Sunday, April 24, 2011

कोकणातली फुलं.

“फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”

अरूणला फुलांविषयी विशेष वाटतं हे मला माहित होतं.त्यादिवशी असाच फुलांवरून विषय निघाला.त्याला मी म्हणालो तुला फुलं आणि फुलांचे प्रकार पहायचे असतील ह्या वेळी तू माझ्या बरोबर कोकणात ये.अरूणने कोकण कधीच पाहिलं नव्हतं.मुंबईला जन्माला आला आणि मोठा झाला.
“आमची -सिकेपी लोकांची-वसाहत फारफारतर ठाण्यापर्यंत पसरली आहे.एकवीरा आमची देवी. माणिकप्रभू आमचे गुरू.कोकणातून येणारे आंबे आणि फळफळावळ जी मुंबईत येते त्यावरून कोकणाचा संबंध येतो.”
अरूण मला म्हणाला.

“पण फुलांसाठी तुला मे महिन्यात कोकणात यावं लागेल.आंबे गरे आणि इतर फळं तुला त्यावेळी तिथे मिळतीलच,पण अनेक तर्‍हेची फूलं पहायला निश्चीतच मिळतील.”
मी असं म्हणाल्यावर माझ्याबरोबर ह्या मे महिन्यात अरूण कोकणात यायला कबूल झाला.

अशी निरनीराळ्या जातीची फूलं अरूणने पहिल्यांदाच पाहिली.वेंगुर्ल्याच्या बाजारात नेऊन मी त्याला विकायला आलेल्या फुलांच्या जाती दाखवल्या.
पुस्सट लाल रंगाची आणि भडक लाल रंगाची आबोली,पांढरी आणि सफेद रंगाची शेवंती,
सुरंगीचे वळेसार,नाग चाफा-सफेद पाकळ्या आणि मधे पिवळं जर्द फूल,नाग चाफयाला तर एव्हडा सुगंधी वास की नको त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुलाभोवती भूंग्या सारख्या गुजन करीत रहायच्या.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसं वाटायचं.तिच स्थिती सुरंगीच्या वळेसाराची.कोकणात फुलांच्या वेणीला वळेसार असं म्हणतात.वळेसार आणि वेणी यांच्या बनावटीत थोडा फरक असतो.

चाफ्याचा आणखी किती जाती-पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवठी चाफा,
त्यानंतरआणखी फूलं म्हणजे ओवळं,सुरंगी,लालआबोली,मोगरा,जाई,जूई,तगडीची फुलं-ही फुलं थेट जाई-जुई सारखी दिसतात पण ह्यांना कसलाही सुवास नसतो.मुंबईत ही फुलं खूप स्वस्त असतात म्हणून फुलवाले जाईच्या वेणीमधे तगडीचीच फुलं जास्त ओवून जाईची वेणी म्हणून विकतात आणि फसणारे फसतात.प्राज्क्ताची फुलं,रात्रराणी,कृष्णकमळ,साध कमळ कण्हेरीची फुलं,नीशीगंधाची फुलं,घाणेरीची फुलं-ह्या फुलांना खूप मोहक वास येतो.जास्वंदीची फूलं-ही फुलं जास्त करून देवाला वाहतात,ह्यांना सुगंध मुळीच नसतो पण दिसायला रंगाने लालबूंद आणि छान दिसतात.
दुसरी कोकणातच दिसणारी फुलांची जात म्हणजे ओवळं.
ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळभर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfume सुद्धा मागे पडेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी महती आहे की म्हणतात ह्या फूलाच्या झुडपात सापाचे वास्तव्य असतं.ते त्या फुलाच्या
वासामुळे की अन्य काही कारणामुळे आहे हे मात्र कळलं नाही.गुलाबाच्या असंख्य जाती आहेत पण अरूणला मी लालगुलाब,पिवळा गुलाब,सफेद गुलाब,काळा गुलाब दाखवू शकलो.
मी अरूणला म्हणालो,
“ही फुलं मला आढळलेली आणि मला माहित असलेली आहेत.यापेक्षा खूप जातीची फुलं कोकणात असतील.”

हे सगळं पाहून झाल्यावर मला अरूण म्हणाला,
“मला फुलांविषयी विशेष वाटतं.मला वाटतं फुलांचा उपयोग एकमेकाशी दुवा साधायला चांगलं साधन आहे. देवांना तर आपण त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करीत असतो.गणपतीला लाल रंगाचं फूल,कृष्णाला,लक्ष्मीला कमळाचं फूल आवडतं.
फुलांच्या रंगावरून ते कशाचं प्रतीक आहे हे दाखवता येतं.
गुलाबाचं फूल आनंद आणि मनोहरता दाखवतं, पांढरं-सफेद फूल दिलासा देतं.
फूलं देण्या-घेण्याने आनंद तर मिळतोच शिवाय व्यक्तीची वृत्ति दिसून येते.व्हॅलेंनटाईन दिवशी तरूण-तरूणीच नव्हे तर कुणीही कुणाला फूलं देत-घेत असतं.अशावेळी फूलं देऊन एकमेकावरचं प्रेम दाखवता येतं.”

मी अरूणचं हे ऐकून भुतकाळात गेलो.मी त्याला म्हणालो,
“फुलांमधून आठवणी जागवल्या जातात.मला आठवतं आमच्या लहानपणी आमचे आजोबा आमच्या गावात आले की आम्हाला शेवंतीचे रोप आणून द्यायचे.लागलीच आम्ही ते आमच्या बागेत लावायचो.आता आमचे आजोबा हयात नाहीत पण पिवळी जर्द आणि पांढरी शुभ्र शेवंती बहराला आल्यावर आम्हाला आमच्या आजोबांची निक्षून आठवणी येतात.

आमच्या आजीला जाई-जुई खूप आवडायच्या.माझ्या आजोळी तिने घराच्या पुढच्या पडवीत आणि मागच्या अंगणात जाई-जुईचे वेल लावले होते.आता आमची आजी नाही.पण आजोळाला गेल्यावर पडवीत बसल्यावर वार्‍याच्या झोतीबरोबर जेव्हा त्या फुलांचा वास नाकात शिरतो तेव्हा त्या वासाबरोबरआजी डोळ्यासमोर येऊन जाते.

मला वाटतं फूल प्रत्येकाच्या व्यक्तीत्वाला प्रेरीत करतं.मला असं वाटण्याचं कारण सर्व फूलं वेगळी वेगळी असतात.त्यांचा सुवास,बनावट,आकार,विस्तार आणि रंग हे त्यांचं वैशिष्ट असतं आणि त्यात खूबी असती.एव्हडच नाहीतर सारख्याच जातीची फूलंसुद्धा थोडी वेगळी असतात. गुलबहाराची फुलं पाहिलीत तर त्यात विभिन्नता जाणवते.ह्या फुलात रंग आणि छटा वेगळ्या असतात तसंच,पाकळ्यांचा आकार आणि पाकळ्यांची संख्या वेगळ्या असतात वगैरे. निरनीराळी फूलं एकाच ठिकाणी उगवली तरी नव्या वातावरणात ती सामावून जातात.”

मला अरूण म्हणाला,
“माझ्या मनात येतं,माणसं जरका ह्या दृष्टीने फुलांसारखी असती तर जग किती चांगलं झालं असतं.
ज्या घराच्या समोर उत्तम फुलांचा, रंगीबेरंगी फुलांचा बगीचादिसला की चटकन घरमालकाच्या व्यक्तित्वाचं लक्षण दिसतं.बगीचा नीट आणि अनोखा दिसला की समजावं माळीच तसा असणार. बगीच्यात जरका झगझगीत रंगाची फूलं दिसली आणि असाधारण रोपं असली की समजावं त्या बगीच्याचा मालक गमतीदार आणि धाडसी असावा.
थोडक्यात,माझ्या दृष्टीने फुलं माणसाच्या जीवनात विशिष्ट स्थान ठेवून असतात.म्हणूनच फुलांचा आणि बगीच्याची कदर केली पाहिजे.फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”

मी अरूणला म्हणालो,
“मी लहानपणापासून कोकणातली ही फुलं पहात गेलो आहे.पण तुझं फुलांबद्दलचं तत्वज्ञान ऐकून ह्या सर्व फुलांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे.आता मी मिळेल त्या फुलाकडे नुसतं त्याचा वास घेऊन रहाणार नाही,प्रत्येक फूल काय संदेश देईल का हे कुतूहलाने पाहिन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com