध्यात्मिक दृष्ट्या मी मानवी समुदायाकडे पहात असतो आणि त्यावर भरवसा ठेवतो.समुद्राकडे असलेला आपला लागाबांधा आणि आपआपसातला आपला लागाबांधा, निरंतर प्रजाति म्हणून रहाण्यातलं आपलं यश ह्याचं, हे प्रतिक आहे असं मला वाटत असलं तर त्यात काही गैर होईल असं वाटत नाही.

मी माझ्या घराच्या खिडकीतून रोज समुद्राकडे पहात असताना,समुद्राशी,पृथ्वीशी आणि एकमेकाशी असलेल्या ह्या लागाबांध्याचा विचार माझ्या मनात आणून हे कुणालातरी समजावून सांगत रहावं असं मला वाटत असतं.”

मी गिरीशला हसत हसत म्हणालो,
“म्हणजे आज तू मला हे सर्व सांगून सुखावला असशील हे निश्चित आहे तर.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com